इंटरमिटंट फास्टिंग करणं धोकादायक ठरू शकतं, असं तज्ज्ञ का म्हणतायेत?

इंटरमिटंट फास्टिंग

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, सौतिक बिस्वास
    • Role, बीबीसी न्यूज

इंटरमिटंट फास्टिंग हा डाएट किंवा आहाराच्या बाबतीतील या दशकातील सर्वाधिक चर्चेत असलेला ट्रेंड बनला आहे. या प्रकारच्या फास्टिंग किंवा उपवासात कॅलरी किंवा कार्बोहायड्रेटच्या प्रमाणावर लक्ष ठेवण्याची चिंता नसते.

इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे रात्रीचं जेवण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी नाश्ता किंवा जेवण करण्यादरम्यानचा कालावधी. हा कालावधी जितका अधिक तितका तो चांगला असं मानलं जातं.

या फास्टिंगमध्ये जेवणाची वेळ निश्चित करण्याची आवश्यकता असते. यात तुम्ही काय खात आहात यावर लक्ष देण्याची आवश्यकता नसते. टेक इंडस्ट्रीशी संबंधित अनेकजण याप्रकारचा डाएट किंवा आहार पद्धती अंमलात आणतात.

तसंच हॉलीवूडमधील अनेक स्टार्सदेखील म्हणतात की यामुळे ते फिट राहतात.

ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषि सुनकदेखील एकदा म्हणाले होते की ते आठवड्याची सुरुवात 36 तासांचा उपवास करून करतात.

आतापर्यंत विज्ञानानं याप्रकारच्या फास्टिंग किंवा उपवासाला पाठिंबा दिला आहे.

आतापर्यंतच्या संशोधनातून असं दिसून आलं आहे की रात्री जेवल्यापासून ते दुसऱ्या दिवशी काहीही खाईपर्यंतचा कालावधी वाढवल्यानं म्हणजेच या रात्रभरच्या उपवासाचा कालावधी वाढवल्यानं चयापचय (मेटाबोलिझम) सुधारू शकतं.

उपवासामुळे पेशी दुरुस्त होण्यास मदत होते. तसंच यामुळे माणसाचं वय वाढवण्याची प्रक्रिया मंदावू शकते, म्हणजेच त्याचा वेग कमी होऊ शकतो.

अर्थात आहारतज्ज्ञ बऱ्याच काळापासून असा इशारा देत आहेत की निरोगी राहण्यासाठी भोजन किंवा अन्न सोडल्यामुळे कोणतीही जादू होऊ शकत नाही.

तज्ज्ञ असंही म्हणत आले आहेत की आधीपासूनच आजार असलेल्या लोकांनी अशाप्रकारे उपवास करणं धोकादायक ठरू शकतं.

नव्या अभ्यासातून काय समोर आलं?

इंटरमिटंट फास्टिंगमध्ये रोजचा जेवणाचा कालावधी एका छोट्या कालावधीत मर्यादित केला जातो.

इंटरमिटंट फास्टिंग करणारे लोक दिवसाच्या 24 तासातील 8 तासाच्या कालावधीत जेवण करतात, तर उर्वरित 16 तास उपवास करतात म्हणजेच काहीही खात नाहीत.

याव्यतिरिक्त टाइम-रिस्ट्रिक्टेड डाएटचे इतरही मॉडेल आहेत. यातील एक मॉडेल म्हणजे आठवड्यातील दोन दिवस कमी खायचं आणि पाच दिवस नॉर्मल म्हणजे नेहमीप्रमाणे जेवायचं. यादरम्यान वेळेची मर्यादा नसते. म्हणजेच तुम्ही कोणत्या वेळेस जेवावं आणि किती वेळ खाऊ नये याचं बंधन नसतं.

मात्र आता एका अभ्यासात याबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या मुद्द्याबाबतचं हे एकप्रकारचे पहिलंच मोठं संशोधन आहे.

या अभ्यासात 19 हजारांहून अधिक वयस्क व्यक्तींच्या आकडेवारीचं विश्लेषण करण्यात आलं.

टाइम-रिस्ट्रिक्टेड डाएटचे अनेक मॉडेल आहेत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, टाइम-रिस्ट्रिक्टेड डाएटचे अनेक मॉडेल आहेत
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

संशोधकांना आढळून आलं की दररोज 12 ते 14 तासांच्या कालावधीत जेवण करणाऱ्या लोकांपेक्षा आठ तासांच्या कालावधीत जेवण करणाऱ्या लोकांमध्ये कार्डिओव्हास्क्युलार म्हणजे ह्रदय आणि त्याच्याशी निगडीत आजारांमुळे मृत्यू होण्याचा धोका, 135 टक्के अधिक असतो.

कार्डिओव्हास्क्युलर धोका वाढण्याचा अर्थ आहे की एखाद्या व्यक्तीचं आरोग्य, जीवनशैली आणि वैद्यकीय माहितीच्या आधारे त्याला ह्रदयाशी निगडीत आजार, उदाहरणार्थ ह्रदयविकाराचा झटका येण्याचा धोका इतर लोकांच्या तुलनेत खूप अधिक असतो.

अर्थात अभ्यासातून असंदेखील आढळलं की एकूण मृत्यूदराशी (कोणत्याही कारणानं होणारे मृत्यू) इंटरमिटंट फास्टिंगचा कोणताही ठोस संबंध नव्हता.

मात्र यामुळे ह्रदयाशी संबंधित आजारांमुळे मृत्यू होण्याचा धोका कोणतंही वय, लिंग आणि जीवनशैलीच्या लोकांमध्ये सातत्यानं होता.

दुसऱ्या शब्दात सांगायचं तर, संशोधकांना आढळलं की छोट्या कालावधीत जेवण करणं आणि एकूण मृत्यूदर यामध्ये खूप ठोस स्वरुपाचा संबंध नव्हता. मात्र ह्रदय आणि त्याच्याशी निगडीत आजारांनी मृत्यू होण्याचा धोका खूपच वाढलेला होता.

या अभ्यासातून याचं कारण आणि परिणाम सिद्ध होत नाहीत. मात्र हे निष्कर्ष याप्रकारच्या फास्टिंगला पूर्णपणे सुरक्षित आणि आरोग्यादायी मानणाऱ्या विचारांना आव्हान देण्यासाठी महत्त्वाचे आहेत.

धू्म्रपान करणारे आणि मधुमेह असणाऱ्यांना अधिक धोका

संशोधकांनी यासाठी आठ वर्षे अमेरिकेतील वयस्क लोकांचा रेकॉर्ड ठेवलं. त्यांच्या जेवणाच्या सवयी जाणून घेण्यासाठी संशोधकांनी यात सहभागी झालेल्या लोकांना दोन वेगवेगळ्या दिवशी (जवळपास दोन आठवड्यांनंतर) त्यांनी काय काय खाल्लं हे आठवण्यास सांगितलं.

या 'डाएटरी रिकॉल्स'च्या आधारे वैज्ञानिकांनी प्रत्येक व्यक्तीचा भोजनामधील सरासरी कालावधी काढला आणि त्याला या लोकांच्या प्रदीर्घ काळाच्या रुटीनप्रमाणेच मानलं.

या अभ्यासानुसार, 12-14 तासांच्या आत जेवणाऱ्यांच्या तुलनेत जे लोक दररोज 8 तासांच्या आत जेवायचे, त्यांना ह्रदय आणि त्याच्याशी निगडीत आजारांनी मृत्यू होण्याचा अधिक धोका होता.

संशोधकांना असं आढळलं की सर्व सामाजिक आणि आर्थिक वर्गाशी निगडीत गटांमध्ये कार्डियोव्हास्क्युलर धोका वाढलेला होता. धूम्रपान करणारे आणि मधुमेह किंवा आधीपासूनच ह्रदयाच्या आजारानं ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये हा धोका सर्वाधिक होता.

याचा अर्थ असा आहे की अशा लोकांनी दीर्घकाळ कडक बंधनांसह जेवणाचा कालावधी कमी ठेवण्याची पद्धत अवलंबताना विशेष सावधगिरी बाळगली पाहिजे.

इंटरमिटंट फास्टिंगचा अवलंब करण्याबाबत तज्ज्ञांनी लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इंटरमिटंट फास्टिंगचा अवलंब करण्याबाबत तज्ज्ञांनी लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे

संशोधकांच्या लक्षात आलं की जेवणाचा दर्जा, प्रमाण आणि स्नॅक्स घेण्याची पुनरावृत्ती आणि रोजच्या जीवनशैलीतील इतर बदल केल्यानंतर देखील हा संबंध कायम होता.

आम्ही जेव्हा संशोधकांना विचारलं की ह्रदयाच्या आजारांनी मृत्यू होण्याचा धोका इतका अधिक का दिसला. प्रत्यक्षात एकूण मृत्यूदराची आकडेवारी इतकी स्पष्ट नव्हती. हा जीवशास्त्राचा परिणाम आहे की आकडेवारीबद्दल काही पूर्वग्रह आहे?

'डायबिटीज अँड मेटाबॉलिक सिंड्रोम: क्लिनिकल रिसर्च अँड रिव्ह्यूज' या जर्नलमध्ये छापून आलेल्या पीयर रिव्ह्यूड स्टडीचे प्रमुख लेखक व्हिक्टर वेन्जे झोंग म्हणाले की मधुमेह आणि ह्रदयविकार होण्यामागच्या सर्वात महत्त्वाच्या कारणांपैकी एक म्हणजे आहार. त्यामुळे ह्रदयविकारांमुळे अधिक मृत्यू होण्याचा संबंध आश्चर्यकारक नाही.

सर्वसामान्य मताच्या उलट आहेत अभ्यासाचे निष्कर्ष

प्राध्यापक झोंग, चीनच्या शांघाय जियाओ टोंग युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये एपिडेमियोलॉजिस्ट (रोग का पसरतात, त्यामागची कारणं काय याचा अभ्यास करणारे तज्ज्ञ) आहेत.

ते म्हणतात, "अनेक वर्षे आठ तासांच्या कालावधीत जेवण करण्याच्या सवयीचा संबंध ह्रदयविकारानं मृत्यू होण्याच्या वाढलेल्या धोक्याशी होता, ही अनपेक्षित बाब समोर आली."

सर्वसामान्य मत असं आहे की याप्रकारचे कमी कालावधीत दिवसभराचं जेवण घेतल्यामुळे ह्रदयाचं आरोग्य आणि चयापचयाची क्रिया सुधारते. काही छोट्या अभ्यासांनीदेखील याला पाठिंबा दिला होता. मात्र हा नवा निष्कर्ष या मताच्या उलट आहे.

याच जर्नलमध्ये छापलेल्या एका संपादकीयामध्ये प्रमुख एंडोक्रायनोलॉजिस्ट डॉक्टर अनुप मिश्रा यांनी इंटरमिटंट फास्टिंगचे फायदे आणि तोटे या दोन्हींची मांडणी केली.

त्यांचं म्हणणं आहे की अनेक चाचण्या आणि विश्लेषण याप्रकारच्या डाएटची सकारात्मक बाजू दाखवतात. यामुळे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते, इन्सुलिन सेन्सिटिविटी सुधारू शकते, रक्तदाब कमी होऊ शकतो आणि लिपिड प्रोफाईल चांगलं होऊ शकतं.

त्यांचं म्हणणं आहे की यामुळे अँटी-इन्फ्लेमेटरी फायदे होत असल्याचेही काही पुरावे मिळाले आहेत.

इंटरमिटंट फास्टिंगवरील नवा अभ्यास जुन्या धारणांना आव्हान देतो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इंटरमिटंट फास्टिंगवरील नवा अभ्यास जुन्या धारणांना आव्हान देतो

अतिशय शिस्तबद्धपणे कॅलरी मोजल्याशिवायदेखील रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यासाठी देखील याप्रकारच्या डाएटमुळे मदत होऊ शकते. उपवासाच्या धार्मिक किंवा सांस्कृतिक प्रथा यांच्यादेखील हे सहजपणे जुळू शकतं आणि ते अंमलात आणणंदेखील सोपं आहे.

प्राध्यापक मिश्रा म्हणतात, "मात्र यामुळे होणाऱ्या संभाव्य अपायांमध्ये, शरीरात पोषक घटकांची कमतरता होणं, कोलेस्ट्रॉल वाढणं, खूप जास्त भूक लागणं, चिडचिडं होणं, डोकेदुखी होणं आणि असा डाएट प्रदीर्घ काळ अंमलात आणतानाच्या अडचणी या गोष्टींचा समावेश आहे."

त्यांच्या मते, "मधुमेहींच्या रक्तातील साखरेवर लक्ष देण्यात आलं नाही, तर उपवासामुळे त्यांच्या रक्तातील साखर धोकादायकरित्या खाली येऊ शकते. यामुळे जंक फूड खाण्यास चालना मिळू शकते. वृद्ध किंवा दीर्घ काळापासून आजारी असलेल्या लोकांना अशक्तपणा येऊ शकतो. तसंच स्नायूंवर परिणाम होऊ शकतो."

कोणत्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे?

इंटरमिटंट फास्टिंगवर टीका होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.

2020 मध्ये जेएएमए इंटरनॅशनल मेडिसिनमध्ये छापून आलेल्या एका तीन महिन्यांच्या अभ्यासात म्हटलं होतं की यामुळे अभ्यासात सहभागी झालेल्या लोकांचं फार थोडं वजन कमी झालं. यामध्ये बहुतांश प्रमाण स्नायूंचं होतं.

आणखी एका अभ्यासातून समोर आलं होतं की इंटरमिटंट फास्टिंगमुळे अशक्तपणा, भूक, पाण्याची कमतरता, डोकेदुखी आणि एकाग्रता होण्यात अडचण यासारखे वाईट परिणाम होऊ शकतात.

प्राध्यापक मिश्रा म्हणतात की नव्या अभ्यासातून ह्रदय आणि त्याच्याशी संबंधित आजारांबाबत चिंताजनक इशारे समोर आले आहेत.

कोणत्याही प्रकारचा उपवास डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली स्वत:च्या आरोग्यानुसार केला पाहिजे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोणत्याही प्रकारचा उपवास डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली स्वत:च्या आरोग्यानुसार केला पाहिजे

प्राध्यापक झोंग यांना विचारण्यात आलं की ह्रदयविकार किंवा मधुमेह असणाऱ्या लोकांनी इंटरमिटंट फास्टिंग करताना काय सावधगिरी बाळगली पाहिजे?

त्यांचं म्हणणं आहे की आहाराविषयीचा सल्ला 'वैयक्तिक' स्वरुपाचा असला पाहिजे. तो त्या व्यक्तीचं आरोग्य आणि नव्या पुराव्यांच्या आधारे असला पाहिजे, याकडे नवे निष्कर्ष लक्ष वेधतात.

ते पुढे म्हणतात की "आतापर्यंत समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे, लोक केव्हा खातात यापेक्षा लोक काय खातात हे जास्त महत्त्वाचं आहे. ह्रदयविकार टाळण्यासाठी किंवा दीर्घायुष्यासाठी लोकांनी किमान दीर्घ काळ आठ तासांच्या ईटिंग विंडोला अंमलात आणणं टाळलं पाहिजे."

या अभ्यासाचा संदेश हाच आहे की उपवास पूर्णपणे सोडण्याची आवश्यकता नाही. उलट त्यात व्यक्तीच्या गरजेनुसार बदल करण्याची आवश्यकता आहे.

सध्यातरी, सर्वात चांगला पर्याय हाच असेल की लोकांनी घड्याळाकडे कमी आणि आपल्या ताटाकडे अधिक लक्ष द्यावं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)