NOTA : मतदानात वापरल्या जाणाऱ्या 'नोटा' पर्यायाविषयी तुम्हाला या गोष्टी माहीत आहेत का?

फोटो स्रोत, Getty Images
लोकसभा निवडणुकांची घोषणा निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी केली. 11 एप्रिलपासून ते 12 मेपर्यंत एकूण सात टप्प्यांमध्ये देशात मतदान होणार आहे. 23 मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत.
हे मतदान EVMद्वारे होणार आहे. EVMमध्ये यावेळी उमेदवाराचा फोटो देखील असणार आहे. जर यादीमध्ये दिलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार पसंत नसेल तर? तर अशावेळी NOTA चा पर्याय निवडणूक आयोगाने दिला आहे.
NOTA म्हणजे None Of The Above. वरीलपैकी कोणताच उमेदवार पसंत नसेल तर सर्वांत खाली एक बटण असतं. ते दाबलं तर वरीलपैकी कोणताच उमेदवार पसंत नाही असं मत देता येतं.
पहिल्यांदा नोटाचा वापर 2013मध्ये झाला. छत्तीसगड, मिझोरम, राजस्थान आणि मध्यप्रदेश, दिल्ली या ठिकाणी झालेल्या मतदानावेळी नोटाचा वापर झाला होता.
नोटाआधी काय होतं?
नोटाचा पर्याय येण्यापूर्वी कलम 49 (O) होतं. कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स 1961 नुसार (निवडणूक अधिनियम 1961) मतदार 17A नंबरचा फॉर्म भरत असत. या फॉर्ममध्ये आपला मतदार यादीतला क्रमांक लिहिला जात असे आणि कोणत्याच उमेदवाराला आपली पसंती नाही असं सांगत असे. निवडणूक अधिकारी आपला शेरा त्यावर लिहीत आणि मतदाराची सही त्या ठिकाणी घेत.

फोटो स्रोत, AFP / Getty Images
पण अशा फॉर्ममुळे मतदाराची ओळख ही गुप्त राहत नसे त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा याला आक्षेप होता. पण नोटामुळे मतदाराची ओळख गुप्त राहते.
किती टक्के लोक नोटा वापरतात?
नुकताच छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश, मिझोरम आणि तेलंगणात मतदान झालं. त्या ठिकाणी अंदाजे 1 ते 2 टक्के मतदारांनी नोटाचा वापर केला होता.
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार छत्तीसगडमध्ये सर्वाधिक दोन टक्के मतदारांनी, म्हणजेच सर्वाधिक 2,82,744 जणांनी नोटाचं बटण दाबलं.

फोटो स्रोत, AFP
मध्यप्रदेशात 1.4 टक्के म्हणजेच 5,42, 295 जणांनी नोटाचा वापर केला आहे तर राजस्थानात 1.3 टक्के म्हणजेच 4,67,781 जणांनी नोटाचा वापर केला.
तेलंगणात 1.1 टक्के म्हणजेच 2,24,709 जणांनी नोटाला पसंती दिलीय तर मिझोराममध्ये केवळ 0.5 टक्के म्हणजेच 2917 जणांनी नोटा वापरलाय.
या लोकसभेला 90 कोटी मतदार आहेत. गेल्या वर्षी 66 टक्के मतदान झालं होतं. त्यांच्यापैकी 1 ते 2 टक्के मतदार नोटाचा वापर करू शकतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








