सेक्ससाठी मी 'हो' म्हटलं का? - ब्लॉग

फोटो स्रोत, INDRANIL MUKHERJEE/Getty images
- Author, दिव्या आर्य
- Role, बीबीसी दिल्ली
एखाद्या पुरुषाला स्त्रीबरोबर शारीरिक जवळीक साधायची असल्यास, "तुला माझ्यासोबत सेक्स करायला आवडेल का?" असं तो विचारतो का?आणि स्त्रिया या प्रश्नाला हो किंवा नाही असं उत्तर देतात का?
मला असं वाटतं की या दोन्ही प्रश्नाचं उत्तर 'नाही' असं आहे.
नाही ना. पुरुष इतकं थेट विचारत नाही आणि स्त्रियासुद्धा इतकं स्पष्टपणे उत्तर देत नाही.
पण आपण ते समजून घेतो... नाही का?
आपण समजून घ्यायलाच हवं. कारण कायद्य़ाप्रमाणे संमतीशिवाय सेक्स हा बलात्कार समजला जातो.
म्हणजे आपण मित्र असलो आणि सांगितलं की, मला तुझ्याबरोबर सेक्स करायचा नाही आणि तरीसुद्धा बळजबरी केली तर तो बलात्कार ठरतो.
पण हे सगळं स्पष्ट बोललं गेलं नाही तर संशयाचं धुकं तयार होतं जसं भारतीय फिल्ममेकर महमूद फारुखी च्या बाबतीत झालं आहे.
एका अमेरिकन रिसर्च स्कॉलरनं फारूखी यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या खटल्यात दिल्ली उच्च न्यायालयाला या स्कॉलरनं कुठेही स्पष्ट नकार दिल्याचं आढळलं नाही.
कोर्टाच्या निर्णयात असं म्हटलं आहे की जेव्हा फारूखी यांनी जेव्हा जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या स्कॉलरनं स्पष्ट नकार दिला नाही आणि फारुखी यांना देखील 'तो' इशारा समजला नाही.
तेव्हा संशयाचा फायदा देऊन कोर्टानं फारुखी यांची मुक्तता केली. तसंच उच्च न्यायालयानं सत्र न्यायालयाच्या सात वर्षाच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.

फोटो स्रोत, PAL PILLAI/AFP
त्यामुळे जेव्हा दोन व्यक्ती जवळ येतात तेव्हा होकार म्हणजे नक्की काय हे कसं समजायचं?
त्यामुळे खोलीचं दार बंद होताच यो छोट्या गोष्टी लुप्त होतात.
सेक्स करायला सगळ्यांनाच आवडतं पण त्याच्याविषयी बोलतांना सगळ्यांना अवघडल्यासारखं होतं.
एका व्हीडिओत हे अवघडलेपण दूर करण्यासाठी सेक्स या शब्दाऐवजी चहा शब्द वापरला आणि तोच प्रश्न विचारला, "तुला चहा हवा का?"
या व्हीडिओत असंही दाखवलं आहे की, जेव्हा एखाद्याला चहा विचारता आणि समोरचा नकार देतो तेव्हा त्यांना चहा पिण्यासाठी बळजबरी करू शकत नाही.
असंही होऊ शकतं की ते आधी हो म्हणतील पण नंतर नकार देऊ शकतात तरीसुद्धा त्यांच्यावर बळजबरी करू नये.
जर तुम्ही शुद्धीत नसाल किंवा चहा घ्यायला संमती दिल्यावरसुद्धा कोणी बेशुद्ध झालं तर त्यांना अजिबात जबरदस्ती करू नये.
आणि त्यांना मागच्या आठवड्यात किंवा अगदी काल रात्री हवा असेल पण आज नको असेल तर त्यांना प्यायला जबरदस्ती करू नये.

फोटो स्रोत, Getty Images
थोडक्यात काय तर संमती सगळ्यांत महत्त्वाची असते.
आता तुम्हाला वाटेल की चहासाठी हो किंवा नाही म्हणणं शरीरसंबंधासाठी संमती देण्यापेक्षा सोपं असतं.
पण सेक्स किंवा चहा या दोन्हीबाबत विचारतांना इच्छा व्यक्त करणं, ती ऐकणं आणि मग 'संमती देणं' हे एकच तत्त्व चिरकाल आहे.
तुम्ही ज्या स्त्रीसोबत बेडरुममध्ये आहात ती तुम्हांला नजरेनं थोपवते आहे का? हातानं दूर करते आहे का? किंवा अगदी स्पष्टपणे थांबायला सांगते आहे का?
ती काही खुणावते आहे का? तुम्ही तिला ऐकता आहात का? बघता आहात का? आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला खरंच हवं आहे का?
आपल्या माध्यमांमध्ये बलात्कार म्हणजे अनोळखी माणसांनी केलेला अत्याचार समजला जातो.
पुरुष आपल्या ताकदीनं स्त्रीला दाबून ठेवतो. ती जोरजोरात मदतीसाठी याचना करते, की हे तिला नको आहे. याचाच अर्थ असा आहे की तिची संमती नाही आणि हा बलात्कार आहे.
पण हा पुरूष कुणी ओळखीचा, प्रेमी किंवा नवरा असला तर?
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार गेल्या दोन दशकात 97 टक्के बलात्काराच्या प्रकरणात पुरुष आणि स्त्रीची आधीच ओळख होती.
मोहम्मद फारुखी प्रकरणात असा निर्णय दिला आहे की, जेव्हा पुरूष आणि स्त्री एकमेकांना ओळखतात,ते शैक्षणिकदृष्ट्या आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम असतील आणि पूर्वी त्यांच्यात शारीरिक संबंध असतील तेव्हा स्त्रीकडून पुसट नकार म्हणजे होकार असतो.
हे ऐकल्यासारखं वाटतं नं? तुमच्या ओळखीच्या लोकांबरोबरसुद्धा हे झालं आहे का? किंवा तुमच्याबरोबरसुद्धा?
सुशिक्षित लोक ओळखीच्या लोकांबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यास उत्सूक असतात.
पण समोरच्या व्यक्तीला 'हे' हवं आहे की नाही हे ओळखणं किती कठीण आहे?
त्या अमेरिकन स्कॉलरनं आपल्या मित्रमैत्रिणींना सांगितलं की, "माझं शरीर आणि माझी लैंगिकता याच्यावर माझी मालकी होती. पण त्या रात्रीनंतर मी ती गमावली."
एखादी स्त्री काही सूचना देत असेल तर त्या कशा बघाव्या, त्या कशा ओळखाव्या आणि स्वीकाराव्यात?
आणि जर पुसट नकार असेल तर ती संमती आहे का? याबाबत आणखी काही ओळखण्याचे प्रयत्न करावेत का?
एकमेकांसाठी एवढं तर आपण नक्कीच करू शकतो, नाही का?
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








