ग्राउंड रिपोर्ट : ‘परप्रांतीय’ हिंदी भाषिकांवर का होत आहेत गुजरातमध्ये हल्ले?

गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, बलात्कार

फोटो स्रोत, Shailesh Chavan

फोटो कॅप्शन, गुजरातमध्ये कामानिमित्त राहणारी माणसं उत्तर प्रदेश आणि बिहारची माणसं परतत आहेत.
    • Author, भार्गव पारिख
    • Role, बीबीसी गुजरातीसाठी

गुजरातमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेमुळे राज्यातील बिगरगुजराती माणसांची अवस्था बिकट झाली आहे. गुजरातमधल्या साबरकांठा जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या आरोपांखाली एका बिगरगुजराती व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर गुजरातमध्ये राहणाऱ्या उत्तर प्रदेशीय माणसबद्दलाचा रोष वाढू लागला आहे.

साबरकांठा जिल्ह्यातल्या हिंमतनगर भागात राहणाऱ्या आणि अन्य राज्यांमधून आलेल्या मजुरांना गुजरातमधून निघून जाण्यासाठी धमक्या दिल्या जात आहेत.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बलात्काराच्या या घटनेनंतर परप्रांतीय म्हणजेच अन्य राज्यातून गुजरातमध्ये कामासाठी दाखल झालेल्या माणसांवर हल्ल्याच्या 18 घटना समोर आल्या आहेत. साबरकांठा जिल्ह्यात राहणाऱ्या बिगरगुजराती नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

ही भीती गुजरातच्या अन्य काही भागांमध्ये वेगाने पसरते आहे. अनेक माणसं भयापोटी गुजरात सोडून जाताना दिसत आहेत.

व्हॉट्सअप तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून बिगर गुजराती व्यक्तींना राज्य सोडून जाण्याबाबत धमकीवजा इशारे देण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यामुळेच वातावरण बिघडत असल्याचं पोलिसाचं म्हणणं आहे.

गुजरात पोलिसांनी अशा धमका पसरवणाऱ्या तसंच भीती निर्माण करणाऱ्या व्यक्तींना अटक तसंच ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र पोलिसांचे प्रयत्न अपुरे आणि अपयशी असल्याचं लोकांचं म्हणणं आहे.

काँग्रेसचे नेते आणि क्षत्रिय ठाकोर सेनेचे अल्पेश ठाकोर यांनी लोकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे.

...आणि वातावरण चिघळलं

28 सप्टेंबर - साबरकांठा जिल्ह्यातल्या हिंमतनगरजवळच्या ढुंढर गावात 14 महिन्यांच्या एका लहान मुलीवर बलात्काराची घटना घडली. याप्रकरणी एका कारखान्यात काम करणाऱ्या 19 वर्षीय रवींद्र गोंडे या इसमाला अटक करण्यात आली.

कारखान्यासमोरच्या एका खाण्यापिण्याच्या टपरीवर रवींद्र नाश्ता-चहासाठी जात असे. पोलिसांच्या सांगण्यानुसार, या दुकानाजवळ झोपलेल्या लहान मुलीला शेतात नेऊन रवींद्रने बलात्कार केला. त्यानंतर रवींद्र फरार झाला.

या मुलीवर अहमदाबादमधल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. प्रचंड रक्तस्राव झाल्याने मुलीची प्रकृती अत्यंत नाजूक होती. मात्र आता तिच्या प्रकृतीचा धोका टळला आहे, असं हॉस्पिटलमधील बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र जोशी यांनी सांगितलं.

गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, बलात्कार

फोटो स्रोत, SHAILESH CHAUHAN

आमच्या घरावर संकट ओढवलं आहे. माझ्या नातीवर दुर्देवी प्रसंग ओढवला आहे. यानंतर सुरक्षेचं कारण देत पोलिसांनी आमचं दुकान बंद केलं. कमाई बंद झाली. दोन्ही वेळच्या जेवणाची भ्रांत झाली आहे, असं या लहान मुलीचे आजोबा अमर सिंह यांनी सांगितलं.

द्वेष पसरवणारे संदेश

आरोपी रवींद्र गोंडे याच्या अटकेनंतर वातावरणात गुजराती आणि बिगर गुजराती अशी दरी निर्माण झाली आहे. सोशल मीडियावरच्या द्वेष पसरवणाऱ्या मेसेजेसचा त्यात मोठा वाटा आहे.

या भागात गुजरातच्या बाहेरून आलेले जवळपास सव्वा लाख लोक राहतात. मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर बाहेरून आलेल्या लोकांवर हल्ल्याचे 18 प्रकार उघडकीस आले आहेत.

यामुळेच उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातून आलेली माणसं गुजरात सोडून चालली आहेत.

हिंमतनगरच्या शक्तीनगर भागात भाड्याच्या घरांमध्ये बाहेरून आलेली माणसं मोठ्या प्रमाणावर राहतात. आता मात्र या घरांना कुलुपं लागलेली दिसतात.

काही घरं बंद आहेत. मात्र वाळत घातलेले कपडे तिथेच आहेत. फ्रीज, टीव्हीसारख्या वस्तू विकून गुजरात सोडत आहेत.

गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, बलात्कार

फोटो स्रोत, Julie Rupali

फोटो कॅप्शन, साबरकांठा येथील सिरॅमिक असोसिएशनचे अध्यक्ष कमलेश पटेल

साबरकांठामध्ये महिन्याला 80 ते 90 कोटी रुपयांचा सिरॅमिकचा व्यवसाय आहे. यामध्ये काम करणारे 50 ते 60 टक्के कामगार गुजरातबाहेरचे आहेत. या घटनेनंतर 30 ते 35 टक्के कामगार उत्तर प्रदेशात परत गेले आहेत. यामुळे सिरॅमिक उद्योगावर विपरीत परिणाम झाला आहे, असं साबरकांठा सिरॅमिक असोसिएशनचे सचिव कमलेश पटेल यांनी सांगितलं.

'तीन दिवस घराबाहेर पडू शकलो नाही'

साबरकांठा हायवेजवळच्या एका वस्तीत राहणारे मनोज शर्मा मूळचे उत्तर प्रदेशातील आग्र्याचे. गेल्या दहा वर्षांपासून ते इथे काम करत आहेत. मनोज आणि त्यांचे कुटुंबीय भयग्रस्त जीवन जगत आहेत.

"माझ्या बायकोची तब्येत ठीक नाही. पण मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ शकत नाही. कारण आम्ही सगळे घाबरलो आहोत. तीन दिवस झाले, आम्ही कोणीही घराबाहेर पडू शकलेलो नाही," असं मनोज यांनी सांगितलं.

मनोज यांच्या पत्नी गिरिशा शर्मा यांनी त्यांचा अनुभव सांगितला. त्या म्हणतात, "घराबाहेर जायला खूप भीती वाटते. घरात जेवढा किराणा शिल्लक आहे त्यावर गुजराण करत आहोत. भाजीपाला खरेदी करण्यासाठीही जाणं नको होतं."

गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, बलात्कार

फोटो स्रोत, Julie Rupali

फोटो कॅप्शन, माणसं घरदार सोडून गेली आहेत.

याच वस्तीत राहणाऱ्या हरिओम त्रिवेदी यांना पाच वर्षांच्या मुलाला घेऊन हॉस्पिटलात जायचं आहे. पण त्यांना प्रचंड भीती वाटते आहे. ते सांगतात, "मी मुलाला घेऊन हॉस्पिटलातही जाऊ शकत नाही. आजूबाजूच्या परिसरात लोकांना बेदम मारहाण करण्यात आली. मी माझ्या मुलाला घेऊन बाहेर पडलो तर मलाही अशी मारहाण होईल अशी भीती मनात आहे."

त्यांच्या पत्नी रमा त्रिवेदी सांगतात, "टीव्हीवरच्या बातम्यांमधले हिंसक प्रकार बघून आमची भीती आणखी वाढली. माझ्या घरच्यांवर हल्ला होऊ नये यासाठी मी रोज प्रार्थना करते."

दहशतीच्या छायेत

हिंमतनगरमध्ये जे घडलं त्याचा परिणाम साबरकांठा, मेहसाणा, गांधीनगर आणि अहमदाबादमधल्या चांदखेडा, अमराईवाडी, बापूनगर तसंच ओढवसारख्या परिसरात दिसतो आहे. या सगळ्याच ठिकाणी गुजरातबाहेरून आलेली माणसं मोठ्या संख्येने राहतात.

सुरतजवळच्या सचिन, पांडेसरा, डिंडोली तसंच डुम्मस अशा औद्योगिक भागांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, बलात्कार

फोटो स्रोत, Julie Rupali

फोटो कॅप्शन, गुजरात सोडून निघालेली माणसं

पोलीस सतर्क झाले असून त्यांनी या भागातला बंदोबस्त वाढवला आहे. मात्र सोशल मीडियावर द्वेषकारक संदेश आणि नकली व्हीडिओंमुळे परिस्थिती चिघळते आहे.

दीडशे लोक अटकेत

"गुजरातबाहेरून आलेल्या लोकांवर झालेल्या 18 हल्ल्यांप्रकरणी 18 खटले दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणाची झळ बसलेल्या भागांमध्ये बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. राज्य राखीव पोलिसांच्या 20 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत दीडशे लोकांना अटक करण्यात आली आहे," असं गुजरातचे डीसीपी शिवानंद झा यांनी बीबीसीला सांगितलं.

ज्या फॅक्टरींमध्ये गुजरात बाहेरून आलेली माणसं काम करतात तिथली सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सोशल मीडियावर पसरवण्यात येत असलेल्या धमक्यांबाबत सायबर सेललाही अलर्ट करण्यात आलं आहे.

गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, बलात्कार

फोटो स्रोत, Julie Rupali

फोटो कॅप्शन, गुजरातमध्ये लहानग्या मुलीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी पोलिसांची चौकशी सुरू आहे.

सोशल मीडियावर द्वेषकारक संदेश पाठवण्याकरता 24 लोकांना अटक करण्यात आली आहे, असं याप्रकरणाची चौकशी करत असलेले पोलीस अधिकारी आर. एस. ब्रह्राभट यांनी सांगितलं.

कठोर शिक्षा व्हायला हवी

"लहानग्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला कठोर शिक्षा व्हायला हवी. मात्र यासाठी गुजरात बाहेरून आलेल्या सगळ्या माणसांना राज्याबाहेर जायला सांगणं चुकीचं आहे. अशा पद्धतीने पलायन करायला लावणं भारत या संकल्पनेला बट्टा लावणारं आहे," असं राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

दरम्यान हायकोर्टाशी सल्लामसलत केल्यानंतर हा खटला फास्ट ट्रॅक पद्धतीने चालवला जाईल. दोन महिन्यांमध्ये संपूर्ण कार्यवाही पूर्ण करण्यात येईल. राज्यातल्या बलात्कारविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हेगाराला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्नशील राहू, असं गुजरातचे गृहमंत्री प्रदीपसिंह जाडेजा यांनी सांगितलं.

बीमारू राज्यातले श्रमिक

आर्थिकदृष्ट्या मागास अशा बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांना बीमारू म्हटलं जातं.

एखादी व्यक्ती आजारी असते तेव्हा त्याला आजारी म्हटलं जातं. याच धर्तीवर 1980च्या दशकात डेमोग्राफर आशिष बोस यांनी या राज्यांना बीमारू हे नाव दिलं होतं.

गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, बलात्कार

फोटो स्रोत, Julie Rupali

फोटो कॅप्शन, कुटुंबकबिला घेऊन गुजरातमधली बिगर गुजराती माणसं परतत आहेत.

या राज्यातली हजारो माणसं गुजरात, महाराष्ट्र, दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये नोकरी, व्यवसाय, रोजंदारीच्या निमित्ताने राहतात. बाहेर गेल्यावर छोटी मोठी दुकानं, सुरक्षारक्षक, फॅक्टरी अशी कोणतीही कामं ते करतात आणि घर चालवतात.

अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा बाहेरून आलेल्या माणसांना लक्ष्य केलं जातं. त्याचवेळी स्थानिक नेतेही गुजरातमधले आणि गुजरातबाहेरचे या भावनेला खतपाणी घालतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)