नरेंद्र मोदी यांचं काँग्रेसला आव्हान: हिंमत असेल तर राजीव गांधीच्या नावे निवडणूक लढवून दाखवा #5मोठ्याबातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा वाद शमलेला नाही.

फोटो स्रोत, Getty Images

1. 'हिंमत असल्यास राजीव गांधींच्या नावे निवडणूक लढवून दाखवा'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा वाद शमलेला नसतानाच त्यांनी पुन्हा एकदा राजीव गांधींवर टीका केली आहे. लोकसत्ताने यासंदर्भात बातमी दिली आहे.

"लोकसभेचे पाच टप्पे पूर्ण झाले आहे. आणखी दोन टप्पे उरले आहेत. ज्या माजी पंतप्रधानांवर बोफोर्सच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांच्या नावावर निवडणूक लढवण्याचं मी त्यांना आव्हान देतो," असं मोदी झारखंडमधल्या चाईबासामध्ये झालेल्या एका सभेत बोलताना म्हणाले.

देशाला पुन्हा एकदा स्थैर्याची आणि एका प्रभावी सरकारची गरज आहे, असंही ते म्हणाले. त्याचप्रमाणे देशाला रिमोटवर चालणाऱ्या पंतप्रधानांची गरज नाही, असं म्हणत मनमोहनसिंग यांच्यावर निशाणा साधला.

2. भाजप सध्या निराशाग्रस्त - काँग्रेस

भाजपला बहुमतासाठी मित्रपक्षांची गरज भासेल, अशा आशयाचं विधान भाजपचे ज्येष्ठ नेते राम माधव यांनी केलं होतं. यावरून भाजपवर निवडणुकीच्या निराशेचं सावट निर्माण झालं आहे, असं वक्तव्य काँग्रेसने केलं आहे. NDTV ने ही बातमी दिली आहे.

ब्लुमबर्गला दिलेल्या एका मुलाखतीत राम माधव म्हणाले, "आम्हाला स्वबळावर 271 जागा मिळाल्या तर आम्हाला आनंदच होईल. आणि NDA बरोबर असेल तर आम्हाला अगदी सहज बहुमत मिळेल." त्यांचं हे वक्तव्य भाजपच्या इतर नेत्यांच्या भूमिकेशी फारकत असल्याचं सांगितलं जात आहे.

राम माधव

फोटो स्रोत, Twitter

काँग्रेसचे प्रवक्ते जैवीर शेरगील म्हणाले की "भाजप स्वबळावर सरकार स्थापन करू शकत नाही आणि त्यांना मित्रपक्षांची गरज भासेल हे खुद्द भाजपने कबुल केलं आहे."

3. मोदींनी केलं नवीन पटनायक यांचं कौतुक

ओडिशात आलेल्या फणी वादळामुळे प्रभावित झालेल्या भागाचं पुनर्वसन करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी 1,000 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. द हिंदूने ही बातमी दिली आहे.

सोमवारी या भागाची हवाई पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "नवीन पटनायक यांच्या सरकारने किनारी भागातील लोकांना वेळेवर हलवून जीवितहानी टाळली."

त्यांनी राज्यातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांबरोबर आणि केंद्रीय अधिकाऱ्यांबरोबर बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळावर बैठकही घेतली. फणी वादळात मृतांचा आकडा 35 वर गेला आहे. मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजाराची मदत मोदींनी सोमवारी जाहीर केली.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

दरम्यान, या मदतकार्याचा आढावा घेण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आपण दोनदा फोन केला. मात्र त्यांना फोन घेतला नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

त्यावर बोलताना "मी मोदींना पंतप्रधान मानत नाही. आम्ही स्वतःची मदत करण्यास समर्थ आहोत. मी नवनिर्वाचित पंतप्रधानांशी बोलेन," असं वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी केलं. इंडिया टुडेनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

4. दुष्काळासाठी महाराष्ट्रातील आचारसंहिता शिथिल

दुष्काळी भागांमध्ये उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करावी, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली विनंती निवडणूक आयोगाने मान्य केली आहे.

लोकमतने दिलेल्या बातमीनुसार, दुष्काळ निवारणाची कामं करण्यास निवडणूक आयोगाने हरकत नसल्याचं कळविल्यानंतर दुष्काळ निवारणासंदर्भात मंत्रिमंडळातील दौरे काढता येणार आहेत. त्यामुळे आता मंत्र्यांना दुष्काळी भागात दौरे करता येतील आणि प्रशासनाला आवश्यक ते आदेशदेखील देता येतील. याशिवाय, चारा छावण्यांमधील जनावरांच्या आहारात शासनाने वाढ केली आहे.

मात्र मतमोजणी प्रक्रियेत समावेश असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मंत्र्यांच्या दौऱ्यात सहभागी होता येणार नाही. तसंच पाणी टंचाईच्या ठिकाणी कूपनलिकांची निर्मिती, पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, कालव्यांची देखभाल दुरुस्ती ही कामं तातडीने पूर्ण करता येतील.

5. भारतीय लष्कराच्या ताफ्यात 460 टँक्स

भारतीय लष्कराच्या ताफ्यात रशियन बनावटीचे 460 टँक्स येणार असल्याची बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. T-90 भीष्म नावाच्या या टँकसाठी 13,448 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 2022-2026 या काळात हे टँक्स भारतात येतील.

पाकिस्तानही याच टँकसाठी रशियाशी बोलणी करत असल्याचं या बातमीत पुढे म्हटलं आहे.

कोणत्याही युद्धजन्य स्थितीला तोंड देण्यासाठी लष्कर त्यांच्या कार्यपद्धतीत सध्या महत्त्वाचे बदल करत आहे. आता Cold start किंवा Pro Active Strategy ही कार्यपद्धती अवलंबण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)