मुंबईच्या आरोही पंडितने अटलांटिक महासागर पार करून असा रचला अनोखा विश्वविक्रम

आरोही आणि किथियर

फोटो स्रोत, SOCIAL ACCESS COMMUNICATION PVT LTD

फोटो कॅप्शन, आरोही आणि किथियर
    • Author, जान्हवी मुळे आणि सरोज सिंग
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

मुंबईची आरोही पंडित ही लाईट स्पोर्ट्स एअरक्राफ्टमधून एकट्यानं अटलांटिक महासागर पार करणारी जगातली पहिली महिला आणि सर्वांत तरुण पायलट ठरली आहे.

विमेन एम्पावरमेंट एक्सपीडिशन अर्थात 'WE' (वुई) नावाच्या या मोहिमेअंतर्गत कॅप्टन आरोहीने हा पराक्रम गाजवला. या मोहिमेत संपूर्णपणे महिलांची टीम पहिल्यांदाच लाईट स्पोर्टस एअरक्राफ्टमधून जगप्रदक्षिणा करत आहे. 23 वर्षांची आरोही आणि तिची 22 वर्षीय मैत्रिण तसंच सहकारी किथियर मिस्किटा या दोघी भारतीय महिला पायलट्स त्यात सहभागी झाल्या आहेत.

आरोहीने युनायटेड किंग्डमपासून कॅनडापर्यंतचं अंतर एकटीनं कापलं. पाच टप्प्यांमध्ये तिनं हा प्रवास पूर्ण केला. वाटेत आईसलँड आणि ग्रीनलँडमध्ये आरोहीनं मुक्काम केला. 13 मे रोजी (भारतीय प्रमाणवेळेनुसार 13 आणि 14 मे दरम्यान मध्यरात्री) आरोही कॅनडाच्या इकालुईट एअरपोर्टवर पोहोचली आणि तिनं हा विश्वविक्रम नोंदवला.

मुंबईच्या लेकी

आरोही आणि किथियर लाइट स्पोर्ट्स एयरक्राफ्ट चालवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला पायलट्स आहेत. दोघींनी मुंबईच्या फ्लाइंग क्लबमधून एव्हिएशनमध्ये पदवी घेतली आहे.

आरोही आणि किथियर

फोटो स्रोत, SOCIAL ACCESS COMMUNICATION PVT LTD

फोटो कॅप्शन, आरोही आणि किथियर

आरोही चार वर्षांची असताना तिने पहिल्यांदा विमान प्रवास केला होता. तेव्हापासूनच तिनं पायलट बनण्याचं स्वप्न पाहिलं होतं. तर किथियरनंही पायलट बनून आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. दोघीजणी गेल्या वर्षी WE मोहिमेत सहभागी झाल्या.

काय आहे 'माही'?

आरोही आणि किथियरनं आपल्या विमानाचं 'माही' असं नामकरण केलं आहे. पण या 'माही'चा क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीशी काही संबंध नाही.

या मोहिमेच्या संयोजक देवकन्या धर सांगतात, "या एयरक्राफ्टच्या नावाचा धोनीशी काही संबंध नाही. या शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ आहे पृथ्वी." एयरक्राफ्ट 'माही' हे भारताचं पहिलं रजिस्टर्ड लाइट स्पोर्ट्स एयरक्राफ्ट आहे.

SOCIAL ACCESS COMMUNICATION PVT LTD

फोटो स्रोत, SOCIAL ACCESS COMMUNICATION PVT LTD

लाइट स्पोर्ट्स एयरक्राफ्ट 'माही' च्या कॉकपिटमध्ये दोन लोकांना बसता येईल एवढीच जागा आहे. माहीचं इंजिन मारुति बलेनो कारएवढं शक्तिशाली आहे. ते ताशी 215 किलोमीटर वेगानं आकाशात उड्डाण करू शकतं. पण या विमानात एका वेळेस 60 लीटर इंधनच राहू शकतं. त्यामुळं एका वेळी हे विमान चार-साडेचार तासांचाच प्रवास करू शकतं.

कसा आहे प्रवासाचा मार्ग?

पंजाबच्या पटियाला एअर बेसपासून आरोही आणि किथियरचा प्रवास सुरू झाला.

त्यानंतर राजस्थान, गुजरातमधून पुढे पाकिस्तानातील कराचीमार्गे इराण, अझरबैजान, तुर्कस्तान, युरोपातील सर्बिया, स्लोवेनिया, जर्मनी, फ्रान्स, युनायटेड किंग्डम, आईसलंड, ग्रीनलँडमार्गे 'माही' कॅनडामध्ये दाखल झालं आहे. यातला युनायटेड किंग्डम ते कॅनडा हा टप्पा आरोहीनं एकटीनं पूर्ण केला.

आरोही आणि किथियर

फोटो स्रोत, SOCIAL ACCESS COMMUNICATION PVT LTD

मोहिमेच्या पुढच्या टप्प्यात अमेरिका, रशिया, जपान, दक्षिण पूर्व आशियातून 'माही' प्रवास करणार आहे. लहान विमान असल्यानं सलग प्रवास न करता टप्प्या टप्प्यानं त्यांचं मार्गक्रमण सुरू आहे.

माही जिथे मुक्कामासाठी थांबतं, तिथे पायलटच्या राहण्याची, विमानाच्या पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी आणि पुढचा मार्ग निश्चित करण्यासाठी त्यांच्या मदतीला ग्राऊंड स्टाफही आहे. विशेष म्हणजे या ग्राऊंड स्टाफमध्येही केवळ महिलांचाच समावेश आहे.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी जगप्रवास

'WE' मोहिमेला भारत सरकारच्या महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या 'बेटी पढाओ, बेटी बचाओ' मोहिमेचीही साथ लाभली आहे.

आरोही आणि किथियर

फोटो स्रोत, SOCIAL ACCESS COMMUNICATION PVT LTD

देवकन्या धर सांगतात, "स्त्रीमुक्ती आणि महिला सबलीकरणाचा संदेश देण्यासाठी उड्डाण घेण्याशिवाय आणखी चांगला मार्ग असू शकत नाही. आरोही आणि किथियर ज्या ज्या देशांत मुक्काम करणार आहेत, तिथं त्या या मोहिमेचा प्रचारही करत आहेत."

त्या माध्यमातून निधी उभा केला जाणार असून, देशभरातील 110 शहरांमधील गरीब कुटुंबातल्या मुलींना विमान उड्डाणाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे, अशी माहिती देवकन्या यांनी दिली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)