महिलेचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांनी केलं जीवाचं रान

फोटो स्रोत, Omkar/Debi Maity
- Author, प्रवीण कासम
- Role, बीबीसी तेलुगू
प्रसुतीनंतर महिलेला काही दिवस कुणीही स्पर्श करायचा नाही, ही एका आदिवासी समाजातील अंधश्रद्धा एका महिलेच्या जीवावर बेतली होती.
पण एका डॉक्टराने या महिलेला दवाखान्यात पोहचवण्यासाठी जीवाचं रान केल्यानं तिचे प्राण वाचू शकले.
ओडिशात घडलेल्या या घटनेमुळं आदिवासी भागातील आरोग्य सुविधांचा अभाव आणि अंधश्रद्धा हे विषय पुन्हा ऐरणीवर आले आहेत. समयसूचकता दाखवणाऱ्या या डॉक्टरचे कौतुक होत आहे.
ओडिशातील सरिगट्टा गावात रविवारी ही घटना घडली.
ओमकार होटा असं या डॉक्टरचं नाव आहे. होटा इथल्या पप्पुलुरू गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करतात.
ते म्हणाले, "या परिसरातातील स्थानिक पत्रकार देबी मेईटी यांचा मला फोन आला. एक महिला गरोदर असून तिचे प्राण संकटात असल्याचं त्यांनी मला सांगितले. या महिलेच्या प्रसुतीसाठी तातडीनं त्या गावात जाण्याचा निर्णय आम्ही घेतला."
डॉक्टर म्हणाले, "सुभमा मारसे ही 30 वर्षांची महिला सारिगट्टा गावात राहते. चित्रकोंडा ब्लॉकमध्ये हे गाव आहे. हे गाव दुर्गम असून तिथं सार्वजनिक वाहतुकीची कसलीही सुविधा नाही.
प्राथमिक आरोग्य केंद्रापासून या गावाचं अंतर 12 किलोमीटर इतकं आहे. गावात पोहचण्यासाठी नदीनाले, पायवाटा असा खडतर प्रवास करावा लागतो."
या गावात आरोग्यसुविधा नाही. त्यामुळं या महिलेची प्रसुती तिच्या झोपडीतच करावी लागली. या महिलेनं मुलाला जन्म दिला. पण रक्तस्त्राव जास्त होऊ लागल्यानं तिला तातडीनं दवाखान्यात नेणं आवश्यक होतं.

फोटो स्रोत, Omkar/Debi Maity
पण प्रसुती झालेल्या महिलेला स्पर्श करायचा नाही, तसंच या महिलेच्या जवळही जायचं नाही, अशी प्रथा कोंडारेड्डी या आदिवासी समजात असल्यानं या महिलेला दवाखान्यात नेण्यासाठी कुणीचं पुढं येतं नव्हत.
"त्यानंतर इथल्या एका पुरुषाला आम्ही पैसे देऊन आमच्यासह येण्यास तयार केलं. या महिलेचा नवरा, पत्रकार देबी आणि मी या महिलेला दवाखान्यात न्यायचं ठरवलं.
या घरातील खाटेचं स्ट्रेचर बनवलं आणि त्यावरून तिला आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेलो."
या महिलेचं गाव आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील अंतर 12 किलोमीटर आहे. या खाटेला दोर बांधण्यात आले होते.
या दोरांच्या सहायाने ही खाट उचलून हे अंतर पायी चालत ते प्राथमिक आरोग्य केंद्रात आले.
दरम्यान, होटा यांनी या महिलेला सलाईन लावलं होतं. शिवाय वरिष्ठांना ही याची कल्पना त्यांनी दिली होती.
या महिलेची प्रकृती आता चांगली असल्याचं त्यांनी सांगितलं. या महिलेची ही तिसरी प्रसुती आहे. यापूर्वी प्रसुती दरम्यान तिच्या एका अपत्याचं निधन झाल्याची माहिती त्यांनी दिली.
होटा म्हणाले, "हा माओवाद्याचा प्रभावाखाली असलेला परिसर आहे. माझ्याकडे रुग्णवाहिकाही नाही आणि मदतीसाठी नर्सही नाही. पेशंटचे प्राण संकटात असले की, आम्हाला असे प्रयत्न करावे लागतात. आमच्यासाठी यात नवीन काहीच नाही. अशा प्रसंगात मी स्वतःला आधी माणूस समजतो."

फोटो स्रोत, Omkar/Debi Maity
देबी म्हणाले, " या महिलेच्या प्रकृतीची माहिती कळताच मी माझी बाईक घेऊन बाहेर पडलो. नंतर डॉक्टरना घेऊन या महिलेच्या गावी पोहचलो. या महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यासाठी मीही मदत केली."
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू खात्याचे मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्वीट करून या होटा यांचं कौतुक केलं आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








