मुंबईच्या तुंबईला 'क्लायमेट चेंज' जबाबदार: आदित्य ठाकरे #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, @AUThackeray
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1. 'मुंबईच्या तुंबईला क्लायमेट चेंज जबाबदार'
पावसामुळे मंगळवारी मुंबई पाणी तुंबलं. त्याला क्लायमेट चेंज कारणीभूत असल्याचं, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना यांनी हे वक्तव्य केलं आहे. एबीपी माझानं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
एवढा पाऊस झाला तर जगभरात कुठलीही सिस्टिम हतबल होईल, मी खोटं बोलणार नाही, ही आपत्कालीन स्थिती आहे, मुंबई महापालिका लोकांना सर्व मदत करण्याचा प्रयत्न करत आहे, असं आदित्य यांनी म्हटलं आहे.
दरम्यान मंगळवारच्या पावसामुळे उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर देखील पाणी साचलं होतं. लोकसत्तानं त्या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
2. राहुल गांधींसाठी फाशीचा प्रयत्न
राहुल गांधी यांनी त्यांचा राजीनामा मागे घ्यावा म्हणून एका काँग्रेस कार्यकर्त्यांनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं वृत्त आहे. या कार्यकर्त्याने गळफास लावून फाशी घेण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्लीतल्या काँग्रेस मुख्यालयाबाहेर हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी वेळीच या कार्यकर्त्याला रोखून ताब्यात घेतलं. इंडिया टुडेनं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, ANI
दरम्यान राहुल गांधी यांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसशासित पाच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी नवी दिल्लीमध्ये त्यांची भेट घेतली.
3. मुलगा कुणाचाही असो, मनमानीचा अधिकार नाही - मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप आमदार आकाश विजयवर्गीय यांच्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत.
नवी दिल्लीमध्ये भाजपच्या संसदीय समितीची बैठक पार पडली त्यावेळी मोदी बोलत होते.
मोदी म्हणाले, कोणाचाही मुलगा असो त्याला मनमानी करण्याचा अधिकार नाही. नवनिर्वाचित खासदार, आमदारांनी त्यांचे आचरण नीट ठेवताना आपली मर्यादा ओळखून काम करावे. समाजात वावरताना सर्वांना आपल्या मर्यादा माहीत असल्या पाहिजेत. त्यासोबतच आपलं वागणंही नियंत्रित ठेवलं पाहिजे. कोणाच्या वागण्यामुळे पक्षाचं नाव खराब होत असेत तर ते आम्हाला मान्य नाही.

फोटो स्रोत, ANI
इंदूरमध्ये एका जीर्ण घरावर कारवाई करण्यासाठी आलेल्या महापालिका अधिकाऱ्यांवर बॅट उगारतानाचा आकाश विजयवर्गिय यांचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली होती. ईटीव्ही भारतनं यासंबंधीचं वृत्त दिलं आहे.
4. नोटबंदीचा अर्थव्यवस्थेवर परिणाम नाही - अर्थमंत्री
भारत अजूनही वेगानं विकास करणारी अर्थव्यवस्था आहे. तसंच नोटबंदीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर कुठलाही परिणाम झाला नाही, असं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, ANI
राज्यसभेत एका प्रशाला उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. उत्पादन क्षेत्राला थोडा फटका बसला आहे, पण त्याचा नोटबंदीशी काही संबंध नाही, असं सीतारमण म्हणाल्या.
इकनॉमिक टाइम्समधील वृत्तानुसार, आर्थिकवृद्धी हे सरकारचं प्रमुख उद्दिष्ट आहे, तसंच जीडीपीच्या वाढीसाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत असंही त्यांनी सांगितलं.
5. मंदिराच्या तोडफोडीवर राजकारण
जुन्या दिल्लीमध्ये झालेल्या एका मंदिराच्या तोडफोडीवरून आता राजकारण सुरू झालं आहे. या मुद्द्यावरून स्थानिक खासदार विजय गोयल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केलं आहे.

फोटो स्रोत, Yaqut Ali/BBC
व्होटबँकेच्या राजकारणासाठी अरविंद केजरीवाल या मुद्द्यावर गप्प असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दिल्लीच्या चांदनी चौक भागात 2 गटांमध्ये झालेल्या वादानंतर एका मंदिराची तोडफोट करण्यात आली आहे.
दरम्यान एमआयएमचे खासदार असदुद्दिन ओवैसी यांनी या घटनेला जबाबदार असलेल्या लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा देशाच्या विविधतेवर केलेला हल्ला आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. इंडिया टीव्हीनं हे वृत्त दिलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








