अनंत कुमार यांना झालेला फुफ्फुसाचा कॅन्सर नेमका काय आहे?

फुफ्फुसाचा कॅन्सर

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, सरोज सिंह
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

सन 2018 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केंद्रीय मंत्री अनंत कुमार अनेकदा खोकताना दिसले. ही गोष्ट मे-जून महिन्यातली गोष्ट आहे. निवडणूक संपली आणि अनंत कुमार यांनी लगेचच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली. या तपासणीत त्यांना फुफ्फुसांचा कॅन्सर असल्याचं निदान झालं. त्यानंतर सातच महिन्यांत एनएच अनंत कुमार यांच्या निधनाची बातमी आली.

पण फुफ्फुसांचा कॅन्सर होतो तरी कसा, त्याची लक्षणं काय आहेत, उपाय कसे केले जातात?

अनंत कुमार यांच्यावर उपचार केलेल्या डॉक्टरांशी आणि इतरही तज्ज्ञांनी बीबीसीने बोलून या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

बंगळुरूमधल्या श्री शंकरा कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये अनंत कुमार यांच्यावर उपचार सुरू होते. याच हॉस्पिटलमध्ये ते खोकल्यासाठी उपचार घेत होते. त्यादरम्यानच त्यांना कॅन्सर झाल्याचं कळलं होतं. यानंतर उपचारांसाठी ते अमेरिकेलाही जाऊन आले होते. 20 दिवसांपूर्वीच ते अमेरिकेहून परतले होते. त्यांना उपचारासाठी शंकरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

फुफ्फुसाच्या कॅन्सरची कारणं

फुफ्फुसाच्या कॅन्सरविषयी जाणून घेण्याआधी कॅन्सर म्हणजे काय हे जाणून घेणं गरजेचं आहे.

दिल्लीतील धर्मशीला कॅन्सर अँड रिसर्च सेंटरचे डॉ. अंशुमन कुमार सांगतात, "शरीरातील पेशींचं एक वैशिष्ट्य असतं. एका ठराविक काळानंतर त्या स्वतः नष्ट होतात. मात्र कॅन्सरमुळं शरीरातल्या त्या विशिष्ट भागातल्या पेशींचा हा गुणधर्म नष्ट होतो. त्या पेशी मरत नाहीत. उलट दोनाच्या चार, चाराच्या आठ या प्रमाणात वाढतात. स्वतःहून नष्ट होण्याची त्यांची क्षमता संपते. शरीरातल्या ज्या भागातल्या पेशींमध्ये ही अडचण निर्माण होते त्याच भागाला कॅन्सरच्या उत्पत्तीचं ठिकाण मानलं जातं."

एनएच अनंत कुमार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अनंत कुमार

अंशुमन यांच्या मते फुफ्फुसाच्या कॅन्सरची तीन कारणं असतात. तंबाखूचं सेवन किंवा स्मोकिंग. सिगरेट ओढणं किंवा तंबाखू खाणं याचा थेट संबंध फुफ्फुसांशी संबंधित आजारांशी असतो. यामुळे फुफ्फुसांचा कॅन्सरही होऊ शकतो.

दुसरं कारण म्हणजे वायू प्रदूषण. डॉ. अंशुमन सांगतात, "हल्ली कारखान्यांमधून होणारं प्रदूषण असो किंवा पेट्रोल-डिझेल गाड्यांमधून निघणारा धूर, या सगळ्यांमधून बेंझिन वायू निघतो. हा वायू हवेला प्रदूषित करतो. यामुळे फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका असतो."

तिसरं कारण आहे जेनेटिक म्हणजे अनुवांशिक.

अनंत कुमार यांना कशामुळे झाला कॅन्सर?

बंगळुरूतल्या शंकरा हॉस्पिटलचे संचालक डॉ. बी. एस. श्रीनाथ सांगतात, "अनंत कुमार सिगरेट किंवा सिगार ओढायचे नाहीत किंवा मद्यपानही करत नव्हते. त्यामुळे त्यांना फुफ्फुसाचा कॅन्सर होण्यामागे पहिलं कारण नव्हतं. तसंच अनुवांशिकता हे कारणही नाही."

अनंत कुमार केंद्रीय मंत्री होते. ते बहुतेक वेळा दिल्लीतच असायचे. जगभरात दिल्लीतल्या वाढत्या प्रदूषणाची चर्चा जोरात सुरू आहे.

मात्र डॉ. श्रीनाथ या प्रश्नाचं थेट उत्तर देत नाहीत. ते म्हणतात, "अनेकदा कॅन्सरचं कारण कळत नाही. याच वर्षी जूनमध्ये त्यांना फुफ्फुसांचा कॅन्सर असल्याचं निदान झालं होतं. त्यांना बंद खोलीत राहण्याचा सल्लाही देऊ शकत नव्हतो. मात्र त्यांचा कॅन्सरचा निदान झालं तेव्हा तो अॅडव्हान्स स्टेजचा होता."

मात्र हे वाक्य पूर्ण होण्याआधीच ते आणखी माहिती सांगतात.

प्रदूषण

फोटो स्रोत, Getty Images

"प्रदूषण आणि फुफ्फुसाच्या आजारांचा थेट संबंध आहे, हे कुणीही नकारू शकत नाही. फुफ्फुसाशी संबंधित आजारांमध्ये प्रदूषणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. मात्र त्यांच्या कॅन्सरचा थेट संबंध होता, असं मी म्हणणार नाही."

फुफ्फुसाच्या कॅन्सरची लक्षणं आणि प्रकार

डॉक्टरांच्या मते फुफ्फुसाच्या कॅन्सरचे दोन प्रकार असतात. ते म्हणजे स्मॉल सेल कॅन्सर आणि नॉन स्मॉल सेल कॅन्सर.

स्मॉल सेल कॅन्सर झपाट्याने पसरतो. मात्र नॉन स्मॉल सेल कॅन्सर हा स्मॉल सेल कॅन्सरच्या तुलनेत कमी वेगाने पसरतो.

कॅन्सरविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी डॉक्टरांनी एक मोहीम सुरू केली आहे - 'इंडिया अगेन्स्ट कॅन्सर'. या मोहिमेच्या वेबसाईटवर फुफ्फुसाच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं खालील प्रमाणे दिली आहेत.

  • तीन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस खोकला आणि तो बरा होत नसेल.
  • कफात रक्त येत असेल.
  • पायऱ्या चढताना-उतरताना धाप लागणे.
  • छातीत सतत दुखणे.
  • सगळं नीट असतानाही वजन सतत कमी होणं.

जर ही लक्षणं दिसत असतील तर फुफ्फुसाच्या कॅन्सरवरच्या तज्ज्ञांकडे गेल पाहिजे, असं या वेबसाईटवर म्हटलं आहे.

मात्र फुफ्फुसाचा कॅन्सर शरीरातल्या इतर भागापर्यंत उदाहरणार्थ मेंदूपर्यंत पोहोचला असेल तर शरीरातल्या एखाद्या अवयवला लकवा मारला जाऊ शकतो. हा कॅन्सर किडन्यांपर्यंत पोहोचला तर जॉन्डिस होण्याची भीती असते.

कॅन्सरच्या 3 स्टेज

सर्व प्रकारच्या कॅन्सरप्रमाणे फुफ्फुसाच्या तीन स्टेज आहेत, असं डॉ. अंशुमन सांगतात.

कॅन्सर

फोटो स्रोत, Getty Images

सुरुवातीची स्टेज : जेव्हा कॅन्सरची सुरुवात होते. शरीरातल्या एखाद्या भागातल्या पेशी 'बे दुने चार'च्या प्रमाणात वाढतात, ती स्टेज. या अवस्थेत ज्यात कॅन्सरची लक्षणं आढळली ते फुफ्फुस किंवा फुफ्फुसाचा एक भाग ऑपरेशन करून वेगळा केला जाऊ शकतो.

मधली किंवा इंटरमिडिएट स्टेज : या स्टेजमध्ये कॅन्सरच्या पेशी शरीरातल्या एका भागातून दुसऱ्या भागात पसरू लागतात. या स्टेजमध्ये किमो थेरपी, रेडियो थेरपी आणि ऑपरेशन अशी उपचार पद्धती असते.

अॅडव्हान्स स्टेज : या स्टेजमध्ये शरीरातल्या दुसऱ्या भागात कॅन्सरच्या पेशी पूर्णपणे पसरतात. या स्टेजमध्ये रुग्ण बरी होण्याची शक्यता जवळपास नसते. मात्र किमो थेरपीद्वारे उपचार केले जाऊ शकतात.

अनंत कुमार यांच्या कॅन्सरचं निदान झालं तेव्हा तो अॅडव्हान्स स्टेजमधला फुफ्फुसांचा कॅन्सर होता. मात्र त्यांना किमो थेरपी देण्यात येत नव्हती. ते केवळ औषधं घेत होते, असं डॉ. श्रीनाथ यांचं म्हणणं आहे.

उपचारासाठी अमेरिका का?

अभिनेत्री सोनाली बेंद्रे असो किंवा क्रिकेटपटू युवराज सिंह कॅन्सरच्या उपचारासाठी कुठलीच बडी आसामी देशात उपचार घेत नाही. सगळेच उपचारासाठी परदेशात जातात.

बंगळुरूच्या शंकरा हॉस्पिटलचे डॉ. श्रीनाथ सांगतात, "कॅन्सरच्या उपचाराशी संबंधित काही नवीन औषधांवर अमेरिकेत संशोधन झालं आहे. ती औषधं भारतात नाहीत. म्हणून अनंत कुमार यांना अमेरिकेत उपचार घेण्याचा सल्ला आम्हीच दिला होता."

ते सांगतात, "फुफ्फुसाच्या कॅन्सरवर भारतात उपलब्ध असलेल्या औषधांचा अनंत कुमार यांना उपयोग होऊ शकला नाही. आपल्या देशात काही मर्यादित स्टँडर्ड उपचारच दिले जाऊ शकतात. अॅडव्हान्स स्टेजवरच्या उपचारांसाठी आपण सक्षम नाही."

"त्यामुळेच निराश झाल्यावर आम्हीच रुग्णाला परदेशात जाऊन उपचार घेण्याचा सल्ला देतो. अमेरिका आणि युरोपात अशा प्रकारच्या संशोधनावर बराच पैसा खर्च केला जातो. त्यामुळे तिथे उपचारही चांगले मिळतात."

कॅन्सर

फोटो स्रोत, Getty Images

मात्र धर्मशीला हॉस्पिटलचे डॉ. अंशुमन यांच्या मते, "भारतातही सर्व प्रकारच्या कॅन्सरवर उपचार उपलब्ध आहेत. मात्र लोकं दोन कारणांमुळे उपचारासाठी परदेशात जातात. एक कारण म्हणजे त्यांना त्यांचा आजार लपवायचा असतो आणि दुसरं कारण आहे पैसा. सेलिब्रिटी स्टेटसमुळे अनेक पैसेवाले भारतात उपलब्ध उपचारांवर विश्वास ठेवू शकत नाहीत."

महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये फुफ्फुसाचा कॅन्सरचं प्रमाण अधिक

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर प्रिव्हेन्शन अँड रिसर्चचे (NICPR) काही डॉक्टर्स आणि संशोधक यांनी 'इंडिया अगेन्स्ट कॅन्सर'च्या माध्यमातून नवं पाऊल उचललं आहे.

त्यांची वेबसाईट 'इंडिया अगेन्स्ट कॅन्सर'नुसार पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये फुफ्फुसाचा कन्सर होण्याची शक्यता कमी असते.

डॉ. श्रीनाथ यांनाही ते मान्य आहे. त्यांच्या मते आतापर्यंत पुरुषांमध्येच फुफ्फुसाच्या कर्करोगाचं प्रमाण अधिक असल्याचं आढळलं आहे.

कॅन्सर

फोटो स्रोत, SPL

फोटो कॅप्शन, प्रतिकात्मक फोटो

डॉ. श्रीनाथ सांगतात, "इतर देशांच्या तुलनेत भारतात कमी वयातच कॅन्सर होताना दिसतो. ही चिंतेची बाब आहे. मात्र याचं नेमकं कारण अजून समजू शकलेलं नाही."

'इंडिया अगेन्स्ट कॅन्सर' या वेबसाईटनुसार कॅन्सरच्या रुग्णाचं साधारण वय 54 वर्षांच्या आसपास आहे.

बहुतांश लोकांना फुफ्फुसाचा कॅन्सर हा तंबाखू सेवन, सिगरेट ओढणं आणि प्रदूषणामुळे होतो. तुम्हाला तंबाखू किंवा सिगरेटचं व्यसन असेल तर ताबडतोब सोडा. तुम्ही पॅसिव्ह स्मोकर असाल तर तुमची मित्रमंडळी किंवा आप्तेष्ट सिगरेट ओढतात तिथे जाऊ नका. प्रदूषण करणाऱ्या वायूंचा धोका असेल अशा ठिकाणी काम करणं शक्यतो टाळा, असं तज्ज्ञ सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)