उद्धव ठाकरे सरकारः शिवसेनेचं हिंदुत्व काँग्रेसला झेपणार का?

शिव सेना

फोटो स्रोत, Getty Images

सरदार पटेल देशाचे पहिले पंतप्रधान असते तर आज भारतालं चित्र काहीसं वेगळं असतं असं 20 ऑक्टोबर 2013ला नरेंद्र मोदींनी तेव्हाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत म्हटलं होतं.

त्याच वर्षीच्या सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी एक विधान केलं. स्वातंत्र्यवीर सावरकर देशाचे पहिले पंतप्रधान असते तर पाकिस्तान अस्तित्त्वातच आला नसता, असं ते म्हणाले.

सावकरांना भारतरत्न देण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली होती. सत्तेत आल्यास सावरकरांना भारतरत्न देऊ, असं भाजपनेही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी तयार केलेल्या आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं. तेव्हा हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवत होते आणि या युतीचा विजय करून देण्याचं आवाहन लोकांना करण्यात येत होतं.

नरेंद्र मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये जम्मू-काश्मीर राज्याचा विशेष दर्जा हटवला, तेव्हा शिवसेनेने त्यांना जाहीर पाठिंबा दिला होता. 'काश्मीर मुसलमानांना आंदण म्हणून दिलं जाऊ शकत नाही', असं शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामनात लिहिण्यात आलं होतं.

बाळासाहेब ठाकरेंनीही बाबरी मशीद पाडण्याचं समर्थन केलं होतं आणि यामध्ये शिवसैनिकांनीही सहभाग घेतल्याचा दावा त्यांनी केला होता. बाबरी मशिदीच्या विरोधात लोकांना एकत्र करण्यामध्ये भाजपचे अनेक नेते सामील होते.

शिवसेना

फोटो स्रोत, @ShivSena

सावरकरांचा अपमान केल्यामुळे काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांना जोडे मारायला हवेत असंही यावर्षीच्या सप्टेंबरमध्ये उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. सावरकरांनी 'टू नेशन थिअरी'चा प्रस्ताव मांडला होता असं मणिशंकर अय्यर यांनी 2018मध्ये म्हटलं होतं.

सावरकरांविषयीच्या एका पुस्तकाच्या अनावरण सोहळ्यात उद्धव ठाकरे म्हणाले होते, "जर सावरकर या देशाचे पंतप्रधान असते तर पाकिस्तानचा जन्मच झाला नसता. आमचं सरकार हिंदुत्वावर आधारित आहे आणि आम्ही त्यांना भारतरत्न देण्याची मागणी करतो. "

गांधीहत्या प्रकरणामध्ये सावरकर सहआरोपी होते. कोर्टाने नथुराम विनायक गोडसे आणि नारायण दत्तात्रय आपटे या दोघांना फाशीची शिक्षा दिली होती. विष्णू आर. करकरे, मदनलाल पहावा, शंकर किस्तय्या, गोपाळ गोडसे आणि डॉ. दत्तात्रय सदाशिव परचुरे या सगळ्यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. तर पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्याने न्यायाधीशांनी विनायक दामोदर सावरकर यांना निर्दोष ठरवलं होतं. सावरकर हिंदुत्ववादी होते.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

पण सावकरांना निर्दोष ठरवण्यात येण्याविषयी अनेकांनी सवाल उपस्थित केले आहेत. 'लेट्स किल गांधी' या आपल्या पुस्तकात तुषार गांधी लिहितात, "गांधी हत्येच्या प्रकरणातून विनायक दामोदर सावरकरांना सोडून देण्यात येण्याविषयी विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. सावकरांच्या विरोधात पुरेसा तपास करण्यात आला नाही. सावरकर दोषी आढळले असते तर मुसलमानांसाठी ते अडचणीचं ठरलं असतं आणि ते हिंदूंचा राग झेलू शकले नसते, ही गोष्टी पटेल यांनीही स्विकारली होती."

आता हीच शिवसेना काँग्रेसच्या सोबतीने सरकार स्थापन करत आहे. उद्धव मुख्यमंत्री होणार आहेत आणि हे काँग्रेसमुळे घडतंय. मग आता असा प्रश्न उपस्थित होतो की सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करणार आहे, बाबरी मशीद विध्वंसाचं समर्थन करणारे आणि जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा हटवण्याला पाठिंबा देणारे लोकही आता काँग्रेसला स्वीकार आहेत का?

शिव सेना

फोटो स्रोत, TWITTER/@Shivsena

या मुद्द्यांविषयीचे काँग्रेसचे विचार अगदी वेगळे आहेत. आपली विचारसरणी बदलण्याची कोणतीही घोषणा अद्याप काँग्रेसने केलेली नाही, म्हणजे हे विचार अजूनही वेगळे असू शकतात. तर काँग्रेससोबत एकत्र आल्यानंतर आता हिंदुत्वाचं राजकारण सोडणार का, असं दुसरीकडे शिवसेनेलाही विचारलं जातंय.

उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रिपदी निवड ज्या बैठकीत झाली होती त्या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार म्हणाले होते "ही एका नवीन युगाची सुरुवात आहे. महाराष्ट्राचं देशात स्थान महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र बदलाची वाट पाहतोय. हे राज्य पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर येईल."

सरकार स्थापन केल्यानंतर आपण दिल्लीत जाऊन मोठ्या भावाची भेट घेणार असल्याचंही याच बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणूक प्रचारादरम्यान त्यांना लहान भाऊ म्हटलं होतं, असं सांगत उद्धव म्हणाले, "हे सरकार सूडभावनेने काम करणार नाही पण कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला आमची आघाडी माफ करणार नाही."

शिव सेना

फोटो स्रोत, Getty Images

त्याआधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याची घोषणा करताना म्हटलं होतं, "शिवसेना खोटं बोलतेय, त्यांनी युतीला दगा दिला. या आघाडीचे विचार जुळत नाहीत."

याचं प्रत्युत्तर देताना मंगळवारी रात्री उद्धव ठाकरे म्हणाले, "हे खरं आहे की माझ्या वडिलांपेक्षा वेगळ्या मार्गावर जातोय. मी असं का केलं, ते मी सांगेन. हे देखील खरं आहे की मी सोनिया गांधींची काँग्रेस आणि दीर्घकाळ विरोधक असणार शरद पवारांसोबत सरकार स्थापन करतोय. पण मातोश्रीवर येऊन जे खोटं बोलले त्यांनी आधी मला उत्तर द्यावं. हा अपमान नाही तर काय आहे? माझं हिंदुत्व कधी खोटं बोलत नाही. मी जर शब्द दिला तर तो पूर्ण करतो. बाळासाहेबांचं हेच तत्व होतं."

शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी या बैठकीमध्ये आपल्या आमदारांना आणि कार्यकर्त्यांना कॉमन मिनिमम प्रोग्रामनुसार सोबत येत काम करण्याचं आवाहन केलं. याच बैठकीत उद्धव यांनी म्हटलं, "जुन्या सहकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही याने मी निराश आहे पण ज्यांच्या विरोधात मी 30 वर्षं लढत होतो, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला."

याच बैठकीत शरद पवार म्हणाले, "जॉर्ज फर्नांडिस, मी आणि बाळासाहेब कधीही सार्वजनिक रॅलीत गुंतून पडलो नाही. आम्ही तिघंही चांगले मित्र होतो. स्वर्गीय मीनाताई ठाकरेंच्या हातचे अनेक चविष्ट पदार्थ मी अनेकदा खाल्लेले आहेत."

शिवसेना

फोटो स्रोत, Getty Images

शिवसेना आणि काँग्रेस - अडचणी आणि जवळीक

शिवसेना आणि काँग्रेसने कधीही सत्तेत एकत्र काम केलेलं नसलं तरी अनेक मुद्द्यांवर दोन्ही पक्ष एकत्र आले होते.

1975मध्ये इंदिरा गांधींच्या आणीबाणीचं समर्थन करणाऱ्या पक्षांपैकी शिवसेना एक होती. ही आणीबाणी देशाच्या हिताची असल्याचं तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं होतं.

आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या. यामध्ये दोन्ही पक्षांना बहुमत मिळालं नाही. यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी मुरली देवरांना महापौर पदासाठी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता.

1980मध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा शिवसेनेचा पाठिंबा मिळाला. बाळासाहेब ठाकरे आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अब्दुल रहमान अंतुले यांचे संबंध चांगले होते आणि ठाकरेंनी त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी मदत केली होती.

शिवसेना

फोटो स्रोत, Getty Images

1980च्या दशकामध्ये भाजप - शिवसेना एकत्र आल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसला जाहीरपणे फार कमी वेळा समर्थन दिलं. पण 2007मध्ये त्यांनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा न देता राष्ट्रपतीपदासाठी काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा देवीसिंह पाटील यांना पाठिंबा दिला होता.

प्रतिभा पाटील मराठी असल्याने शिवसेनेने भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा न देता पाटील यांना पाठिंबा दिला होता. पाच वर्षांनी पुन्हा एकदा शिवसेनेने काँग्रेसचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रणव मुखर्जींना समर्थन दिलं होतं. बाळासाहेब ठाकरेंनी तर शरद पवारांना पंतप्रधान होण्यासाठीही पाठिंबा देण्याची घोषणा केली होती.

अस्पृश्य नाही

काँग्रेस आणि शिवसेना एकमेकांसाठी अस्पृश्य नाहीत. शिवसेनेचे मुसलमानांविषयीचे विचार माहित असूनही त्यांना समर्थन दिल्याबद्दल काँग्रेसला सवाल केले जातील. पण काँग्रेसने आतापर्यंत शिवसेनेचा पाठिंबा घेतलेला आहे. पण शिवसेनेचं सरकार होऊ न देण्यापेक्षा, धर्मनिरपेक्षतेच्या दृष्टीने भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं गरजेचं होतं असंही काँग्रेसकडून सांगणयात येतंय.

पण मग आता प्रश्न उभा राहतो की काँग्रेस आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात शिवसेनेच्या सोबतीने लढणार का? मग शिवसेनेच्या हिंदुत्त्ववादी पक्ष असण्याचं काय होणार? की शिवसेना काँग्रेसच्या सोबत राहूनही आक्रमक हिंदुत्ववादी पक्ष राहू शकते? की काँग्रेस शिवसेनेच्या सोबत राहूनही धर्मनिरपेक्ष असण्याचा दावा करू शकते?

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)