IPL 2019 final: महेंद्र सिंह धोनीच्या या चुकांमुळे चेन्नई सुपर किंग्स पराभूत?

महेंद्र सिंह धोनी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, आदेश कुमार गुप्त
    • Role, क्रीडा पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी

IPLच्या 12 हंगामाची फायनल चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्समध्ये खेळली गेली. ही मॅच इतकी उत्कंठावर्धक होती की अर्ध्या रात्री क्रिकेटच्या चाहत्यांची झोप उडाली.

हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या या मॅचमध्ये शेवटपर्यंत काय होईल हे सांगता येत नव्हतं. अखेर शेवटच्या क्षणी, शेवटच्या बॉलला मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपरकिंग्सला धूळ चारली.

हा शेवटचा बॉल टाकला होता मुंबईचा सगळ्यात अनुभवी बॉलर लसिथ मलिंगाने. मलिंगाला जग सगळ्यात धोकादायक यॉर्करचा जनक म्हणूनच ओळखतं.

बॅटिंग करत होता चेन्नईचा शार्दूल ठाकूर. 150 रन्सचं लक्ष्य असणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्सचा शार्दूल जेव्हा क्रीझवर आला तेव्हा टीमला फक्त 4 रनांची गरज होती.

मलिंगाच्या पहिल्या बॉलवर शार्दूलने 2 रन काढले. पण शेवटच्या बॉलवर मलिंगाच्या जबरदस्त ऑफ कटरला शार्दूल बळी पडला आणि मुंबई इंडियन्सने IPLचं जेतेपद चौथ्यांदा पटकावलं.

शार्दूलला पाठवणं ही धोनीची चूक

मलिंगाने टाकलेला बॉल स्टंपच्या अगदी समोर उभ्या असलेल्या शार्दूल ठाकूरच्या पॅडवर जाऊन आदळला आणि अंपायरने आपलं बोट उचलून इशारा केला - आऊट!

हे घडताक्षणी मुंबईच्या डगआऊटमध्ये बसलेले खेळाडू हर्षोल्हासाने पिचकडे धावले.

दुसऱ्या बाजूला चेन्नईच्या गोटात निराशा पसरली. पॅड बांधून हातात बॅट घेऊन सज्ज असलेला हरभरजन सिंग रागारागात उठला. एकंदर माहोलच असा होता की मॅच फिरवणारा धोनीचा निर्णय चुकीचा होता.

IPL final

फोटो स्रोत, Getty Images

क्रिकेट समीक्षक विजय लोकपल्ली यांच्या मते धोनीने खरंच मोठी चूक केली. शार्दूल ठाकूरऐवजी हरभजन सिंगला बॅटिंग करायला पाठवायला हवं होतं. हरभजन त्याच्या तडाखेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो.

तर क्रिकेट समीक्षक अयाझ मेमन यांच्यामते धोनीने शार्दूलची प्रथम श्रेणी क्रिकेटमधली कामगिरी बघून हा निर्णय घेतला असावा.

'हरभजनला पाठवायला हवं होतं'

आता जे झालं ते झालं, पण हरभजन प्रत्येक बाबतीत शार्दूलपेक्षा जास्त अनुभवी होता. मेमन म्हणतात, "दबावाखाली खेळायची शार्दूलची क्षमताही अधिक आहे."

पण ते हेही मान्य करतात की धोनीने विचार केला असेल की शार्दूल तरुण आहे, रविंद्र जाडेजा सोबतच्या भागीदारीत 1-2 रन पटकन पळून काढू शकतो. याव्यतिरिक्त शार्दूलला पाठवायचं काही कारण असेल, असं वाटत नाही.

IPL final

फोटो स्रोत, Getty Images

पण जिंकता जिंकता IPLचं जेतेपद हरण्यापेक्षा दुसरी मोठी निराशादायक गोष्ट धोनी आणि टीमसाठी असू शकत नाही.

वॉटसनचं रनआऊट होणं

चेन्नईच्या पराभवाचं दुसरं कारण म्हणजे सलामीवीर शेन वॉटसनचं रन आऊट होणं.

शेन वॉटसनने मागच्या वेळेस, 2018 मध्ये हैदराबाद विरुद्ध नाबाद शतक फटकावलं होतं. आपल्या एकट्याच्या बळावर त्याने चेन्नईला तिसऱ्यांदा चँपियन बनवलं होतं.

रविवारी शेनचा रागरंग पाहून वाटत होतं की तो पुन्हा गेल्या वेळेसारखीच दमदार खेळी करणार.

रनआऊट व्हायच्या आधी शेनने फक्त 59 बॉलमध्ये 8 फोर आणि 4 सिक्सच्या साहाय्याने 80 रन काढले होते.

लसिथ मलिंगाच्या शेवटच्या ओव्हरचा चौथा बॉल शेनने डीप पॉईंटकडे तडकावला. पहिला रन तर आरामात निघाला, पण स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याच्या प्रयत्नात शेन दुसरा रन घ्यायला धावला.

तिकडे कृणाल पांड्यांने बॉल अडवून विकेटकीपर क्विंटन डीकॉककडे फेकला. क्विंटनने स्टंपच्या बेल्स उडवल्या. त्यावेळेस शेन क्रीझपासून बराच लांब होता आणि म्हणून आऊट झाला.

IPL final

फोटो स्रोत, Getty Images

आश्चर्याची गोष्ट अशी आहे की शेन वॉटसनसोबत क्रीझवर होता रविंद्र जाडेजा. रविंद्रही मोठे शॉट खेळण्यासाठी ओळखला जातो.

शेन वॉटसनच्या आऊट होण्याच्या पद्धतीवर क्रिकेट समीक्षक आक्षेप नोंदवतात. ते म्हणतात, "त्याने इतकी मस्त इनिंग खेळली. शेनने खरंतर चेन्नईला मॅच जिंकवूनच परत यायला हवं होतं."

जर त्याने मॅच जिंकवून दिली असती तर क्रिकेटप्रेमी सहजासहजी विसरले नसते की कशाप्रकारे एका वय वाढलेल्या क्रिकेटरने आपल्या बळावर आपल्या टीमला सलग दुसऱ्यांदा चॅम्पियनशिप जिंकवून दिली.

आता मुंबईच्या विजयानंतर असं म्हणता येऊ शकतं की तरुण मुंबईने चेन्नईच्या म्हाताऱ्या वाघांना मात दिली. पण हे विसरता कामा नये की चेन्नईच्या 'डॅडी आर्मी'ने मुंबईच्या तरुण रक्ताला शेवटच्या बॉलपर्यंत विजयासाठी तिष्ठत ठेवलं. मुंबई फक्त 1 रनने जिंकली आहे.

काय योगायोग बघा, आपल्या आधीच्या ओव्हरमध्ये 20 रन देणाऱ्या 35 वर्षांच्या लसिथ मलिंगाने मुंबईला जिंकवून दिलं. मलिंगाही 'मुंबई इंडियन्स'चा डॅडी म्हणायला हवा, नाही?

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)