मी माझ्या बायकोचं आडनाव लावलं, कारण...

दाम्पत्य
    • Author, क्रिस्टी ब्रिवर
    • Role, बीबीसी

आपल्याकडे आजही लग्न झाल्यानंतर स्त्रियांचं नाव बदलतं. पण काही महिला लग्नानंतरही त्यांचं मूळ नाव तसंच ठेवतात. काही जणी लग्नानंतर दोन आडनावं ठेवतात. पाश्चिमात्य देशांत नवरा- बायको दोघांच्याही नावांपासून तयार केलंलं एक नवीन नाव स्वीकार ण्याची एक नवीन पद्धत आली आहे.

पण नवऱ्यानं लग्नानंतर नाव बदललं आणि बायकोचं नाव स्वीकारलं, हे तुम्ही कधी ऐकलं आहे का? विकसित देशांतही असे पुरुष सापडणं दुर्मीळ आहे. बीबीसीच्या क्रिस्टी ब्रिवर अशा तीन पुरुषांना भेटल्या.

लंडनमधल्या एका प्राथमिक शाळेतले शिक्षक रॉरी 2016 मध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला गेले ते मिस्टर रॉरी कुक म्हणून. आणि नवीन शैक्षणिक सत्रात ते शाळेत परतले तेव्हा त्यांचं आडनाव मिस्टर डिअरलव होतं. त्यांच्या वर्गातल्या सात ते आठ वर्षं वयाच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. याआधी महिला शिक्षकांनी लग्नानंतर त्यांची आडनावं बदलल्याचं त्यांना माहीत होतं. पण पुरुषानं? कधीही नाही.

त्यांच्या वर्गातल्या एका विद्यार्थिनीला राहावलं नाही आणि अखेर तिने रॉरी यांना खेळायच्या मैदानावर विचारलं, "तुम्ही तुमचं आडनाव का बदललं, मिस्टर डिअरलव?"

रॉरी यांनी स्मित करत बोटातली वेडिंग रिंग दाखवली आणि उत्तर दिलं, "कारण माझं लग्न झालं आहे. हे बघं!"

"पण का?" तिने विचारलं.

"कारण जेव्हा आपण लग्न करतो तेव्हा तुम्ही कुठलं नाव हवं, हे ठरवू शकता. तुम्ही तुमचं पूर्वीचंच नाव ठेऊ शकता किंवा जोडीदाराचं नावं घेऊ शकतात. दोन्ही नावं ठेवू शकता किंवा नवीन नावही निवडू शकता. मी माझ्या पत्नीचं आडनावं निवडलं, डिअरलव," रॉरीने सांगितलं.

"शाळांमध्ये विद्यार्थी जे सामान्यपणे अनुभवतात, तेच खरं म्हणून स्वीकारतात. माझं आडनाव बदलण्याचा निर्णय हा त्यांच्यासाठी नवीन संकल्पना होती. माझ्यासाठी एक वेगळा विचार रुजवण्याची ही एक चांगली संधी होती," रॉरी म्हणाले. चार वर्षांपूर्वी ते त्यांची पत्नी लुसी यांना 'टिंडर' या 'डेटिंग अॅप'द्वारे भेटले होते.

लुसीचं आडनाव स्वीकारणं रॉरीसाठी फारसा अवघड निर्णय नव्हता. "मी स्वःच्या कुक या आडनावाशी फार जोडला गेलेला नव्हतोच कधी", ते सांगतात. "काम करताना या सर्वांचा माझ्यावर कुठलाही परिणाम होणार नाही. सही नवीन असेल फक्त, ज्याला माझी हरकत नाही," ते म्हणाले. "मी विचार केला की, आम्हा दोघांचं एकच आडनाव असणं चांगलंच आहे आणि डिअरलव हे दोन्ही आडनावांपैकी जास्त चांगलं नाव वाटलं."

दाम्पत्य

सध्या ब्रिटनमधल्या महिलांमध्ये नाव बदलण्याचं प्रमाण पुन्हा वाढलं आहे. पण रेडिओ प्रोड्यूसर असलेल्या लुसीनं आधीच स्पष्ट केलं होतं की ती तसं करणार नाही.

रॉरी आपलं आडनाव बदलेल, हेही तिला बिलकुल अपेक्षित नव्हतं. "पहिल्यांदा मला वाटलं तो मस्करी करत असावा," ती म्हणाली. "माझ्यासाठी ते फारसं महत्त्वाचं कधीच नव्हतं. जसं माझं नाव मी कायम ठेवणं हा माझा हक्क आहे, तसाच त्याचाही तो हक्क आहे. पण असं केल्यानं माझ्या मैत्रिणींच्या मनातलं त्याचं स्थान वाढलं," लुसी सांगतात.

रॉरीच्या वर्गातल्या त्या आठ वर्षांच्या मुलांनी त्यांच्या नवीन नावाचा लवकरच स्वीकार केला, पण रॉरी ज्यांच्यासोबत फुटबॉल खेळतो त्यांच्यापैकी काहींना हे विचित्र वाटलं. तर काहींनी "आधुनिक पुरुष" असं म्हणत भुवया उंचावल्या. पण रॉरीला या टीकेनं कुठं फरक पडत होता?

विवाहाची आणखी एक असमानता

इंग्लड आणि वेल्समध्ये मॅरेज सर्टिफिकेटवर फक्त नवदाम्पत्याच्या वडिलांचं नाव असतं. आईचं नाव नसतं. सध्याच्या आधुनिक विचारसरणीच्या जमान्यात हे सर्टिफिकेट अयोग्य असल्याचं काही जणांचं म्हणणं आहे. त्यांनी त्या दृष्टीनं मोहीमही उघडली आहे.

प्रमाणपत्र

फोटो स्रोत, Getty Images

"कुठल्याही आईसाठी हे अपमानास्पद आहे," असं खासदार फ्रँक फिल्ड म्हणाले. कॅरोलिन स्पेलमन यांच्या नेतृत्वाखालील वेगवेगळ्या पक्षांतील काही खासदारांनी एक आंतरपक्षीय दबावगट स्थापन केला आहे. फ्रँक फिल्ड हे या गटातले सदस्य आहेत.

मॅरेज सर्टिफिकेटवर आई-वडील या दोघांच्या नावांचा उल्लेख केला जावा, यासाठी कायद्यात बदल करण्याविषयी विधेयक या गटातर्फे गेल्या वर्षी यूकेच्या पार्लमेंटमध्ये सादर करण्यात आलं.

2014 मध्ये, समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता दिल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनीही यासंदर्भात संकेत दिले होते. "महाराणी व्हिक्टोरियांची कारकीर्द सुरू झाली त्या काळापासून हा कायदा अस्तित्वात आहे," असा उल्लेख त्यांनी भाषणात केला होता.

त्यानंतर 2015 आणि 2016मध्ये या कायद्याच बदल करण्याचे अयशस्वी प्रयत्न झाले. नवीन विधेयकावर पुढील महिन्यात दुसऱ्यांदा सुनावणी होणार आहे.

विकसित देशांतही अजून बायकोचं आडनाव लावणं सर्वमान्य नाही. आपला मुलगा लग्नानंतर त्याच्या पत्नीचं आडनाव लावणार असल्याचं कळल्यावर त्याच्या पालकांनी विवाहाला जाण्यास नकार दिल्याचं एक उदाहरण माझ्या माहितीत आहे. त्यांच्यासाठी आपल्या मुलाचं वर्तन अनाकलनीय होतं. आपला मुलगा हा बायकोच्या हातचं बाहुलं ठरणार, याचा हा जाहीर पुरावा असल्याचं त्यांचं मत होतं.

नेवाडा विद्यापीठातील संशोधक रशेल रॉबनेट यांनी अमेरिका आणि ब्रिटनमधील विविध दाम्पत्यांचा अभ्यास केला. ज्याची पत्नी विवाहानंतरही माहेरचं आडनाव ठेवते अशा स्त्रियांना स्त्रीवादी म्हटलं जातं.

"लोक अशा स्त्रियांना पॅसिव्ह किंवा निष्क्रिय म्हणून पाहतात आणि जाहीरपणे सांगतात, 'ती नेहमी ट्राउझर घालत असणार," रॉबनेट म्हणाल्या. पण काही लोकांनी अशी स्त्री 'व्यवस्थित संगोपन करणारी' आणि 'काळजी घेणारी' असते सकारात्मक विवेचनही दिली आहेत.

दुसरीकडे अशी स्त्री नात्यामध्ये निष्ठा नसलेली पण महत्वाकांक्षी, खंबीर असल्याचं समजलं जातं, असं त्या सांगतात.

कामाच्या ठिकाणी लोक अजूनही लिंगभेदाच्या निकषांवर ठोकताळे बांधत असतात, असं रॉनेट यांचं मत आहे.

जो आपल्या पत्नीचं आडनाव लावतो त्याच्याकडे लोक कसं बघतात? असं विचारल्यावर त्या म्हणतात, "या संशोधनातून पुढे आलेले निष्कर्ष हे अतिशयोक्तीपूर्ण ठरतील, अशी मला खात्री आहे." त्या म्हणाल्या.

तथापि पत्नीचं आडनाव लावणाऱ्या पुरुषांची संख्या वाढते आहे. ब्रिटनमधील ओपिनियम संस्थेनं 2000 लोकांचं सर्वेक्षण केलं होतं. 18 ते 34 वयोगटातील दर दहा तरुणांपैकी एक तरुण जोडीदाराचं नाव लावतो, असं हे संशोधन सांगतं खरं, पण त्यापैकी किती पुरुष आणि किती स्त्रिया हे स्पष्ट झालेलं नाही.

चार्ली मोर्ले हे चार्ली शॉ झाले तो क्षण.

फोटो स्रोत, Millie Robson

फोटो कॅप्शन, चार्ली मोर्ले हे चार्ली शॉ झाले तो क्षण.

तिबेटियन बुद्धीस्ट ध्यानधारणेचे प्रशिक्षण देणारे चार्ली शॉ यांनी गेल्या वर्षी लग्न झाल्यानंतर पत्नीचं आडनाव लावलं. ते म्हणतात, "विवाहानंतर महिला आपल्या पतीचंच आडनाव लावतील अशी धारणाच हास्यास्पद आहे."

"हे एक महान फेमिनिस्ट विधान नव्हतं. पण ते एका निष्ठेचं प्रतीक होतं. आपल्या समाजात छुपा लिंगभेद आहे आणि आपण वेगळ्या पद्धतीनं वागू शकतो हे स्वीकारण्याची संधी मी घेतली," चार्ली म्हणतात.

योगायोगाने, त्यांच्या कुटुंबात हे प्रथमच झालेलं नव्हतं. चार्ली यांचे पणजोबा हे ग्रीक होते आणि त्यांचं आडनाव अस्पिओटीस होतं. लंडन युद्धकाळातील वाद टाळण्यासाठी त्यांनी त्यांचं नाव पत्नी मोर्लेच्या नावावरून ठेवलं. चार्लीसुद्धा व्यवहारात मोर्ले हेच आडनाव वापरत असत.

काही पुरुषांना आपल्या वडिलांचं आडनाव ठेवणं काही कारणामुळं नकोसं वाटतं त्यांच्यासाठी ही आयतीचं संधी आहे.

कैओ आणि जिल
फोटो कॅप्शन, कैओ आणि जिल

"वडिलांचं आडनाव ठेवणं माझ्यासाठी त्रासदायक होतं आणि ते कधीच मला आपलसं वाटलं नाही," असं ब्राझीलमध्ये राहणारा 29 वर्षीय काइओ लँगलोइस सांगतो. गेल्या दहा वर्षांत तो आपल्या वडिलांशी एकदाही बोलला नाही.

कॅनिडियन पत्रकार असलेली काइओची पत्नी जिल म्हणाली, "सात वर्षांपूर्वी लग्न झाल्यावर मी नाव तसंच ठेवण्याचा निर्णय घेतला. काइओनं लग्नापूर्वी असलेलं परेरा हे नाव बदललं आणि लॅंगलोइस ठेवलं."

"विवाहानंतर जिलचं आडनाव स्वीकारणं एक उत्तम संधी वाटली," असं काइओ म्हणतो. "जिल ही फारच स्त्री महिला असून तिच्या नावामुळे केवळ चांगल्याच भावना जागृत होतात."

बीटल्सच्या चाहत्याची बातच न्यारी!

काइओ हा बीटल्सचा फार मोठा चाहता आहे. जॉन लेनन आणि योको ओनो यांनी विवाहानंतर एक-दुसऱ्याचं आडनाव हे मधलं नाव म्हणून वापरण्याचा निर्णय घेतला होता, ही कल्पना त्याला फार आवडली.

दाम्पत्य

फोटो स्रोत, Getty Images

"योकोनं माझ्यासाठी नाव बदललं. मी तिच्यासाठी माझं नाव बदललं. "दोघांसाठी एक, एकमेकांसाठी दोघं." तिच्याजवळ रिंग आहे. माझ्याजवळ रिंग आहे. आमच्या नावांमध्ये नऊ 'O' आहेत. जे भाग्यदायी आहेत. दहा हे भाग्यदायी नसतं," असं लेनननी त्यावेळी म्हटलं होतं.

जिल म्हणते, "पुरुषानं बायकोचं आडनाव लावणं हे ब्राझीलमध्ये पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये रुचलं नसतं असं आम्हाला वाटलं. हे कमकुवतपणाचं लक्षण आहे असं समजलं जाईल हे आम्हाला वाटलं. पण आमच्या मित्र किंवा नातेवाईकांपैकी कुणीही यावर प्रश्नचिन्ह उभं केलं नाही."

"माझं पौरुषत्व हे माझ्या नावात नाही. तुमचं पौरुषत्व हे तुमच्या चारित्र्यावर, व्यक्ती म्हणून तुम्ही कसे आहात यावर आणि इतरांचा आदर तुम्ही कसा करतात यावर अवलंबून असतं," असं काइओ स्पष्ट करतो.

"मी नाव बदलल्याचं कळल्यावर अनेक लोक मला हसतात. त्यांना धक्का बसल्याने ते विचारतात असं का? पण आपण आता 21व्या शतकात आहोत. ही नवीन पिढी आहे. आणि ही पिढी वेगळ्या पद्धतीनं सर्व गोष्टी करते."

पुढे तो सांगतो, "मी माझं नाव बदललं या जाणिवेनंच गहिवरलो. खूप दिवसांपासून एखादी गोष्ट करायची होती आणि ती पूर्ण झाली ही भावना खूप आनंददायी होती. मी सुटकेचा निःश्वास टाकला."

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)