बालाकोट : पाकिस्तानमधल्या ‘त्या’ मदरशातून पहिला ग्राउंड रिपोर्ट

बालाकोटमध्ये भारतीय वायुदलाने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर 43 दिवसांनी पाकिस्तान सरकारने आंतरराष्ट्रीय माध्यमांना थेट 'त्या' मदरशाची भेट घडवून आणली. यावेळी पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी आणि इतर देशांचे राजनयिक अधिकारीही सोबत होते.
बीबीसी न्यूजच्या उस्मान झहिद यांनी या भेटीचं व्हीडिओ चित्रीकरण केलं. यावेळी मदरशाची पक्की इमारत जशीच्या तशी उभी असल्याचं दिसून आलं. तसंच मदरशात 100-150 मुलं धार्मिक शिक्षण घेत असल्याचंही समोर आलं आहे.
त्यामुळे कट्टरवाद्यांना प्रशिक्षण देणारा 'तो' मदरसा नष्ट केल्याचं भारत सरकारच्या जे म्हणणं आहे, त्यावर प्रश्नचिन्हं उपस्थित झालं आहे.
दरम्यान आंतरराष्ट्रीय माध्यमांना बालाकोटमध्ये नेऊन काहीच झालं नसल्याचं दाखवणाऱ्या पाकिस्तानला भारतानं उत्तर दिलंय.
"एअरस्ट्राईकच्या घटनेला तब्बल दीड महिना उलटून गेल्यानंतर माध्यमांना बालाकोटमध्ये नेणं आणि परिस्थिती दाखवणं हेच बोलकं आहे. शिवाय 26 फेब्रुवारीला वायुदलानं दिलेल्या प्रत्युत्तरात आम्ही आमचं लक्ष्यं साध्य केलं आहे. आणि दहशतवादाला चोख उत्तर देण्यासाठी, निर्णायक कारवाई करण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचं यातून दिसून आलं आहे." असं भारताच्या परराष्ट्र खात्यानं बीबीसीला सांगितलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
14 फेब्रुवारी 2019 रोजी भारत प्रशासित काश्मीरमधल्या पुलवामात CRPFच्या तुकडीवर आत्मघातकी हल्ला झाला होता. त्यात 40 हून अधिक भारतीय जवान मारले गेले होते.
त्यानंतर 12व्या दिवशी म्हणजे 26 फेब्रुवारीला पहाटे भारतीय वायुदलानं बालाकोटच्या खैबर पख्तुनख्वा राज्यातील मदरशावर हवाई हल्ला केला. हा दहशवादी तळ आहे, असं त्यावेळी भारताने सांगितलं. या हल्ल्यात इमारत नष्ट केल्याचं, तसंच 'अनेक दहशदवादी' मारल्याचं भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी म्हटलं होतं.
लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील 91 जागांसाठी उद्या भारतात मतदान होत आहे. त्याआधी 24 तास बालाकोटमधील 'त्या' मदरशाला आंतरराष्ट्रीय माध्यमांना भेट देण्याची मुभा देण्यात आली. पाकिस्तान सरकारनं आयोजित केलेल्या या भेटीदरम्यान लष्कराचे अधिकारीही मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
बीबीसी न्यूजच्या उस्मान झहिद यांनी या भागातील सद्यस्थिती कथन केली. हा व्हीडिओ तुम्ही बीबीसी मराठीच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. या भेटीदरम्यान झहिद यांनी केलेली लाईव्ह कॉमेंट्री:
"मी आता या क्षणाला बालाकोटच्या नवाई भागातील जाबामध्ये आहे. इथे जो मदरसा आहे, त्यावर हल्ला केल्याचा दावा भारतीय वायुदलानं केला होता. तिथं मी पोहोचलो आहे. या इमातीचं कुंपण इथं दिसतं आहे. आम्ही हेलिपॅडवर उतरल्यानंतर दीड तास पायपीट केल्यानंतर इथं पोहोचलो आहोत. आता आम्ही या मदरशात जाऊन नेमकं काय सुरू आहे हे पाहणार आहोत.

"मला आतून काही मुलं शिकत असल्याच आवाज येतो आहे. काही सामानही समोर ठेवल्याचं दिसतं आहे. बरीच मुलंही आत उपस्थित आहेत. या मदरशासमोर एक मोकळं पटांगण दिसतं आहे. जिथं फुटबॉलच्या पोस्ट लागलेल्या दिसत आहेत. मुलं कदाचित ही जागा खेळण्यासाठी वापरत असावीत.
"ही मदरशाची इमारत आहे. जी एका मशिदीसारखी दिसते आहे. इथं आत जाण्यापूर्वी सगळे लोक चप्पल, बूट काढून जातायत. इथं बरीच मुलं उपस्थित आहेत. इथं काही पत्रकार आणि राजदूतही उपस्थित आहेत. मोठमोठ्या बर्फाच्छादित पर्वतांमध्ये हा भाग आहे. पाकिस्तानी लष्करानं हे सगळं पाहण्यासाठी आम्हाला इथं आणलं आहे. आता आम्ही आत जाऊन पाहणार आहोत की इथं किती मुलं शिकत आहेत.
(आत पोहोचल्यावर) "मी सध्या या मदरशातील मशिदीसारख्या दिसणाऱ्या हॉलमध्ये आलो आहे. इथं 100 ते 150 मुलं कुराणचा अभ्यास करत आहेत. कुठल्याही मदरशामध्ये जसा माहोल असतो, तोच इथं दिसत आहे. सध्या इथं बरेच बाहेरच्या देशातील पत्रकारही उपस्थित आहेत, जे फोटो घेतायत आणि परिस्थितीचा अंदाज घेतायत. पाकिस्तानी लष्करही आमच्यासोबत आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
अनेक प्रश्न
पण हे सगळं करण्यासाठी पाकिस्तान सरकारला किंवा लष्कराला 43 दिवस का लागले? भारतात पहिल्या टप्प्यातलं मतदानाआधीच ही भेट होणं हा योगायोग आहे का? मदरशाला मध्यंतरी सुटी का देण्यात आली? पत्रकारांना स्थानिकांशी बोलू दिलं का? हे सर्व प्रश्न आम्ही बीबीसीच्या उस्मान झहिद यांना विचारले. पाहूयात त्यांनी मदरशाच्या भेटीनंतर दिलेली उत्तरं:
प्रश्न - जो मदरसा कट्टरवाद्यांचा अड्डा होता आणि तो नेस्तनाबूत केला, तसंच त्यात काही कट्टरवादी मारले गेले असं भारतीय वायुदलानं म्हटलं होतं, तिथं पहिल्यांदाच पत्रकारांना घेऊन जाण्यात आलं. तुम्ही तिथं काय पाहिलंत?
उस्मान झहिद - पाकिस्तानी लष्करानं आंतरराष्ट्रीय माध्यमांना जाबा परिसराच्या दौऱ्यावर आणलं होतं. विशेष म्हणजे भारतीय वायुदलानं जो मदरसा नेस्तनाबूत केल्याचं म्हटलं होतं, तिथंही नेण्यात आलं. मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा भाग अतिशय दुर्गम आहे. आम्ही हेलिपॅडवर आल्यानंतर दीड तास डोंगराळ भागात पायपीट केल्यानंतर इथं पोहोचलो. आम्ही तीन ठिकाणी भेटी दिल्या.

त्यातल्या एका ठिकाणी मोठा खड्डा दिसला, तिथं भारतीय वायुदलानं पेलोड (स्फोटकं) टाकलं होतं, असं आम्हाला पाकिस्तानी लष्कराने सांगितलं. आणि तो भाग मानवी वस्तीपासून बराच दूर आहे. यात फक्त एका घराचं नुकसान झालं आणि एक जण जखमी झाल्याचं पाकिस्तानी लष्करानं सांगितलं. बाकी तीन ठिकाणी कुठलंही नुकसान झालेलं नाही. त्यानंतर आम्हाला एका डोंगराच्या माथ्यावर असलेल्य मदरशात नेण्यात आलं. आंतरराष्ट्रीय मीडियाला याठिकाणी आणण्याची पहिलीच वेळ होती.
प्रश्न - तुम्ही हे तर सांगितलं की तुम्हाला रस्त्यात काय पाहायला मिळालं. पण ज्या मदरशावरून प्रचंड वाद सुरू आहे. त्याची काय स्थिती आहे? तुम्ही काय पाहिलंत?
उस्मान झहिद - दीड तासाचा कठीण प्रवास करून आम्ही जेव्हा मदरशात प्रवेश केला. आम्ही पाहिलं की तिथं एक मोठी इमारत आहे. त्यासमोर एक पटांगण आहे. त्याच्या चारही बाजूला लोखंडाचं कंपाउंड आहे. त्याला एक दरवाजाही आहे. सगळ्यांत मोठा हॉल जो समोर दिसला ती मशीद आहे. तिथं 150-200 मुलं कुराणचा अभ्यास करत होते. मोठमोठ्या आवाजात त्यांचे शिक्षक त्यांना शिकवताना दिसत होते. एकही मुलगा 12-13 वर्षापेक्षा जास्त मोठा नव्हता.
काही शिक्षकांशी आम्ही बोललो, आम्ही विचारलं की हा मदरसा कोण चालवतं? त्यावर त्यांनी मौलाना अश्रफ साहब चालवतात. मी त्यांना विचारलं की जैश ए मोहम्मद किंवा मौलाना युसुफ अझहर चालवतात असं सांगितलं जातं, त्यावर ते म्हणाले की आम्हाला याबाबत काहीही माहीत नाही.
यावेळी इथं 10 पेक्षा जास्त राजनयिक अधिकारी उपस्थित होते. त्यांनीही मुलांची भेट घेतली. काही फोटो काढले. आम्हाला तिथं फक्त 20 मिनिटं वेळ घालवू दिला. यानंतर लष्कराचे प्रवक्ते असिफ गफूर बाजवांनी आमच्याशी संवाद साधला. ते म्हणाले की 'तुम्ही बघू शकता की ही एक जुनी-पुराणी इमारत आहे. इथं कुठलंही नुकसान झालेलं नाही. त्यामुळे भारतीय सरकार जो दावा करतंय त्यात काहीही सत्य नाही'. आधी ऑफ द रेकॉर्ड कॅमेरा बंद करून त्या गोष्टी सांगितल्या आणि त्यानंतर ऑन रेकॉर्डही तीच माहिती दिली.
प्रश्न - पाकिस्तानी लष्कर जर असं म्हणतंय की भारताचा दावा चुकीचा आहे, तर मग आंतरराष्ट्रीय माध्यमं आणि राजनयिक अधिकाऱ्यांना इथं घेऊन जाण्यास 43 दिवस का लागले? याचं काय उत्तर आहे त्यांच्याकडे?
उस्मान झहिद - नक्कीच हा प्रश्न विचारण्यात आला की, इतक्या उशिराने आम्हाला इथं का आणण्यात आलं? त्यावर पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते असिफ गफूर बाजवा यांनी सांगितलं की, घटना खूप वेगानं घडत होत्या. आम्हालाही अडचणी होत्या की तुम्हा सगळ्यांना एकत्र कसं आणायचं. आता ही एक चांगली संधी आम्हाला मिळाली की बाहेरच्या देशातील राजनयिक अधिकारीही पाकिस्तानमध्ये आले होते.

इथं कुणीही येऊ शकत होतं, असं ते म्हणाले. पण आपल्याला माहिती आहे की रॉयटर्सच्या पत्रकारांना रोखण्यात आलं. लोकल मीडियालाही या इमारतीजवळ जाण्याची परवानगी नव्हती. सगळ्यांना हे माहिती आहे की तिथं जाण्याची मुभा कुणालाही नव्हती. पण त्यांचं म्हणणं होतं की 'घटना वेगानं घडत होत्या आणि परिस्थिती तणावग्रस्त होती, त्यामुळे आम्हाला वेळ मिळाला नाही. पण आता सगळं तुमच्या समोर आहे.'
प्रश्न - जो व्हीडिओ तुम्ही पाठवलाय त्यात दिसतंय की हा मदरसा काही दिवस बंद होता, त्याच्या बोर्डवर छर्ऱ्यांच्या खुणा दिसत आहेत. तिथल्या लोकांशी, मुलांशी बोलल्यानंतर हा मदरसा काही दिवस बंद होता, अशी माहिती तुम्हाला मिळाली का?
उस्मान झहिद - मी विचारलं. तिथल्या बोर्डवर लिहिलं होतं 27 फेब्रुवारी ते 14 मार्चपर्यंत हा मदरसा तात्पुरता बंद आहे. मी लष्कराच्या लोकांना आणि मुलांनाही विचारलं, त्यावर ते म्हणाले की तणावग्रस्त परिस्थिती पाहून थोडा काळ मदरसा बंद होता असं सांगण्यात आलं. तिथल्या एका शिक्षकानं तर मला सांगितलं की आताही तिथं सुट्ट्याच सुरू आहेत. इथं सध्या जी मुलं तुम्हाला शिकताना दिसत आहेत, ती स्थानिक मुलं आहेत.

सध्या सुट्ट्याच आहेत. हे ऐकून मी हैराण झालो. कारण सुटीतही इथं 150-200 मुलं दिसत होती. पण विद्यार्थ्यांची संख्या नीटपणे ते सांगत नव्हते. पण मी आम्हाला तिथं छायाचित्रं घेऊ दिली. शूटिंग करू दिलं. पण जेव्हा कुणी तिथल्या मुलांशी, लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्यावर लष्कराचे लोक बारीक नजर ठेऊन होते.
काही वेळा तर लवकर लवकर आटपा अशी घाई करण्यात आली. आपल्याला पुढे जायचं आहे, असं म्हणून घाई करण्यात आली. त्यांचा प्रयत्न होता की आम्ही जास्त लोकांशी बोलू नये. आम्ही जास्त लोकांशी बोलू नये म्हणून ते मर्यादा घालताना दिसत होते.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 3
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








