सर्दी, ताप आणि कोरोना यामधील फरक काय? जाणून घ्या लक्षणं आणि घरगुती उपाय

फोटो स्रोत, Getty Images
- Author, डॉ. ऑस्कर ड्यूक
- Role, बीबीसी न्यूज
सर्दी झाल्यावर खोकला येणं, तोंडातून अस्पष्टसा आवाज येणं, घसा खवखवणं किंवा घशाला सूज येणं या गोष्टींचा अनुभव तुम्हीदेखी घेतला असेल.
ताप येणं किंवा फ्लू होणं, सर्दी होणं यासारखे विषाणूंमुळे होणारे आजार वर्षभर होत असतात. मात्र ते बहुतांश हिवाळ्यात होतात.
मात्र ती फक्त सर्दी नाही, त्यापेक्षा जास्त काहीतरी आहे हे तुम्हाला कसं कळू शकेल आणि तुम्ही सर्वात गंभीर स्थिती कशी टाळू शकाल?
डॉ. ऑस्कर ड्यूक हे डॉक्टर असण्याबरोबरच नियमितपणे टीव्हीवर कार्यक्रम सादर करत असतात. यात बीबीसीच्या मॉर्निगं लाईव्हचाही समावेश आहे. यासंदर्भात त्यांनी त्यांच्या सर्वोत्तम टिप्स सांगितल्या आहेत.
थंड हवामानामुळे सर्दी होते का?
थंड हवामानाचा आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर किती परिणाम होतो याबद्दलचं संशोधन अद्याप अस्पष्ट स्वरूपाचं आहे.
अतिशय थंड तापमानात, आपण सामान्यपणे उबदार, आरामदायी, घराच्या आतल्या भागाकडे धाव घेतो.
हे वातावरण विषाणूंसाठी योग्य किंवा पोषक असतं.

फोटो स्रोत, Getty Images
युकेसारख्या काही देशांमध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर लहान मुलं शाळेत पुन्हा एकत्र जमतात तेव्हादेखील असंच होतं.
त्यावेळेस शाळा आणि नर्सरी एखाद्या पेट्री डिशसारखे म्हणजे सुक्ष्मजीव संवर्धनासाठी प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या बशीसारख्या असू शकतात. ज्यात असंख्य विषाणू फिरत असतात. त्यातून हे विषाणू किंवा जंतू या मुलांसोबत त्यांच्या घरी जाण्याची शक्यता असते.
हीच गोष्ट विद्यापीठातील नवीन विद्यार्थ्यांच्या बाबतीत देखील लागू होते. तिथे तरुण एकत्र येतात, एकमेकांसोबत मिसळतात. त्यातून हे विषाणू पसरतात. तसंच जास्त मद्यपान केल्यामुळे आणि खूप जास्त पार्टी केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती आणखी कमकुवत होते.
ती सामान्य सर्दी असते, ताप असतो की कोरोना?
सर्दी, ताप आणि कोरोनासारख्या गंभीर विषाणूंच्या संसर्गाची बरीचशी लक्षणं सारखीच असतात.
मात्र अशी काही चिन्हं असतात, जी नेमका आजार ओळखण्यात उपयुक्त ठरू शकतात.
- जर सर्दी होणार असेल, तरी ती बऱ्याचवेळा हळूहळू होते.
- त्यामुळे तुमच्या नाकावर आणि घशावर परिणाम होतो. तर काहींना तोंडाच्या मागील बाजूस खवखवतं.
- कानात दाब वाढवणं किंवा दडे बसल्यासारखं होणं, ही त्याचं आणखी एक सुरुवातीचं लक्षण असू शकतं.
- जर विषाणू अधिक पसरला, तर तो संसर्ग तुमच्या फुफ्फुसापर्यंत पोहोचू शकतो आणि त्यामुळे अतिशय त्रासदायक असा खोकला होऊ शकतो.
मात्र बहुतांशवेळा या लक्षणांमुळे आपलं रोजचं सामान्य पद्धतीनं चालणारं आयुष्य थांबत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
फ्लू किंवा तापाबद्दल असंच म्हणता येणार नाही. त्यात सर्वसाधारणपणे अंगदुखी, ताप आणि स्नायूंमधील कमकुवतपणा जाणवतो.
फ्लू किंवा तापाचा अर्थ असा नाही की तुम्हाला अंधरुणातच झोपून राहावं लागेल. मात्र तापामुळे तुम्हाला तसं वाटू शकतं.

फोटो स्रोत, Getty Images
कोरोनाच्या संकटापासून या गोष्टी आणखी गुंतागुंतीच्या झाल्या आहेत. कारण त्याची लक्षणं फ्लू किंवा तापासारखी आहेत.
मात्र कोरोनाचं विशिष्ट लक्षण म्हणजे चव किंवा वासाची संवेदना कमी होणं. या हिवाळ्यात स्ट्रॅटस आणि निंबस या कोरोनाच्या नवीन प्रकारांचा संसर्ग वाढल्यानं अगदी तीक्ष्ण स्वरुपाचा किंवा अगदी टोचल्याप्रमाणे घसा खवखवतो. त्यामध्ये अतिसार होणं हीदेखील सामान्य बाब आहे.
यातही पुन्हा घरीच राहण्याचा, विश्रांती घेण्याचा आणि त्यातून बरा होण्याचा सल्ला दिला जातो.
मात्र जर तुम्हाला ही लक्षणं जाणवत असतील, श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा ही लक्षणं तीन आठवड्यांनंतरदेखील कमी होत नसतील, तर तुम्ही वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे.
मी स्वत:च बरा होऊ शकतो का?
आपलं शरीर नैसर्गिकरित्या विषाणू आणि संसर्गाशी लढतं. मात्र आपण योग्य औषधं घेऊन आजारातून बरं होण्यास मदत करू शकतो.
पॅरासिटामॉल: जर तुम्हाला ते घेण्यात अडचण नसेल, तर पॅरासिटामॉल किंवा आयब्रुप्रोफेन हे पहिलं पाऊल आहे. या औषधांमुळे ताप कमी होण्यास आणि अंगदुखी किंवा इतर वेदना कमी होण्यास खरोखरंच मदत होते.
मात्र लक्षात ठेवा खूप जास्त खोकला आणि सर्दीच्या मिश्रणात पॅरासिटामॉलचे अंश असतात. त्यामुळे ते चुकूनही जास्त प्रमाणात घेतलं जाणार नाही, याची खातरजमा करा.
व्हिटामिन सी: सर्दीपासून बचावासाठी हे उपयुक्त असतं असं मानलं जातं. मात्र असं होतं यासाठीचे खूप पुरावे नाहीत. तुम्हाला अगदीच कमतरता नसेल, निरोगी, संतुलित आहारावर लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे.
व्हिटामिन डी: युकेसारख्या ज्या देशांमध्ये हिवाळ्यात दिवस लहान होतो किंवा सूर्यप्रकाश कमी वेळ असतो, तिथे व्हिटामिन डीच्या सप्लिमेंट घेण्याचा सल्ला दिला जातो.
डिकाँजेस्टंट स्प्रे: ते खरोखरंच चांगले असतात आणि लगेचच आराम देतात. मात्र या स्प्रेचा अधिक वापर केल्यामुळे पुन्हा कफ आणखी जमा होऊ शकतो. जेव्हा तुमच्या नाकाला सवय होते आणि ते सुजतं, त्यातून ही समस्या होऊ शकते. त्यामुळे चार किंवा पाच दिवसांहून अधिक काळ ते न वापरण्याचा सल्ला मी देतो.
चिकन सूप: हे सूप थेट विषाणूंशी लढा देतं याचे फारसे पुरावे नाहीत. मात्र यातून शरीराला मिळणाऱ्या उष्णतेमुळे तुमच्या घशाचा मागील भाग उबदार होण्यास तसंच त्याची काही लक्षणं कमी होण्यास मदत होऊ शकते.
शरीरात अतिरिक्त द्रवपदार्थ घेण्याचा हा एक चांगला पर्याय आहे. कारण या संसर्गाला तोंड देताना शरीरात पाण्याचं प्रमाण पुरेसं राखणं हे खूप महत्त्वाचं ठरतं.
लसीकरण किती महत्त्वाचं असतं?
जागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यूएचओ) इन्फ्लुएन्झा विषाणूमुळे झालेला संसर्ग किंवा गंभीर परिणाम टाळण्याचा किंवा रोखण्याचा लसीकरण हा सर्वात प्रभावी मार्ग आहे.
इन्फ्लुएन्झा विषाणूमुळे फ्लू किंवा ताप येतो. हा विषाणू सतत बदलत असतो आणि विकसित होत असतो. त्यामुळे त्याच्या नवीन प्रकारांशी लढण्यासाठी दरवर्षी त्याची लस अपडेट केली जाते.
डॉ. ऑस्कर म्हणतात की दरवर्षी फ्लूसाठीची लस घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
लस देण्यासाठीचं प्राधान्य किंवा त्यासाठीची पात्रता वेगवेगळ्या देशांमध्ये तिथल्या परिस्थितीनुसार बदलते. ज्यांना सर्वात जास्त धोका आहे त्यांना प्राधान्य दिलं जाऊ शकतं. युरोपियन सेंटर फॉर डिझीज प्रिव्हेन्शन अँड कंट्रोलनुसार, फ्लू किंवा तापामुळे गुंतागुंत निर्माण होणाचा सर्वात जास्त धोका असणाऱ्या लोकांसाठी लसीकरण महत्त्वाचं आहे.
यामध्ये प्रदीर्घ कालावधीपासून विशिष्ट आजार असलेले लोक, गरोदर महिला, सहा महिने ते पाच वर्षांपर्यंतची मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आरोग्यसेवा कर्मचारी यांचा समावेश आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











