विधानसभा निकाल : महाराष्ट्रातील पाच चुरशीच्या लढती, मतांमधील फरक हजारांहूनही कमी

फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये अजित पवार, विश्वजित कदम, धीरज देशमुख यांच्यासारख्या उमेदवारांनी तब्बल एक लाखांपेक्षा जास्त मतांच्या फरकानं बाजी मारली.
पण दुसरीकडे संपूर्ण महाराष्ट्रात 5 लढती इतक्या अटीतटीच्या झाल्या की यातल्या विजयी उमदेवारांचं मताधिक्य हे 1000 मतांपेक्षाही कमी आहे.
1. दौंड
दौंड मतदारसंघात मतमोजणीच्या वेळेस उत्कंठावर्धक घडामोडी झाल्या. इथे भाजपचे राहुल कुल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश थोरात यांच्यात लढत होती.
राहुल कुल यांचे वडील सुभाष कुल यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुल आणि थोरात असे दोन गट तयार झाले.

फोटो स्रोत, FACEBOOK
2004 च्या निवडणुकीत रंजना कुल आणि रमेश थोरात यांच्यात लढत झाली. त्यात रंजना कुल विजयी झाल्या होत्या.
त्यानंतर 2009 च्या निवडणुकीत रमेश थोरातांनी राहुल कुल यांना पराभूत केलं.
2014 ला राहुल कुल यांनी पुन्हा थोरातांना पराभूत केलं.
काल (24 ऑक्टोबर) विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सुरुवातीला रमेश थोरात 200 मतांनी विजयी झाल्याचं जाहीर करण्यात आलं. पण यावर आक्षेप घेत राहुल कुल यांनी फेरमोजणीची मागणी केली. या फेर मोजणीमध्ये राहुल कुल यांचा 746 मतांच्या फरकांने विजय झाला.
2. चांदिवली
शिवसेनेच्या दिलीप लांडे यांनाही असाच निसटता विजय मिळाला.

फोटो स्रोत, Getty Images
उत्तर मुंबईतल्या चांदिवली मतदारसंघातून शिवसेनेचे दिलीप लांडे आणि काँग्रेसचे नसीम खान यांच्यात चुरशीची लढत झाली. यात लांडे यांनी केवळ 380 मतांनी बाजी मारली.
नसीम खान यांना एकूण 85,436 मतं मिळाली. तर दिलीप लांडेंना 85,816 मतं मिळाली.
3. अर्जुनी मोरगाव
अर्जुनी मोरगाव मतदारसंघामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर चंद्रिकापुरे आणि माजी केंद्रीय मंत्री राजकुमार बडोले यांच्यात अतिशय कमी मतांचा फरक होता.

फोटो स्रोत, FACEBOOK
मनोहर चंद्रिकापुरे यांना 72400 मतं मिळाली तर राजकुमार बडोलेंना 71682 मतं मिळाली.
बडोलेंचा केवळ 718 मतांनी पराभव झाला.
4. कोपरगाव
कोपरगावमध्ये सामना रंगला तो पुन्हा एकदा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. इथेही राष्ट्रवादी काँग्रेसने निसटता विजय मिळवला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आशुतोष काळे यांनी अवघ्या 822 मतांनी भाजपच्या स्नेहलता कोल्हेंवर बाजी मारली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशुतोष काळे यांना एकूण 87566 मतं मिळाली तर भाजपकडून लढणाऱ्या स्नेहलता कोल्हे यांना 86547 मतं मिळाली.
5. सांगोला
विधानसभेतले सर्वात ज्येष्ठ सदस्य असणाऱ्या गणपतराव देशमुख यांनी यावर्षी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. तब्बल 55 वर्षं त्यांनी सांगोला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं.
त्यामुळे त्यांच्याऐवजी इथून शेतकरी कामगार पक्षाने त्यांचा नातू डॉ. अनिकेत चंद्रकांत देशमुख यांना उमेदवारी दिली होती.

फोटो स्रोत, FACEBOOK
पण शिवसेनेच्या अॅडव्होकेट शहाजीबापू पाटील यांनी अनिकेत देशमुख यांचा 768 मतांनी पराभव केला.
अॅडव्होकेट पाटील यांना 99464 मतं मिळाली तर डॉक्टर अनिकेत देशमुख यांना 98696 मतं मिळाली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








