कार्ती चिदंबरमना अटक का झाली? काय आहेत पी. चिदंबरम यांच्या मुलावर आरोप?

फोटो स्रोत, KARTI P CHIDAMBARAM FACEBOOK
मनी लॉड्रिंगच्या एका प्रकरणात CBI ने कार्ती चिदंबरम यांना अटक केली आहे. कार्ती यांचे वडील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम हे मनमोहन सिंग सरकारमध्ये गृहमंत्री आणि अर्थमंत्री होते.
लंडनहून चेन्नईला परतल्यानंतर कार्ती यांना लगेचच अटक करण्यात आली. याच प्रकरणात काही दिवसांपूर्वी त्यांचे चार्टर्ड अकाउंटंट (CA) एस. भास्कर रमन यांनाही अटक झाली होती.
नेमकं काय आहे प्रकरण?
पी. चिदंबरम हे अर्थमंत्री असताना INX मीडियामध्ये 300 कोटी रुपयांच्या परदेशी गुंतवणुकीचं हे प्रकरण आहे. Foreign Investment Promotion Board (FIPB) ने मर्यादेपेक्षा अधिक परदेशी गुंतवणूक स्वीकारण्यासाठी INX मीडियाला मिळालेल्या मंजुरीत अनियमिततेचा आरोप लावला होता.
गेल्या वर्षी मे महिन्यात सक्तवसुली संचालनालयाने (Enforcement Directorate अर्थात ED) कार्ती चिदंबरम यांच्याविरुद्ध एक केस दाखल केली होती. या केसमध्ये कार्ती चिदंबरम यांनी लाच घेतल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
INX मीडियाद्वारे कथित बेकायदेशीर रक्कम वळवल्याच्या माहितीच्या आधारे CBI ने कार्ती चिदंबरम आणि इतर काही जणांवर एक स्वतंत्र केस दाखल केली आहे.

फोटो स्रोत, TWITTER @KARTIPC
CBIने पीटर आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या मीडिया फर्मवरील कर चौकशीला रद्द करण्यासाठी कथितरित्या रक्कम घेतल्याच्या प्रकरणात चार शहरांमध्ये चिदंबरम यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे मारले होते. या आधीही CBIनं अनेकवेळा कार्ती चिदंबरम यांची चौकशी केलेली आहे.
याशिवाय सप्टेंबर 2017मध्ये EDनं कार्ती चिदंबरम यांच्या दिल्ली आणि चेन्नईतल्या संपत्तींवर टाच आणली होती.
भारतीय माध्यमांनुसार चौकशीदरम्यान EDला माहिती मिळाली की, 2G घोटाळ्यातल्या एअरसेल मॅक्सिस प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या कार्यकाळात FIPBच्या मंजुऱ्याही मिळालेल्या आहेत. याचबरोबर कार्ती आणि पी. चिदंबरम यांच्या भाचीच्या कंपनीला मॅक्सिस ग्रूपकडून लाच मिळाल्याची माहितीही ED ला मिळाली होती.
माध्यमांमधल्या वृत्तांनुसार, एअरसेल-मॅक्सिस करारामध्ये माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या भूमिकेचाही तपास CBI करत आहे.

फोटो स्रोत, RAVEENDRAN/AFP/GETTY IMAGES
2006 मध्ये मलेशियन कंपनी मॅक्सिसद्वारे एअरसेलमध्ये 100 टक्के भागीदारी मिळवण्यासाठी मंजुरी देण्याच्या प्रकरणात चिदंबरम यांच्यावर अनियमततेचे आरोपही लावण्यात आले आहेत.
पण पी. चिदंबरम यांनी नेहमी त्यांच्यावर आणि मुलावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्यावरचे सगळे आरोप राजकीय हेतून लावण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
कार्ती चिदंबरम यांना अशा वेळी अटक झाली आहे, जेव्हा संसदेचं अधिवेशन सुरू होणार आहे. असंही म्हटलं जातं आहे की, PNB प्रकरणात विरोधक मोदी सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत आहे.
तुम्ही ही क्विझ सोडवलीत का?
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








