IPL 2019: दिल्लीला नमवत चेन्नई पुन्हा IPL फायनलमध्ये, रविवरी मुंबईशी लढत

चेन्नई

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चेन्नई सुपरकिंग्स
    • Author, आदेशकुमार गुप्त
    • Role, क्रीडा पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी

IPL 2019 मध्ये शुक्रवारी विशाखापट्टणमला झालेल्या क्वॉलिफायर-2 मध्ये चेन्नई सुपरकिंग्सने दिल्ली कॅपिटल्सचा सहा गड्यांनी पराभव केला. आता जेतेपदासाठी रविवारी चेन्नई सुपरकिंग्सचा सामना मुंबई इंडियन्सशी होईल.

विशाखापट्टणममध्ये झालेल्या या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने नऊ गडी गमावत 147 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल चेन्नईने 19व्या षटकात चार गड्यांच्या बदल्यात हे लक्ष्य पूर्ण केलं. आणि याबरोबरच तब्बल सात वर्षांनंतर आयपीएलच्या प्लेऑफ मध्ये खेळणाऱ्या दिल्लीचं अंतिम फेरीत जाण्याचं स्वप्न भंगलं.

दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या मते कोणतीही मोठी भागीदारी न झाल्यामुळे दिल्लीला पराभव पत्करावा लागला.

दिल्लीची खेळी

प्रथम बॅटिंग करताना दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत 9 गड्यांच्या मोबदल्यात 147 धावा केल्या.

दिल्लीच्या वतीने ऋषभ पंतने काही प्रमाणात चेन्नईच्या गोलंदाजांचा सामना केला. त्याने 25 चेंडूत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 38 धावा केल्या.

त्याशिवाय कोलिन मुनरोने 27 आणि शिखर धवनने 18 धावा केल्या. दिल्लीच्या संपूर्ण खेळीत ते चेन्नईच्या गोलंदाजांसमोर अतिशय दबावात होते, हे दिसत होतं.

12.5 षटकात अवघ्या 80 धावा काढत दिल्लीने पाच गडी गमावले. चेन्नईतर्फे दीपक चहर, हरभजन सिंह, रविंद्र जडेजा आणि डॅन ब्रावोने दोन दोन गडी बाद केले.

वॉटसन आणि डू प्लेसी

शेन वॉटसन आणि फॉफ डुप्लेसी यांनी संपूर्ण सामन्याचा चेहरामोहराच बदलला आणि सामना एकतर्फी झुकवत त्यांना विजय मिळवून दिला. या जोडीने मैदानात येताच दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरुवात केली.

या जोडीने पहिल्या विकेटसाठी 10.2 ओव्हरमध्ये 81 धावांची भागीदारी केली. या दोन्ही फलंदाजांनी स्वतःच्या 50-50 धावाही पूर्ण केल्या.

सामन्याच्या सुरुवातीलाच ही जोडी फोडण्याची चांगली संधी दिल्लीकडे चालून आली होती. दुसऱ्या षटकात दोन्ही फलंदाज चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात एकाच दिशेने धावत सुटले. मात्र दिल्लीच्या खेळाडूंना या संधीचा फायदा घेता आला नाही.

आयपीएल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शेन वॉटसन आणि डू प्लेसी

नंतर मात्र या दोघांनीही मागे वळून पाहिलं नाही. आधी त्यांनी योग्य चेंडू येण्याची वाट पाहिली आणि पाचव्या षटकापासून वेगाने धावा केल्या.

12व्या शतकात वॉटसनच्या तुफान फटकेबाजीमुळे दिल्लीच्या विजयाच्या आशा पूर्णपणे मावळल्या. कीमो पॉलच्या गोलंदाजीवर या षटकात वॉटसनने 25 धावा केल्या. या षटकात वॉटसनने तीन षटकार आणि एक चौकार लगावला.

त्यानंतर पुढच्या षटकात शेन वॉटसन आणि अमित मिश्राच्या गोलंदाजीवर ट्रेट बोल्टकडे अलगद झेल दिला. मात्र तेव्हापर्यंत त्याने चेन्नईला विजयाच्या वाटेवर नेऊन ठेवलं होतं.

आपल्या खेळीबाबत बोलताना वॉटसन काहीसा नर्व्हस झाला होता. डु प्लेसीने त्याला प्रेरणा दिली असं तो म्हणाला.

जेव्हा वॉटसन माघारी परतला तेव्हा चेन्नईचा स्कोर दोन गड्यांच्या मोबदल्यात 109 होता. सुरेश रैना केवळ 11 आणि धोनी नऊ धावांवर माघारी परतले तेव्हा सामन्यात उत्कंठा निर्माण झाली होती. मात्र उरलंसुरलं काम रायडू ने 20 धावा आणि ड्वेन ब्रावोने चार धावा करत पूर्ण केलं.

दिल्लीच्या ट्रेंट बोल्ट, इशांत शर्मा, अमित मिश्रा, आणि अक्षर पटेलने एक एक गडी बाद केला.

धोनी थोडासा नाखूश...

सामना संपल्यावर चेन्नईचा कर्णधार धोनी म्हणाला की सामन्यात त्यांनी अनेक झेल सोडले, क्षेत्ररक्षणात चुका केल्या तरीही अंतिम सामन्यात पोहोचल्याचा आनंद आहे.

चेन्नईला यावेळी क्वॉलिफायर-2 मध्ये खेळावं लागलं. अंतिम सामन्यात पोहोचण्याचही हाही एक मार्ग आहेच, असं धोनी म्हणाला.

अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठीच्या कामगिरीसाठी त्याने गोलंदाजांचे आभार मानले.

गेल्यावेळी चेन्नईने पहिल्या क्वालिफायर मध्ये सनराईजर्स हैदराबादचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. त्यानंतर हैदराबादलाच अंतिम सामन्यात नमवत आयपीएलचं विजेतेपद मिळवलं होतं.

धोनी

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, धोनी

त्या सामन्यातही शेन वॉटसनने 112 धावा करत चेन्नईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. यावेळीही त्याने हैदराबाद विरुद्ध 96 धावा केल्या तर दिल्लीविरुद्ध हे त्याचं दुसरं अर्धशतक होतं. यावेळीही त्याने 16 सामन्यात 318 धावा केल्या.

आता अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात हैदराबादला होईल. यंदाच्या हंगामात मुंबईने चेन्नईचा दोनदा पराभव केला. इतकंच नाही तर पहिल्या क्वालिफायरमध्येही त्यांचा पराभव केला.

आता अंतिम सामन्यात या पराभवांचा वचपा घेईल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्या