वीज पुरवठा कमी करण्याची तेलंगणाच्या शेतकऱ्यांची मागणी

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अंजय्या
- Role, बीबीसी प्रतिनिधी
तेलंगणा सरकार शेतीसाठी 24 तास वीज पुरवण्याचा प्रयत्न करत असताना इथल्या शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे वीज पुरवठा कमी करण्याची मागणी केली आहे.
सरकारने 24 तास वीज पुरवली तर शेतात जास्त पाणी वापरलं जाईल, आणि त्यामुळं भूजल पातळी खालावेल, अशी शेतकऱ्यांना भीती आहे.
सिरिसिला जिल्ह्यातल्या गोरांताळा येथील शेतकऱ्यांनी नऊ तास वीज मिळावी असा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माहिती आणि तंत्रज्ञान व पंचायत राज्य मंत्री के. तारका रामा राव यांना पत्रंही पाठवली आहेत.
"आमच्या गावात पाण्याचे खूप कमी स्रोत उपलब्ध आहेत. शेतीसाठी आम्ही पूर्णत: बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून असतो. असं असताना जर सरकार 24 तास वीज पुरवणार असेल तर मोटार जमिनीखालचं पाणी जलदगतीनं ओढून घेईल आणि त्यामुळं बोअर कोरडे पडतील. आणि शेतीसाठी हे धोक्याचे आहे," असं येराम अंजीरेड्डी या स्थानिक शेतकऱ्यानं बीबीसीला सांगितलं.

"नऊ तास वीज मिळावी या मागणीची पत्रं आम्ही मंत्र्यांना पाठवली आहे," असं त्यांनी पुढे सांगितलं.
पण स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते सध्यातरी ते 24 तास वीज पुरवठा करणार आहेत. नंतर त्यात तूट करण्यात येईल.
शेतकऱ्यांची मागणी काय?
अन्नेपारती गावच्या सरपंच वाय. पुष्पलता यांनी बीबीसीला सांगितलं की, "सरकारने 24 तास वीज पुरवली तर त्यामुळं भूजल पातळी खालावेल. त्यामुळंच आम्ही फक्त नऊ तासांसाठी वीजेची मागणी करत आहोत."
नालगोंडा जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी शेतीसाठी बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून आहेत. बोअरला पाणी न लागल्यास त्यांतले अनेक जणांची अडचण होते.
यावर्षी झालेल्या पुरेशा पावसामुळं नालगोंडा जिल्ह्यातील पाण्याची पातळी बरीच वर आली आहे. पण अखंडित वीजपुरवठ्यामुळं पाण्याचा उपसा जास्त होण्याची भीती तेथील शेतकऱ्यांना आहे.
''नऊ तास वीज मिळावी या मागणीचे पत्र आम्ही उच्च अधिकाऱ्यांना दिले असून ते बारा तासापर्यंत वीज पुरवण्याचा विचार करत असल्याचं,'' अप्पाजीपेट गावातील शेतकरी सतिश यांनी बीबीसीला सांगितलं.

मग मोटर बंद का नाही करत?
शेतीसाठी तेलंगणातील शेतकरी मुख्यत्वे बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून असतात. तसंच नालगोंडा जिल्ह्यातही तीन लाख बोअरवेल घेतलेले आहेत.
"राज्य सरकारने मेडक, नालगोंडा आणि करीमनगर या तीन जिल्ह्यांत प्रायोगिक तत्त्वावर 24 तास वीज पुरवठा सुरू केला आहे. पुढच्या रबी हंगामापर्यंत राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये याचं अवलंबन करण्याचा सरकारचा मानस आहे," असं वीज विभागाचे आयुक्त नीलम जानय्या यांनी सांगितलं.
शेतकऱ्यांच्या या मागणीवर शासनाकडून अजूनतरी अधिकृतरित्या काहीही जाहीर करण्यात आलेलं नाही. पण स्थानिक अधिकारी नऊ ते बारा तास वीज पुरवठा करणार आहेत.
ज्यांना 24 तास वीज नको आहे त्यांनी त्यांच्या मोटारी बंद करायला हव्यात आणि त्याऐवजी पूर्वी वापरत असलेल्या स्वयंचलित स्टार्टरचा वापर करायला हवा.
पण शेतकऱ्यांमध्ये भीती आहे की, मोटारीचा वापर थांबवल्यास पाणी इतर शेतकऱ्यांच्या विहिरीत जाईल. याच कारणामुळं शेतकरी बोअरवेलचा वापर थांबवायला तयार नाहीत.
सध्या सरकार दोन फेजमध्ये 12 तासांचा वीजपुरवठा करत आहे, सहा तास सकाळी आणि सहा तास रात्री. त्यामुळं सरकारनं दिवसाच 12 तास वीज पुरवावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








