उदयनराजेंच्या पक्षांतरावर धनंजय मुंडे म्हणतात, राजे गेले, सेनापती गेले आता आम्ही मावळे लढणार #5मोठ्याबातम्या

धनंजय मुंडे

फोटो स्रोत, Hindustan Times/getty

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. 'राजे गेले, सेनापती गेले आता आम्ही मावळे लढणार'- धनंजय मुंडे

"उदयनराजे यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला, याचं मला फार फार वाईट वाटलं. काल शरद पवार यांच्यासोबत उदयनराजेंची बैठक झाली. त्या बैठकीत महाराज महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेच्या प्रश्नांबाबत अत्यंत निराश होते. भाजपविषयी ते जे काही बोलत होते. त्यानंतर ते भाजपात जातील असं वाटलं नव्हतं," असं मत राष्ट्रवादीचे नेते धनजंय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आज (14 सप्टेंबर) दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

ते पुढे म्हणाले, जीएसटी, मंदी, बेरोजगारी या सगळ्या विषयांवर चर्चा झाली. हे सरकार चांगलं काम करत नसल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र संध्याकाळी काय घडलं ते माहित नाही. उदयनराजे भोसले यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांनी का घेतला? ते माहीत नाही. रयतेची काळजी असलेले राजे गेले, सेनापती गेले आता आम्ही मावळे लढू."

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केलेल्या भास्कर जाधव यांच्यावरही टीका केली आहे.

"भास्कर जाधव 2013 मध्ये विचारत होते ठाकरेंचा व्यवसाय नाही, मग त्यांचं उत्पन्न इतकं कसं? आज भास्कर जाधव यांना उत्तर मिळालं असेल, अशी अपेक्षा आहे. तुम्हाला पवारसाहेबांनी पद दिलं, सगळं दिलं. लोकांचा विकास तुम्ही केला नाहीत ही तुमची चूक की पक्षाची?"

2. गणपती विसर्जनादरम्यान 40 जण बुडाले

गणपती विसर्जनदरम्यान झालेल्या घटनांमध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधील 40 जण बुडाले आहेत, अशी बातमी टाइम्स ऑफ इंडियानं दिली आहे.

महाराष्ट्रातल्या 11 जिल्ह्यांमध्ये 23, तर दिल्लीत 4 आणि उत्तरप्रदेशमध्ये 2 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.

गणपती बाप्पा

फोटो स्रोत, Getty Images

यात सगळ्यांत मोठी दुर्घटना भोपाळमध्ये घडली. गणपतीची मोठी मूर्ती विसर्जित करण्यासाठी दोन बोट एकमेकांना बांधण्यात आल्या असताना त्यातील 11 जण बुडाले आहेत.

3. बँक अधिकाऱ्यांचा 2 दिवस संप

देशातील बँकांच्या विलीनीकरणातून मोठ्या बँका करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ देशभरातील बँकांच्या अधिकाऱ्यांनी 26 आणि 27 सप्टेंबरला संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

28 सप्टेंबरला चौथा शनिवार आणि 29 सप्टेंबरला रविवार असल्यानं त्याही दिवशी बँका बंद राहतील. त्यामुळे देशातील सरकारी बँकांचे व्यवहार तब्बल चार दिवस ठप्प होणार आहेत.

4.प्रकाश आंबेडकर म्हणतात,'केंद्रातलं सरकार हे 'दारुड्यांचे'

"केंद्र सरकार हे 'दारुड्यां'चं सरकार आहे. दारुडा जसे स्वतःचे पैसे संपल्यावर चोऱ्या करतो, घरातलं समान विकतो. तसंच केंद्र सरकार आता RBI च्या पैशावर डल्ला मारतंय," अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिलीय.

प्रकाश आंबेडकर

फोटो स्रोत, BBC / Sharad Badhe

"आतापर्यंत कोणीच असं केलं नाही. हे सरकार झिंगलेल्या माणसासारखे चालतंय. हम करे सो कायदा आणि विरोधात बोललं तर देशद्रोही अशी लेबलं लावली जात आहेत. RSS आम्हाला देशभक्ती शिकवतेय हे दुर्भाग्य आहे," असंही ते म्हणालेत.

जालना येथे आयोजित बलुतेदार-आलुतेदार निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.

5. चिदंबरम यांची आत्मसमर्पण याचिका फेटाळली

अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) आत्मसमर्पण करण्याची माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची याचिका दिल्ली न्यायालयानं शुक्रवारी फेटाळली. द हिंदूनं ही बातमी दिलीय.

चिदंबरम यांना 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहावं लागणार आहे.

चिदंबरम यांना घेऊन जाताना सीबीआयचे अधिकारी

फोटो स्रोत, Getty Images

आयएनएक्स मीडिया मनी लाँडरिंग प्रकरणात चिदंबरम यांची अटक करणे आवश्यक आहे, असं ईडीनं न्यायालयाला सांगितलं होतं. त्यावर ईडीचा हेतू चांगला नाही, चिदंबरम यांना त्रास व्हावा, असा ईडीचा हेतू आहे, असा युक्तिवाद चिदंबरम यांच्या वकिलानं केला होता आणि आत्मसमर्पण याचिका दाखल केली होती.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)