'योगी सरकारचे खायचे दात वेगळे' : अयोध्या मुद्द्यावर सोशल मीडियावर चर्चा

फोटो स्रोत, Twitter
दिवाळीच्या एक दिवस आधी योगी आदित्यनाथ अयोध्येत पोहोचले. अयोध्येत रामाची भव्य मूर्ती उभारण्याचा आराखडा त्यांच्या सरकारने मांडला आणि या त्यावर चर्चा सुरू झाली.
त्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने वाचकांना विचारलं होतं की, योगी सरकार दिवाळीच्या निमित्ताने अयोध्येचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणत आहेत का? अनेक वाचकांनी त्यांची मतं व्यक्त केली आहेत. त्यापैकी ही काही प्रातिनिधिक मतं.
दिनकर पाटील म्हणतात की, "योगी सरकार सर्वधर्म समभाव मानणारे आहोत असं दाखवत असले तरी ते त्यांचे खायचे दात नाहीत."
मनोज बेंद्रे म्हणतात की, हो! दुर्दैवाने खरं आहे. योगी सरकार दिवाळीच्या निमित्ताने अयोध्येचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणत आहे.

फोटो स्रोत, Facebook
संतोष लोळगे म्हणतात की, "निवडणुका आल्या की राममंदिर आणि तत्सम मुद्दे प्रचारात आणणे ही जुनी मोडस ऑपरेंडी आहे."
"ज्या उत्तर प्रदेशात शेकडो बालकं प्राणवायू आणि वैद्यकीय उपचाराअभावी दगावले तिथे असे खर्चिक सोहळे म्हणजे विकास का?", संतोष लोळगे विचारतात.

फोटो स्रोत, Facebook
योगी सरकारने मंदिराऐवजी बेरोजगारी कमी करण्यावर भर दिला पाहिजे, असं शैलेंद्र पवार म्हणतात.
सुधीर तुपेंनी मत मांडलं आहे की, "सत्ता हातातून जाईल या भितीने सरकार असं करत आहे."

फोटो स्रोत, Facebook
विनोद गोरे म्हणतात की, निदान सणोत्सवाच्या काळात राजकारणी मुद्दे नकोत. तर संदीप गांगुर्डे म्हणतात की, भाजप सरकारला धर्म महत्त्वाचा झाला आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








