अंडे आणि कोंबडीला शाकाहाराचा दर्जा द्या - संजय राऊत #5मोठ्याबातम्या

संजय राऊत

फोटो स्रोत, GETTY IMAGES/HT

फोटो कॅप्शन, संजय राऊत

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. अंडे आणि कोंबडीला शाकाहारीचा दर्जा द्या - संजय राऊत

राज्यसभेत आयुर्वेदावर चर्चा सुरु असताना संजय राऊत यांनी अंडी आणि कोंबडी शाकाहारी असल्याचं जाहीर करून टाका, अशी मागणी केली आहे. ही मागणी करताना त्यांनी नंदुरबारमधल्या आदिवासी पाड्यावरचा किस्साही सांगितला आहे. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

संजय राऊत म्हणाले, "नंदुरबारमधील एका आदिवासी पाड्यावर भेट दिली असताना तेथील स्थानिकांनी कोंबडीचं जेवण दिलं. कोंबडी खाण्यास मी नकार दिला. त्यावेळी स्थानिकांनी ही आयुर्वेदिक कोंबडी असल्याचा दाखला दिला. ही कोंबडी खाल्ल्यास रोगांपासून मुक्तता होत असल्याचा दावा स्थानिकांनी केला होता.

"चौधरी चरण सिंह विद्यापीठातील काही संशोधकांनी आपण आयुर्वेदिक अंड्यांवर संशोधन करत असल्याचं सांगितलं. आयुर्वेदिक अंड देणाऱ्या कोंबडीला फक्त वनस्पती, आयुर्वेदिक खाद्य दिलं जातं. त्यामुळे त्या कोंबडीपासून बनणारे अंडे हे पूर्णपणे शाकाहारी असून शाकाहारी व्यक्तीदेखील प्रोटीनसाठी अंडी खाऊ शकतात," असंही ते पुढे म्हणाले.

2. इंग्रज नसते तर भारतावर आज मराठ्यांचं राज्य असतं : शशी थरूर

"इंग्रज भारतात आले नसते, तर भारतावर मराठ्यांचं राज्य असतं," असं वक्तव्य काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.

शशी थरूर

फोटो स्रोत, SHASHI THAROOR/FACEBOOK

फोटो कॅप्शन, शशी थरूर

केरळमधील थिरूवअनंतपुरमधल्या 'मातृभूमी इंटरनॅशनल फेस्टिव्हल ऑफ लेटर्स' या कार्यक्रमात शशी थरूर यांनी भाषण केलं होतं.

यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की जर व्यापारी बनून आलेले इंग्रज भारतात आलेच नसते, तर भारत आजच्यासारखाच राहिला असता का?

एका विद्यार्थिनीने भाषणानंतर हा प्रश्न थरूर यांना विचारला होता.

त्यावर उत्तर देताना शशी थरूर यांनी म्हटलं की, "इंग्रज नसते तर भारतावर आज छत्रपतींचं शासन अन् मराठ्यांचं राज्य असतं. मराठ्यांचं सामाज्य फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नव्हतं तर ते पार दिल्लीपर्यंत पसरलं होतं."

"मी जेव्हा जगाच्या आणि भारताच्या इतिहासाकडे पाहतो तेव्हा भारतीय उपखंडावर मराठ्यांचंच नियंत्रण होतं, तेच कारभार पाहत होते, हे लक्षात येतं. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठ्यांमधील महान राजे होते," असंही त्यांनी म्हटलंय.

3. उज्ज्वला योजनेमुळे ग्रामीण महिलांचंआरोग्य सुधारलं

पंतप्रधान उज्ज्वला योजनेमुळे ग्रामीण महिलांच्या श्वसनासंबंधीच्या आजारांत (दमा, खोकला) 20 टक्के घट झाली, असं Indian Chest Society and Indian Chest Research Foundation या संस्थेच्या अभ्यासातून समोर आलं आहे.

ही बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.

चूल

फोटो स्रोत, SEETU TEWARI/BBC

International Journal of Medical and Health Research या जर्नलमध्ये हा शोधनिबंध प्रकाशित करण्यात आला आहे. यासाठी 20 ते 50 वयोगटातील 120 महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी (15 जुलै) लोकसभेत सांगितलं की, "या योजनेमुळे महिलांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होत आहे. उज्ज्वला योजनेमुळे 27 टक्के गरिबांना बीपीएलमधून बाहेर काढण्यातस मदत झाली आहे."

4.गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात 'जादूटोणाविरोधी कायद्याचा' समावेश

गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाने 'जादूटोणाविरोधी कायद्याचा' समावेश अभ्यासक्रमात केला आहे. या कायद्याचा समावेश करणारे गोंडवाना विद्यापीठ राज्यातील एकमेव विद्यापीठ ठरले आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

"सर्वाधिक पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राची देशात ओळख आहे. तरीही राज्यात अंधश्रद्धा, जादूटोण्याच्या अनेक घटना समोर येतात. अंधश्रद्धेतून छोट्या बाळापासून तर मोठ्या व्यक्तींपर्यंत आणि स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे जादूटोणाविरोधी कायदा तयार करून अभ्यासक्रमात त्याचा समावेश करावा," अशी मागणी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी सातत्याने लावून धरली होती.

विद्यापीठाच्या विधिसभेच्या बैठकीत या कायद्याचा' समावेश बी.ए. अंतिमच्या समाजशास्त्र विषयात करण्याचा निर्णय झालेला आहे. सविस्तर चर्चेअंतीच हा निर्णय घेण्यात आलेला आहे, असं गोंडवाना विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ.चंद्रशेखर भुसारी यांनी म्हटलं आहे.

5. रस्ते अपघातात मृत्युमुखींच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये मदतनिधी - नितीन गडकरी

वाहन अधिनियम विधेयक 15 जुलै (सोमवार) लोकसभेत पारित करण्यात आलं. या विधेयकांतर्गत रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांचा मदतनिधी आणि गंभीर दुखापतग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबीयांना अडीच लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत ही माहिती दिलीय. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीय.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

देशातील 30 टक्के वाहनधारकांचे परवाने बोगस होते. दरवर्षी रस्ते अपघातात जवळपास दीड लाख जण मृत्यूमुखी तर 5 लाख व्यक्तींना दुखापत होते, असंही गडकरींनी म्हटलंय.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)