विधानसभा निवडणूक: श्रीपाद छिंदम यांना अहमदनगर शहर मतदारसंघातून विधानसभेत एंट्री मिळणार का?

श्रीपाद छिंदम

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, श्रीपाद छिंदम

श्रीपाद छिंदम. अहमदनगर महापालिकेतील माजी उपमहापौर. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत ते अपक्ष निवडून आले होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत छिंदम हे बहुजन समाज पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत.

अहमदनगर शहर मतदारसंघातून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यांच्या विरुद्ध शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम जगताप रिंगणात आहेत. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे.

श्रीपाद छिंदम वादग्रस्त का?

2013 च्या महापालिका निवडणुकीत श्रीपाद छिंदम भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. पुढे त्यांना भाजपने उपमहापौरपदी बसवलं. 2018 सालच्या फेब्रुवारी महिन्यात सफाई कंत्राटदाराशी बोलताना छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढले होते. त्यानंतर महाराष्ट्रभर त्याचे पडसाद उमटले. भाजपनं त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. पोलिसांनी शहरातून तडीपार केलं. या प्रकरणानंतर श्रीपाद छिंदम यांनी माफी मागितली होती.

महापालिकेत छिंदम अपक्ष निवडून आल्यानंतर स्थानिक पत्रकार शिवाजी शिर्के यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं होतं, "जेव्हा छिंदम यांनी महाराजांबद्दल अपशब्द काढले, तेव्हा लोकांनी छिंदम यांच्यासोबतच त्यांच्या साथीदारांच्या घरावरही दगडफेक केली. महाराष्ट्रभर मोर्चे आणि आंदोलनं झाली. छिंदम यांच्यासोबत त्यांच्या साथीदारांनाही नगर सोडावं लागलं. छिंदम हे पद्मशाली समाजाचे आहेत. छिंदम ज्या प्रभाग 9 मधून निवडणूक लढले, तिथं 11 हजार 229 मतं आहेत. त्यात पद्मशाली समाजाची 2500 मतं आहेत. त्यांनी आपल्या समाजाच्या व्होटबँकचा वापर विजयासाठी करून घेतला होता. "

काँग्रेस ते अपक्ष - व्हाया शिवसेना, भाजप

डिसेंबर 2018 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत छिंदम यांच्या प्रभाग 9 मधील उमेदवारांना पडलेल्या मतांवर नजर टाकूयात. इथं भाजपच्या प्रदीप परदेशींना 2561 मतं मिळाली. शिवसेनेच्या सुरेश तिवारींना 1613 मतं, मनसेच्या पोपट पाथरे यांना 1425, तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या अनिता राठोड यांना फक्त 715 मतं मिळाली. तर श्रीपाद छिंदम यांना 4532 मतं मिळाली होती. महापालिका निवडणुकीत श्रीपाद छिंदम प्रभाग 9 मधून 1900 मतांनी निवडून आले होते. अशा प्रकारे तब्बल 1900 मताधिक्याने छिंदम निवडून आले होते.

डिसेंबर 2018 ला झालेल्या अहमदनगर महापालिका निवडणुकीत विजयी झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करताना छिंदम

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, डिसेंबर 2018 ला झालेल्या अहमदनगर महापालिका निवडणुकीत विजयी झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करताना छिंदम

ज्येष्ठ पत्रकार अशोक तुपे सांगतात, "अहमदनगर महापालिका निवडणुकीदरम्यान भाजप आणि शिवसेनेत मोठ्या प्रमाणात दुफळी निर्माण झाली होती. स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षात वाद असल्यामुळे त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत चारही पक्ष वेगवेगळे लढल्याने त्याचा फायदा छिंदम यांना झाला होता. तसंच त्यांची आर्थिक ताकद चांगली असल्यामुळे त्यांनी निवडणुकीचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केलं होतं."

शिवाजी शिर्के यांनी सांगितलं, "श्रीपाद छिंदमच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती असतानाही सर्व पक्षातील नेत्यांनी मदत केली. सुरुवातीला ते काँग्रेस आणि नंतर शिवसेनेत होते. या काळात जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारातून त्यांनी मुबलक पैसाही कमावला.

"पण महाराजांबद्दल अपशब्द काढल्यानंतर त्यांना राजकीय पक्ष आणि नेत्यांनी दूर केलं. छिंदम यांनी वैयक्तिक संकटाची भीती समाजाच्या मनात घातली. भीतीलाच शस्त्र बनवलं. पद्मशाली समाजही असुरक्षित भावनेमुळे छिंदम यांच्या पाठिशी उभा राहिला."

या सगळ्या आरोपांवर बीबीसीशी बोलताना छिंदम यांनी "माझ्यावर गुन्हेगारीचे आणि इतर आरोप करणाऱ्यांबद्दल मला काहीच बोलायचं नाही. त्यांच्याबद्दल मला राग, द्वेष किंवा इतर कुठलीही भावना नाही. मी माझ्या प्रचारासाठी अहमदनगरमध्येही नव्हतो. तरीही मला जनतेनं निवडून दिलं आहे. त्यामुळे हा जनतेचाच विजय आहे," असं त्यावेळी म्हटलं होतं.

विधानसभेच्या रिंगणातील उमेदवार

प्रमुख लढत शिवसेना-राष्ट्रवादीमध्येच

अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. शिवसेनेचे अनिल राठोड हे सलग पाचवेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. पण 2014च्या निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या संग्राम जगताप यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्या निवडणुकीत युती तुटल्याने त्याचा शिवसेनेला मोठा फटका बसला होता.

संग्राम जगताप

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, संग्राम जगताप

संग्राम जगताप यांनी प्रथमच विधानसभा निवडणूक लढवली होती. संग्राम हे विधानपरिषदेचे आमदार अरुण जगताप यांचे चिरंजीव आहेत. तसंच ते भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे जावई आहेत. लोकसभा निवडणुकीत संग्राम जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट दिलं होतं. पण भाजपच्या सुजय विखे पाटील यांनी त्यांचा सुमारे अडीच लाख मतांनी पराभव केला.

अहमदनगर शहर मतदारसंघात विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष असे एकूण 12 उमेदवार उभे असले तरी प्रमुख लढत ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असेल, असं ज्येष्ठ पत्रकार अशोक तुपे यांनी सांगितलं. त्यांच्या मते, "श्रीपात छिंदम यांना विधानसभा निवडणुकीत कोणताच प्रभाव दिसून येणार नाही. महापालिकेच्या निवडणुकांमध्ये प्रभाग छोटे असतात. या निवडणुकीत वैयक्तिक पातळीवर मतदान केलं जातं. पण विधानसभा निवडणुकांमध्ये पक्ष पाहिला जातो. पद्मशाली मतांची संख्या नगर शहरात 15 हजारांच्या आसपास आहे. हे सगळंच मतदान छिंदम यांना होईल, असं नाही. सध्याच्या वातावरणात शिवसेनेचं पारडं जड आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगतापच चांगली टक्कर देऊ शकतात."

अनिल राठोड

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, अनिल राठोड

ते पुढे सांगतात, "अहमदनगरमध्ये शिवसेनाआणि भाजपमध्ये सत्तेचा संघर्ष सुरू होता. दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नव्हते. महापालिकेत भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतल्यानंतर शिवसेना-भाजपचा वाद टोकाला गेला होता. पण लोकसभा निवडणुकीपासून हे चित्र बदललं आहे. लोकसभेत दोन्ही पक्षांनी मिळून काम केल्यामुळे सुजय विखे पाटील चांगल्या मताधिक्याने निवडून आले. विधानसभेत महायुती झाल्याचा फायदा शिवसेनेला नक्की होईल."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)