उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश, उत्तर मुंबईतून उमेदवारी मिळणार?

फोटो स्रोत, Congress/TWITTER
- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठीसाठी, मुंबईहून
अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनं काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
45 वर्षांच्या उर्मिला मातोंडकर यंदा लोकसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहेत.
1977मध्ये उर्मिला यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. नरसिम्हा या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा अभिनेत्री म्हणून काम केलं.
काय म्हणाल्या ऊर्मिला?
- महात्मा गांधी, सरदार पटेल यांच्या विचारांवर माझ्या कुटुंबाची विचारधारा आधारलेली आहे. त्यामुळे आज मी सक्रिय राजकारणात प्रवेश करत आहे.
- घटनेनं दिलेल्या स्वातंत्र्यावर आज प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. भारतातल्या असंख्य नागरिकांच्या मनात ते आहेत. या प्रश्नांना आवाज देण्यासाठी मी राजकारणात आले आहे.
- निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मी राजकारणात आलेले नाही. तर काँग्रेसच्या विचारधारेवर माझा विश्वास आहे. मी निवडणूक संपली म्हणजे पक्षातून बाहेर जाईन असं नाही तर पूर्ण वेळ आता काँग्रेससाठी काम करणार आहे.
उत्तर मुंबईत कॉंग्रेसचा 'सेलिब्रिटी पॅटर्न'
गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचा उमेदवार कोण याची चर्चा अनेक दिवस सुरू आहे. अभिनेत्री नगमा, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन पासून गोविंदाचा भाचा कॉमेडीयन क्रिष्णापर्यंत अनेक नावं समोर आली.
या चर्चेवरून कॉंग्रेसला २००४ च्या गोविंदा पॅटर्नची गरज असल्याच दिसलं. अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा आज कॉंग्रेसमध्ये प्रवेश झाला. यामुळे उत्तर मुंबईमध्ये कॉंग्रेसच्या 'सेलिब्रिटी पॅटर्न'वर पुन्हा शिक्कामोर्तब झालय. कॉंग्रेसचा हा सेलिब्रिटी पॅटर्न कितपत यशस्वी होईल याचा हा आढावा.
उत्तर मुंबईवर पकड कोणाची?
भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाला २००४ च्या निवडणुकीत कॉंग्रेसने भगदाड पाडलं. सलग पाच वेळा लोकसभेत निवडून आलेले राम नाईक यांच्या विरोधात कॉंग्रेसने अभिनेता गोविंदाला उमेदवारी दिली. कॉंग्रेसचा हा स्टार पॅटर्न यशस्वी झाला.

फोटो स्रोत, Congress/TWITTER
भाजपचे उमेदवार राम नाईक यांचा पराभव करत अभिनेता गोविंदा मोठ्या मताधिक्याने निवडून आला. २००९ च्या निवडणुकीतही भजापचा पराभव झाला. मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले. पण तरीही भाजपची मतदारसंघावरची पकड कमी झाली नाही.
२०१४च्या निवडणुकीत मोदी लाट असताना भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी विजय मिळवतं कॉंग्रेसचा धुव्वा उडवला. त्यानंतर लगेच विधानसभेला याच मतदारसंघातून भाजपचे सहा पैकी चार आमदार निवडून आले.
मुंबई महापालिकेत भाजपचे एकूण ८२ नगरसेवक आहेत. त्यापैकी २४ नगरसेवक हे एकट्या उत्तर मुंबई मतदारसंघातले आहेत. त्यामुळे उत्तर मुंबईवर भाजपने पकड भक्कम केलीये हे सिध्द होतं.
कॉंग्रेसचं 'सेलिब्रिटी' कार्ड
२००४ च्या निवडणुकीत राम नाईक यांनी अभिनेता गोविंदाला कमकुवत उमेदवार समजलं. पण गोविंदा त्याचा अभिनय, डान्सबरोबर त्याची संघर्षमय कहाणी सांगून लोकांना आकर्षित करत होता.
लोकांच हेच आकर्षण राम नाईकांना भारी पडलं आणि गोविंदाने राम नाईक यांच्यासारख्या उमेदवाराचा पराभव केला.
लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक संदिप प्रधान सांगतात, "राम नाईकांनंतर आता गोपाळ शेट्टी यांनीही हा मतदारसंघ चांगला बांधून ठेवलाय. पण कितीही झालं तरी सेलिब्रिटी उमेदवाराला कमकुवत समजून चालणार नाही."

फोटो स्रोत, Govinda/FACEBOOK
मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष मागचे चार वर्षें या मतदारसंघात फिरत असले तरी त्यांनी ऐनवेळी उत्तर मुंबई सोडून उत्तर पश्चिममधून उमेदवारी मागितली. कॉंग्रेसकडे कोणीही चांगला उमेदवार नसल्यामुळे कॉंग्रेस २००४ ची रणनिती अमलात आणण्यासाठी सेलिब्रिटी चेहर्याच्या शोधात होती. अभिनेत्री उर्मिला मातोंडकरची उमेदवारी जाहीर झाल्यास कॉंग्रेसला उत्तर मुंबईमध्ये फायदा होऊ शकतो.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








