'रोमचा ब्राह्मण' ज्याने दक्षिण भारतात हिंदूंचे धर्मांतर करत वाढवला ख्रिश्चन धर्म, काय होती पद्धत?

फोटो स्रोत, Penguin Random House India
- Author, जी. ए. मणिकुमार
- Role, बीबीसीसाठी
युरोपमध्ये सुधारणाविरोधी चळवळ सुरू झाली, त्यानंतर ख्रिश्चन मिशनरी म्हणजे ख्रिस्ती धर्माचे प्रचारक भारतात येऊ लागले. गोवा तेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र मानले जात होते.
1510 मध्ये पोर्तुगीज राज्याचे गव्हर्नर अल्फान्सो डी. अल्बुकर्कने विजापूरच्या सुलतानकडून गोवा ताब्यात घेतला आणि तिथे पोर्तुगीजांचे राज्य स्थापन केले.
त्या वेळी गोव्यातील सर्व हिंदू मंदिरं पाडण्यात आली. हिंदू धार्मिक विधींवर बंदी घालण्यात आली. गरीब आणि दुर्बल लोकांना पकडून त्यांचे धर्मांतर करण्यात आले.
नोबिलीच्या (1542) पूर्वी, सेंट फ्रान्सिस झेवियर यांनी पोर्तुगीज सरकार आणि लष्करी अधिकाऱ्यांच्या अत्याचार, लूट आणि भ्रष्टाचाराबद्दल होली सीच्या आर्चबिशप यांच्याकडे तक्रार केली.
त्यांनी पोर्तुगालचे राजा जॉन तिसरे याला पत्र लिहून सांगितलं की, "येथील लोकांसाठी जे काही आम्ही केलं, ते पोर्तुगीजांच्या लोभी आणि अनैतिकतेमुळे नष्ट झालं आहे. त्यामुळे मला वेदना होत आहेत. म्हणून मी येथे वेळ वाया घालवणार नाही, जपानला जाईन."
फ्रान्सिस झेवियरच्या आगमनाच्या काळात समुद्रकिनाऱ्यावर राहून मासेमारी करणाऱ्या भरथा, केरळचे मुक्कुवास आणि खारवा या भागांमध्ये धर्मांतरितांची संख्या वाढून 50,000 झाली होती.
रॉबर्ट डी नोबिलीची धार्मिक आवड
रॉबर्ट डी नोबिलीचा जन्म 1577 मध्ये रोममधील एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला होता.
तो ज्युलियस तिसरा आणि मार्सेलस दुसरा या दोन भावांचा नातेवाईक होता आणि रोमच्या एका भागाचा मालकही.
त्याच्या पालकांना त्याच्याकडून धर्मसेवेची अपेक्षा नव्हती.
परंतु, नोबिलीने 17 वर्षांचा असतानाच ठरवलं की, तो सॉसाइटी ऑफ जीझसमध्ये जाईल आणि धार्मिक सेवा करेल.

फोटो स्रोत, Getty Images
पालकांची परवानगी न मिळाल्याने एक दिवस नोबिली घर सोडून नेपल्सला गेला.
तिथं जेव्हा तो सापडला तेव्हा त्याने त्याच्या नातेवाईकांमार्फत एक पत्र लिहिलं, ज्यात सांगितलं की, त्याला कौटुंबिक संपत्तीची काहीही गरज नाही.
पालकांची परवानगी मिळाल्यानंतर त्याने नेपल्समध्ये धार्मिक कार्यासाठी औपचारिक प्रशिक्षण घेतले.
नोबिलीने ईस्ट इंडिजमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि 1604 मध्ये गोव्यासाठी रवाना झाला.
प्रवासात अनंत अडचणी
नोबिलीने जेसुइट नेते क्लॉडिओ अगुइया यांना एक पत्र लिहिलं. त्यात लिस्बन ते गोवा या 14 महिन्यांच्या प्रवासात त्याला ज्या अडचणींचा सामना करावा लागला, याचं वर्णन केलं.
त्यानं पत्रात लिहिलं की, "आमचं पहिलं जहाज मोझांबिकजवळ वाळूत अडकलं. त्यामुळे आम्ही मालवाहू जहाज तिथेच सोडून बोटीने प्रवास केला. तीही तुटलेली असल्यामुळे आम्ही मेलिंडाच्या किनाऱ्यावर असलेल्या पोर्तुगीज किल्ल्यात गेलो आणि तिथल्या लोकांच्या मदतीने गोव्यापर्यंत पोहोचलो."
गोव्यात पोहोचल्यावर खराब बिस्किटं खाल्याने आणि अस्वच्छ पाणी प्यायल्यामुळे नोबिलीला तीव्र ताप आला. त्याची राहण्याची व्यवस्था गोव्याच्या सेंट पॉल कॉलेजमध्ये करण्यात आली. तिथे त्याने पाच वर्षे ख्रिस्ती धर्मग्रंथांचा अभ्यास केला.
नोबिलीचा गोवा ते कोची प्रवास

फोटो स्रोत, Getty Images
गोवा हे असं ठिकाण होतं जिथे वैयक्तिक भांडणं अनेकदा मोठ्या वादविवादाचे कारण बनत असत. त्यामुळे नोबिलीने दक्षिणेकडे जाण्याचा निर्णय घेतला. तो गोव्याहून कोचीला गेला आणि तिथे पुन्हा आजारी पडला.
एका कॉलेजमध्ये राहून त्याला फ्रान्सिस्कन, डॉमिनिकन आणि ऑगस्टिनियन भिक्षूंच्या मठांना भेट देण्याची आणि धार्मिक विषयांवर चर्चा करण्याची संधी मिळाली.
तीन महिन्यांनंतर तो कन्याकुमारीहून रामेश्वरमपर्यंतच्या समुद्रकिनाऱ्यावरील मासेमारी करणाऱ्या भागांमध्ये गेला. तेथील लोकांना फ्रान्सिस झेवियरने दीक्षा दिली होती.
नोबिलीची मदुराईला भेट
नोबिलीने मदुराईला भेट दिली. तिथे त्या भागातील मोठ्या ख्रिश्चन समाजाचा नेता कॉन्सेजो फर्नांडो एक शाळा आणि हॉस्पिटल चालवत होता. दक्षिण किनाऱ्यावरच्या व्यापारी मार्गांवर सोळाव्या शतकाच्या शेवटी कॅथलिक चर्चची स्थापना झाली होती.
मदुराईतून जाणाऱ्या भारतीयांना आणि पोर्तुगीज व्यापाऱ्यांना त्याने वेदांचं शिक्षण दिलं. मदुराईत येऊन त्याला आता 11 वर्षे झाली होती. मदुराईचे लोक ख्रिस्ती धर्माला देवहीन आणि जातिविहीन धर्म मानत होते.
भारतीय किंवा पोर्तुगीजांना संस्कृत, बौद्ध किंवा जैन धर्माबद्दल काहीच माहिती नव्हती. फर्नांडो नेहमी भारतीयांसोबत राहत असल्यामुळे त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचलेच नव्हते आणि कोणी त्यांच्याशी चर्चाही केली नव्हती. त्यामुळे त्यांना मदुराईत एकालाही ख्रिस्ती धर्मात आणता आलं नाही.

फोटो स्रोत, Getty Images
वालुकामय किनाऱ्यावरच्या भारतीयांच्या वस्ती पाहून आणि भव्य मीनाक्षी अम्मन मंदिर तसेच कलात्मकरितीने सजवलेल्या इमारती पाहून नोबिली खूप प्रभावित झाला. त्याने आपली सावत्र बहीण कॅथरीनला लिहिलेल्या पत्रात मदुराईचं वर्णन उबदार लोकांचं शहर असं केलं.
ख्रिस्ती धर्म प्रसारापूर्वी, मदुराई रोमसारखे दिसायचे. मदुराई शक्तिशाली नायक राजांच्या राजवटीखाली होते आणि त्या काळातील राजा कृष्णप्पा नायक दुसरे ख्रिस्ती धर्म आणि ख्रिस्ती संस्थांचे समर्थक होते, असे नोबिलीने आपल्या पत्रात म्हटलं आहे.
सुरुवातीचं जीवन

फोटो स्रोत, Getty Images
मदुराईत आल्यावर नोबिली एका श्रीमंत माणसाने दिलेल्या छोट्या घरात राहत होता. तो एकांतात राहून तपश्चर्या करायचा आणि कोणालाही भेटत नसे.
त्याचा आहार खूप साधा होता. भात, दूध आणि केळीच्या पानांनी बनवलेला हर्बल चहा.
हा शाकाहारी आहार त्याला खूप मानवला. नोबिली पूर्वी वारंवार आजारी पडायचा, पण मदुराईत आल्यावर त्याची तब्येत सुधारली.
नोबिलीने बाहेरच्या जगाशी संपर्क ठेवण्यासाठी दोन लोकांची मदत घेतली. एक ब्राह्मण स्वयंपाकी आणि दुसरा उच्चवर्णीय पण ब्राह्मण नसलेला ख्रिश्चन मिशनरी शाळेचा शिक्षक.
तमिळ भाषा आणि साहित्याचा अभ्यास
नोबिलीच्या मते, जसं ज्यूंना रोमन लोकांमध्ये काम करताना धार्मिक अडचणींचा सामना करावा लागला, तसंच वातावरण इथंही होतं. त्याने नायक राजा आणि स्थानिक ब्राह्मण यांचे धर्मांतर घडवणं हे आपलं मुख्य उद्दिष्ट मानलं.
नोबिलीला वाटत होतं की, ब्राह्मण तपस्वी बनण्याचा मार्ग हा फर्नांडोच्या 'बंदरस्वामी' पद्धतीपेक्षा चांगला पर्याय ठरेल. त्याला खात्री होती की, तो भारतीयांना वगळून थेट ब्राह्मण आणि वेल्लाळ लोकांशी चर्चा आणि उपदेश करून त्यांचे धर्मांतर घडवू शकेल आणि त्यांना ख्रिस्ती बनवू शकेल.
नोबिलीने शाळेतील एका शिक्षकाकडून संस्कृत भाषा आणि साहित्य शिकण्यासाठी एका ब्राह्मणाला कामावर ठेवलं. त्याने तमिळ आणि तेलुगू भाषाही शिकल्या.
डिसेंबर 1606 मध्ये मित्राला लिहिलेल्या पत्रात त्याने लिहिलं, "माझी इटालियन भाषा खराब झाली आहे, हे ऐकून तुला आश्चर्य वाटेल. पोर्तुगीज आणि तमिळ शिकता शिकता मी आता इटालियन विसरुन गेलो आहे."
नोबिली हा पोर्तुगीजऐवजी शुद्ध तमिळ भाषेत बोलत होता, हे एकदम विशेष होतं.
नोबिलीचा नवीन दृष्टिकोन
नोबिलीने पवित्रता, नम्रता, शिस्त आणि भक्ती हे गुण सर्वात महत्त्वाचे मानले. त्याने आपल्या डोक्याचं मुंडण केलं आणि ब्राह्मणांसारखे कपडे घालायला सुरुवात केली.
चामड्याचे बूट सोडून तो पिवळा झगा, पांढरा किंवा लाल दुपट्टा, पगडी आणि लाकडी चप्पल घालत. त्यामुळे तो एखाद्या साधूसारखा दिसू लागला.
तो स्वतःला रोमन सम्राट समजत, छत्री घेऊन मदुराईत फिरत असे. त्याने आपला चर्च फर्नांडोच्या चर्चपासून वेगळा केला.
धर्मांतरित लोकांना जानवं घालण्यासाठी परवानगी होती, पण ब्राह्मण ख्रिश्चन झाल्यावर आधी घातलेलं जानवं काढून टाकलं जात असे. त्यांना पादरीच्या आशीर्वादाने नवीन जानवं दिलं जात असे. नंतर असे धर्मांतरित ख्रिस्ती बाप्तीस्माच्या आधी आंघोळ करत आणि कपाळावर चंदन लावत.
नोबिलीच्या नेतृत्वाखालील कॅथलिक चर्चमध्ये धर्मांतरित लोकांसाठी असे विधी केले जात असत.
ज्ञानाच्या माध्यमातून ब्राह्मणांची मनं जिंकली
नोबिलीला त्याच्या वादग्रस्त वर्तनामुळे स्थानिक ब्राह्मणांकडून जोरदार विरोधाचा सामना करावा लागला.
मदुराईतील ब्राह्मणांनी संस्कृत शिक्षकाच्या प्रश्नांना उत्तरं देण्याचे आव्हान दिले. त्यानंतर नोबिलीने एका चर्चासत्राचे आयोजन केलं. त्यात 800 ब्राह्मण सहभागी झाले होते.
नोबिलीला शैव धार्मिक विधी, सिद्धांत शास्त्र, वैष्णव धर्मातील 4,000 दिव्य लोकांची माहिती, हिंदू वेद आणि उपनिषद यांचा सखोल अभ्यास होता. त्यामुळे तो ब्राह्मणांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची स्पष्टपणे उत्तर देऊ शकला.
धर्मांतराची सुरुवात
नोबिलीने आयोजित केलेल्या 20 दिवसांच्या चर्चासत्रात सहभागी झालेल्या ब्राह्मणांना खूप आश्चर्य वाटलं आणि त्यांनी नोबिलीचं 'अद्भुत तपस्वी' म्हणून कौतुक केलं.
त्याच्या वैचारिक तेजामुळे पहिला धर्मांतरित त्याचा संस्कृत शिक्षक शिवधर्म झाला. त्यानंतर अॅलेक्सिस नायक, त्याची आई आणि भाऊ फ्रान्सिस यांनी सोसाइटी ऑफ जीझसमध्ये प्रवेश केला.
त्यानंतर इन्नासी नायकपासून सुरूवात करून पहिल्या प्रयत्नातच 10 लोक सोसायटी ऑफ जीझसमध्ये सामील झाले.
यानंतरच्या दोन वर्षांत (1611) धर्मांतरित लोकांची संख्या 150 पर्यंत वाढली.

फोटो स्रोत, Getty Images
हे लोक हिंदू असताना जेवढं देवावर प्रेम करायचे, तेवढंच प्रेम ते ख्रिस्ती झाल्यानंतर येशूवर करत असल्याने नोबिलीला खूप आनंद झाला.
नोबिलीने आपल्या पत्रांमध्ये काही लोकांची धर्मावरील निष्ठा आणि चर्चप्रती असलेल्या निष्ठेचा उल्लेख केला आहे. उदाहरण म्हणून, इरुकुवेल वेल्लार जातीतील कालिस्त्रीने ख्रिस्ती धर्म स्वीकारला आणि तो येशुपट्टन झाला.
त्याने स्वतःच नव्हे, तर त्याचे वडील (जे धर्मांतरानंतर ख्रिश्चन संत झाले) आणि दोन मुलांचेही धर्मांतर केले. नोबिलीने लिहिलं आहे की, तो निर्भयपणे जगत होता. नातेवाईक, समाज आणि राजवाड्यातील योद्धे त्याला त्रास देत आणि धमकावत होते, पण त्याने या सर्वांचा सामना केला.
फर्नांडोसोबत मतभेद आणि संघर्ष
नोबिली काही वर्षेच मदुराईत राहिला. 65 वर्षीय फर्नांडो हे एक वरिष्ठ जेसुइट होते आणि ते 11 वर्षांपासून मदुराईत होते. त्यांनी नोबिलीवर सोसायटी ऑफ जीझसच्या शिकवणींविरुद्ध जाण्याचा आरोप केला. त्यांनी आर्कडाओसिसला पत्र लिहून विरोध व्यक्त केला आणि इतरांकडून ऐकलेली माहिती त्या पत्रात लिहिली.
नोबिलीने फर्नांडोच्या आक्षेपांना लॅटिन भाषेत 39 पानांचे उत्तर दिले. ज्यात संस्कृत आणि तमिळ उदाहरणांचाही समावेश होता.
निकोलो पिमेंटो यांना 1611 मध्ये मलबार आर्कडाओसिसमध्ये पोपचे वारसदार म्हणून नेमले गेले. त्यांनी नोबिलीच्या पद्धतीवर कठोर टीका केली. त्यांनी जेसुइट नेतृत्वाला एक सविस्तर पत्रही लिहिले. नोबिलीने हिंदू धार्मिक विधींचे पालन केले आणि फर्नांडोपासून वेगळे झाल्यामुळे जेसुइट्स संतप्त झाले.
जेसुइट्सने 1613 मध्ये नोबिलीला तीन गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले: धाग्याचा वापर करणे, कपाळावर चंदन लावणे आणि लाकडी चप्पल घालणे. पण नोबिलीने जेसुइट्सचे मत स्वीकारण्यास आणि आपला दृष्टीकोन बदलण्यास नकार दिला.
गोव्यात परिषद आणि मान्यता

फोटो स्रोत, Getty Images
नोबिलीच्या पद्धतींचा परिणाम समजून घेण्यासाठी थोडा वेळ लागेल, हे तत्कालीन आर्चबिशप अल्बर्ट लासिव्हो यांना लक्षात आलं. त्यांनी फर्नांडोची बदली केली. त्यामुळे नोबिलीला अधिक स्वातंत्र्य मिळालं आणि तो काम करू शकला.
दरम्यान, पोपने भारतात धर्मांतराच्या मुद्द्यावर स्पष्ट धोरण ठरवण्यासाठी गोव्यात परिषद आयोजित करण्याची विनंती केली. नोबिलीला त्याची भूमिका मांडण्याची संधी देण्यात आली.
नोबिली काही काळ कोडुंगल्लूर (सध्याचा त्रिशूर जिल्हा) येथे गेला आणि गोवा परिषदेची वाट पाहत होता.
या परिषदेचा समारोप 1619 मध्ये झाला. पोपकडून चर्चेच्या मुद्द्यासाठी पाठवलेल्या ठरावांना परिषदेत मान्यता मिळाली आणि नंतर ते व्हॅटिकनला पाठवले गेले.
दक्षिणेतील राजकीय उलथापालथ
1614 मध्ये विजयनगर सम्राट वेंकटपती रायच्या मृत्यूनंतर उत्तराधिकारीसाठी युद्ध झाले. तंजावर आणि मदुराईचा नायक राजा यांच्यात लढाई झाली. परिणामी, मदुराईचा नायक राजा मुथू वीरप्पा नायकला त्याची राजधानी तिरुचिलापल्लीकडे हलवावी लागली.
त्या वेळी दक्षिण भारतात डच लोकांमुळे पोर्तुगीज राजवटीला धोका निर्माण झाला होता. पोर्तुगीजचा राजा व्यापारातील तोट्यामुळे भारतातील त्यांच्या कॅथलिक धार्मिक संस्थांना पैसे देऊ शकला नाही.
डच लोक आर्थिकदृष्ट्या मजबूत असल्यामुळे त्यांनी नायक राजाला आपल्याकडे खेचलं आणि पोर्तुगीजांना एकटं पाडलं.
1622 च्या मोठ्या दुष्काळामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. दुष्काळामुळे इतके लोक मरण पावले की, मृतदेह नीट दफनही करता येत नव्हते. जेसुइट नोंदींनुसार, बहुसंख्य मृतदेह वैगाई नदीत टाकले गेले आणि नदीच्या प्रवाहात ते वाहून गेले.
त्या काळात कोणतेही धर्मांतर झाले नाही. त्याऐवजी अशी अफवा पसरली की, नोबिलीच्या वादग्रस्त धर्मांतरामुळे दुष्काळ पडला आहे. नोबिली आणि त्याच्या सहकाऱ्यांना मदुराई सोडण्याचा सल्ला दिला गेला, पण नोबिलीने त्यास ठाम नकार दिला.
नोबिलीच्या दृष्टिकोनाचे यश
पोपची परवानगी मिळण्यासाठी नोबिलीला खूप प्रतिक्षा करावी लागली. अखेरीस 1624 मध्ये त्याला मान्यता मिळाली. त्यानंतर नोबिली संपूर्ण तमिळनाडूमध्ये ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी निघाला.
ब्राह्मण तपस्वीच्या पद्धतीवर विश्वास ठेवणारा मार्टिन, पोपची परवानगी मिळाल्यानंतर 1625 मध्ये नोबिलीला मदत करण्यासाठी पोहोचला.

फोटो स्रोत, Getty Images
यानंतर काही वर्षे नोबिली मदुराईच्या बाहेर तिरुचिरापल्ली, सालेम आणि मारा मंगलमसारख्या ठिकाणी गेला. तिरुचिरापल्लीमध्ये त्याचा आधीच एक तळ होता.
तो तपस्वींच्या पोशाखात सालेम पलायकार चेल्लाप्पा नायकला भेटायला गेला. त्याचे स्वागत करण्यासाठी कोणी आले नाही. त्यामुळे तो एका भोजनालयात थांबला.
संथामंगलम नावाच्या एका छोट्या राज्याच्या राजाला त्याच्या भावाने पदच्युत केलं होतं. तो नोबिलीला भेटला आणि ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर इतर लोकही नोबिलीला भेटायला येऊ लागले.
सालेम पलायकारचा पाठिंबा
नोबिलीच्या आगमनाची बातमी मिळताच चेल्लाप्पा नायकने त्याला राजवाड्यात बोलावलं आणि मदत केली.
त्याने नोबिलीला सालेममधील ब्राह्मणांच्या परिसरात घर दिलं. त्याने वेळोवेळी त्याचा सल्लाही घेतला.
1627 मध्ये कॅथलिक धर्माच्या इतिहासात आणखी एक महत्त्वाचं वळण आलं. परैयार जातीतील एका बुद्धिमान व्यक्तीला नोबिलीने 'उगवता सूर्य' असं म्हटलं. त्याच्या क्षमतेने सर्वजण प्रभावित झाले आणि त्याला ख्रिस्ती धर्म स्वीकारायला लावला.
सर्वजण त्याला हिलरी म्हणत असत. त्याने आपल्या 2000 शिष्यांचे धर्मांतर कॅथलिकमध्ये केले. त्रिचीमध्ये त्याच्यासाठी एक कॅथलिक चर्चही उभा करण्यात आले.
हिलरीचे माजी शाकाहारी सहकारी रागावले आणि त्यांनी चर्चची तोडफोड केली. हिंसाचार थांबवण्यासाठी नोबिली आणि लोक एकत्र आले.
यानंतर बंदरस्वामीच्या पद्धतीने चर्च तयार केले गेले. नोबिलीने विचार केला की, ही रणनीती दलित लोकांना मोठ्या प्रमाणात धर्मात आणण्यासाठी उपयुक्त ठरेल.
सकाळी ब्राह्मणांना आणि रात्री बंदरस्वामींना धार्मिक प्रवचन दिले जात असत. मार्टिन सत्यमंगलला गेले तेव्हा त्यांनी स्वतः पाहिलं की दलित आणि शूद्रांचं धर्मांतर ब्राह्मण तपस्वींनी बंदरस्वामींपेक्षा अधिक प्रभावीपणे केलं होतं. कारण ब्राह्मण तपस्वींशी संबंध ठेवणं लोकांसाठी अभिमानाची गोष्ट होती.
त्या काळात नोबिलीचे समर्थक आर्चबिशप फ्रान्सिस्को रॉस हे कोल्लमहून उत्तरकडे जात होते. त्यांना समुद्री चाच्यांनी पकडले. त्यांच्यावर अत्याचार केला. नंतर त्यांना सोडण्यात आलं.
पण ते त्या धक्क्यातून सावरू शकले शकले नाहीत आणि 1630 मध्ये त्यांचं निधन झालं. त्यांच्या मृत्यूमुळे नोबिलीला खूप दुःख झालं.
राजा तिरुमलाई यांच्याशी भेट
मदुराईचे नायक राजा मुथूवीरप्पा नायक यांचे निधन झाले आणि तिरुमलाई नायक 1628 मध्ये सिंहासनावर आले.
सोसायटी ऑफ जीझसकडून त्यांना भेटलेली पहिली व्यक्ती ही थुथुकुडीचे आर्चबिशप अँटोनियो रुबिनो होते. तिरुमलाई नायकांनी त्यांना त्यांच्या ताब्यातील सर्व प्रदेशांत फिरण्याची परवानगी दिली आणि तीन वर्षांसाठी भारतीयांकडून करही माफ केला.
1630 मध्ये तो नोबिलीला भेटला, पण पोर्तुगीज आणि डच लोकांमधील युद्धामुळे ही भेट जास्त वेळ टिकू शकली नाही.
तिरुमलाई नायक यांचं स्थान खूप महत्त्वाचं होतं. तसेच मार्टिन पोर्तुगीज होता आणि नोबिली व अँटोनियो व्हिगो हे पोर्तुगीज राजाची माणसं होती. त्यामुळे ते पूर्वीप्रमाणे काम करू शकले नाहीत. तंजावरचा राजा आणि रामनाथपूरमचा राजा डच लोकांच्या बाजूने असल्यामुळे पोर्तुगीज काहीही करू शकले नाहीत.
1638 मध्ये डच लोकांनी श्रीलंकेतील एक मुख्य व्यापारी केंद्र पट्टिकुलमवर कब्जा केला आणि पोर्तुगीजांना बाहेर काढण्यासाठी कांदयानच्या राजासोबत करार केला.

फोटो स्रोत, Getty Images
1640 मध्ये एक श्रीमंत शिवपंथी परैयारला एका नवधर्मांतरित ख्रिस्ती मुलीशी लग्न करायचं होतं. तेव्हा संतप्त ख्रिस्ती लोक त्याच्यावर हल्ला करायला आले.
परैयारच्या बाजूला सर्व बंदर (शैव साधू) एकत्र झाले, त्यामुळे मोठा गोंधळ झाला.
नायक दरबारातील एक प्रतिष्ठित व्यक्ती वेंकटरायर पिल्लई यांच्याकडे त्यांनी मदत मागितली आणि त्यानंतर मार्टिनला अटक करण्यात आली.
राजाने नोबिलीला देखील अटक करण्याचा आदेश दिला. दोघांनाही तुरुंगात 16 दिवस पुरेसं अन्न न देता छळण्यात आलं.
मारवाच्या आक्रमणानंतर तिरुमलाई नायकला वेंकटरायर पिल्लईच्या निर्णयाची माहिती मिळाली. त्यावेळी त्याने त्याला केवळ फटकारलेच नाहीतर मार्टिन आणि नोबिलीला सोडण्याचा आदेशही दिला.
पण जेव्हा राजा तिरुचिरापल्लीला गेला, तेव्हा पिल्लईच्या आदेशानुसार दोघांना पुन्हा अटक करण्यात आली. 1641 मध्ये राजा परतल्यावर त्यांना सोडण्यात आलं. त्यानंतर मार्टिन दिवसा ब्राह्मण तपस्वी आणि रात्री बंदरस्वामी म्हणून आपलं कर्तव्य पार पाडू शकला नाही.
नोबिलीचा मृत्यू
विजापूरच्या सुलतानाने मदुराईवर हल्ला केला आणि तंजावर व मदुराई शहरांची लूट केली. चर्च उद्धवस्त करण्यात आले.
परिस्थिती बिकट होत चालली होती. हे पाहून नोबिली जाफनाला गेला आणि तेथे दोन वर्ष राहिला. त्याने मुलांसाठी पुस्तकं लिहिली. त्यानंतर तो मदुराईकडे न जाता मैलापूरला गेला आणि तेथे आठ वर्ष राहिला.
1656 मध्ये त्याने हस्तरेखाशास्त्रावरील 20 खंडाच्या संग्रहाच्या अंतिम ओळी लिहिल्या. त्याच वर्षी 16 जानेवारीला मैलापूरमध्ये नोबिलीचा मृत्यू झाला आणि त्याचे तिथेच दफन करण्यात आले.
तामिळनाडूमध्ये त्याचं कोणतंही स्मारक नाही. पण धर्मापुरतं मर्यादित न राहता, त्यानं लिहिलेल्या पुस्तकांमुळे तो सर्वांच्या आठवणीत जिवंत आहे.
रॉबर्ट डी नोबिलीला रोमचा ब्राह्मण किंवा गोऱ्यांचा ब्राह्मण अशा अनेक नावांनी अनेक ओळखलं जातं. पण 'फिलॉसॉफर' (तत्वज्ञानी) ही उपाधी त्याला सर्वात जास्त शोभते.
(लेखक मनोमण्यम सुंदरनार विद्यापीठात इतिहासाचे निवृत्त प्राध्यापक आहेत)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











