संजय निरुपम: निवडणुकीला सामोरं जाण्याची काँग्रेसची तयारी नाही - विधानसभा निवडणूक

फोटो स्रोत, Ani
विधानसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसमधली दुफळी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. मुंबई कांग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी आपण सुचवलेल्या उमेदवाराला पक्षाने तिकीट न दिल्याच्या कारणावरून नाराजी दर्शवली आहे.
काँग्रेस पक्षाची तयारी नसल्याचं धक्कादायक विधान त्यांनी यावेळी केलं आहे. राहुल गांधी अपयशी ठरावेत यासाठी एक मोठं षड्यंत्र रचलं गेलं. काँग्रेसच्या केंद्रीय समितीत कोणत्याही बाबतीत एकमत नाही, त्यांना पक्षाची आणि नेत्यांची माहिती नाही असा आरोप त्यांनी केला. याचबरोबर सोनिया गांधी यांना काँग्रेस कमिटीची सदस्य चुकीचा सल्ला देतात असंही ते म्हणाले.
संजय निरुपम यांनी गुरूवारी ट्वीट करून पक्षावरची आपली नाराजी प्रकट केली. आपल्या ट्वीटमध्ये निरुपम यांनी लिहिलं, "काँग्रेस पक्षाला माझी सेवा नको आहे, असं वाटतंय. विधानसभा निवडणुकीसाठी मी फक्त एक नाव सुचवलं होतं. पण तेसुद्धा नाकारण्यात आल्याचं मी ऐकलं. यापूर्वीच मी पक्षश्रेष्ठींना सांगितल्याप्रमाणे, अशा स्थितीत मी पक्षाचा प्रचार करणार नाही. हा माझा अंतिम निर्णय आहे.
त्यानंतर पुढच्या एका ट्वीटमध्ये संजय निरूपम म्हणाले, "पक्ष सोडण्याची वेळ अजून तरी आली नाही, अशी आशा आहे. पण पक्षनेतृत्व माझ्यासोबत ज्याप्रमाणे वागत आहे. ती वेळ दूर नाही."
सध्या काँग्रेस पक्षातील अनेक नेते पक्ष सोडून जाताना दिसत आहेत. काही मतदारसंघात काँग्रेसला योग्य उमेदवार सापडत नसल्याच्या बातम्या येत आहेत. असं असूनही संजय निरूपम यांना एका-एका उमेदवारासाठी इतका खटाटोप करावा लागत असल्यामुळे त्यांचं पक्षातील स्थान कमकुवत झाल्याचा अंदाज जाणकार व्यक्त करतात.
तिकीट वाटपात सहभागी करून न घेतल्याबद्दल नाराजी
वरच्या दोन ट्वीटसोबतच संजय निरुपम यांनी आणखी एक ट्वीट केलं. त्यामध्ये शुक्रवारी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
त्यांच्या नाराजीबाबत एएनआय वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीने त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला. "संपूर्ण मुंबईत विधानसभेच्या 36 जागा आहेत. उमेदवारांच्या निवडप्रक्रियेत सहभागी असणाऱ्या नेत्यांना मी प्रामाणिकपणे फक्त माझ्या लोकसभा मतदारसंघातली एक जागा मी मागितली होती.

फोटो स्रोत, Twitter
मल्लिकार्जून खरगे, माधवराव सिंधिया, वेणूगोपाल, बाळासाहेब थोरात यांना फक्त एक जागा देण्याची मी विनंती केली होती. सुरूवातीला तीन याद्या आल्या. त्यामध्ये ते नाव आलं नाही. याबद्दल मी खर्गेंशीही बोललो. माझी इतकी पण इज्जत नाही का? असं मी त्यांना विचारलं," असं निरूपम यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, "अखेर ते नाव नाकारण्यात आल्याची माहिती मला गुरूवारी मिळाली. याचा अर्थ पक्षाला माझ्या सेवेची आता गरज नाही. पक्षालाच गरज नाही तर मी प्रचारापासून दूर राहिलेलंच बरं आहे, असं मला वाटतं."
'यामुळे पक्षाचं नुकसान होईल'
संबंधित उमेदवाराचं नाव विचारलं असता संजय निरूपम यांनी त्याचं नाव स्पष्ट केलं नाही. पुढे बोलताना ते म्हणाले, "तो उमेदवार कुणीही असू शकतो. मुंबई काँग्रेसचा मी माजी अध्यक्ष आहे. तीन वेळचा खासदार आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढवतो. एक नावसुद्धा मी सुचवू शकत नाही का? एक उमेदवार पण मला देऊ शकत नाही म्हणजे तुमच्याकडे माझ्यासाठी इज्जत नाही. हा मोठा विषय आहे."
अनेक नेते असे आहेत, जे बैठकांमध्ये फाईलीच्या फाईली घेऊन जातात. ज्यांना काहीही माहीत नाही, तिथं भांडण करतात. मला तर सगळी मुंबई माहीत आहे. कुठे कोणता उमेदवार चांगला आहे, हे मी सांगू शकतो. पण मी या सगळ्या गोष्टींमध्ये पडलो नाही. जे लोक आज मुंबई काँग्रेस चालवत आहेत, त्यांच्यावर मी निर्णय सोडून दिला. ज्यांचं भविष्य खराब आहे, असे अनेक उमेदवार देण्यात आले आहेत. यामुळे पक्षाला नुकसान होईल. मी तुम्हाला फक्त एक विनंती केली होती. तीसुद्धा मान्य केली जात नसेल तर नाराज होणं स्वाभाविक आहे."
मुंबईतल्या तीन चार जागा सोडल्या तर बाकी ठिकाणी मुंबईमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांचं डिपॉजिट जप्त होईल असं निरुपम म्हणाले.
कोण आहेत संजय निरूपम?
पत्रकार ते राजकीय नेता असा प्रवास संजय निरूपम यांनी केला आहे. शिवसेनेत असताना ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अतिशय जवळचे होते. त्यानंतर काँग्रेस प्रवेश केल्यानंतर निरुपम राहुल गांधींच्या अतिशय निकटवर्तीय मानले जातात.

फोटो स्रोत, Twitter
संजय निरुपम शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना' या दैनिकाची हिंदी आवृत्ती 'दोपहर का सामना'चे संपादक होते. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत ते वायव्य मुंबईतून सुनील दत्त यांच्या विरोधात उभे होते.
या निवडणुकीपूर्वी दोनवेळा शिवसेनेतर्फे राज्यसभा खासदार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. 2004 ला त्यांनी सुनील दत्त यांना चांगली टक्कर दिली पण त्यांचा पराभव झाला. पुढे त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2009 ची लोकसभा निवडणूक त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर लढवली. पण 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
बाळासाहेबांबरोबर कशी झाली भेट?
संजय निरुपम यांना आतापर्यंतचं यश सहजासहजी मिळालं नसल्याचं मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार अनुराग त्रिपाठी सांगतात. "निरुपम यांनी हे यश संघर्ष करून मिळवलं आहे. त्यांच्यात ती क्षमता आहे. सुरूवातीला ते पांचजन्यमध्ये दिल्लीत काम करायचे. मुंबईत त्यांना सर्वप्रथम सिनेपत्रकारितेची जबाबदारी देण्यात आली. तिथं त्यांची ओळख शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी झाली. त्यांच्या माध्यमातून ते बाळासाहेबांना भेटले.
"बाळासाहेबांनी त्यावेळी सामना सुरू केला होता. त्यांना हिंदीत वृत्तपत्र सुरू करायची कल्पना निरुपम यांनीच सुचवली. या वृत्तपत्राच्या संपादकपदाची जबाबदारी निरुपम यांनीच घेतली आणि चांगल्या पद्धतीने पेलली सुद्धा. दिल्लीत आपली बाजू मांडणारा नेता हवा यासाठी त्यांना राज्यसभा खासदार बनवण्यात आलं होतं," असं त्रिपाठी सांगतात.

फोटो स्रोत, Twitter
पुढे ते सांगतात, "प्रमोद महाजन यांच्यावर त्यांनी टीका करणं सुरू केल्यामुळे प्रमोद महाजनांनी ही तक्रार बाळासाहेबांकडे नेली. त्यातून तणावाचे प्रसंग निर्माण झाले. तसंच शिवसेनेतल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांशी त्यांचे वाद झाले. पण उद्धव ठाकरेंना पुढे घेऊन येण्यात त्यांचं योगदान होतं. 1995 ते 1999 दरम्यान शिवसेनेत स्मिता ठाकरे आणि राज ठाकरे यांची नावे समोर येत होती. त्यावेळी उद्धव ठाकरे जास्त राजकारणात नव्हते. पण त्यांची राजकीय प्रतिमा तयार करण्यात संजय निरूपम यांची महत्त्वाची भूमिका होती."
महत्त्वाकांक्षी नेते
ज्येष्ठ पत्रकार विमल मिश्रा हे नवभारत टाईम्सच्या मुंबई आवृत्तीचे संपादक होते. त्यांनी संजय निरुपम यांच्यासोबत काम केलं आहे. ते सांगतात, "संजय निरुपम हे अतिशय महत्त्वाकांक्षी होते. ते सुरुवातीला जनसत्तामध्ये काम करायचे. भाईंदरमध्ये असताना कार्यालय ते घर प्रवासात ते कायमच पुस्तक वाचन किंवा अन्य कामांमध्ये व्यस्त दिसून यायचे."

फोटो स्रोत, Twitter
"पुढे ते दोपहर का सामनामध्ये गेले. संजय निरुपम बाळासाहेबांच्या जवळचे होते. त्यांनी शिवसेनेला हिंदी भाषकांमध्ये चांगल्या प्रमाणात पोहोचवलं. त्यांनी शिवसेनेचे राज्यसभा खासदार म्हणून काम पाहिलं. तिथं त्यांच्या कामामुळे त्यांना मोठी पदे मिळत गेली. पण पुढे त्यांनी हिंदुत्ववादी विचारधारेच्या विरुद्ध अशा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तिथंही त्यांनी बऱ्यापैकी मोठी पदं मिळवली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्षही होते. त्यांना नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहायला आवडतं. त्यामुळेच अनेकवेळा ते एकांगी निर्णय घेतात, असंही म्हटलं जायचं."
काँग्रेसमध्ये येताना विरोध
अनुराग त्रिपाठी सांगतात, "काँग्रेसमधल्या प्रस्थापित उत्तर भारतीय नेतृत्वाने त्यांना कांग्रेस प्रवेशाच्या वेळी विरोध केला होता. त्यामुळे त्यांना काँग्रेसमध्ये गॉडफादर भेटत नव्हता. पण प्रभा राव यांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यांच्या मदतीने ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. शिवसेनेप्रमाणेच काँग्रेसमधल्या अंतर्गत राजकारणाशी संघर्ष करत निरुपम राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचले."
राजकीय जाण चांगली
"संजय निरुपम यांचं राजकीय ज्ञान चांगलं आहे. पत्रकार म्हणून काम केलेलं असल्यामुळे त्यांना सामाजिक विषयांची माहिती आहे. तसंच राजकीय समीकरण त्यांना चांगल्या प्रकारे समजतात. अशा प्रकारचा नेता कोणत्याही पक्षाला हवाहवासा असतो. काँग्रेसनेही त्यांना योग्य तो मानसन्मान द्यायला हवा. त्याचा पुढे काँग्रेसलाच फायदा होईल," असं त्रिपाठी यांना वाटतं.
"काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांना सुनील दत्त यांच्या मतदारसंघात तिकीट हवं होतं. पण त्यांना याठिकाणी तिकीट न देता उत्तर मुंबईत तिकीट देण्यात आलं. संजय निरूपम यांनी हे आव्हान स्वीकारून मोठ्या चतुराईने या जागेवर विजय मिळवला," त्रिपाठी सांगतात.
पराभवानंतरही सक्रिय
2014 च्या पराभवानंतर काँग्रेसला मरगळ आलेली असतानाही संजय निरूपम कार्यरत होतं. दरम्यान त्यांना मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपदही मिळालं. यावेळी छोटी-मोठी आंदोलनं करून त्यांनी आपलं अस्तित्व दाखवून दिलं. पण काँग्रेसच्या गटबाजीचा त्यांना फटका बसला. आजही ते राजकीय अस्तित्व दाखवण्याचा वारंवार प्रयत्न करत असतात.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
आक्रमक स्वभावच आड आला
"काँग्रेसमध्ये ते आल्यानंतर इतर नेत्यांच्या तुलनेत ते तरुण होते. पण इतर नेत्यांशी त्यांचं जास्त पटलं नाही. त्यामुळे मुंबई काँग्रेसमध्ये पुढे गटबाजी झाल्याचं पाहायला मिळालं. कृपाशंकर सिंह, गुरूदास कामत, मुरली देवरा या मुंबई काँग्रेसच्या नेत्यांमधूनही ते पुढे गेले. आक्रमक स्वभावामुळे त्यांना यश मिळालं पण त्याच आक्रमक स्वभावामुळे त्यांचं नुकसानही झालं. वेळोवेळी ते विरोधी पक्षांवर प्रखर टीका करताना दिसतात. पण ही वेळ अशी आहे, ते इतर पक्षांच्या फारसे जवळही नाहीत. त्यामुळे पुढे त्यांचं राजकीय भवितव्य काय असेल, हा प्रश्न आहे," असं मिश्रा सांगतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








