राज ठाकरे यांची निवडणूक आयोगाकडे मागणी 'विधानसभा निवडणुकीत मतपत्रिका वापरा', घेतली सोनिया गांधींची भेट
- Author, अमृता कदम
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
पाहा व्हीडिओ
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
EVM तसेच निवडणूक प्रक्रियेबाबत असलेल्या शंका घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी दिल्लीत निवडणूक आयोगाला भेट दिली. तेव्हा त्यांनी महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी EVM ऐवजी कागदी मतपत्रिकांचा वापर करावा, अशी मागणी आयोगापुढे केली.
निवडणूक आयुक्तांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, "2014 पूर्वी भाजपही EVM वर शंका घ्यायचा, तो पक्ष कोर्टातही गेला होता. पण 2014 नंतर भाजपनं त्याचा पाठपुरावा थांबवला. मी दिलेलं मत त्याच पक्षाला गेलंय का, हे पाहाण्याची पारदर्शकता असली पाहिजे."
EVM मुळे मतमोजणी लवकर होते या युक्तिवादाबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले, "आपल्याकडे दोन-दोन महिने निवडणुका चालतात मग मतमोजणीला दोन दिवस गेले तर काय हरकत आहे?"
निवडणूक आयुक्तांची भेट घेटल्यावर त्यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेतली आणि EVMच्या विषयावर चर्चा केली.

फोटो स्रोत, Handout
या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे, मात्र "यावेळी उभयतांत विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर चर्चा झाली," असं मनसेच्या ट्विटर अकाऊंटवरून सांगण्यात आलं.
मात्र थेट 10 जनपथला भेट देण्यामागचं नेमकं काय 'राज'कारण असावं, हा चर्चेचा विषय आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर लोकसभा निवडणुकीपूर्वी आघाडी झाली नाही, म्हणून राज यांनी थेट हाय कमांडची "त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली" का?
याविषयी लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान सांगतात की सोनिया गांधी आणि राज ठाकरे यांची ही भेट केवळ सदिच्छा भेट असावी. "लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाविरोधात राज ठाकरे यांनी प्रचार केला होता म्हणून त्यांनी सदिच्छा भेट घेतली असावी. पण एका मर्यादेच्या पलीकडे दोन्ही पक्षांनी सलगी केली तर मनसेच्या भूमिकेमुळे काँग्रेसवर परिणाम होऊ शकतो. काँग्रेसची विचारधारा सर्वसमावेशक असेल आणि ती बदलणारी नाही. त्यांच्या मुलभूत भूमिकेत बदल होऊ शकणार नाही. त्यामुळे भाजपाविरोध हा सामायिक धागा सोडला तर या भेटीत फारसे राजकारण नसावे," असं प्रधान यांना वाटतं.
'निवडणूक आयोगाकडून अपेक्षा नाही'
निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन आमचं म्हणणं मांडलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहाता त्यांच्याकडून शून्य अपेक्षा आहेत. पण केवळ औपचारिकता म्हणून आम्ही त्यांची भेट घेतली. आम्ही आमचं म्हणणं मांडलं, बाकी मी महाराष्ट्रात जाऊन पुढील निर्णय घेईन, असंही राज यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Twitter
EVM बाबतीत असणाऱ्या शंकांबाबत आपण ऑगस्ट 2018मध्येच सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना पत्रं लिहिली होती. मात्र त्यावेळेस कुणीच हालचाल केली नाही, असं सांगत राज ठाकरे यांनी जर निवडणुका फिक्स असतील तर तयारी कसली करणार, असा प्रश्न उपस्थित केला. "जी मॅच फिक्स आहे. त्यासाठी सराव, नेट प्रॅक्टिस करण्यात काय अर्थ आहे?" अशा शब्दांमध्ये त्यांनी निवडणुकांच्या पारदर्शकतेवर शंका उपस्थित केली.

फोटो स्रोत, SHARAD BADHE/BBC
राज ठाकरे यांच्याबरोबरच मनसे नेते आणि प्रवक्ते अनिल शिदोरे यांनीही निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "लोकांचा विश्वास, निवडणूक आयोगाचे प्रशासन आणि तांत्रिक बाबी" या आमच्या दृष्टीने तीन महत्त्वाच्या गोष्टी होत्या. EVM बद्दल वेगवेगळ्या कारणांनी शंका उपस्थित झाल्या आहेत. माहितीमध्ये तफावत असणे तसेच निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून माहिती गायब होणे, EVMची सुरक्षा अशा अनेक शंका समोर आल्या आहेत. त्या आम्ही आयोगासमोर मांडल्या. तसेच EVMच्या सोर्सकोडची चीप अमेरिकेतून येते का असाही प्रश्न आहे."
निवडणूक आयोगाला एका माध्यमसंस्थेनं प्रत्यक्ष मतदान आणि मोजलेलं मतदान यामध्ये तफावत असल्याचं दाखवून दिलं तरीही निवडणूक आयोगानं कोणतीही समिती स्थापन केली नाही. तसेच ही माहिती नंतर संकेतस्थळावरून गायब करण्यात आली, त्यानंतर आमच्या मनातल्या शंका वाढल्या, असं राज ठाकरे यांनी निवडणूक आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे.
पारदर्शकता, पुन्हा पुन्हा तपासणी करण्याची क्षमता आणि गुप्तता हे आदर्श, न्याय्य आणि खुल्या निवडणूक प्रक्रियेचे तीन आधारस्तंभ आहेत. निवडणूक अशी खुली आणि न्याय्य व्हावी हेच निवडणूक आयोगाचं उद्दिष्ट आहे. या सर्व निकषांवर निवडणूक मतपत्रिकेचा (बॅलेट) पर्यायच अधिक योग्य वाटतं असं ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








