सज्जन दोषी : इंदिरा गांधींच्या हत्येनंतर वाहिले शिखांच्या रक्ताचे पाट

शीख

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी

1984ला उसळलेल्या शीख विरोधी दंगलीच्या प्रकरणात काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील भीषण दंगलींपैकी एक असं या दंगलींचं वर्णन केलं जातं. 34 वर्षांनंतर आजही या दंगलीच्या कटू स्मृती जाग्या आहेत. 31 ऑक्टोबर 1984ला इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर 2 दिवस दिल्लीत आणि आसपासच्या परिसरात काय घडलं याचा हा लेखाजोखा.

line

31 ऑक्टोबर ला इंदिरा गांधींची हत्या झाली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी दिल्ली आणि देशाच्या काही भागात शिखांच्या विरोधात दंगली भडकल्या.

काही वर्षांपूर्वी या दंगलींवर दृष्टिक्षेप टाकणारं When A Tree Shook Delhi नावाचं एक पुस्तक प्रकाशित झालं होतं.

या पुस्तकात दंगलीची भीषणता, त्यात झालेली पडझड आणि आप्तस्वकीयांचं दु:ख आणि राजकारण्यांबरोबर पोलिसांची संगनमत अशा अनेक गोष्टींचं तपशीलवार वर्णन आहे.

"जेव्हा इंदिरा गांधींची हत्या झाली तेव्हा आपल्या देशात काही दंगली झाल्या होत्या. आम्हाला माहिती आहे की जनतेच्या मनात किती रोष होता. काही दिवस असं वाटलं की संपूर्ण भारत हलतोय. एखादा मोठा वृक्ष उन्मळून पडला तर जमीन थोडी हादरतेच."

हे शब्द होते तत्कालीन पंतप्रधान आणि इंदिरा गांधींचे उत्तराधिकारी राजीव गांधी यांचे. बोट क्लबमध्ये जमलेल्या लोकांसमोर त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.

जे हजारो शीख बेघर आणि अनाथ झाले त्यांच्याबाबत राजीव गांधींनी चकार शब्दही उच्चारला नाही. उलट हे वक्तव्य म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं होतं.

वादग्रस्त वक्तव्य

या हत्या योग्य आहेत असं या वक्तव्यातून संदेश गेला. या वक्तव्यामुळे त्या काळी मोठी खळबळ माजली होती. या वक्तव्याबद्दल सारवासारव करताना आजही पक्षाला बरेच कष्ट घ्यावे लागतात.

काँग्रेस पक्षाचे नेते सलमान खुर्शीद म्हणतात, "हे वक्तव्य कोणत्या उद्देशाने केलं आहे हे त्या व्यक्तीलाच विचारावं लागेल. समजणारे काहीही समजतात. त्या वाक्याचा काय संदर्भ आहे, त्यांच्या मनात काय आहे हे त्या व्यक्तीवर अवलंबून असतं."

राजीव गांधी

फोटो स्रोत, Getty Images

खुर्शीद म्हणतात, "मी राजीव गांधींना ओळखत होतो. ते अत्यंत संवेदनशील आणि उदार मनाचे होते. असं वक्तव्य करण्यामागे त्यांचा वेगळा काही उद्देश होता असं मला वाटत नाही."

ते म्हणतात, "ज्या लोकांना या वाक्यावर आक्षेप आहे त्यांना राजीव गांधींनी आजही स्पष्टीकरण दिलं असतं. ते म्हणाले असते की त्यांनाही असं काही म्हणायचं नव्हतं. त्यांच्या मनात असं काही नव्हतं मीसुद्धा माझ्या आईला गमावलं आहे आणि आईला गमावल्याचं दु:ख मला माहिती आहे."

सुरुवातीचा घटनाक्रम

इंदिरा गांधीच्या हत्येची बातमी कळताच तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग उत्तर येमेनचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीला आले. तेव्हा या दंगलीला सुरुवात झाली होती.

जेव्हा झैलसिंग इंदिरा गांधीचं दर्शन घेण्यासाठी दिल्ली विमानतळावरून AIIMS जायला निघाले तेव्हा त्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला.

त्यावेळी तरलोचन सिंग त्यांचे माध्यम अधिकारी होते. ते नंतर राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्षही झाले.

इंदिरा गांधी

फोटो स्रोत, BBC Sport

ते सांगतात, "ग्यानी झैलसिंग विमानतळावरून थेट एम्समध्ये गेले. त्यांची कार सगळ्यात पुढे होती. मागे त्यांचे सचिव, आणि त्यांच्या मागे माझी कार होती. आम्ही जेव्हा आर. के. पुरम भागात पोहोचलो तेव्हा समोरच्या दोन कार पुढे निघून गेल्या. माझ्या कारसमोर काही लोक जळत्या मशाली घेऊन आले आणि आमच्यावर मशाली फेकल्या. ड्रायव्हरने कसंतरी मला वाचवलं आणि घरी पोचवलं."

कल्पनेच्या पलीकडे

ही फक्त सुरुवात होती. येत्या काळात शिखांबरोबर जे होणार होतं त्याची कोणीही कल्पना केली नव्हती.

2 नोव्हेंबर 1984 ला इंडियन एक्सप्रेसचे प्रतिनिधी राहुल बेदी आपल्या कार्यालयात बसले होते. त्यांना कळलं की त्रिलोकपुरीच्या ब्लॉक नंबर 32मध्ये हत्याकांड सुरू होतं.

बेदी सांगतात, "मोहन सिंग नावाचा एक व्यक्ती आमच्या ऑफिसमध्ये आला होता. तो म्हणाला की त्रिलोकपुरीमध्ये हत्याकांड सुरू आहे. माझ्या दोन सहकाऱ्यांबरोबर मी तिथे गेलो. मात्र मला तिथे कोणीही पोहोचू दिलं नाही. कारण ब्लॉककडे जाणाऱ्या रस्त्यावर हजारो लोक जमा झाले होते. जेव्हा आम्ही संध्याकाळी तिथे पोहोचलो तेव्हा एका गल्लीत लोकांचे मृतदेह आणि लोकांचे तुटलेले अवयव आम्हाला दिसलं. त्या गल्लीत जाणंही कठीण होतं. अगदी पाय ठेवायलाही जागा नव्हती."

इंदिरा गांधी

फोटो स्रोत, Getty Images

ते पुढे सांगतात, "अगदी महिला आणि महिला आणि लहान मुलांनाही सोडलं नव्हतं. नंतर कळलं की 320 लोकांची हत्या झाली होती. मी तो भयानक प्रसंग कधीही विसरू शकत नाही. संध्याकाळी साडेसहा ते सातची वेळ होती. त्या घराला आठ ते दहा हजार लोकांनी वेढा घातला होता. सगळीकडे भयान शांतता पसरली होती."

पोलिसांची भूमिका संशयास्पद

आणखी एक घटना भारतीय वायुसेनेतील ग्रुप कॅप्टन मनमोहन वीरसिंग तलवार यांच्यासोबत घडली होती. त्यांना 1971मध्ये महावीर चक्र पुरस्कार देण्यात आला होता. पाच हजार लोकांनी त्यांच्या घराला घेराव घातला आणि घराला आग लावली.

काही वर्षांपूर्वी बीबीसीने त्यांच्याशी संपर्क साधला होता. पण "जुन्या जखमांवरील खपली का पुन्हा काढत आहात?" असं म्हणत त्यांनी काही सांगण्यास नकार दिला.

पण सध्या कॅलिफोर्नियात स्थायिक असलेले जसवीर सिंग सांगतात, "यमुनेच्या पलीकडे आमचं कुटुंब राहात होतं. आमचं एकत्र कुटुंब होतं. त्या दिवशी आमच्या घरातील 26 जणांची कत्तल करण्यात आली होती. गेली अनेक वर्षं विधवांचं जीवन जगणाऱ्या आमच्या आयाबहिणींना विचार त्या कसं जगत आहेत?"

"आमच्या कुटुंबातील सर्वांना मारण्यात आलं होतं. मुलांच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरपलं होतं. माझ्या कुटुंबातील काही मुलं नंतर पाकीटमार झाली तर काही मुलं ड्रग्जच्या आहारी गेली."

या दंगलीत सर्वांत मोठं प्रश्नचिन्ह पोलिसांच्या भूमिकेवर निर्माण झालं होतं. पोलिसांनी तक्रारींकडे फक्त दुलर्क्षचं केलं नाही तर अनेक ठिकाणी दंगलखोरांची मदतच केली.

इंदिरा गांधी

फोटो स्रोत, AFP

या दंगलीतील खटले लढणारे वकील हरविंदर सिंग फुल्का When A Tree Shook Delhi या पुस्तकाचे सहलेखक आहेत. ते सांगतात, "पोलिसांनी शिखांना मदत तर केली नाहीच पण उलट शिखांवरच कारवाई केली."

ते सांगतात, "कल्याणपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 600 लोकांना मारण्यात आलं. 1 नोव्हेंबरला हिंसा झाली होती. त्यावेळी पोलिसांनी 25 लोकांना ताब्यात घेतलं पण ते सगळे शीख होते. "

ते सांगतात, " 1 आणि 2 नोव्हेंबरला पोलिसांनी इतर कुणाला अटक केली नाही. इतकंच नाही तर पोलिसांनी शिखांना पकडून गर्दीच्या ताब्यात दिलं होतं."

दंगल नियोजनबद्ध होती का?

एवढं सगळं होत असताना एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे या दंगली मागे काही नियोजन होतं का?

लेखक मनोज मित्ता सांगतात, "हा हिंसाचार राजकीय नेत्यांच्या इशाऱ्याने झाला. 31 ऑक्टोबरला लहानसहान घटना घडल्या होत्या. पण 1 आणि 2 नोव्हेंबरला जे काही घडलं ते नियोजनाशिवाय शक्य नव्हतं."

इंदिरा गांधी

फोटो स्रोत, Getty Images

मित्ता सांगतात, "ज्या दिवशी इंदिरा गांधींची हत्या झाली त्या दिवशीच्या घटना स्वाभाविक म्हणता येतील, पण त्या दिवशी एकाही शीख व्यक्तीचा खून झाला नव्हता."

ते सांगतात, "इंदिरा गांधीच्या हत्येनंतर पूर्ण 24 तासांनी दंगली सुरू झाल्या."

मित्ता सांगतात, "नेत्यांनी आपल्या भागात बैठका घेतल्या आणि त्यानंतर हत्यारांसह ते बाहेर पडले. पोलिसांनी त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि त्यांची मदतच केली."

इंदिरा गांधी

फोटो स्रोत, Getty Images

हरविंदर फुल्का यांचाही असा तर्क आहे की ज्या पद्धतीने घटना घडल्या ते पाहाता त्या पूर्वनियोजित होत्या असं म्हणायला जागा आहे.

ते सांगतात, "कोणत्या घरात शीख राहातात याची यादी दंगलखोरांकडे होती. त्यांना हजारो लीटर रॉकेल उपलब्ध करून देण्यात आलं होतं. दंगलखोरांकडे ज्वलनशील पावडरही होती. शिवाय त्यांच्याकडे जे लोखंडी गज होते ते एक प्रकारचेच होते."

पण पोलिसांनी त्यांची जबाबदारी का पार पाडली नाही, असा प्रश्न निर्माण होतो. वरिष्ठ पोलीस अधिकारी वेद मारवाह यांच्याकडे या दंगलीतील पोलिसांच्या भूमिकेचा तपास करण्याची जबाबदारी होती.

ते सांगतात, "पोलीस म्हणजे एकप्रकारे हत्यारांचा साठा असतो. त्यांचा हवा तसा उपयोग केला जाऊ शकतो. जे अधिकारी अधिक महत्त्वाकांक्षी असतात ते नेत्यांना काय हवं हे पाहातात. त्यांना इशाऱ्यानेच नेत्यांना काय हवं ते कळतं. प्रत्येक वेळी तोंडी आदेश देण्याची गरज नसते.".

इंदिरा गांधी

ज्या ठिकाणी पोलिसांनी योग्य जबाबदारी पार पाडली तिथं परिस्थिती नियंत्रणात होती, असं ते सांगतात. "दिल्लीतील चांदणी चौक परिसरात कसलाच हिंसाचार झाला नाही. मॅक्सवेल परेरा तिथं पोलीस उपायुक्त होते, त्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. चांदणी चौक परिसरात मोठा गुरुद्वारा आहे, तरीही तिथं गोंधळसुद्धा झाला नाही. जिथं पोलिसांनी राजकीय नेत्यांच्या दबावापुढे गुडघे टेकले तिथं दंगली झाल्या."

सरकारी मान खाली

दंगलीनंतर 21 वर्षांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी संसदेत माफी मागितली होती. जे काही घडलं त्याबद्दल माझी मानं शरमेने खाली झुकते, असं ते म्हणाले होते.

पण असं सांगितल्याने सरकारची जबाबदारी पूर्ण होते का? स्वातंत्र भारतातील सर्वांत मोठ्या हत्याकांडाच्या आठवणी पुसल्या जातील का?

काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद म्हणतात, "याचं उत्तरं ज्यांना न्यायाची अपेक्षा आहे त्यांनी द्यायची आहे. मी जर म्हटलं की न्याय मिळाला तर ते म्हणतील तुम्ही आमचं दुःख कुठं पाहिलं आहे. तुम्ही कसं म्हणू शकता न्याय मिळाला की नाही मिळाला? ज्यांना जखम झाली, ज्यांना वेदना झाल्या तेच या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात."

1984नंतर भारतात दंगली सुरूच राहिल्या. 1988ला भागलपूर, 1992-93ला मुंबई आणि 2002ला गुजरात दंगली अशा घटना घडल्या.

पण किती लोकांना दंगली केल्याबद्दल शिक्षा झाली? बहुतेक यामुळेच अशा घटना भारतमध्ये आजही होताना दिसतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)