राजीव गांधी सहलीसाठी INS विराटने आले नव्हते: नरेंद्र मोदी यांच्या आरोपांवर माजी नौदल अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण

राजीव गांधी-नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणूक प्रचारामध्ये पुन्हा एकदा माजी पंतप्रधान राजीव गांधींना लक्ष्य केलं आहे. राजीव गांधींना 'भ्रष्टाचारी नंबर वन' म्हटल्यानंतर नरेंद्र मोदींना आता त्यांच्यावर नवीन आरोप केला आहे.

बुधवारी रामलीला मैदानावर पंतप्रधान दिल्लीमधल्या आपल्या पहिल्या प्रचारसभेत बोलत होते.

'जेव्हा मी काँग्रेसच्या गैरकारभारावर बोलतो, तेव्हा त्यांना एवढा राग का येतो,' असं नरेंद्र मोदींनी या सभेमध्ये बोलताना म्हटलं.

जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते, तेव्हा गांधी परिवार INS विराट या युद्धनौकेचा वापर 'खासगी टॅक्सी'सारखा करायचे, असा आरोप नरेंद्र मोदींनी दिल्लीतल्या सभेत केला.

गांधी परिवारानं आपल्या सुट्ट्यांसाठी युद्धनौकेचा वापर करून त्याचा अपमान केला असल्याचंही मोदींनी या सभेत म्हटलं.

नरेंद्र मोदींनी म्हटलं,

"कोणी सुट्ट्या घालवण्यासाठी सहकुटुंब युद्धनौकेवर गेलंय, असं कधी तुम्ही ऐकलं आहे का? हा प्रश्न ऐकून आश्चर्यचकित होऊ नका. असं झालंय आणि आपल्या देशातच झालंय. काँग्रेसच्या सर्वांत मोठ्या नामदार कुटुंबानं देशाची शान असलेल्या INS विराटचा वापर आपलं खासगी वाहन असल्याप्रमाणे केला होता. राजीव गांधी तेव्हा भारताचे पंतप्रधान होते आणि 10 दिवसांसाठी सुट्टीवर गेले होते. त्यावेळी INS विराट भारताच्या सागरी सीमांच्या रक्षणासाठी तैनात होती. मात्र या युद्धनौकेला सुट्टीवर निघालेल्या गांधी परिवाराला आणण्यासाठी पाठवलं. त्यानंतर राजीव गांधींच्या सगळ्या गोतावळ्यासह INSविराट एका बेटावर थांबविण्यात आली...तब्बल दहा दिवस ही युद्धनौका तिथंच होती. राजीव गांधींसोबत त्यांच्या सासरवाडीची मंडळीही होती. परदेशी नागरिकांना भारताच्या युद्धनौकेवर नेऊन देशाच्या सुरक्षेला धोका नाही का निर्माण झाला? की ते राजीव गांधी होते आणि त्यांच्यासोबत सासरवाडीची मंडळी होती...इटलीवरून आली होती म्हणून अपवाद केला."

राजीव गांधींच्या कुटुंबीयांच्या सरबराईसाठी नौदलाकडून एक हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आल्याचा आरोपही नरेंद्र मोदींनी केला.

काँग्रेसनं मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी पत्रकार परिषद घेऊन हे सर्व आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे.

"व्हाईस ऍडमिरल (रिटायर्ट) विनोद पसरिचा यांनी राजीव गांधी यांची ही ऑफिशियल भेट असल्याचं पुढे येऊन सांगितलं आहे. पण मोदींनी फॅक्टशी देणंघेणं काही नाही," असं खेडा यांनी म्हटलंय.

"मोदींकडे सांगण्यासाठी त्यांनी केलेल्या कामांबद्दल काहीच नसल्यानं ते असे आरोप करत आहेत. ते त्यांच्या अपयशांवर मतदान मागत आहेत," असंही खेडा यांनी म्हटलंय.

काय होतं हे संपूर्ण प्रकरण?

पंतप्रधानांनी 21 नोव्हेंबर 2013 ला इंडिया टुडेमध्ये प्रकाशित झालेल्या एका बातमीचा हवाला देत ट्वीट केलं होतं. 'भारतीय सैन्य दलाच्या प्रमुख युद्धनौकेचा वापर स्वतःच्या सुट्टीसाठी खासगी टॅक्सीप्रमाणे करण्याची कल्पनाही कोणी करू शकतं का?'

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

विमानवाहक युद्धनौका INS विराटला 1987 साली भारतीय नौदलामध्ये सामील करण्यात आलं होतं. 30 वर्षें सेवेत राहिल्यानंतर 2016 मध्ये INS विराट सेवेतून निवृत्त झाली.

मोदींनी इंडिया टुडेच्या बातमीचा उल्लेख केला आहे, त्यात नमूद केलेलं बेट हे लक्षद्वीपमधल्या 36 बेटांपैकी एक आहे. त्याचं नाव बंगाराम आहे. अर्ध्या स्क्वेअर मीटरच्या परिसरात पसरलेलं हे बेट पूर्णपणे निर्जन आहे.

राजीव गांधी

फोटो स्रोत, Getty Images

या बेटाची निवड करण्यामागे एक खास कारण होतं. या बेटावर परदेशी नागरिकांच्या येण्यावर कोणतेही निर्बंध नव्हते. लक्षद्वीपचे तत्कालिन पोलीस महासंचालक पीएन अग्रवाल यांनी सांगितलं, की बंगाराम बेट अतिशय सुरक्षित आहे आणि इतर जगाशी त्याचा काहीच संपर्क नाहीये. नैसर्गिकदृष्ट्या ही जागा अतिशय सुंदर आणि सुरक्षित आहे.

इंडिया टुडेच्या बातमीनुसार,

राहुल आणि प्रियंकाचे चार मित्र, सोनिया गांधींची बहीण, मेहुणे आणि त्यांची मुलगी त्याचप्रमाणे सोनियांची आई, त्यांचा भाऊ आणि मामा हे लोक INS विराटवर उपस्थित होते. राजीव गांधी यांचे अतिशय जवळचे मित्र अमिताभ बच्चन, त्यांची पत्नी जया बच्चन आणि तीन मुलंही विराटवर आली होती. अमिताभसोबतच्या तीन मुलांमध्ये त्यांचा भाऊ अजिताभ यांची मुलगी होती.

राजीव आणि सोनिया गांधी 30 डिसेंबर 1987च्या दुपारी या सुंदर बेटावर पोहोचले. अमिताभ बच्चन एका दिवसानंतर कोचीन-कावारत्ती हेलिकॉप्टर सेवेनं तिथं आले.

राजीव गांधी-सोनिया गांधी

फोटो स्रोत, Getty Images

बंगाराम बेटावर अमिताभची उपस्थिती दडविण्याचे भरपूर प्रयत्न करण्यात आले. मात्र अमिताभ यांना बंगारामपासून काही अंतरावर असलेल्या कावारत्तीमध्ये इंधन भरण्यासाठी थांबावं लागलं आणि त्यांच्या या दौऱ्याची बातमी फुटली.

त्यानंतर अमिताभ सुट्टीवरून परत येत होते, तेव्हा कोचीन एअरपोर्टवर इंडियन एक्स्प्रेसच्या एका फोटोग्राफरनं त्यांचा एक फोटो काढला. अमिताभला याचा राग आला आणि त्यांनी फोटोग्राफरला दमही दिला होता.

राजीव गांधींवरील आरोप दिशाभूल करणारे?

वजाहत हबीबुल्लाह

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, वजाहत हबीबुल्लाह

लक्षद्वीपचे माजी प्रशासक वजाहत हबीबुल्लाह आणि INS विराटचे माजी कमांडिंग ऑफिसर विनोद पसरिचा यांनी राजीव गांधींवरील हे आरोप फेटाळून लावले.

वजाहत हबीबुल्लाह यांनी ANI शी बोलताना सांगितलं, की राजीव गांधी तिथं पंतप्रधान या नात्यानं 'आयलंड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी'च्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आले होते. त्यांच्यासोबत संपूर्ण कॅबिनेट होतं. कवरत्तीमध्ये ही बैठक झाली होती."

INS विराटच्या दुरूपयोगाबद्दल बोलताना हबीबुल्लाह यांनी सांगितलं, की या आरोपात काही तथ्य नाही. INS विराट त्यावेळी तिथेच होती. मात्र ती पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी होती. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी काय काय बंदोबस्त असतो, हे आम्ही सांगू शकत नाही.

राजीव गांधी सोनियांच्या आई आणि कुटुंबीयांसह INS विराटवर आले होते, हा आक्षेप व्हाइस अॅडमिरल (निवृत्त) विनोद पसरिचा यांनीही पूर्णपणे फेटाळून लावला.

INS विराट

फोटो स्रोत, Getty Images

पसरिचा डिसेंबर 1987 साली विराटचे कमांडिंग ऑफिसर होते. त्यांनी म्हटलं, "राजीव गांधी सरकारी कामानिमित्त लक्षद्वीपला आले होते. तिथं 'आयलंड डेव्हलपमेंट अथॉरिटी'ची एक बैठक होती. या बैठकीत सहभागी होण्यासाठी ते लक्षद्वीपला आले होते, कौटुंबिक सहलीसाठी नाही. त्यांच्यासोबत पत्नी सोनिया, राहुल गांधी आणि IAS अधिकारी होते."

राजीव यांच्यासोबत अमिताभ बच्चन आणि त्यांचे कुटुंबीय तसंच सोनिया गांधीचे कुटुंबीय नसल्याचंही पसरिचा यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)