स्पीड डेटिंग : 80 मिनिटांत भेटा 10 जणांना आणि निवडा तुमचा पार्टनर!

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सिंधुवासिनी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"जेव्हा मी तिथे गेले तेव्हा मला असं वाटलं की, माझं स्वयंवरच होणार आहे. माझ्या समोर 10 तरुण उभे होते आणि माझी नजर त्यातील बेस्ट तरुणाला शोधत होती."
श्रुती हे सांगताना खूप हसते. स्पीड डेटिंग कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ती गेली होती त्यावेळची ही घटना आहे.
स्पीड डेटिंगला आधुनिक स्वयंवर म्हणणं चुकीचं ठरणार नाही. अर्थात यात मोठा फरक असा आहे की, इथे तरुण आणि तरुणी दोन्ही असतात आणि दोघांना आपल्या आवडीचा मित्र किंवा पार्टनर शोधण्याचं स्वातंत्र्य असतं. जर कुणी पसंत नसला तर तर सांगण्याची मुभा ही असते.
काय आहे स्पीड डेटिंग?
स्पीड डेटिंगची संकल्पना पाश्चात्य आहे. पण भारतासह कितीतरी देशांत हा ट्रेंड सुरू झाला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
स्पीड डेटिंगच्या कार्यक्रमात सिंगल तरुण तरुणी एकमेकांना भेटतात. समजा 10 तरुण आणि 10 तरुणी असतील तर सर्वांना एकमेकांना भेटण्याची संधी मिळेल. यासाठी त्यांना 8 मिनिटांचा वेळ मिळतो. इतक्या वेळेत एकमेकांच्या आवडीनिवडी, बेसिक माहिती जाणून घेतील जाते.
म्हणजे 80 मिनिटांत 10 लोकांना भेटून तुम्ही तुमचा पार्टनर शोधू शकता. 8 मिनिटांच्या चर्चेतून तुम्ही ठरवात की, तुम्हाला या दहापैकी कुणाला पुन्हा भेटायला आवडेल.
स्पीड डेटिंगचे फायदे
जर दोघं पुन्हा भेटायला तयार झाले तर विषय पुढे सरकतो. स्पीड डेटिंगचा सर्वाधिक फायदा हा आहे की तुम्ही कमी वेळेत तुमच्यासारख्या लोकांना भेटू शकता.
प्रेमाच्या शोधासाठीच याचा उपयोग होतो असं नाही. गप्पाटप्पा आणि मित्र शोधण्यासाठीही लोक स्पीड डेटिंगचा वापर करतात.

फोटो स्रोत, Getty Images
'लाईफ ऑफ लाईन' हे असं व्यासपीठ आहे जे भारतातील विविध शहरांत 2016पासून स्पीड डेटिंगचे कार्यक्रम ठेवतं.
याच्या आयोजकांपैकी एक असलेले प्रतीक यांनी बीबीसीशी संवाद साधला. ते म्हणाले, "जर कुणी स्पीड डेटिंगसाठी उत्सुक असेल तर त्याला आमच्या वेबसाईटवर नोंदणी करावी लागते. त्यानंतर आम्ही त्यांना संपर्क साधतो."
ते म्हणतात, "आमच्याकडे 20 ते 40 वयोगटातील लोक येतात. या लोकांना कामातून वेळ मिळत नाही. या माध्यमातून त्यांना वेगवेगळ्या लोकांना भेटायची संधी मिळते."
डेटिंग कंपनी संबंधित व्यक्तीचा संपर्क कोणालाही देऊ शकत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
स्पीड डेट.कॉम आणि क्वॅकक्वॅक.कॉम स्पीड डेटिंगच्या सुविधा देणाऱ्या वेबसाईट आहेत.
स्पीड डेटिंगच्या ऑफर देणाऱ्या कंपन्यांचा उद्देश मॅट्रिमोनिअल वेबसाईटसारखा नसतो. अर्थात डेटिंग लग्नापर्यंत गेल्याची उदाहरणंही आहेत.
रिलेशनशिप एक्सपर्ट डॉ. गीतांजली सक्सेना म्हणतात, "आजची परिस्थिती पाहता स्पीड डेटिंगमध्ये काही चुकीचं नाही. पहिल्या नजरेत प्रेम बसायला हवं असं काही नाही. तुम्ही विचार करून जर जोडीदार निवडत असाल तर चांगलीच बाब आहे."
दिल्लीत राहणारे गौरव वैद्य आयटी कंपनीत काम करतात. ऑस्ट्रेलियातून परत आल्यानंतर त्यांच्या एका मित्राने स्पीड डेटिंगचा सल्ला दिला.
ते म्हणाले, "सुरुवातीला मला हे एखाद्या गेमसारखं वाटलं. मी एका मुलीशी बोलत होतो, तोवर शिटी वाजली आणि मला दुसऱ्या टेबलवर जाऊन दुसऱ्या मुलीशी बोलण्यासाठी जा, असं सांगण्यात आलं."
पण यामुळे कमी वेळेत जास्ती जास्त लोकांशी भेटता येतं, हे त्यांनी मान्य केलं. आता 2 मुलींशी बोलत असून योग्य जोडीदार मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे.

फोटो स्रोत, Getty Images
अर्थात याचे काही तोटेसुद्धा आहेत. डॉ. गीतांजली सांगतात, "स्पीड डेटिंगला जात असताना आपल्याला माहीत असायला हवं की आपण कसा जोडीदार शोधत आहोत. नाही तर एकाच वेळी अनेकांना भेटल्यानं गोंधळ उडण्याचीच शक्यता जास्त असते."
त्यांचं मत असं आहे की, कोणाच्या सौदर्यांकडे, हास्याकडे आपण आकर्षित होऊ शकतो, पण ते रिलेशनशिप दीर्घकाळ टिकवण्यासाठी चांगलं असेलच असं नाही.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








