भीमा कोरेगाव प्रकरण : 'JNU आणि TISSच्या विद्यार्थ्यांना जंगलात पाठवण्याचा माओवाद्यांचा डाव'

वरवरा राव, गौतम नवलखा आणि सुधा भारद्वाज

फोटो स्रोत, GETTY / FACEBOOK

फोटो कॅप्शन, वरवरा राव, गौतम नवलखा आणि सुधा भारद्वाज

"माओवाद्यांनी सरकारविरुद्ध युद्ध पुकारलं असून त्यांचा सरकार उलथवून लावायचा कट होता. तसंच JNU आणि TISSच्या विद्यार्थ्यांना जंगलात लष्करी प्रशिक्षण देण्याची योजना होती," अशी माहिती राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) परमवीर सिंह यांनी शुक्रवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

भीमा कोरेगाव प्रकरणी पुणे पोलिसांनी देशभरातील सामाजिक चळवळीतील पाच कार्यकर्त्यांना 28 ऑगस्टला अटक केली होती. पण, पुढील सुनावणी होईपर्यंत या पाच जणांना घरातच नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. या कारवाईसंदर्भात हा गौप्यस्फोट पोलिसांनी केला आहे.

मूळचे तेलंगणाचे असलेले वरावरा राव, अरुण फरेरा, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा आणि वर्होन गोन्सालविस यांच्याविरोधात ठोस पुरावे हाती लागल्याचं सिंह यांनी सांगितलं.

अटकेतील सगळ्यांचे नक्षलवाद्यांशी संबंध होते आणि तसे संबंध असल्याची पत्रं पोलिसांना मिळाली आहेत. या पत्रांमध्ये नक्षलवाद्यांना मदत, पैसा, हत्यारे पुरवण्याचा उल्लेख असल्याचं सिंह यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.

पोलिसांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाच्या 9 गोष्टी पुढीलप्रमाणे -

1. पोलिसांना तपासादरम्यान हाती लागलेल्या पत्रांचं या पत्रकार परिषदेत वाचन करण्यात आलं. यात सुधा भारद्वाज, मिलिंद तेलतुंबडे आणि रोना विल्सन यांची पत्र होती. नक्षलवादी चळवळीसाठी योजना आखणं, पैशाची उभारणी आणि मागणी, हत्यारं यांचा उल्लेख या पत्रांमध्ये आहे.

Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

2. अशी हजारो पत्र मिळाली आहेत. ज्यामध्ये नक्षलवाद्यांना मदत होत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

3. फरार झालेल्या मिलिंद तेलतुंबडे यांनी रोना विल्सन यांना लिहीलेल्या पत्रात नक्षली कारवायांचा थेट उल्लेख केल्याचं पोलिसांनी सांगितलं.

4. भीमा कोरेगावमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सुधीर ढवळे यांना माओवादी संघटनांकडून प्रथम 5 लाख आणि नंतर 10 लाख असे एकूण 15 लाख रुपये देण्यात आल्याचं सिंह यांनी बोलताना स्पष्ट केलं.

महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक परमवीर सिंह

फोटो स्रोत, ANI/TWITTER

फोटो कॅप्शन, महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक परमवीर सिंह

4. काही पत्रांमध्ये आरोपींनी जम्मू-काश्मीरमध्ये भूमिका बजावल्याचा उल्लेख आहे. काश्मीर खोऱ्यात दगडफेक करणाऱ्यांना एकत्र कसं आणलं जातं, तशी कल्पना देशात राबवता येईल, असंही पत्रांत लिहीलं आहे. अटकेतील आरोपींचा मणिपूर, जम्मू-काश्मीर इथल्या फुटीरतावाद्यांशी संबंध आहे.

5. नक्षली कारवाया करण्यासाठी विविध स्तरावरून पैशाचा पुरवठा करण्यासंदर्भातही पत्रं असल्याचं परमवीर सिंह यांनी स्पष्ट केलं.

6. दिल्लीमधील JNUमधून विद्यार्थ्यांना वळवून त्यांना जंगलात पाठवण्याचा यांचा विचार असल्याचं सिंह यांनी सांगितलं.

कॉम्रेड प्रकाश यांना लिहीलेलं पत्र.

फोटो स्रोत, MAYURESH KONNUR/BBC

फोटो कॅप्शन, कॉम्रेड प्रकाश यांना लिहीलेलं पत्र. या पत्रात राजीव गांधी यांच्या हत्येसारखा प्रकार करण्याबद्दलचा उल्लेख आहे.

7. रोना विल्सन यांचा पासवर्ड, संरक्षित पत्र पोलिसांच्या हाती लागलं आहे. विल्सन यांनी 4 लाख राऊंड, ग्रेनेड आणि 8 कोटी रुपयांचा उल्लेख असलेलं पत्र कॉम्रेड प्रकाश यांना लिहीलं होतं. यात राजीव गांधींसारख्या घातपाताचा उल्लेख होता.

8. कॉम्रेड सुदर्शन यांनी कॉम्रेड नवलखा यांना लिहीलेलं पत्र पोलिसांनी वाचून दाखवलं.

line

ते पत्र कपोलकल्पित

या पत्रकार परिषदेनंतर प्रसारमाध्यमांकडे दिलेल्या निवेदनात सुधा भारद्वाज यांनी त्यांची बाजू मांडली. सुधा भारद्वाज सध्या नजरकैदेत आहेत. त्यांनी त्यांच्या वकील वृंदा ग्रोवर यांच्या मार्फत पत्र लिहून हे निवेदन दिलं आहे.

त्या म्हणतात," पोलिसांनी जे पत्र सादर केलं आहे ते कपोलकल्पित आहे. अशाप्रकारे पत्र सादर करून माझी प्रतिमा गुन्हेगार म्हणून ठसवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे."

सुधा लिहितात, ज्या बैठकांना अपराध म्हणून दाखवलं जात आहे, त्या कुणापासून लपवून झालेल्या नाहीत. बऱ्याच लोकशाही घडामोडी, बैठका, परिषदा आणि आंदोलनं यांना माओवाद्यांचा हात आहे, असं म्हणून परवानगी देण्यात नाकारण्यात येत आहे.

पोलिसांनी पत्रकार परिषदेत या कार्यकर्त्यांचा माओवाद्यांसह काश्मीरमधील फुटीरवाद्यांशी संपर्क असल्याचं म्हटलं होतं. या संदर्भात त्या लिहितात, "याबद्दल मी सांगू इच्छिते की मोगा इथं कार्यक्रम घेण्यासाठी मी कधीही 50 हजार रुपये दिलेले नाहीत. तसेच महाराष्ट्रातील कोणत्याही अंकितला किंवा काश्मीरमधील फुटीरवाद्यांशी संपर्कात असलेल्या कोणत्याही कॉम्रेड अंकितला मी ओळखत नाही."

त्या लिहितात, "मी गौतम नवलखा यांना ओळखते. ते एक प्रतिष्ठित कार्यकर्ते आहेत. या शिवाय जगदपूरमध्ये न्यायिक मदत देणाऱ्या गटालाही मी ओळखते. पण बंदी असलेल्या कोणत्याही संघटनेशी मी कोणताही व्यवहार कधीही केलेला नाही."

त्यांनी डी. पी. चौहान यांच्यावर लावलेले आरोपही चुकीचे असल्याचे म्हटले आहे. त्या लिहितात की, "जे कार्यकर्ते आणि वकील छत्तीसगडमधील बस्तर इथल्या मानवी हक्कांच्या पायमल्लीचे विषय समोर आणत आहेत, त्यांच्या विरोधात बदल्याच्या भावनेने कारवाई केली जात आहे."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)