राजू शेट्टी: काँग्रेस-राष्ट्रवादी संत आहेत असं सर्टिफिकेट आम्ही देत नाही

आम्हाला शिवाजी महाराजांची शिकवण आहे की मोगलांशी लढायचं असेल तर कुतुबशाही-आदिलशाहीशी हातमिळवणी करावी लागते, असं वक्तव्य स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी बीबीसीच्या राष्ट्र महाराष्ट्र कार्यक्रमात बोलताना केलं.
आज दिवसभर पुण्यामध्ये या डिजिटल कार्यक्रमाचं आयोजन बीबीसी मराठीने केलं आहे. या कार्यक्रमात राज्यातील प्रमुख पक्षांचे प्रमुख नेते येणार आहेत. ते बीबीसी मराठीच्या आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात बीबीसीच्या अभिजीत कांबळेंच्या प्रश्नांची राजू शेट्टींनी दिलखुलास उत्तरं दिली.
संपूर्ण मुलाखत पाहा इथे -
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेमध्ये ठिकठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. 2014 मध्ये याच पक्षासोबत तुम्ही होता, मग दरम्यानच्या काळात काय बिनसलं?
2014 मध्ये आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता, मी तर असा दावा करतो की भाजपला ग्रामीण भागात तळागाळापर्यंत नेण्यात आमचा मोलाचा वाटा होता. त्यावेळी भारतीय जनता पक्ष हा गोपिनाथ मुंडे आणि अटबिहारी वाजेपायींचा पक्ष होता. त्यावेळी मोदीं-शहांनी या पक्षावर कब्जा केला नव्हता.
आम्हाला वाटलं की बदल होतील, नवीन काहीतरी घडेल, त्यामुळे आम्ही त्यांना साथ देण्याचं ठरवलं पण काही दीड-दोन वर्षांतच कळालं की आपण गंडवले गेलो आहोत. फसवले गेलो आहोत. मग अशा परिस्थिती आम्ही विरोध करणं क्रमप्राप्त होतं.
आता जनादेश यात्रेविषयी बोलू. या यात्रेतून ते विदर्भात गेले, मराठवाड्यात गेले, पश्चिम महाराष्ट्रात गेले, उत्तर महाराष्ट्रात गेले, कोकणात गेले. पण कुठल्या भागातल्या कुठल्या प्रश्नाविषयी त्यांनी भाष्य केलं? गेल्या पाच वर्षांत आपण काय केलं यापेक्षा गेल्या 50 वर्षांत समोरच्यांनी काय वाटोळं केलं हेच बोलत राहीले.
एका बाजूला पाकिस्तानला घुसून मारू म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला त्याच पाकिस्तानात कांदा आयात करायचा, साखर आयात करायची याला काय अर्थ?
कडकनाथ पालनात गुंतवणूक करा म्हणून अनेकांची फसवणूक केली. आमचे स्वाभिमानीचे कार्यकर्ते आठ-आठ दिवस आधी मोबाईल ट्रॅक करून पकडले कारण त्यांनी आंदोलन करू नये, पण सोशल मीडियावर उजळमाथ्याने फिरणारे कडकनाथचे आरोपी सापडू नयेत?
पहिल्यांदा पाहिलं की पोलीस, जे सरकारी कर्मचारी आहेत ते भाजपचा ड्रेस घालून काम करताहेत, कार्यकर्त्यांना मारहाण करत आहेत. हा जनतेचा आक्रोश आहे. शेतकरी सोडा हो, हे सरकार कुणाच्याच हिताचे निर्णय घेत नाहीये.
तुम्ही म्हणाला की सत्ताधारी पक्षाकडून तुम्ही गंडवले गेलात, तुम्ही आता काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत चर्चेत आहेत. तुम्ही पुन्हा गंडवले जाणार नाही याची काय गॅरेंटी?
मुळात काँग्रेस राष्ट्रवादी संत असल्याचं सर्टिफिकेट आम्ही देतच नाही. पण ज्याप्रकारे शिवसेना-भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे, ते पाहाता आमच्या एकट्यांची ताकद पुरेशी पडणार नाही हे आम्हाला माहिती आहे. आम्हाला शिवाजी महाराजांनी सांगितलंय, मोगलांशी लढायचं असेल तर कुतुबशाही-आदिलशाहशी हातमिळवणी करावी लागते. शिवाजी महाराजांनी आदिलशाहाला चांगलं म्हणून सर्टिफिकेट दिलं होतं का?
गेली पाच वर्ष सोडली तर त्याआधी 10-15 वर्ष तुम्ही राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्याविरोधात आंदोलन करत आहात, ते शेतकऱ्यांचे विरोधक आहे अशी भूमिका तुम्ही घेतली होती, मग आता काय बदललं?
मी कार्यकर्ता म्हणून अनेक आंदोलनं केलेली आहेत. सरकार आणि चळवळीतले कार्यकर्ते यांचा संघर्ष असतोच. पण गेल्या पाच वर्षांत जेवढा त्रास मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना झाला आहे तो कधीच झाला नव्हता. लोकशाहीमध्ये काही संकेत असतात, त्या संकेतांच्या पलीकडे जाऊन जर कार्यकर्त्यांना त्रास होत असेल तर ते वाईट आहे.

ते आधी एकदाच 1977मध्ये आणिबाणीच्या काळात झालं होतं. आता अघोषित आणीबाणी असल्याचा आमचा अनुभव आहे. ते साधूसंत नाहीतच, पण हे त्यांच्याहीपेक्षा वाईट आहेत. त्यांच्यासोबत असलो तर किमान लोकशाहीत मत मांडायचं स्वातंत्र्य तरी आम्हाला राहील.
तुम्ही अनेक वर्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढताय, महाराष्ट्रात शेतकरी चळवळही सक्षम आहे. महाराष्ट्रात 50 टक्क्यांहून अधिक शेतकरी आहे मग तुम्ही स्वबळावर लढू का शिकत नाही?
चळवळी या उद्बोधनासाठी असतात. कोणतीही साधनं नसताना वेगवेगळ्या जातींच्या, मतप्रवाहांच्या, अंधश्रद्धांमध्ये अडकलेल्या लोकांचं मतपरिवर्तन करणं अवघड असतं. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यालाही 150 वर्ष लागली. आपल्याला आता कुठे लोकशाही समजायला लागली आहे. बदल घडायला थोडावेळ लागेल. मी हे प्राजंळपणे मान्य करतो की माझ्या ताकदीचा सहकारी तयार करण्यात कमी पडलो.
सरकार शेतकरीविरोधी असेल तर त्यांना शेतकऱ्यांचा पाठिंबा का मिळतो?
भाजपला निवडणुका मॅनेज करण्याचं तंत्र जमलेलं आहे. त्यांना मार्केटिंग चांगलं जमतं. भाजप काही पार्टी विथ डिफरन्स वगैरे काही नाही. ते सत्ता मिळवण्यासाठी वाट्टेल ते करतात. पुर्वी हे काँग्रेस करायचं. 2019 च्या आधी पुलवामा घटलं नसलं, सर्जिकल स्ट्राईक झाला नसता तर मोदी सरकार नक्की हारलं असतं. पण आमच्या तरूणांना असं वाटलं की पाकिस्तान एक मोठा शत्रू आहे आणि मोदी सुपरमॅन आहेत. ते इम्रान खानचे लचके तोडणार आणि भारताला वाचवणार. अहो, आमचीच पोरं आमच्या विरोधात गेली. आता काय सांगायचं तुम्हाला.
लोकसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे लढला असता तर फरक पडला असता का?
मी मान्य करतो की आमची आघाडी लोकांना पटवून देण्यात आम्ही कमी पडलो. पण लक्षात घ्या, लोकसभेमध्ये संख्याबळाला महत्त्व असतं. आमच्या विरोधाच प्रचार केला गेला की ज्यांच्या विरोधात हे लढले त्यांच्याच कळपात जाऊन बसले. पण आता हे सगळे चोर शिवसेना-भाजपमध्ये गेले ना.
पण मी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं अभिनंदन करतो. त्यांनी सगळी घाण साफ केली, आपल्याकडे घेतली. आता इतर पक्षांमध्ये नव्या रक्ताला वाव मिळेल. तिसऱ्या चौथ्या-फळीला वाव मिळेल.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








