बेरोजगारीच्या दरात गेल्या अडिच वर्षांत सर्वाधिक वाढ - CMIE #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहुया.
1. गेल्या 29 महिन्यांत बेरोजगारीचा दर सर्वाधिक - CMIE
Centre for Monitoring Indian Economy (CMIE)च्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी 2019मध्ये देशातल्या बेरोजगारी वाढीचा दर 7.2 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. फेब्रुवारीमध्ये 2018मध्ये हा दर 5.9 टक्के इतका होता. गेल्या अडीच वर्षातील बेरोजगारीचा हा सर्वाधिक आकडा आहे, असं बिझनेस टुडेनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.
2016 पासून 1.8 कोटी लोक बेरोजगार झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
CMIEचे प्रमुख महेश व्यास यांनी म्हटलं आहे की, "ही आकडेवारी देशभरातल्या लाखो कुटुंबीयांच्या सर्वेक्षणावर आधारित आहे. फेब्रुवारी 2019मध्ये 40 कोटी लोक नोकरीला असण्याचा अंदाज आहे, गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात हीच संख्या 40.6 कोटी इतकी होती."
2. गेल्या 4 वर्षांत 11,995 शेतकरी आत्महत्या
महाराष्ट्रात गेल्या चार वर्षांत 11,995 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी माहिती अधिकाराअंतर्गत मिळवलेल्या माहितीनुसार, अमरावती विभागात आत्महत्येचं प्रमाण सर्वाधिक आहे.

फोटो स्रोत, BBC/NITESH RAUT
अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिम या पाच जिल्ह्यात 4,384 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, बीड, हिंगोली, लातूर, परभणी, नांदेड या जिल्ह्यांतील 4,124 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.
2011 ते 2014 या चार वर्षांत आत्महत्यांच्या 6,268 प्रकरणांपैकी 3,284 प्रकरणांमध्ये नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळाली आहे. तर गेल्या चार वर्षांत 11,995 पैकी 6,844 आत्महत्याग्रस्त कुटुंबांना नुकसान भरपाई मिळाली आहे.
3. रफालप्रकरणी मोदींवर खटला भरण्याची वेळ आलीय : राहुल गांधी
"नरेंद्र मोदींकडून पंतप्रधान कार्यालयाचा गैरवापर करण्यात आला असून रफाल प्रकरणी झालेला घोटाळा उघड झाला आहे. त्यामुळे मोदींवर आता फौजदारी खटला दाखल करण्याची वेळ आली आहे," असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
तर "रफाल खरेदीची गोपनीय कागदपत्रं चोरीला जातातच कशी," असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
"रफाल खरेदी प्रकरणाची फाइल चोरीला गेल्याची माहिती सरकारकडून सुप्रीम कोर्टात देण्यात आली आहे. मोदी सरकारकडून राफेल खरेदीमधील घोटाळा झाकण्यासाठी फाइल जाळली असावी," असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
4. मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पाहिल्यामुळे ही अवस्था - एकनाथ खडसे
"चाळीस वर्षांच्या काळात अनेक मंत्रिपदं मिळाली, मात्र मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहिलं म्हणून कोणताही गुन्हा नसताना ही अवस्था झाली," असं माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Twiiter/eknath khadse
"मंत्रिपदांचं काय, येतात आणि जातात. 40 वर्षांच्या काळात आपण अनेक मंत्रिपदं भूषवली. मंत्रिपदावर असताना जाती-धर्माच्या आधारावर नव्हे, तर मुस्लीम समाज मागास असल्यानं सामाजिक भावनेतून मुस्लिम समाजाच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न केला," असंही खडसे यांनी म्हटंलय.
जळगाव जिल्ह्यातील सावदामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीनं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
5. निकाल लागेपर्यंत राजकारणात येणार नाही - रॉबर्ट वाड्रा
"आर्थिक घोटाळा प्रकरणी सुरू असलेल्या खटल्याचा निकाल येईपर्यंत देशातून बाहेर पडणार नाही आणि सक्रिय राजकारणातही येणार नाही," असं काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटलं आहे. एनडीटीव्हीनं हे वृत्त दिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी म्हटलंय की, "मी देशातच आहे. देशातल्या काही लोकांनी इथं लूट केली आणि ते पळून गेले. त्यांच्याबद्दल काय? जोपर्यंत माझी या खटल्यातून मुक्तता होत नाही, तोपर्यंत मी देश सोडणार नाही आणि सक्रिय राजकारणातही येणार नाही."
"माझा जन्म मोरादाबादमध्ये झाला आहे आणि माझं बालपण उत्तर प्रदेशात गेलं. माला वाटतं हा परिसर माझ्या परिचयाचा आहे. असं असलं तरी मी देशात कुठंही राहू शकतो आणि लोकांना समजून घेऊ शकतो," असंही वाड्रा यांनी म्हटलंय.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








