जितेंद्र आव्हाडः 'भाऊ भावाला गोळ्या घालतो, त्याला गृहकलह म्हणतात' #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, facebook
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया
1. "भाऊ भावाला गोळ्या घालतो, त्याला गृहकलह म्हणतात" - जितेंद्र आव्हाड
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सायंकाळी अचानक आमदारकीच्या राजीनामा दिला. हा राजीनामा गृहकलहातून देण्यात आला असं रंगवण्यात आलं होतं. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हे फेटाळून लावलं आहे.
'भाऊ भावाला गोळ्या घालतो, त्याला गृहकलह म्हणतात,' असा पलटवार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आव्हाड यांनी यातून थेट भाजपलाच लक्ष्य केलं.
भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांना त्यांचा भाऊ प्रविण महाजन यांनी राहत्या घरात गोळ्या घातल्या होत्या. त्यात प्रमोद महाजन यांचा मृत्यू झाला होता. याचाच आधार घेत आव्हाडांनी एकप्रकारे भाजपला त्यांच्या गृहकलहाचीही चर्चा करु, असाच काहीसा इशारा दिल्याचं बोललं जात आहे. ही बातमी टीव्ही 9 मराठीने प्रकाशित केली आहे.
'आमचा घरसंसार आहे. कुणी उगीच गृहकलहामुळे झालं असं ओरडत आहेत. भाऊ भावाला गोळ्या घालतो त्याला गृहकलह म्हणतात. बाकी गृहकलह नसतो,' असं आव्हाड म्हणाले.
2. ईडीची पिडा टाळण्यासाठी कमळाचं फूल जवळ ठेवा - संजय राऊत
ईडीची पिडा टाळण्यासाठी कमळाचं फूल जवळ ठेवा, अशा आशयाचं व्यंगचित्र शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे.
सध्या माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम, राज ठाकरे तसंच शरद पवार यांच्याविरूद्ध ईडीची कार्यवाही सुरु आहे. त्यामुळे सध्या ईडीचा विषय चर्चेत आहे. अशातच संजय राऊत यांनी हे ट्विट करून सोशल मीडियावर ईडीची खिल्ली उडवली आहे. ही बातमी लोकसत्ताने प्रकाशित केली आहे.

फोटो स्रोत, ANI
शरद पवार यांच्यावर शिखर बँक प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल केल्यावर ते स्वतःच ईडी कार्यालयात हजर राहणार होते. त्यासाठी त्यांनी शुक्रवारी ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ईडीने तुम्ही आता येऊ नका गरज असेल तेव्हा आम्ही तुम्हाला बोलवू असं सांगितलं. त्यानंतर शरद पवार यांनी ईडी कार्यालयात जाणं रद्द केलं. त्याच अनुषंगाने एक व्यंगचित्र ट्विट करत 'अच्छा है' म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी ईडीची खिल्ली उडवली आहे.
3. मनसेचा सोमवारी मेळावा, राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुंबईत एक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मुंबईतील वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सोमवारी (30 सप्टेंबर) काळी 10 वाजता हा मेळावा होईल.

फोटो स्रोत, Getty Images
या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आगामी विधानसभा निवडणुकीची रणनिती ठरवत मोठी घोषणा केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. ही बातमी टाईम्स नाऊ मराठीने दिली आहे.
4. खटले निकाली काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचं विभाजन करा - उपराष्ट्रपती
न्याय मिळण्यात होत असलेल्या विलंबाबद्दल उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. घटनात्मक प्रकरणे आणि अपिलांच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे विभाजन करण्याची सूचना त्यांनी केली आहे.

फोटो स्रोत, Twitter
सर्वोच्च न्यायालयाची चार विभागीय खंडपीठे स्थापन करून खटले वेगाने निकाली काढण्यात यावेत, असं उपराष्ट्रपती म्हणाले. ही बातमी लोकमतने दिली आहे.
5. पॅन-आधार लिंक करण्यास मुदतवाढ
अर्थ मंत्रालयाने पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठीची मुदत 31 डिसेंबर 2019 पर्यंत वाढवली आहे. ही मर्यादा 30 सप्टेंबर 2019 ला संपुष्टात येणार होती. शनिवारी सीबीटीडीकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनातून ही माहिती देण्यात आली. ही बातमी हिंदुस्थान टाईम्सने प्रकाशित केली आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे ज्या लोकांनी आपले पॅन कार्ड आधारशी लिंक केलेले नाही. त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र 31 डिसेंबरपर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक केले नाही तर ते बंद होईल. त्यामुळे आर्थिक व्यवहार करता येणार नाही.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








