जागतिक विकलांग दिन : परिस्थितीवर केली दीक्षानं मात, आता मलेशियात मांडणार 'सर्वांसाठी शिक्षणा'वर विचार

फोटो स्रोत, Diksha Dinde
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी
बाळ सहा महिन्यांचं झाल्यानंतरही पालथं पडत नव्हतं, रांगत नव्हतं. मग दीक्षाच्या आईला लक्षात आलं, आपली लेक विकलांग आहे.
त्यानंतर तिच्यावर दोनदा शस्त्रक्रिया झाली. पण ती 84 टक्के विकलांग असल्यानं त्यात यश आलं नाही.
गरज होती मोठी शस्त्रक्रिया करण्याची. पण त्यासाठी दीक्षाच्या पालकांकडे तेवढा पैसाही नव्हता. आई शिवणकाम करायची आणि वडील रिक्षा चालवून घरखर्च भागवत होते.
त्यातच 2005 साली वडिलांना अपघात झाला आणि त्यांचं रिक्षा चालवणंही थांबलं. आईनं मात्र येणाऱ्या अडचणींना तोंड देत तिचं शिक्षण सुरू ठेवलं.
परिस्थिती बेताची असली, तरी दीक्षा मात्र आपल्या विकलांगतेपुढं झुकणारी नव्हती. तिला परिस्थितीशी नुसतंच झुंजायचं नव्हतं, तर त्यात बदलही घडवून आणायचा होता.
आणि तो तिनं केला.... स्वत:हून.
बंडाची सुरुवात
पुण्यातल्या एका कॉलेजात दीक्षा पदवीचं शिक्षण घेत होती. कॉलेजकडून शेवटच्या वर्षी अभ्यास दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
पण सुविधेचं कारण सांगून तिला या दौऱ्यातून वगळण्यात आलं. तिच्या मैत्रिणींच्या माध्यमातून शिक्षकांनी तिला ही गोष्ट कळवली.
कुठंही जायचं म्हटलं की आपल्यासोबत नेहमीच असं होतं, असा विचार करून दीक्षानं तिच्या भूतकाळाची उजळणी सुरू केली.
हा प्रसंग घडला त्याच्या मागच्याच वर्षी कॉलेजकडून पाचगणीला एक परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी फी वगैरे भरून दीक्षानं सर्व सोपस्कार पूर्ण केले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता गाडी निघणार होती. पण आदल्या रात्री नऊ वाजता तिला सांगण्यात आलं, "मॅडम, तुम्ही येऊ शकत नाही. कारण आमच्याकडं तुमच्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध नाहीत!"

फोटो स्रोत, Diksha Dinde
यापूर्वीही विकलांगतेमुळे तिला शाळेत प्रवेश नाकारण्यात आला होता. अशा एक ना अनेक गोष्टी तिला आठवत गेल्या.
"आता बस्स! आता आपण शांत नाही राहायचं," असं म्हणत दीक्षानं स्वत:च्या हक्कासाठी आवाज उठवला. तिच्याच शब्दांत सांगायचं झालं तर, तिनं बंड पुकारलं.
तिनं कॉलेज प्रशासनाविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारपत्रात लिहिलं, "जर तुम्ही मला अभ्यास दौऱ्याला नेणार नसाल, तर त्यासाठी भरलेली 1200 रुपये फी मला परत द्या."

फोटो स्रोत, Diksha Dinde
दोन-तीनदा तक्रार केल्यानंतर कॉलेज प्रशासनानं तिच्या आईला बोलावून घेतलं. ते तिच्या आईला म्हणाले, "अशी काय आहे मुलगी तुमची? कॉलेज मॅनेजमेंटच्या विरोधात जाते. काही संस्कार वैगेरे केले की नाही तिच्यावर?"
पण जिद्दीनं पेटलेली दीक्षा मागे हटण्यास तयार नव्हती. शेवटी कॉलेजला माघार घ्यावी लागली.
"मी माझे 1200 रुपये तर परत मिळवलेच, शिवाय कॉलेज प्रशासनाकडून 'सॉरी'ही वदवून घेतलं," दीक्षा अभिमानानं सांगते.
इतकंच नव्हे गेल्या वर्षी मे महिन्यात कॉलेजकडून दीक्षाला 'बेस्ट अल्युमनाय', अर्थात सर्वोत्कृष्ट माजी विद्यार्थीचा पुरस्कारही देण्यात आला.
या प्रसंगातून शिकल्याचं दीक्षा सांगते. "जर तुम्ही स्वत:च्या हक्कांसाठी आवाज उठवू शकत नसाल, तर इतरांसाठी काहीच करू शकत नाही."
समाजाला परत द्यावं म्हणून...
2012 पासून दीक्षा पुण्यातल्या 'रोशनी' संस्थेशी जुळली. 'अॅक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग' म्हणजे कार्यानुभवातून शिक्षण या माध्यमातून प्राथमिक गरजांपासून वंचित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम ही संस्था करते.
तसंच अंध मुलांना परीक्षेच्या काळात रायटर (लेखनिक) पुरवणं आणि लैंगिक समानतेसारख्या विषयांअंतर्गत महिलांना मासिक पाळीविषयी जागरूक करण्याचं कामही या संस्थेच्या उपक्रमांमधून मग दीक्षा करू लागली.

फोटो स्रोत, Diksha Dinde
याशिवाय आता ती सिग्नलवर भीक मागणाऱ्या मुलांसाठी शाळा चालवत आहे. स्वत:मधल्या शिक्षणाप्रतीच्या जिद्दीतून ती इतरांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देत आहे.
जागतिक दखल
दीक्षाच्या कार्याची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने 'वर्ल्ड अॅट स्कूल' या उपक्रमासाठी तिची 'वर्ल्ड युथ एज्युकेशन अंबॅसेडर' किंवा 'जागतिक युवा शिक्षण राजदूत' म्हणून निवड केली आहे.

फोटो स्रोत, Diksha Dinde
"अपंगत्वावर मात करत गेल्या पाच वर्षात दीक्षानं केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे," असं नमूद करत महाराष्ट्र सरकारनेही 2015-16 सालचा 'राज्य युवा पुरस्कार' देऊन तिचा गौरव केला आहे. असे अनेक पुरस्कार तिला आजवर मिळाले आहेत.
6 ते 10 डिसेंबर या कालावधीत मलेशियाची राजधानी क्वालालांपूरमध्ये होणाऱ्या 'एशिया पॅसिफिक फ्युचर लीडर्स इनिशिएटिव्ह' परिषदेसाठी तिची निवड करण्यात आली आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाने आयोजित केलेल्या या परिषदेत Sustainable development, किंवा शाश्वत विकास या संकल्पनेवर चर्चा होणार आहे. आणि दीक्षा या परिषदेत 'सर्वसमावेशक शिक्षण' (Inclusive education) या संकल्पनेवर तिचं मत मांडणार आहे.
"सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे लिंग, अंपगत्व, जात-पात असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न बाळगता सगळ्यांना समान रितीने शिक्षणाची संधी मिळायला हवी," असं दीक्षा सांगते.

फोटो स्रोत, Diksha Dinde
दीक्षाचा आजवरचा प्रवास, कॉलेजमधल्या त्या पहिल्या बंडापासून ते येणाऱ्या क्वालालंपूरच्या परिषदेपर्यंत, थक्क करणारा आहे. पण ती म्हणते, ही फक्त सुरुवात आहे.
सध्या दीक्षा एका मुक्त विद्यापीठातून इतिहास विषयात MA करत आहे. पुढे जाऊन कलेक्टर बनण्याचं तिचं स्वप्न आहे.
"संधी मिळते पण आपण तिथवर पोहोचत नाही. मग त्यासाठी आपण कष्ट घ्यायला हवेत," असं दीक्षा सांगते.
"प्रश्न आहेत म्हणण्यापेक्षा आव्हानं आहेत, असं म्हटलं पाहिजे. कारण आव्हानं म्हटलं की, आपण त्यांच्याशी भिडायचा प्रयत्न करतो. प्रश्न म्हटलं की, आपण नकारात्मकतेकडे ओढले जातो."
आणि या यशस्वी प्रवासात दीक्षानं कधी विकलांगतेला आड येऊ दिलं नाही. ती म्हणते, "It is not a disability, it is a different ability. विकलांगता ही एक क्षमता आहे, जिच्याद्वारे आपण आपण कुठलीही गोष्ट वेगळ्या प्रकारे करू शकतो."
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








