जीसॅट-11 भारताच्या सर्वांत अवजड उपग्रहाचं प्रक्षेपण, इंटरनेटचा स्पीड वाढणार

इस्रो

फोटो स्रोत, ISRO

    • Author, टीम बीबीसी
    • Role, नवी दिल्ली

भारताचा सर्वांत अवजड उपग्रह जीसॅट-11 बुधवारी सकाळी फ्रेंच गयानामधून युरोपीय अंतराळ संस्थेच्या रॉकेटनं अकाशात झेपावला आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)च्या माहितीप्रमाणे जीसॅट-11 हा उपग्रह 5854 किलो वजनाचा आहे आणि त्यांनी तयार केलेला हा आतापर्यंतचा सर्वांत अवजड उपग्रह आहे.

हा जिओस्टेशनरी उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 36 हजार किलोमीटर अंतरावर स्थिरावेल. हा उपग्रह इतका मोठा आहे की त्याचा प्रत्येक सोलार पॅनल चार मीटरपेक्षा जास्त लांब आहे. म्हणजे एका सेदान कारएवढा लांब.

जीसॅट-11 मध्ये केयू-बँड आणि केए-बँड फ्रिक्वेंसीमध्ये 40 ट्रान्सपाँडर असतील. हे ट्रान्सपाँडर 14 गेगाबाईट/ प्रतिसेकंद एवढ्या प्रचंड वेगवान अशा डेटा ट्रान्सफर स्पीडने हाई बँडविड्थ कनेक्टिव्हिटी देऊ शकेल.

इस्रो

फोटो स्रोत, ISRO

जीसॅट-11चं वैशिष्ट्यं काय?

प्रसिद्ध विज्ञान पत्रकार पल्लव बागला यांनी बीबीसीला सांगितलं, "जीसॅट-11 अनेक अर्थाने विशेष आहे. भारतात तयार झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत जास्त वजनाचा उपग्रह आहे."

मात्र अवजड उपग्रह असण्याचा अर्थ काय? ते सांगतात, "उपग्रह जड असण्याचा अर्थ तो कमी काम करेल, असा होत नाही. कम्युनिकेशन उपग्रह प्रकारात अवजड असण्याचा अर्थ तो खूप शक्तीशाली आहे आणि दीर्घ काळ काम करू शकतो, असा होतो."

बागला यांच्या मते हा आतापर्यंतच्या सर्व उपग्रहमध्ये सर्वाधिक बँडविड्थ सोबत घेऊन जाणारा सॅटेलाईटही असेल.

यामुळे संपूर्ण भारतात इंटरनेटची सेवा मिळू शकेल. या उपग्रहाला आधी अमेरिकेत पाठवण्यात आलं होतं. मात्र नंतर चाचणीसाठी पुन्हा मागवण्यात आला, हेदेखील विशेषच.

इस्रो

फोटो स्रोत, ISRO

जीसॅट-11चं प्रक्षेपण रद्द का करण्यात आलं होतं?

यावर्षी मार्च-एप्रिलमध्येच जीसॅट-11चं प्रक्षेपण होणार होतं. मात्र जीसॅट-6ए मोहीम अपयशी ठरल्यानंतर हे प्रक्षेपण रद्द करण्यात आलं. 29 मार्चला पाठवण्यात आलेल्या जीसॅट-6एचा संपर्क तुटल्यामुळे इलेक्ट्रिक सर्किटमध्ये बिघाड झाला आहे.

जीसॅट-11 मध्येसुद्धा हीच समस्या उद्भवू शकते, असा अंदाज होता. त्यामुळेच या उपग्रहाचं प्रक्षेपण लांबणीवर टाकण्यात आलं. यानंतर अनेक चाचण्या झाल्या आणि सर्व यंत्रणा योग्य रितीने काम करत असल्याचं त्यात स्पष्ट झालं.

बागला यांनी सांगितलं, "5 डिसेंबरला भारतीय वेळेनुसार दोन वाजून आठ मिनिटांनी प्रक्षेपण करण्यात येईल."

विशेष म्हणजे इस्रोचं जीएसएलव्ही-3 हे प्रक्षेपण यान चार टनापर्यंत वजन उचलू शकतं. मात्र त्यापेक्षा जास्त वजनाचे इस्रोचे पेलोड फ्रेंच गयानातील युरोपीय अंतराळ संस्थेतून सोडले जातात.

इस्रो

फोटो स्रोत, ISRO

इंटरनेट स्पीड वाढणार

इस्रो चार टन वजनापर्यंतचे उपग्रह प्रक्षेपित करू शकते. मात्र जीसॅट-11 चं वजन जवळपास सहा टन असल्याचं पल्लव बागला यांनी सांगितलं.

भारत कधी एवढ्या वजनाचे उपग्रह सोडू शकेल, हे विचारल्यावर बागला म्हणाले, "तुम्ही प्रत्येकच गोष्ट बाहेर पाठवू इच्छित नाही. मात्र मोठी वस्तू असेल तर बाहेर पाठवावंच लागतं."

"आपण बसने प्रवास करतो. मात्र ती आपल्या घरी तर ठेवत नाही ना. जेव्हा गरज भासते तेव्हा आपण भाडं भरून बस घेतो. सध्यातरी स्वतः वजनी उपग्रह पाठवण्याचा इस्रोचा विचार नाही. मात्र काही वर्षांनतंर जेव्हा सेमी-क्रायोजेनिक इंजिन तयार होईल, तेव्हा असं होऊ शकतं."

हा उपग्रह चांगला इंटरनेट स्पीड देईल, असंही सांगितलं जातंय. यावर बागला म्हणाले, "उपग्रहामुळे इंटरनेटची स्पीड वाढत नाही. कारण तो ऑप्टिकल फायबरमधून मिळते."

"मात्र या उपग्रहामुळे कव्हरेजमध्ये फायदा होईल. अतिदुर्गम आणि खेडोपाडी इंटरनेट पोहोचण्यास मदत होईल. अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथे फायबर पोहोचवता येत नाही. तिथे याउपग्रहाद्वारे इंटरनेटची सेवा पुरवता येईल "

इस्रो

फोटो स्रोत, ISRO

उपग्रह कसं काम करेल?

याशिवाय एक मोठा फायदा म्हणजे फायबरचं काही नुकसान झालं तर इंटरनेट पूर्णपणे बंद होणार नाही आणि उपग्रहामार्फत सेवा सुरू राहील.

इस्रोच्या जीएसएलव्ही-3च्या वजन उचलण्याच्या क्षमतेवरही काम सुरू आहे. जीसॅट-11 हाई थ्रूपुट कम्युनिकेशन सॅटेलाईट आहे. याचा उद्देश भारताच्या प्रमुख क्षेत्रात आणि जवळपासच्या भागात मल्टी स्पॉट बीम कव्हरेज पुरवणं हा आहे.

हा उपग्रह अनेक स्पॉट बीम वापरतो, हेदेखील या उपग्रहाचं एक वैशिष्ट्य आहे. या स्पॉट बीममुळे इंटरनेट स्पीड आणि कनेक्टिव्हिटी वाढते.

स्पॉट बीम म्हणजे सॅटेलाईट सिग्नल, जे एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात केंद्रीत होतात. बीम जितकी पातळ क्षमता तेवढीच जास्त.

हा उपग्रह संपूर्ण देशाला कव्हर करण्यासाठी बीम किंवा सिग्नलला पुन्हा वापरतो. इनसॅटसारखे पारंपरिक उपग्रह ब्रॉड म्हणजे रुंद सिग्नल बीम वापरतात. असे ब्रॉड सिग्नल बीम संपूर्ण क्षेत्राला कव्हर करण्यासाठी पुरेसे नाहीत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)