मोदी सरकारमध्ये अमित शहा गृहमंत्री: अटकेपासून सुटकेपर्यंतचा आणि वादापासून विजयापर्यंतचा प्रवास

शपथविधी

फोटो स्रोत, PRAKASH SINGH

    • Author, अजय उमट
    • Role, ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी

भरपूर मसाले घालून केलेली पावभाजी अमित शहांना आवडते. त्यांना राजकारणातही काहीही कमी असलेलं चालत नाही. त्यांना ते मान्यच नसतं.

"मला ते दिवस आठवतात जेव्हा एक तरुण कार्यकर्ता म्हणून मी नारनपुरा भागात भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसाठी पोस्टर चिकटवायचो. अनेक वर्षं लोटली आहेत आणि माझं वयही बरंच वाढलं आहे. मात्र आठवणी अजूनही ताज्या आहेत. माझी सुरुवात इथूनच झाली होती."

अमित शहांनी 1982 सालची आठवण जागवली. तेव्हा ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते होते. 30 मार्चला गांधीनगरमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आयोजित रोड शोमध्ये ते बोलत होते.

1982 पासून अनेक वर्षं लोटली आहेत आणि कोणे एके काळी अटल बिहारी वाजपेयी आणि भाजपच्या इतर दिग्गज नेत्यांसाठी पोस्टर चिकटवणारा तो तरुण आज स्वतः भाजपचा पोस्टर बॉय झाला आहे.

भाजपला केंद्रात दुसऱ्यांदा बहुमत मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. आणि आता तर त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्याकडे गृह मंत्रालयाची जबाबदारी देऊन मोदींनी मोठाच विश्वास दाखवला आहे.

अभाविपमधून सुरू झाली कारकीर्द

अमित शहा यांचा आतापर्यंतचा प्रवास अनेक नाट्यमय घडामोडींनी भरलेला आहे. याची तुलना एखाद्या बॉलीवुड सिनेमातील नायकाच्या आयुष्याशी करता येईल.

शहा यांनी आपल्या जीवनात सर्व प्रकारचा चांगला वाईट काळ बघितला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून आपला राजकीय प्रवास सुरू करणारे शहा आज अशा ठिकाणी पोहोचले आहेत, जिथे पक्षाच्या कामगिरीसाठी ते पूर्णपणे जबाबदार आहेत, मग निवडणुकीतला विजय असो वा पराजय.

शहा यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत एका वाण्याच्या घरी झाला. वयाच्या चौदाव्या वर्षी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गेले आणि हीच त्यांच्या राजकीय आयुष्याची सुरुवात मानली जाते.

गांधीनगर जिल्ह्यात मनसा नावाचं एक छोटं शहर आहे. इथूनच त्यांनी तरुण स्वयंसेवक म्हणून सुरुवात केली. हे त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचं वळण होतं.

अमित शाह

फोटो स्रोत, AFP/Getty Images

यानंतर अमित शहा महाविद्यालयीन शिक्षणासाठी अहमदाबादला गेले. तिथे त्यांनी अभाविपचं सदस्यत्व घेतलं. 1982 साली बायोकेमिस्ट्रीचा अभ्यास करत असताना त्यांना अभाविपच्या अहमदाबाद शाखेचं सचिवपद मिळालं.

यानंतर ते भाजपच्या अहमदाबाद विभागाचे सचिव झाले आणि तिथून त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. त्यांना पक्षाने राज्यातील अनेक महत्त्वाची पदं दिली.

भारतीय जनता युवा मोर्चाचे कोषाध्यक्ष असताना 1997 साली त्यांच्यावर भाजप प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

मात्र सोहराबुद्दीन आणि कौसर बी यांच्या बनावट चकमकीप्रकरणी त्यांना तुरुंगात जावं लागलं आणि पदोन्नतीची ही साखळी खंडित झाली.

राजकारणातील मातब्बरांच्या मते, त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली होती.

तुरुंगात रवानगी

2005 साली गँगस्टर सोहराबुद्दीन शेख आणि त्याची पत्नी कौसर बी यांच्या कथित बनावट एन्काउंटर प्रकरणी जेव्हा अमित शहांचं नाव आलं, तेव्हा अमित शहा गुजरातचे गृहराज्य मंत्री होते.

पुढे 2006 साली तुलसी प्रजापती या गुन्हेगाराच्या कथित बनावट एन्काउंटर प्रकरणीही अमित शहांचं नाव आलं. या दोन्ही प्रकरणांमुळे अमित शहांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. या प्रकरणांमध्ये इतकी नाट्यमय वळणं आली की त्यांची तुलना 'गेम ऑफ थ्रोन्स' या अमेरिकन सीरिजशी करता येईल.

सोहराबुद्दीनच्या कुटुंबीयांनी सुप्रीम कोर्टाची दारं ठोठावली. त्यामुळे 2005 ते 2006 या काळात या प्रकरणाची कसून चौकशी झाली.

गुजरात आणि राजस्थान या दोन राज्यांच्या अनेक पोलीस आधिकाऱ्यांवर या प्रकरणी सहभागी असल्याचे आरोप झाले. MN दिनेश, राजकुमार पांडियन, DG वंझारा आणि अमित शहांसह अनेक आरोपींना अटक करण्यात आली.

25 जुलै 2010 या दिवशी अमित शहांना अटक करण्यात आली आणि 29 ऑक्टोबर 2010 रोजी त्यांना जामीन मिळाला. सप्टेंबर 2012 पर्यंत गुजरातमध्ये प्रवेश करण्यास त्यांना मनाई करण्यात आली.

अनेक वर्षं कायद्याची लढाई लढल्यानंतर 30 सप्टेंबर 2014ला CBI कोर्टाने त्यांना निर्दोष मुक्त केलं.

अमित शाह

फोटो स्रोत, Reuters

मुलगाही वादाच्या भोवऱ्यात

2017 सालच्या ऑक्टोबर महिन्यात 'द वायर' या वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या बातमीमुळे अमित शहा पुन्हा वादात सापडले.

या बातमीत दावा करण्यात आला होता की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आणि अमित शहा भाजपचे अध्यक्ष झाल्यानंतर शहांचे मुलगे जय शहा यांच्या कंपनीचा टर्नओव्हर 16 हजार पटींनी वाढला.

रजिस्ट्रार ऑफ कंपनीजच्या वेबसाईटवरच्या दस्तावेजांचा दाखला 'द वायर'च्या बातमीत देण्यात आला होता.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

2014-15 मध्ये शहांची मालकी असलेल्या टेंपल एंटरप्राईज लिमिटेड या कंपनीची उलाढाल केवळ 50 हजार रुपये होती. ती एका वर्षातच मोदी सत्तेत आल्यावर 80.5 कोटी रुपये इतकी झाली. त्यानंतर एका वर्षात (ऑक्टोबर 2016) जय शहांनी व्यापारी काम पूर्णतः बंद केलं.

ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अमित शहा यांनी द वायर या वेबसाईटची रिपोर्टर रोहिणी सिंह आणि संस्थापक सिद्धार्थ वरदराजन यांच्यासह 7 जणांविरोधात अहमदाबादमध्ये अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला. सध्या हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे.

'शहा आणि मोदी - एक नाणं, दोन बाजू'

ऑक्टोबर 2010मध्ये तुरुंगातून आल्यानंतर अमित शहा पक्षासाठी कठोर परिश्रम घेऊ लागले आणि त्यांच्या विकासाची गाडी पुन्हा वेग पकडू लागली.

अमित शहांना जवळून ओळखणाऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांनी गांधीनगर मतदारसंघात जोमाने काम केलं आणि त्यामुळे अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांना फायदा झाला.

वाजपेयी आणि अडवाणी यांच्याप्रमाणेच शहा यांनी नरेंद्र मोदी यांनादेखील राष्ट्रीय राजकारणाच्या क्षितिजावर आणण्यासाठी मदत केली, असं राजकारणावर लक्ष ठेवणाऱ्या आणि पक्षाशी संबंधित कार्यकर्ते सांगतात.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

मोदी आणि शहा या दोघांना जवळून ओळखाऱ्या एका भाजप नेत्याने त्यांचं वर्णन या शब्दांत केलं: 'मोदी आणि शहा एकाच वेळी अनेक शतकं ठोकणाऱ्या फलंदाजांची जोडी आहे'.

"मोदी आणि शहा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अनेक दशकांपासून ते एकत्र आहेत. ते एकसारखाच विचार करतात. ते एका परफेक्ट टीमसारखं काम करतात. दोघांचाही खाजगी आणि राजकीय आयुष्याप्रति दृष्टिकोन वेगवेगळा असल्याचं जाणवतं, मात्र दोघंही एकमेकांना पूरक आहेत," त्या नेत्याने सांगितलं.

अमित शाह

फोटो स्रोत, European Photpopress agency

ते पुढे सांगतात, "शहा असे फलंदाज आहेत, जे फलंदाजी करणाऱ्या दुसऱ्या सहकाऱ्याला साथ देतात आणि त्याला अधिकाधिक शतकं झळकवण्यात मदत करतात. ते असे फलंदाज आहेत जे वैयक्तिक स्कोरची काळजी न करता टीमच्या विजयासाठी प्रयत्न करतात. 2014च्या विजयासाठी मोदींनी त्यांना 'मॅन ऑफ द मॅच' ठरवलं होतं."

त्या ज्येष्ठ नेत्याने अमित शहांसाठी म्हटलं की ते चित्रपट दिग्दर्शकासारखे आहेत. ते कॅमेऱ्याच्या मागून काम करतात आणि अभिनेत्याला स्टार बनवतात. शहा यांनी अनेक राजकीय स्टार बनवले आहेत, मात्र सुपरस्टार आहेत नरेंद्र मोदी.

संघटनात्मक कौशल्य

राजकारणावर नजर ठेवणाऱ्यांच्या मते अमित शहा एक उत्तम व्यवस्थापक आहेत. त्यांची शिस्त लष्कराप्रमाणेच आहे आणि ही शिस्त भाजप कार्यकर्त्यांमध्ये दिसते.

ते स्वतः आपल्या कॅडरला शिस्त लावतात. बूथ मॅनेजमेंटवर अनेक वर्षांपासून त्यांचा भर आहे. याचा परिणाम आधी गुजरात निवडणूक आणि त्यानंतर 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत दिसला.

त्यांची रणनीती आणि प्रशासकीय कार्यक्षमतेमुळेच पक्षाने त्यांना 2010 साली सरचिटणीस पद देत उत्तर प्रदेशच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली.

शहा यांनी उत्तर प्रदेशात भाजपचे निवडणूक नशीबच बदललं आणि पक्षाला न भूतो न भविष्यति यश असं यश मिळालं. 80 जागांच्या या राज्यात भाजपने 73 जागा पटकावल्या.

ते प्रभारी असताना उत्तर प्रदेशात पक्षाचा व्होट शेअर दोन वर्षांत जवळपास अडीच पट वाढला. 2014च्या निवडणुकीत शहा भाजपच्या निवडणूक समितीचे सदस्य होते आणि त्यांच्यावर जनसंपर्क, मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचणे आणि नवीन मतदारांना जोडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

अमित शाह

फोटो स्रोत, AFP/Getty Images

हमखास यश मिळवून देण्याच्या त्यांच्या कौशल्याने 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. निवडणुकीच्या आधी आणि नंतर युती करण्याच्या त्यांच्या कौशल्याला सर्वच दाद देतात.

विरोधी पक्षातील खासदार, आमदार यांना फोडून आपल्यासोबत जोडण्याच्या कलेत ते पारंगत असल्याचाही दावा केला जातो. पक्षाला गरज असेल तेव्हा तेव्हा ते हे करतातच. नाकारताच येणार नाही, असा प्रस्ताव ते समोरच्या व्यक्तीसमोर मांडतात.

पक्षांतर्गत बाबींचा अभ्यास करणारे तज्ज्ञ सांगतात की पक्षाने देशाच्या उत्तर, मध्य आणि पश्चिमेकडील भागातील राजकीय युद्धभूमीवर केवळ विजय मिळवलेला नाही तर त्यावर प्रभूत्व प्रस्थापित केले आहे. मात्र दक्षिण आणि ईशान्य भारतात आपला प्रभाव पाडण्याचा पक्षाचा अजूनही प्रयत्न सुरू आहे.

भाजपचे एक ज्येष्ठे नेते सांगतात, "शहा दक्षिण भारतातील राज्यांत बऱ्याच काळापासून शांतपणे काम करत आहेत. त्यांनी दक्षिण आणि ईशान्य भारतात प्रत्यक्ष खूप काम केले आहे. ही ती राज्ये आहेत जिथे भाजपचं कुठलंच भविष्य दिसत नाही. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांसाठी अनेक आघाड्या उघडल्या आहेत आणि या आघाड्यांवर लढण्यासाठी त्यांना सज्ज करत आहेत. त्यांनी केलेले काम हे लोकसभा निवडणुकीच्या निकालांवरून स्पष्ट दिसतं."

अमित शाह

फोटो स्रोत, Getty Images

केवळ पक्षातील नेते आणि कार्यकर्तेच नाही तर इतर पक्षातील नेतेदेखील अमित शहा यांच्या सोशल इंजीनिअरिंग कौशल्याची स्तुती करतात. भाजपतील एक ज्येष्ठ नेते सांगतात, "इतर कुठल्याच नेत्याला अमित शहांप्रमाणे जातीची वीण जमत नाही. जातीचं राजकारण ते अंतर्बाह्य जाणून आहेत. त्यांचे एकट्याचे कौशल्य काँग्रेसच्या सर्व रणनीतीकारांचा घाम काढतो."

बुद्धिबळाचे खेळाडू शहा

शहा खवय्ये आहेत. मसालेदार पदार्थ त्यांच्या आवडीचे. अहमदाबादमध्ये असतील तेव्हा ते भजियाची जास्त मसाला असलेली पावभाजी नक्की खातात.

अमित शहा यांनी आपल्या आयुष्यात कधीच चारचाकी गाडी चालवलेली नाही. 'दोन-चाकी' माणूस, अशीही त्यांची संभावना करण्यात आली. 2000 सालापर्यंत ते आपली स्कूटरच चालवायचे.

बुद्धिबळ हा शहा यांचा आवडता खेळ. रिकाम्या वेळेत त्यांना बुद्धिबळ खेळायला आवडतं.

ज्योतिषशास्त्रावर त्यांचा गाढ विश्वास आहे. कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी ते ज्योतिषाचा सल्ला घेतात. त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली त्याचवेळी एका ज्योतिष्याने त्यांच्या आयुष्यात राजयोग असल्याचे भाकित केले होते.

अमित शाह

फोटो स्रोत, Reuters

ते शिवशंकराचे भक्त आहेत. विशेषतः सोमनाथ महादेव मंदिरावर त्यांची श्रद्धा आहे. याच कारणामुळे नरेंद्र मोदी यांनी शहा यांना सोमनाथ मंदिर ट्रस्टचे सदस्य बनवले.

शहा यांना भारतीय शास्त्रीय संगिताची देखील आवड आहे. लांबच्या प्रवासात कारमध्ये मोठ्या आवाजात संगीत ऐकायला त्यांना आवडतं. गायक मुकेशचे ते फॅन आहेत. त्यांना गाण्याच्या भेंड्या खेळायलाही आवडतं. गाण्याच्या भेंड्यामध्ये ते कधीच हरत नाही, असं म्हणतात.

शहा यांची स्मरणशक्ती हत्तीसारखी आहे, असंही म्हणतात. कुठल्याही विधानसभेतील ठिकाण, नेते आणि कार्यकर्त्यांची नावं त्यांना चटकन लक्षात राहतात. हिंदीतील अनेक गाणी त्यांना पूर्ण पाठ आहेत.

1982 साली त्यांची नरेंद्र मोदींशी पहिली भेट झाली. त्यावेळी मोदी संघाचे प्रचारक होते आणि अमित शहा अभाविपचे तरुण नेते. या भेटीमुळे भारतीय राजकारण बदलेल, असं त्यावेळी कुणालाही वाटलं नसेल.

अमित शहा आता गांधीनगरहून निवडून आले असले आणि केंद्रीय गृहमंत्री झाले असले, तरी त्यांच्या नावाभोवतीचे अनेक वाद आजही कायम आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)