इलेक्ट्रिक कार ते SUVचा हंगाम : 2019मध्ये ऑटोविश्वात काय काय होणार?

2019 मध्ये भारतीय ऑटो विश्वात काय मोठं होणार?
फोटो कॅप्शन, 2019मध्ये भारतीय ऑटो विश्वात काय मोठं होणार?
    • Author, गुलशनकुमार वनकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

नवीन वर्ष म्हटलं की नवलाई, नवनवीन ऑफर्स आणि नव्या संकल्पनासुद्धा. नवीन वर्ष सुरू झालं की अनेकांचा संकल्प असतो - यंदा नवीन गाडी घेणार.

तर पाहूया 2019 मध्ये भारतीय ऑटो विश्वात काय मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी अपेक्षित आहेत -

1) SUVचा हंगाम

गेल्या पाच-दहा वर्षांमध्ये स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल किंवा SUVने बाजारात चांगलाच दणका उडवला आहे. 2012 साली रेनॉ डस्टरने भारतीय बाजारात प्रवेश केला आणि तेव्हापासून मोठ्या, मजबूत पण आरामदायी गाड्यांचा ट्रेंड सुरू झाला.

गेल्या काही वर्षांमध्ये या सेगमेंटच्या गाड्यांची विक्री जवळजवळ सातत्याने 30 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे 2019मध्येही अनेक कंपन्या आपापल्या दणकट लक्झरी गाड्यांचा मेळा भारतीय बाजारपेठेत भरवणार आहे.

23 जानेवारीला टाटा हॅरिअर लाँच होणार आहे

फोटो स्रोत, Tata Motors

फोटो कॅप्शन, 23 जानेवारीला टाटा हॅरिअर लाँच होणार आहे

यापैकी टाटा हॅरिअर, ह्युदाई टूसॉन, निस्सानची क्रॉसोव्हर गाडी किक्स, ऑडीच्या छोटी SUV Q3 आणि मोठी SUV Q5, BMWच्याही X1 आणि X5चे अपडेट येणार आहेत.

2) लाखमोलाच्या नवीन सुपरबाईक्स

सध्या यंग इंडियाला लक्ष्य करून जवळजवळ सर्वच ऑटो कंपन्या आपल्या गाड्या डिझाईन करत आहेत, तशा आकर्षक किमती ठरवत आहेत आणि तरुणाईला आकर्षक अशा फायनान्स स्कीम देऊ करत आहेत. त्यामुळे आधी 80 हजाराच्या पल्सरची स्वप्नं पाहणारी मंडळी आता दीड-दोन लाखांच्या बाईक्सवरून धूम करताना दिसताहेत.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

त्यातच बेनेली, डुकाटी, KTM, ट्रायम्फ सारख्या नामवंत परदेशी कंपन्या खास भारतात आपली तमाम आंतरराष्ट्रीय रेंज आणू पाहत आहेत.

2000 साली लाँच झाल्यापासून होंडा अॅक्टिव्हाने देशी मोपेड बाजारावर सत्ता गाजवली आहे. याच 100-150 CC स्कूटर सेगमेंटमध्ये सुझुकी अॅक्सेस, TVS ज्युपिटर, हीरो मायस्त्रो आणि डेस्टिनी आणि वेस्पासारखे काही निवडक ब्रँड्स यांच्यात अटीतटीची स्पर्धा आहे.

पण 2018 साली बेंगळुरूची स्टार्टअप कंपनी एथर एनर्जीने आपले 340 आणि 450 या दोन इलेक्ट्रिक बाईक्स बाजारात आणल्याने स्कूटर सेगमेंटची समीकरणं काही अंशे बदलू शकतात.

2018मध्ये एथर एनर्जीने आपले 340 आणि 450 या दोन इलेक्ट्रिक बाईक्स बाजारात आणल्या

फोटो स्रोत, Twitter / @AtherEnergy

फोटो कॅप्शन, 2018मध्ये एथर एनर्जीने आपले 340 आणि 450 या दोन इलेक्ट्रिक बाईक्स बाजारात आणल्या

सध्या तरी ही कंपनी आपलं सेल्स आणि चार्जिंग नेटवर्कचं जाळं स्वतःच बेंगळुरू आणि आसपासच्या निमशहरी भागांमध्ये पसरवते आहे, पण त्यामुळे भविष्य आणखी थोडं जवळ आल्याची अनुभूती होतेय, हे मात्र नक्की.

3)यंदाचं तरी वरीस इलेक्ट्रिकचं?

मागच्या मुद्द्यात ज्या भविष्याबद्दल आपण बोललो, ते हेच - इलेक्ट्रिक गाड्यांचं भविष्य.

ऑटो एक्सपोमध्ये एमफ्लक्स कंपनीने ही इलेक्ट्रिक सुपर बाईक सादर केली होती.
फोटो कॅप्शन, ऑटो एक्सपोमध्ये एमफ्लक्स कंपनीने ही इलेक्ट्रिक सुपर बाईक सादर केली होती.

गेल्या कित्येक वर्षांपासून भारतात इलेक्ट्रिक कार किंवा बाईक्स सामान्य होण्याचं स्वप्न 'अच्छे दिन'सारखं कुठे तरी अडकून पडलंय.

दरवर्षी कित्येक कंपन्या शुद्ध तंत्रज्ञानासाठी कोट्यवधींचे करार करतात, मोठ्यामोठ्या घोषणा करतात, पण अजूनही पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांचाच शोरूम्स तसंच रस्त्यांवर बोलबाला आहे, असं म्हणू शकतो.

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या दिल्ली ऑटो एक्सपोमध्ये महिंद्रा, टाटा आणि मारुती सुझुकीने आपापली इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट दाखवली होती. पण वर्ष लोटूनही त्या प्रत्यक्षात उतरल्या नाहीयेत.

अधूनमधून बातम्या येत असतात की अमूक कंपनी सध्या आपली इलेक्ट्रिक गाडी टेस्ट करते आहे किंवा तमूक कंपनीने डिझेल इंजन बनवणं बंद करण्याचा विचार केला आहे. आणि एखादी कंपनी आता फक्त इलेक्ट्रिक गाड्याच बनवणार.

पण एकंदरच हेही वर्ष फार काही उमेद घेऊन येणारं असेल, असं वाटत नाही. याला दोन कारणं आहेत - सरकार आणि कंपन्या.

सरकार आपल्या इलेक्ट्रिक गाड्यांच्या धोरणांवर अद्यापही ठाम नाही. त्याबाबतचं एकसूत्री धोरण बनवता बनवता दोन-तीन वर्षं लोटली. आणि जेव्हा निर्णयाचा क्षण आला तेव्हा ते म्हणाले की, भारताला इलेक्ट्रिक गाड्यांच्या बाबतीत स्वतंत्र धोरणाची गरज नाही.

यामुळे अनेक वर्षांपासून कंपन्याही गोंधळात आहे - की इलेक्ट्रिक गाड्यांच्या संशोधन आणि निर्मितीसाठी गुंतवणूक करावी की नाही. त्यामुळे अधूनमधून सरकारच थोड्याथोडक्या प्रमाणात या ई-कार कंपन्यांकडून विकत घेत असते, पण अजूनही सामान्यांच्या हाती मनासारख्या आणि खिशाला परवडणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आलेल्या नाहीत.

मग प्रश्न पडतो, 2019 मध्ये तरी येणार का? शक्यता कमीच आहे, कारण निवडणुका तोंडावर असल्याने या संदर्भात नवीन धोरणाची शक्यता दिसत नाही.

4) दोन नवीन कंपन्या दाखल होणार

या बाबतीत खरंच 2019 खास ठरेल. कारण चिनी कंपनी MG मोटर्स आणि कोरियन कंपनी किया मोटर्स भारतात आपल्या अद्ययावत गाड्या घेऊन दाखल होतील, अशी अपेक्षा आहे.

MG हे नाव भारतीयांसाठी तसं नवं नाही. स्वांतत्र्यपूर्व काळात अनेक लोकांनी मॉरिस गराज किंवा MG या ब्रिटिश कंपनीच्या इंपोर्टेड गाड्या खरेदी केल्या होत्या.

Instagram पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

Instagram पोस्ट समाप्त

याच कंपनीची गाडी एकेकाळी ब्रिटनच्या राजघराण्यातही होती. पण काळ बदलला, जर्मन कंपन्यांचं तंत्रज्ञान, अमेरिकन कंपन्यांची मास प्रोडक्शनची मक्तेदारी आणि अखेर आशियाई कंपन्यांच्या वाढत्या दबदब्यापुढे मॉरिस गराजने मान टाकली होती. या कंपनीचा ताबा आधी चीनच्या नानजिंग ऑटोमोबाईलकडे आणि पुढे SAIC या चिनी सरकारच्या एका कंपनीकडे आला.

आता ही चिनी कंपनी भारतात परत येऊ पाहतोय याच मॉरिस गराज किंवा MG ब्रँडच्यामार्गे.

MG विषयी दोन रंजक गोष्टी सांगायच्या तर - 2017 साली भारतातून बाहेर पडलेल्या जनरल मोटर्स (शेवरोले) या अमेरिकन कंपनीचं गुजरात स्थित प्लांटमध्ये MG आपल्या गाड्या बनवणार आहे.

आजही मोठ्या शहरांमध्ये अनेक अँबासॅडर पाहायला मिळते.
फोटो कॅप्शन, आजही मोठ्या शहरांमध्ये अनेक अँबासॅडर पाहायला मिळते.

भारतीय राजकारणाचं प्रतीक जर कुठली गाडी असेल तर ती म्हणजे हिंदुस्तान अँबासॅडर. ही गाडी कोलकत्याच्या हिंदुस्तान मोटर्स कंपनीने MGच्या मॉरिस ऑक्स्फोर्ड सीरिज III मॉडेलवर आधारित होती, जो इंग्लंडमध्ये 1956 ते 1959 दरम्यान खूप प्रचलित होता.

आजही कोलकातामध्ये गेलं की असंख्य पिवळ्या अँबासॅडर टॅक्सी स्वरूपात दिसतात. तिथे हिंदमोटो नावाचा एक भाग आहे, जिथे एकेकाळी या गाड्यांची फॅक्ट्री होती.

दुसरी कंपनी जी या वर्षी भारतात दाखल होणार आहे, ती म्हणजे किया मोटर्स. भारतात दुसरी सर्वांत मोठी कार कंपनी असलेली ह्युंदाई मोटर्स आणि या कंपनीचे जुने आणि जवळचे संबंध आहेत. दोन्ही कंपन्या दक्षिण कोरियाच्या आहेत आणि दोन्ही कंपन्या एकमेकांचे अल्प भागीदार आहेत.

किया स्टिंगरे
फोटो कॅप्शन, किया स्टिंगरे

म्हणजे ह्युंदाईचे किया मोटर्समध्ये जवळजवळ 33 टक्के शेअर्स आहेत तर किया मोटर्स ह्युंदाईच्या 20हून अधिक कंपन्यांमध्ये भागीदार आहे.

पण ही कंपनी गाड्या कोणत्या आणणार? सध्या तरी बेत आहे एक SUV आणण्याचा, जी कॉन्सेप्ट स्वरूपात दिल्ली ऑटो एक्सपोमध्ये गतवर्षी दाखवण्यात आली होती. तिचं नामकरणही अद्याप झालेलं नाही, पण सध्या तिला SP2 Concept हे टोपणनाव देण्यात आलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)