लोकसभा 2019 : अहमदनगरमध्ये 'सासरे' आणि 'वडिलां'समोर मोठा पेच

सुजय विखे पाटील

फोटो स्रोत, facebook

    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठीसाठी

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ उमेदवारी देण्यापासूनच गाजतोय. जितकं नगर दक्षिणची उमेदवारी गाजली तितकीच इथली राजकीय समिकरणंही गुंतागुंतीची झाली आहेत.

डॉ. सुजय विखे पाटील आणि संग्राम जगताप या दोन तरुण उमेदवारांमध्ये इथं काटे की टक्कर आहे. त्यात नाराज असलेले विद्यमान खासदार दिलीप गांधी आणि त्यांचा मुलगा शिवेंद्र गांधी यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगरमध्ये प्रचार करणार नाही, असं जरी जाहीर केलं असलं तरी मुलासाठी मतांची जुळवाजुळव करताना दिसतायेत. राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर दक्षिणचे विद्यामान खासदार दिलीप गांधी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.

संग्राम जगताप

फोटो स्रोत, Prajakta pol/bbc

फोटो कॅप्शन, संग्राम जगताप

त्यामुळे कॉंग्रेसचे स्टार प्रचारक आणि विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा नगरमध्ये तरी भाजपला पाठिंबा असल्याचं दिलीप गांधींनी म्हटलं आहे.

तसंच राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांचे सासरे आणि भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले हे भाजपच्या व्यासपीठावर जाऊन डॉ. सुजय विखे पाटील यांचा प्रचार करत असले तरी जावयाला पराभूत कसं करणार हा पेच त्यांच्यासमोर आहे.

घराणेशाहीची प्रतिष्ठा पणाला

सुजय विखे-पाटील यांच्या उमेदवारीवरून पवार आणि विखे-पाटील घराण्याचे जुने वाद समोर आले. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले.

सुजय विखे हा डोक्यात हवा गेलेला उमेदवार असल्याचं शरद पवार यांनी नगरच्या सभेत बोलताना म्हटलं. तर त्याला प्रत्युत्तर देताना माझ्या डोक्यात हवा नाही तर माझी हवा जनतेत असल्याचं सुजय विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

संग्राम जगताप

फोटो स्रोत, facebook/sangram jagtap

फोटो कॅप्शन, संग्राम जगताप

राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे पडद्यामागून भाजपलाच मदत करत असल्याचा आरोप केलाय.

सुजय विखे-पाटील यांना भाजपमध्ये आणण्यात भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांचा मोठा हात असल्याचं बोललं जात आहे.

पण शिवाजी कर्डिलेंना जावई संग्राम जगताप यांच्या विरोधात प्रचार करावा लागत आहे. पण यामुळे सर्व घराण्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

मतांचं गणित

अहमदनगरवर सहकार क्षेत्राचा तितकासा प्रभाव नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघात शिवसेना भाजपचं वर्चस्व आहे.

या मतदारसंघात ६ विधानसभा क्षेत्र आहेत. त्यातील ३ आमदार हे भाजपचे, १ आमदार हा शिवसेनेचा आहे तर दोन आमदार हे राष्ट्रवादीचे आहेत.

स्थानिक नेतृत्व आणि जातीय मतांची किनार इकडच्या राजकारणाला आहे. नगरमध्ये संमिश्र जातीचे मतदार आहेत. पाथर्डी, श्रीगोंदा भागात जवळपास दीड लाख मतदार हे वंजारी समाजाचे आहेत. गोपीनाथ मुंडेंना मानणारा हा मोठा वर्ग आहे. त्याचा फायदा निश्चितच भाजपला होतो.

सुजय विखे पाटील

फोटो स्रोत, Prajkta pol

माळी समाजाची मतं विभागली जातात. तर नगर शहरात मुस्लिम समाजाचाही प्रभाव आहे.

पण यावेळी कुठलीही लाट नाही. त्यात युतीचा उमेदवार हा कॉंग्रेसमधून आयात केलेला आहे. त्याचबरोबर पवार विरूध्द विखे पाटील अशी ही निवडणूक रंगतेय. त्यामुळे या निवडणुकीत मतांची गणितं वेगळी दिसू शकतात, असं जेष्ठ पत्रकार अशोक तुपे यांना वाटतं.

त्यामुळे आता नगर दक्षिणच्या खासदारकीसाठी कुणाची वर्णी लागतेय हे बघणं उत्सुकतेचं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)