स्तनपान देणाऱ्या केरळच्या मॉडेलवरून सोशल मीडियावर खळबळ

फोटो स्रोत, Grihalakshmi magazine
केरळमधून प्रसिद्ध होणाऱ्या एका नियतकालिकानं स्तनपान देणाऱ्या स्त्रीचा फोटो मुखपृष्ठावर छापल्यामुळे सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.
'गृहलक्ष्मी' या केरळमधून प्रसिद्ध होणाऱ्या मासिकानं गिलू जोसेफ या मॉडेलचा फोटो कव्हरवर छापला. त्यात ती एका बाळाला छातीशी कवटाळून कॅमेराकडे बघताना दिसते आहे.
एखादी बाई स्तनपान देतानाचा फोटो कव्हरवर छापणं हे भारतात पहिल्यांदाच बघायला मिळतंय. त्या कव्हरवर "माता साऱ्या केरळला सांगत आहेत - टक लावून बघू नका, आम्हाला स्तनपान द्यायचं आहे," असंही फोटोबरोबर लिहिलेलं आहे.
ती खरीखुरी आई नसून मॉडेल आहे, असं म्हणत अनेकांनी या फोटोवर सोशल मीडियावर टीका केली आहे, तर बऱ्याच जणांनी नियतकालिकाच्या या कृतीला पाठिंबाही दर्शवला आहे.
गृहलक्ष्मीच्या संपादक मॉन्सी जोसेफ यांच्या मते, सार्वजनिक ठिकाणी मातांना स्तनपान देणं सोयीचं व्हावं यासाठी जनजागृती करण्याच्या हेतूनं मुखपृष्ठावर तसा फोटो छापला.
"एका महिन्यापूर्वी एकानं आपल्या बायकोचा स्तनपान देतानाचा फोटो फेसबुकवर शेअर केला होता आणि या विषयावर संवाद सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. पण या प्रयत्नाला पुरुष आणि स्त्रियांकडूनही टीकेचा सामना करावा लागला होता," असं मॉन्सी जोसेफ यांनी बीबीसीचे अशरफ पदान्ना यांच्याशी बोलताना सांगितलं. "म्हणून आम्ही आमच्या ताज्या अंकात स्तनपान देणाऱ्या मातांचा प्रश्न उपस्थित करण्याचा निर्णय घेतला", असं ते पुढे म्हणाले.
सार्वजनिक ठिकाणी स्तनपान
भारतात अनेक स्त्रिया सार्वजनिक ठिकाणी स्तनपान देताना स्वतःला झाकता यावं म्हणून साडी नेसतात. पण ज्या स्त्रिया साडी नेसत नाहीत किंवा ओढणीही घेत नाहीत, त्यांच्यासाठी हा पर्याय उपलब्ध नाही.
अनेक लोकांनी मासिकाच्या धाडसी निर्णयाला आणि मॉडेलला पाठिंबा दिला आहे, तर अनेक लोकांनी ती मॉडेल खरीखुरी आई नसल्याचं सांगत टीका केली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
एखाद्या खऱ्याखुऱ्या आईऐवजी मॉडेलला मुखपृष्ठावर घेतल्यानं जास्त टीका झाली आहे.
"स्तनपान देणाऱ्या आईचा फोटो आतल्या पानावर टाकून स्तन उघडे ठेवणाऱ्या मॉडेलचा फोटो टाकणं म्हणजे खळबळ माजवण्याचा प्रकार आहे", असं अंजना नायर या ब्लॉगरनं लिहिलं आहे.
मॉडेल गिलू जोसेफ यांनी मात्र मासिकाच्या मुखपृष्ठावर तसा फोटो देण्याचं समर्थन केलं आहे. "माझ्यावर खूप टीका होईल अशी अपेक्षा होतीच. पण स्तनपान देणाऱ्या स्त्रियांच्या प्रतिष्ठेसाठी आणि स्वातंत्र्यासाठी मी हे आनंदानं करण्याचा निर्णय घेतला", असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.
एका मासिकाला मुलाखत देतांना "स्तनपान केल्यामुळे कोणता देव नाराज होईल?" असा प्रश्न त्यांनी विचारला.
हे परंपरांना छेद देणारं पाऊल आहे, असं केरळमधील प्रसिद्ध लेखक पॉल झकेरिया यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
"सार्वजनिकरित्या स्तनपान देण्यात काही गैर नाही, असं लोकांना वाटेल. यामुळे खूप मोठं परिवर्तन होईल असं मला वाटत नाही, पण हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या प्रकरणाचा शेवट संपादकानं माफी मागण्यात होऊ नये असं मला वाटतं," असंही ते पुढे म्हणाले.
जागतिक आरोग्य संघटना बालकांना पहिल्या सहा महिन्यापर्यंत फक्त स्तनपान करण्याचा सल्ला देतात. सार्वजनिक ठिकाणी स्तनपान देणं हा सर्वदूर अगदी परदेशातही वादाचा मुद्दा आहे.
स्कॉटलंड येथे झालेल्या एका सर्वेक्षणात एक चतुर्थांपेक्षा अधिक मातांनी सार्वजनिक ठिकाणी स्तनपान देणं सोयीचं नाही असं सांगितलं.
मागच्या वर्षी एका सर्वेक्षणात यूकेमध्ये स्तनपानाचा दर सगळ्यात कमी असल्याचं सांगण्यात आलं आहे. 200 पैकी 1 किंवा 0.5% स्त्रिया एका वर्षानंतरसुद्धा थोड्याफार प्रमाणात स्तनपान देत असतात. हे प्रमाण जर्मनीत 23 टक्के, अमेरिकेत 27 टक्के, ब्राझीलमध्ये 56 टक्के आणि सेनेगलमध्ये हे प्रमाण 99 टक्के आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








