मनोहर पर्रिकरांचं आजारपण आणि गोवा भाजपचं बिघडलेलं आरोग्य

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मनस्विनी प्रभुणे नायक
- Role, बीबीसी मराठीसाठी गोव्याहून
"गोव्यात सरकारने वेगाने काम केलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांजवळील खाती इतरांकडे सोपवली पाहिजेत. लोकांमध्ये पक्षाबद्दल तीव्र नाराजी निर्माण झाली आहे," अशी टीका विरोधी पक्ष काँग्रेसने किंवा कुण्या राजकीय विश्लेषकानी नाही तर भाजपचेच आमदार मायकल लोबो यांनी केली आहे.
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती खालवल्याने गोव्यातील राजकीय स्थितीही अस्थिर झाली आहे. या पार्श्वभूमीवर सत्ता स्थापनेच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेसचे दोन आमदार फोडणाऱ्या सत्ताधारी भाजपमध्ये सारे आलबेल नाही, हेच लोबो यांच्या टीकेवरून दिसून येते.
भाजप - महाराष्ट्र गोमंतक पार्टी - गोवा फॉरवर्ड आणि अपक्ष आमदारांनी मिळून मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली मार्च २०१७ मध्ये गोव्यात सत्ता स्थापन केली होती. खास या आघाडीच्या नेतृत्वासाठी पर्रिकर यांना केंद्रीय संरक्षण मंत्रिपद त्यागावं लागलं होतं.
२०१८ ला विद्यमान सरकारची वर्षपूर्ती होण्यापूर्वीच फेब्रुवारीत पर्रिकर उपचारासाठी मुंबईला आले. तिथूनच गोव्यात राजकीय परिस्थिती बदलू लागली.
पर्रिकर दिल्लीच्या 'एम्स'मधून गोव्यात स्ट्रेचवरूनच परतले. शनिवारी त्यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची बैठक घेऊन 200 कोटींचे प्रकल्प मंजूर केले. पण यामुळे स्वपक्षीय आमदारांचं समाधान मात्र होऊ शकलेलं नाही, असं चित्र आहे.

फोटो स्रोत, PTI
पण त्यांच्या तब्येतीमुळे प्रशासनात आलेली ढिलाई आणि सरकारची कामगिरी यामुळे सत्ताधारी पक्षातच नाराजीचे ढग गडद होत आहेत. एकेकाळी पर्रिकर यांचे पाठीराखे राहिलेले लोबो आता पर्रिकरांचेच टीकाकार झाले आहेत आणि यातून बरंच काही सांगता येतं.
राजकीय घडामोडींचा आठवडा
पर्रिकरांची तब्येत गंभीर होताच काँग्रेसने गेल्या आठवड्यापासून सत्ता स्थापन्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. मगोपला मुख्यमंत्रिपद देऊ करत काँग्रेसने कर्नाटक फॉर्म्युला गोव्यात आजमावण्यास हालचाली सुरू करताच भाजप सजग झाली.
काँग्रेसचे आमदार सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांनी मंगळवारी आमदारकी आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सत्तेच्या सारीपाटात आता काँग्रेस आणि भाजपचे संख्याबळ समान, म्हणजे प्रत्येकी 14 झालं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या सत्ता स्थापनेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना खीळ बसली.
भापजमध्ये अंतर्गत कलह
काँग्रेसला रोखण्यात भाजपला यश आलं असलं तरी पक्षांतर्गत कलह डोकेदुखीचा विषय झाला आहे. भाजपने काँग्रेसमध्ये जी फूट पाडली, त्यावर खुद्द भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीच टीका केली आहे.

फोटो स्रोत, PIB
"पक्षांतर्गत कोणतीही चर्चा न करता काँग्रेसचे दोन आमदार फोडण्यात आले. हा प्रकार आमच्यासारख्या निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय करणारा आहे," अशी तोफ पार्सेकर यांनी डागली.
बुधवारी झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीतही याचे पडसाद उमटताना दिसले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून फुटून बाहेर पडलेले बंडखोर नेते आणि गोवा सुरक्षा मंचाचे अध्यक्ष सुभाष वेलिंगकर यांनी भाजप आणि काँग्रेसमध्ये काडीचाही फरक राहिलेला नाही, अशी टीका केली.
'सरकार अस्तित्वात आहे का?'
गोव्यात मनोहर पर्रिकर हेच मुख्यमंत्री राहतील, असं जाहीर करणारे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी दुसरीकडे दिल्लीत नवीन नेत्याच्या निवडीचा अंदाज घेण्यासाठी घटक पक्षांबरोबर बैठका सुरू ठेवल्या आहेत. पर्रिकरांकडील महत्त्वाच्या खात्यांच्या वाटपासंदर्भात चर्चेचं गुऱ्हाळ लांबत चाललं आहे.
सध्याच्या राजकीय अस्थिरतेवर भाष्य करताना प्रुडंट मीडिया या वृत्तवाहिनीचे संपादक प्रमोद आचार्य म्हणाले, "राज्यात गेली 7 महिने सरकार अस्तित्वात नाही, अशी स्थिती आहे. भाजपची लाचारी आणि तत्त्वहीन राजकारण पाहता या पक्षाला इतरांहून वेगळं कसं म्हणायचं, हा प्रश्न निर्माण झाला आहे."

फोटो स्रोत, FACEBOOK @PARRIKAR.MANOHAR
पुढच्या दोन दिवसांत अमित शाह घटक पक्षांना ज्यादा खाती वाटून राजकीय परिस्थितीवर तात्पुरता तोडगा काढतील, असं सांगितलं जात आहे. त्यासाठी त्यांनी घटक पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली आहे.
या सगळ्या राजकीय घडामोडीत एक बाब प्रकर्षाने दिसून येते. ती म्हणजे गोवा भाजपची 'निर्नायकी' स्थिती.
आचार्य म्हणतात, "भाजपकडे नेतृत्वाची दुसरी फळीच नाही. केंद्रात भाजपचं सरकार आहे, म्हणून गोव्यातील सरकार टिकलं आहे. अन्यथा हे सरकार केव्हाच पडलं असतं. ठिगळं लावून सरकार चालू राहीलही. पण पुढच्या निवडणुकीत भाजपचा समोर मोठ्या समस्या निर्माण होतील, हे मात्र स्पष्ट दिसत आहे."
या निर्नायकीतून आणि पक्षांतर्गत कलहातून गोव्यातील भाजप कसं बाहेर पडतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पण एक मात्र नक्की, की मनोहर पर्रिकरांच्या गूढ आजारपणामुळे गोवा सरकार आणि एकंदरच राज्यातल्या भाजपचं आरोग्य बिघडलेलं आहे.
हे वाचलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








