रहाणे, पांडे, अय्यर, शुभमन- टीम इंडियाचा 'मिडल ऑर्डर क्रायसिस' कोण सोडवणार?

भारत, वर्ल्ड कप 2019

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, टीम इंडिया

न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरमधील उणीव प्रकर्षाने स्पष्ट झाली आहे. टीम इंडिया आता वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. वर्ल्ड कपचं स्वप्न सेमी फायनलमध्ये संपुष्टात आल्यानंतर वनडे संघात बदल होणार का?

वर्ल्ड कपसाठी संघनिवड करताना निवडसमितीने चौथ्या क्रमांकासाठी अंबाती रायुडूऐवजी विजय शंकरच्या नावाला पसंती दिली होती.

विजय हा 'थ्री डायमेन्शल प्लेयर' अर्थात ऑलराऊंडर खेळाडू असल्याचं म्हटलं होतं. केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी हे मधल्या फळीतली अन्य खेळाडू होते.

टीम इंडियासाठी शिखर धवन, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे त्रिकूट भक्कम होतं. वर्ल्ड कप सुरू झाल्यानंतर टीम इंडियाने के.एल. राहुलला चौथ्या क्रमांकावर पाठवलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत शिखरने शतकी खेळी साकारली मात्र त्याच्या हाताला दुखापत झाली.

ही दुखापत बरी होण्यास प्रदीर्घ कालावधी लागणार असल्याने शिखर वर्ल्ड कप खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. यानंतर राहुलला सलामीला बढती देण्यात आली आणि चौथ्या क्रमांकाचा प्रश्न ऐरणीवर आला.

राहुलच्या बढतीनंतर विजयला चौथ्या क्रमांकावर खेळवण्यात आलं. विजयने तीन सामन्यात 58 धावा केल्या आणि 2 विकेट्स मिळवल्या. वेस्ट इंडिजच्या लढतीनंतर विजय शंकर दुखापतग्रस्त असल्याचं जाहीर करण्यात आलं.

विजयच्या जागी ऋषभ पंतला खेळवण्यात आलं. ऋषभने चार सामन्यात 32, 48, 4, 32 अशा खेळी केल्या.

केदार जाधवला वर्ल्ड कपमध्ये सहा सामन्यात खेळवण्यात आलं. त्याने एकूण 80 धावा केल्या. या सहा सामन्यात त्याला एकही विकेट मिळवता आली नाही.

केदार अपयशी ठरल्याने दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली. तब्बल 15 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कार्तिकचं वर्ल्ड कप पदार्पण झालं. दिनेश तीन सामन्यात मिळून फक्त 14 धावा करू शकला.

कॅप्टन कूल फिनिशर महेंद्रसिंग धोनी 34, 27, 1, 28, 56*, 42*, 35, 50 अशा खेळी साकारल्या. धोनी पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर खेळला.

एकूणात महेंद्रसिंग धोनीचा अपवाद वगळता टीम इंडियाची मिडल ऑर्डर डळमळीत असल्याचं स्पष्ट झालं.

वर्ल्ड कपनंतर टीम इंडियात बदल संभवतात. टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरसंदर्भात चर्चा सुरू झाली आहे.

श्रेयस अय्यर

24वर्षीय मुंबईकर श्रेयस अय्यरचं नाव चर्चेत आहे. वर्ल्ड कपपूर्वी झालेल्या आयपीएल स्पर्धेत श्रेयस अय्यरने दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व केलं होतं.

दिल्लीने पहिल्यांदाच बाद फेरी गाठली होती. स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईसाठी खेळताना श्रेयसने 54 मॅचेसमध्ये 52.18च्या सरासरीने 4592 धावा केल्या आहेत.

भारत, वर्ल्ड कप 2019

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, श्रेयस अय्यर

या धावा करताना श्रेयसने 12 शतकं आणि 23 अर्धशतकं झळकावली आहेत. श्रेयसने दोन वर्षांपूर्वी वनडे पदार्पण केलं होतं. श्रेयसने 6 वनडे मॅचेस खेळल्या असून, 42.00च्या सरासरीने 210 धावा केल्या आहेत. श्रेयसचा स्ट्राईक रेट 96.33 आहे.

मनीष पांडे

भारत, वर्ल्ड कप 2019

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मनीष पांडे

कर्नाटकचा आधारस्तंभ असलेल्या 29वर्षीय मनीष पांडेने वनडे पदार्पण केलं तेव्हा त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. मनीषने 2015मध्ये वनडे पदार्पण केलं. तेव्हापासून आतापर्यंत मनीषने 23 वनडेत भारताचं प्रतिनिधित्व केलं.

मनीषने 36.66च्या सरासरीने 440 धावा केल्या आहेत. मनीषच्या नावावर एक शतक आणि 2 अर्धशतकं आहेत. मनीषचा स्ट्राईक रेट 91.85 आहे.

शुभमन गिल

पंजाब दा पुत्तर या खेळाडूने गेल्या वर्षी न्यूझीलंडमध्ये झालेला U19 वर्ल्ड कप गाजवला होता. संघाचा उपकर्णधार असणाऱ्या शुभमनने त्या स्पर्धेत 124च्या सरासरीने 372 धावा केल्या होत्या. स्थानिक क्रिकेटमध्ये पंजाबसाठी खेळताना शुभमनच्या नावावर 77.78च्या जबरदस्त सरासरीसह 1089 धावा आहेत.

शुभमनचा स्ट्राईक रेट 77.28 असून त्याच्या नावावर 3 शतकं आणि 7 अर्धशतकं आहेत.

भारत, वर्ल्ड कप 2019

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शुभमन गिल

शुभमनच्या तंत्रकौशल्यावर आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सने संघाने विश्वास ठेवत त्याला संघात समाविष्ट केलं. 2018 हंगामात शुभमनने 13 मॅचेसमध्ये 203 धावा केल्या.

हाच फॉर्म यंदाच्या हंगामात कायम राखत शुभमनने 14 मॅचेसमध्ये 296 धावा केल्या. वनडेत मोठी इनिंग्ज खेळण्यासाठी आवश्यक टेंपरामेंट आणि वय शुभमनकडे असल्याने त्याच्याकडे भविष्य म्हणून पाहिलं जात आहे.

चेतेश्वर पुजारा

भारत, वर्ल्ड कप 2019

फोटो स्रोत, MUNIR UZ ZAMAN

फोटो कॅप्शन, चेतेश्वर पुजारा

टेस्ट क्रिकेटमध्ये टीम इंडियाची नवी वॉल अशी उपाधी चेतेश्वर पुजाराने मिळवली आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर खेळणारा पुजारा टीम इंडियाचा आधारस्तंभ आहे. टेस्ट स्पेशलिस्ट असं बिरुद नावामागे लागल्याने पुजाराचा वनडेसाठी विचारच होत नाही.

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरचा संघर्ष बघता, पुजाराचा कदाचित विचार होऊ शकतो. सहा वर्षांपूर्वी पुजाराने वनडे पदार्पण केलं. त्याच्या नावावर 5 वनडे आहेत. इनिंग्ज कशी खेळावी याचा वस्तुपाठ पुजाराने टेस्ट मॅचेसमध्ये अनेकदा सादर केला आहे. मधल्या फळीत खेळण्यासाठी पुजारा आदर्शवत आहे.

अजिंक्य रहाणे

वर्ल्ड कपदरम्यान टीम इंडियाची मधली फळी अडखळत असताना अजिंक्य रहाणेच्या नावाची सर्वाधिक चर्चा झाली. वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये सुरू असताना, अजिंक्यही इंग्लंडमध्येच खेळत होता. इंग्लंड काऊंटी संघ हॅम्पशायरसाठी अजिंक्य खेळत होता. शिखर धवन आणि नंतर विजय शंकर दुखापतग्रस्त झाल्यानंतर अजिंक्यच्या नावाचा विचार झाला होता.

भारत, वर्ल्ड कप 2019

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अजिंक्य रहाणे

टेस्ट संघाचा अविभाज्य भाग असणाऱ्या अजिंक्यच्या नावावर 90 वनडे आहेत. 35.26च्या सरासरीने अजिंक्यच्या नावावर 2962 धावा आहेत. यामध्ये 3 शतकं आणि 24 अर्धशतकांचा समावेश आहे. स्ट्राईक रोटेट करण्याच्या मुद्यावरून अजिंक्यला डच्चू देण्यात आला होता. मोठी खेळी करण्याचा प्रदीर्घ अनुभव अजिंक्यच्या नावावर आहे. वर्ल्ड कपनंतर रहाणेच्या नावाला पसंती मिळू शकते.

पृथ्वी शॉ

भारत, वर्ल्ड कप 2019

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पृथ्वी शॉ

स्थानिक क्रिकेटमध्ये वयोगट स्पर्धांमध्ये धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या पृथ्वी शॉने पदार्पणातच दिमाखदार शतकी खेळी केली. पृथ्वीच्या नावावर दोन टेस्टचा अनुभव आहे. त्याचं वय आहे फक्त 19. आयपीएल तसंच स्थानिक स्पर्धांमधली शानदार कामगिरीच्या बळावर पृथ्वीने कसोटी पदार्पण केलं.

यांच्यावरचा विश्वास कायमराहणार?

ऋषभ पंत

भारत, वर्ल्ड कप 2019

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ऋषभ पंत

आयपीएल आणि फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये आक्रमक पवित्र्यानिशी खेळणाऱ्या ऋषभ पंतच्या नावाची वर्ल्ड कप निवडीसाठी प्रचंड चर्चा होती. मात्र वर्ल्ड कपसाठीच्या मूळ संघात पंतचा समावेश करण्यात आला नाही. शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्यानंतर निवडसमितीने ऋषभला संघात समाविष्ट केलं.

21वर्षीय ऋषभला मोठी खेळी करण्यात अपयश आलं. मात्र गुणवत्ता आणि वय बघता ऋषभ टीम इंडियाचा कायमस्वरुपी भाग असण्याची शक्यता जास्त आहे.

दिनेश कार्तिक

भारत, वर्ल्ड कप 2019

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दिनेश कार्तिक

2007 वर्ल्ड कप संघात दिनेश कार्तिकचा समावेश होता मात्र तो एकही मॅच खेळला नाही. त्यानंतर झालेल्या 2011, 2015 वर्ल्ड कप संघात दिनेशचा समावेश नव्हता. यंदाच्या वर्ल्ड कपसाठी निवडसमितीने अनुभवी दिनेशच्या नावाला पसंती दिली. मात्र दिनेशला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही.

न्यूझीलंडविरुद्ध खातं उघडण्यासाठी दिनेशला 21 चेंडूंसाठी संघर्ष करावा लागला. वर्ल्ड कपमधली कामगिरी बघता दिनेशला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

विजय शंकर

भारत, वर्ल्ड कप 2019

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विजय शंकर

थ्री डी प्लेयर असं वर्णन झालेल्या विजय शंकरसाठी वर्ल्ड कपवारी दुखापतीमुळे वेळेआधीच संपुष्टात आली. बॅटिंगमध्ये विजयला विशेष चमक दाखवता आली नाही.

बॉलिंगमध्ये त्याला फारशी संधीच मिळाली नाही. फिल्डिंगच्या बाबतीत विजयची बाजू उजवी आहे. वर्ल्ड कपनंतर विशेषज्ञ फलंदाजांचा विचार केल्यास, विजय शंकरला डच्चू मिळू शकतो.

केदार जाधव

भारत, वर्ल्ड कप 2019

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, केदार जाधव

कमी चेंडूत जास्तीत जास्त धावा, स्लिंगिंग अक्शनची स्पिन बॉलिंग, कीपिंगचा अनुभव या गुणवैशिष्ट्यांमुळे केदार जाधव वर्ल्ड कप संघाचा भाग होता. मात्र केदारला मोठी खेळी करण्यात अपयश आलं.

गोलंदाजीत विशेष प्रभाव पाडू शकली नाही. वर्ल्ड कपनंतर केदारला पुन्हा संधी मिळण्याचीच शक्यता दिसते.

अंबाती रायुडू

भारत, वर्ल्ड कप 2019

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अंबाती रायुडू

टीम इंडियाच्या मूळ योजनांनुसार अंबाती रायुडू चौथ्या क्रमांकावर खेळणार होता. मात्र प्रत्यक्षात विजय शंकर आणि ऋषभ पंत या क्रमांकावर खेळले. विजय शंकर दुखापतग्रस्त झाल्यानंतर रायुडूला संधी मिळेल असं चित्र होतं. मात्र निवडसमितीने एकही वनडे न खेळलेल्या मयांक अगरवालची निवड केली.

नावावर सशक्त आकडेवारी असूनही दुसऱ्यांदा बाजूला सारण्यात आल्याने रायुडूने थेट निवृत्तीच जाहीर केली. निवृत्ती स्वीकारल्यामुळे रायुडूच्या नावाचा विचार होऊ शकत नाही.

वर्ल्ड कपमध्ये आपली मधली फळी

धोनी वर्ल्ड कपमध्ये

संभाव्य खेळाडूंची वनडे कामगिरी

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)