UPI वर 'आपोआप' खर्च होतोय? 24 तासांचा 'नो स्पेंड डे' प्रयोग करुन पाहा

महिला

फोटो स्रोत, Getty Images

वयाच्या तिशीत आलेला मानस. शिक्षण पूर्ण झाल्यावर नव्हे, शिक्षणाचं शेवटचं वर्ष पूर्ण होतानाच त्याला नोकरी लागली. नोकरी लागल्यावर मात्र त्याच्या मनावरचं सगळं जोखड उतरलं.

इतकी वर्षं प्रत्येक गोष्ट घेताना त्याला विचार करायला लागायचा. एकतर कुटुंबीयांवर अवलंबून राहावं लागायचं, तसंच घरच्या मध्यमवर्गीय विचारांमुळे प्रत्येक खर्चाला एक मर्यादा आणि शिस्तही होती.

आता मात्र ही कारणं उरलेली नव्हती. त्याच्या गरजा अतिशय व्यवस्थित भागतील इतके पैसे त्याच्या स्वतःच्या खात्यात येत होते आणि त्याला कोणावर अवलंबूनही राहावं लागत नव्हतं. पण त्याला एक वेगळीच गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे सतत होणारा खर्च. आवश्यक गोष्टींच्या पलिकडेही त्याचा भरपूर खर्च होत होता.

पावभाजी खावीशी वाटली लगेच ॲपवरुन मागवली, कंटाळा आला ओटीटीवर सिनेमा पाहिला. एखादं पुस्तक घ्यायचंय सहज डिलिव्हरी ॲपवर मागवलं. बाहेर गेल्यावर तर युपीआयसाठी मोबाईलवर तर्जनी सतत नाम ओढतच असते.

UPIवर 'आपोआप' खर्च होतोय? 24 तासांचा 'नो स्पेंड डे' प्रयोग करुन पाहा

फोटो स्रोत, Getty Images

प्रत्येक खर्चाच्या वेळेस त्याला वाटायचं थोड्याच तर रकमेचा प्रश्न आहे. पण एकेदिवशी महिना अखेरीला त्याला एक गोष्ट समजली. महिनाभर ठिपक्यांसारखे केलेले खर्च त्याच्या अकाऊंटला मोठं भगदाड पाडून गेले होते. प्रत्येक दिवशी सतत केलेले खर्च मुंग्यांच्या रांगेसारखे अकाऊंटमधून बाहेर पडलेले होते. त्या मुंग्यांनी त्याचं अकाऊंट पोखरुन टाकलेलं होतं.

म्हणजेच आपण प्रमाणाबाहेर खर्च केलाय हे त्याच्या लक्षात आलेलं पण त्याचा हात अजूनही खर्च करण्यापासून दूर गेलेला नव्हता. मनोरंजन हवंय, भूक लागलीय, एखादी वस्तू हवीय असा विचार जरी आला तरी काही क्षणात त्याच्याकडून कृती होत होती आणि युपीआयवर खर्च होऊन तो मोकळा होत होता.

आता त्याला प्रश्न तरी कळला होता पण त्यावर उत्तर कसं मिळवायचं याचा विचार त्यांनं सुरू केला.

मानससारखीच आज बहुतांश लोकांची स्थिती आहे. मनात एखादी कल्पना आली की ती वस्तू, गोष्ट, पदार्थ तात्काळ मागवून ही मंडळी मोकळी होते. या अशा विचित्र स्थितीत खर्चावर नियंत्रण कसं आणायचं आणि हा सवयीपोटी आणि 'आपोआप' केला जाणारा खर्च कसा कमी करता येईल याचा आपण विचार करू. यासाठी हा प्रयोग केला जातो. त्याचं नाव आहे. नो मनी डे किंवा 24 तासात काहीही खर्च न करणे.

आता वरवर वाचलं की हे फार सोप्पं आहे असं वाटतं. पण सतत खर्च करायची सवय लागलेल्या माणसांसाठी ही मानसिक आणि सवयींच्या पातळीवर कसोटीसारखी स्थिती असते.

UPIवर 'आपोआप' खर्च होतोय? 24 तासांचा 'नो स्पेंड डे' प्रयोग करुन पाहा

फोटो स्रोत, Getty Images

सोशल मीडियावर हा एक नवा ट्रेंड वेगाने पसरतो आहे. 24 तास अजिबात खर्च न करण्याचा. या काळात ना ऑनलाइन खरेदी, ना कॅफेत जाणं, ना अचानक होणाऱ्या खरेदी. वरवर पाहता हे एक आर्थिक आव्हान वाटत असलं तरी, ही एक प्रत्यक्षात मनाच्या नियंत्रणाची, आत्मसंयमाची आणि भावनांवर ताबा ठेवण्याची परीक्षा आहे, असं यात सहभागी होणाऱ्या लोकांना जाणवतं.

इन्स्टंट डिजिटल पेमेंट्स आणि सतत वाढणाऱ्या लाइफस्टाइल खर्चाच्या काळात, खरेदी ही अनेकदा तणाव, कंटाळा किंवा भावनिक अस्वस्थतेवरची एक 'कोपिंग मेकॅनिझम' (उपाययोजना) बनते.

'नो मनी डे' म्हणजे नेमकं काय आणि त्याची कशी मदत होते?

'नो मनी डे' अर्थात 'नो स्पेंडिग डे' किंवा 24 तास काहीही खर्च न करण्याचा प्रयोग हा प्रत्यक्षात पैशांचा नव्हे, तर मनाचा प्रयोग आहे. या दिवशी मुद्दाम स्वतःला एक मर्यादा घालायची, आज कितीही इच्छा झाली, कितीही लहान रक्कम असली तरी एकही व्यवहार करायचा नाही. ऐकायला ही संकल्पना सोपी वाटते, पण प्रत्यक्षात ती सवयींशी भिडणारी असते.

कारण बहुतेक खर्च हे गरजेपोटी नसून सवयीपोटी होत असतात. ऑफिसमध्ये कंटाळा आला म्हणून चहा मागवणं, भूक नसताना खाण्याचे पदार्थ मागवणं, मूड गेला, एकटं वाटतंय म्हणून केक- आईस्क्रीम खाणं, घरी जाताना काहीतरी खायचं म्हणून ऑर्डर करणं, रिकाम्या वेळेत शॉपिंग ॲप्स स्क्रोल करत बसणं. हे अतिशय सुक्ष्मपातळीवर आपण करत असतो. 'नो मनी डे' या लाटांवर लक्ष ठेवायला शिकवतो.

'नो मनी डे' म्हणजे नेमकं काय आणि त्याची कशी मदत होते?

फोटो स्रोत, Getty Images

यावर नियंत्रण आणण्यासाठी या दिवशी प्रत्येक खर्चाच्यावेळेस खरंच मला ही वस्तू, गोष्ट आताच हवी आहे का? मी याशिवाय राहूच शकणार नाही का? असा प्रश्न विचारायचा. आता मी जे हे खर्च करतोय ते केले नाही तर माझं जीवन अतिशय कठीणच होऊन जाईल का असा एक प्रश्नही यावेळेस उपयोगी पडतो.

'नो मनी डे'चा मुख्य फायदा असा की तो आपल्याला आपल्या खर्चाच्या ट्रिगर्सची ओळख करून देतो. भूक, कंटाळा, तणाव, स्वतःलाच बक्षीस देण्याची भावना यापैकी नेमकं काय आपल्याला खर्चाकडे ढकलतंय, हे स्पष्ट होतं. एकदा हे लक्षात आलं की मग पर्याय शोधता येतात. भुकेसाठी घरचं अन्न, कंटाळ्यासाठी मोफत पर्याय, तणावासाठी चालणं किंवा बोलणं.

हा प्रयोग रोजच करण्याची गरज नाही. आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून काही दिवस जरी केला, तरी तो खर्चावरची पकड आपोआप सैल करतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आपला पैसा खर्च करणं आपल्याच हातात आहे ही जाणीव पुन्हा एकदा माणसाला मिळते.

'नो मनी डे' म्हणजे नेमकं काय आणि त्याची कशी मदत होते?

फोटो स्रोत, Getty Images

हे करताना मात्र तुम्ही कंजुष व्हा, अतिशय प्राधान्याच्या वस्तू म्हणजे आरोग्यसाठी लागणाऱ्या गोष्टीही विकत घेऊ नका असा अर्थ नाही.

हा फक्त आपणच आपल्यावर करायचा एक प्रयोग आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यातून लगेच श्रीमंत वगैरे होता येत नाही. तसेच तुमचे सगळे प्रश्नही सुटत नाहीत, परंतु आर्थिक शिस्तीच्या दिशेने एक पाऊल नक्कीच टाकलं जातं.

हे नक्की करायचं कसं?

आता हे अंमलात कसं आणता येईल हे पाहू. तुम्ही म्हणाल की आम्हाला ऑफिसला जाताना प्रवासासाठी किंवा ऑफिसमध्ये गेल्यावर चहा, खाणं वगैरे अशा गोष्टींसाठी, रिक्षा-बस यावर पैसे खर्च होतात किंवा गाडीमध्ये पेट्रोल-हवा भरावी लागते. मग आम्ही हे कसं करू शकणार? तर अशा नोकरदार लोकांनी हा प्रयोग सुटीच्यादिवशी किंवा वर्क फ्रॉम होमच्या दिवशी करुन पाहावा.

  • घरी असताना कोणत्याही चोवीस तासांची निवड करता येईल. वरवर चोवीस तास हा आकडा मोठा वाटत असला तरी त्यातले सात-आठ तास झोप, आन्हिकं, जेवण, व्यायाम यांचा वेळ बघितला तर त्यातले 12 तासच हा उपवास करावा लागणार आहे.
  • या काळामध्ये ज्या लोकांना मनात कल्पना आली की एखादा पदार्थ मागवावासा वाटतो किंवा वस्तू मागवावी वाटते त्यांनी आपला फोन शक्यतो दूर ठेवावा. त्यादिवशी फोनचा वापरही कमी करता येईल.
  • या दिवसात तुम्हाला बाहेर जायचं असेल आणि बाहेर गेल्यावर काहीतरी फास्टफूड खायची इच्छा होतेच अशी स्थिती असेल तर घरातूनच खाऊन बाहेर पडता येईल. याचा दुहेरी फायदा होईल एकतर घरी केलेला पदार्थ खाल्ला जाईल त्यामुळे फास्टफूडमधून होणारा संभाव्य त्रास टळेल. दुसरं तुमचा प्रयोग सुरू राहिल.
  • दिवस संपला की खर्चाच्या किती कल्पना डोक्यात आल्या आणि त्यांच्यासाठी अंदाजे किती खर्च आला असता याचा एक हिशेब करता येईल. म्हणजे आपण दिवसभरात किती पैसे वाचवले हे समजेल.

आपल्या घरात किती अनावश्यक वस्तू आपण मागवल्या किंवा खरेदी केल्या हे सुद्धा यातून समजतं. उदाहरणच घ्यायचं झालं तर गिटार खरेदी केलेल्या, सायकल विकत घेणाऱ्या लोकांनी त्यांच्या या वस्तूंचं काय केलं हे विचारा.

बहुतांशवेळा घाईघाईत वस्तू विकत घेतल्या जातात आणि त्यांचा वापर नंतर केला जात नाही. त्याऐवजी मग आधी जुनी सायकल विकत घेता येईल का? किंवा आधीची जुनी सायकल दुरुस्त करुन वापरता येईल काय, एखाद्या व्यक्तीची सायकल थोडे दिवस वापरू शकू का अशा गोष्टी केल्या तर मग आपण त्या नक्की किती वापरणार आहोत हे समजेल.

अनावश्यक गोष्टी का विकत घेतल्या जातात? त्यावेळेस डोक्यात काय सुरू असतं?

काही लोक अनावश्यक फुटकळ गोष्टी का विकत घेतात आणि ते मनात विचार आल्यावर ताबडतोब का विकत घेतात असा प्रश्न आपल्या मनात येतोच. किंवा असं वर्तन आपल्याकडूनही होत असतं. यामध्ये डोपामिन सारख्या काही रसायनांची भूमिका असते. याबद्दल आम्ही मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटलमधील कन्सल्टिंग सायकॉलॉजिस्ट रुची जैन यांना विचारलं.

अनावश्यक गोष्टी का विकत घेतल्या जातात? त्यावेळेस डोक्यात काय सुरू असतं?

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

त्या म्हणाल्या, "काही लोकांमध्ये काही लोकांसाठी खरेदी ही भावनिक तणाव हाताळण्याची एक पद्धत असते. आपली खर्चाची सवय, भावना या डोपामिन या न्यूरोकेमिकलवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. डोपामिनमुळे 'हवंय – घेतलं – थोडं बरं वाटलं' असं एक चक्र सुरू राहातं.

एकटेपणा, मित्र–कुटुंबाचा अभाव, कंटाळा किंवा भावनिक पोकळी भरून काढण्यासाठी अनेक जण ऑनलाइन शॉपिंग अ‍ॅप्सवर वेळ घालवतात आणि शेवटी गरज नसलेल्या वस्तूही खरेदी करून बसतात. या खरेदीमुळे तात्पुरतं उत्साही (temporary high) वाटतं. तो जो मेंदूच्या रिवॉर्ड सिस्टीममुळे येत असतो. मात्र नंतर अपराधीपणाची भावना किंवा पश्चात्तापही येऊ शकतो."

त्या पुढे सांगतात, "संशोधनानुसार डोपामिनची सर्वात मोठी 'लाट' प्रत्यक्ष वस्तू मिळाल्यावर नव्हे, तर ती खरेदी करण्याच्या अपेक्षेत म्हणजे ब्राउझिंग करताना, कार्टमध्ये टाकताना किंवा एखादी चांगली डील मिळाल्यावर येते. हीच तथाकथित 'रिटेल थेरपी' ताण, कंटाळा किंवा दुःखावर तात्पुरता उपाय म्हणून काम करते आणि माणसाला सर्व काही नियंत्रणात असल्याची व काहीतरी साध्य केल्याची भावना देते. परिणामी, भावना अनेकदा तर्कशुद्ध विचारांवर मात करतात आणि खर्च हा बऱ्याचदा तर्कापेक्षा भावनांवर आधारित ठरतो."

अनावश्यक गोष्टी का विकत घेतल्या जातात? त्यावेळेस डोक्यात काय सुरू असतं?

फोटो स्रोत, Getty Images

यातून स्वतःवर नियंत्रण आणण्याचा हेतू कसा साध्य होतो असं रुची यांना विचारल्यावर त्या सांगतात,

"नो-स्पेंड डे हा इच्छाशक्तीवर नियंत्रण, भावनांचे नियमन आणि उद्दिष्ट ठरवण्याशी संबंधित अनेक मानसिक प्रक्रिया सक्रिय करतो.

जाणीवपूर्वक खर्च टाळणे म्हणजे 'डिलेड ग्रॅटिफिकेशन' (तत्काळ समाधान पुढे ढकलणे), ते कालांतराने आत्मसंयम आणि स्वयंनियंत्रण मजबूत करतं. जरी स्वयंनियंत्रणासाठी मानसिक ऊर्जा लागते (याला 'इगो डीप्लिशन' म्हटलं जातं), तरी सातत्याने संयमाची सवय लावल्यास ती एखाद्या स्नायूप्रमाणे मजबूत होत जाते. उदाहरणार्थ जशी व्यायामाने दिवसेदिवस ताकद वाढते, तसंच इथं आहे."

"हा एक प्रकारचा व्यवहार्य, अल्पकालीन स्वयंनियंत्रणाचा सराव ठरतो, तो भावनिक किंवा तात्काळ समाधानाच्या सवयीने होणाऱ्या खर्चाच्या चक्राला खंडित करतो. काही अंशी हा 'डिटॉक्स' किंवा व्यसनापासून दूर राहण्याचा (de-addiction) उपायही ठरू शकतो, कारण ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदी अनेकदा व्यसनासारखी बनते."

अनावश्यक गोष्टी का विकत घेतल्या जातात? त्यावेळेस डोक्यात काय सुरू असतं?

फोटो स्रोत, Getty Images

हे सांगून रुची जैन एक धोक्याचा इशाराही देतात. त्या म्हणाल्या, "मात्र 24 तासांचा नो-स्पेंड डे हा एक अल्पकालीन प्रयोग आहे. तो खोलवर रुजलेल्या वर्तणुकीच्या समस्या सोडवेलच असं नाही. शिवाय, जर तो अतिशय टोकाचा असेल तर नंतर 'बिंज स्पेंडिंग' म्हणजेच एकदम जादा खर्च होण्याचाही धोका असतो."

अती आवेगातून होणारे खर्च हे मूडशी आणि एकटेपणाशीही संबंधित असतात का?

"क्लिनिकल निरीक्षणं आणि मानसशास्त्रीय संशोधनानुसार, अती किंवा इम्पल्सिव्ह खर्च हा अनेकदा आतल्या भावनिक समस्यांशी जोडलेला असतो. तो तणाव, एकटेपणा किंवा नैराश्य अशा भावनांवरचा एक अपायकारक उपाय (maladaptive coping mechanism) ठरतो." असं रुची जैन सांगतात.

त्या सांगतात, "रिटेल थेरपी किंवा 'कम्पेन्सेटरी कन्झम्प्शन' म्हणून ओळखला जाणारा हा प्रकार तात्पुरता दिलासा देतो. मात्र नंतर अपराधीपणा, लाज किंवा चिंता (buyer's remorse) निर्माण होते आणि हीच नकारात्मक भावना पुन्हा खर्चाकडे ढकलू शकते. अशा प्रकारे हे एक दुष्टचक्र बनतं."

अती आवेगातून होणारे खर्च हे मूडशी आणि एकटेपणाशीही संबंधित असतात का?

फोटो स्रोत, Getty Images

रुची जैन सांगतात, "अनावश्यक वस्तूंकरिता लगेच खरेदी न करता 24 तास थांबणं उपयुक्त ठरू शकतं; त्यामुळे भावनिक उर्मी ओसरते आणि अनेकदा खरेदी टळते. क्वचित जास्त खर्च झाला तर स्वतःवर न चिडता, पुन्हा मार्गक्रमण करणं महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा,ऑनलाइन शॉपिंग पोर्टल्स अखेरीस तुमच्याच खर्चावर फायदा कमावत असतात."

नियंत्रण तुमच्याकडे ठेवा, शहाणपणाने निवड करा. एखादा छंद जोपासा, नियमित व्यायाम करा. हा वेळ 'खर्च' करण्याची खऱ्या अर्थाने आरोग्यदायी मार्ग आहेत.

गरज आणि हौस यातला फरक ओळखण्यासाठी आवश्यक

या नो मनी डे किंवा 24 तासात काहीही खर्च न करण्याच्या उपायाबद्दल आम्ही किरांग गांधी यांच्याकडून अधिक माहिती घेतली. किरांग गांधी हे अर्थसल्लागार असून ते विविध माध्यमांमध्ये आर्थिक विषयांवर तसेच बचत आणि गुंतवणुकीवर लेखन करतात.

24 तासांचं No‑Spend Challenge खरोखरच आर्थिक शिस्तीकडे जाणारं पाऊल आहे का, की तो केवळ एक प्रतीकात्मक प्रयोग म्हणून पाहायला हवा? दीर्घकालीन आर्थिक वर्तनावर याचा काही परिणाम होतो का? असा प्रश्न त्यांना विचारल्यावर ते म्हणाले,

" 24 तासांचे 'नो-स्पेंड चॅलेंज' हा केवळ एक प्रतिकात्मक प्रयोग नसून, तो आर्थिक जागरूकता आणि आत्मनियंत्रणाचा एक व्यावहारिक सराव आहे. इन्स्टंट युपीआय पेमेंट आणि ऑनलाइन शॉपिंगच्या काळात, लोक अनेकदा भावनिक होऊन आणि नकळतपणे खर्च करतात. 24 तासांच्या या 'नो-स्पेंड चॅलेंज'मुळे लोकांना त्यांच्या खर्चाविषयी सवयी ओळखण्यास आणि 'गरज' व 'हौस' यातील फरक समजून घेण्यास मदत करतो. जरी यातून होणारी थेट आर्थिक बचत कमी वाटत असली, तरी त्याचा दीर्घकालीन फायदा हा खर्चाचे विचारपूर्वक वर्तन, मजबूत अर्थसंकल्पीय शिस्त आणि पैशांच्या निर्णयांवर अधिक चांगले भावनिक नियंत्रण निर्माण करण्यात दडलेला आहे."

गरज आणि हौस यातला फरक ओळखण्यासाठी आवश्यक

फोटो स्रोत, Getty Images

पण डिजिटल पेमेंटसमुळे अदृश्य वाटणाऱ्या खर्चाचं काय करायचं हा प्रश्न उरतोच. त्यावर किरांग गांधी यांना विचारलं असता ते म्हणाले, " डिजिटल पेमेंटमुळे 'पैसे देण्याचं दुःख' कमी होते कारण टॅप किंवा स्कॅनद्वारे पैसे शांतपणे निघून जातात, ज्यामुळे लहान खर्चही किरकोळ वाटू लागतात. 'नो-स्पेंड डे' प्रत्येक खरेदीच्या निर्णयापूर्वी लोकांना थांबण्यास भाग पाडून पुन्हा जागरूकता निर्माण करतो."

ते पुढं म्हणाले, " हे चॅलेंज व्यक्तीला भावनिक आणि आवेगातून होणाऱ्या खर्चाची कारणे शोधण्यात मदत करते, ज्यामुळे ते दैनंदिन सवयींबद्दल अधिक सजग होतात. हा छोटासा सराव काळांतराने आर्थिक सजगता आणि खर्चाची शिस्त सुधारू शकतो."

गरज आणि हौस यातला फरक ओळखण्यासाठी आवश्यक

फोटो स्रोत, Getty Images

त्यानंतर या प्रयोगाचा दीर्घकालीन बचतीसाठी काही थेट फायदा होतो का याबद्दल त्यांना विचारुन पाहिलं.

किरांग गांधी यांना, मासिक बजेट बनवण्याच्या तुलनेत असे छोटे प्रयोग (आठवड्यात किंवा महिन्यात एक‑दोन दिवस) ईएमआय, बचत किंवा आपत्कालीन निधी उभारणीच्या दृष्टीने काही ठोस आर्थिक लाभ देतात का? असं विचारलं

त्यावर ते सांगतात, "खर्चाशिवाय केलेले छोटे प्रयोग हे योग्य मासिक बजेटची जागा घेऊ शकत नाहीत, परंतु ते व्यावहारिक मार्गांनी आर्थिक शिस्त मजबूत करू शकतात. नियमितपणे एक किंवा दोन दिवस अनावश्यक खर्च टाळल्याने कुटुंबांना छोटी बचत ईएमआय, आपत्कालीन निधी किंवा गुंतवणुकीकडे वळवण्यास मदत होऊ शकते. "

"महत्त्वाचे म्हणजे, हे प्रयोग मनाला आवेगातून होणारी खरेदी आणि जीवनशैलीतील महागाई नियंत्रित करण्याचे प्रशिक्षण देतात. कालांतराने, सातत्यपूर्ण विचारपूर्वक खर्चाच्या सवयी वाढत्या राहणीमानाचा खर्च आणि कर्जाचा दबाव व्यवस्थापित करणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी अर्थपूर्ण आर्थिक स्थैर्य निर्माण करू शकतात."

गरज आणि हौस यातला फरक ओळखण्यासाठी आवश्यक

फोटो स्रोत, Getty Images

हे सगळं वाचायला आणि कल्पनेत भारी वाटत असलं तरी हे वास्तववादी आहे का हेसुद्धा पाहिलं पाहिजेच.

त्यामुळेच दिवसभर मजुरी करणारे कामगार, लहान मुलांचे पालक किंवा वैद्यकीय खर्चाला सामोरे जाणारे लोक अशा प्रयोगातून काय घेऊ शकतात? असा प्रश्न किरांग गांधी यांना विचारला.

त्यावर ते म्हणाले, " सामान्य भारतीयांसाठी, 'नो-स्पेंड डे' म्हणजे अन्न, औषधे, वाहतूक किंवा मुलांच्या गरजा यांसारखे आवश्यक खर्च टाळणे असा नाही. याचा खरा धडा हा विचारपूर्वक खर्च करणे हा आहे, टोकाचा त्याग करणे नव्हे."

गरज आणि हौस यातला फरक ओळखण्यासाठी आवश्यक

फोटो स्रोत, Getty Images

ते सांगतात, "रोजंदारीवर काम करणारे आणि मध्यमवर्गीय कुटुंबं या प्रयोगाचा वापर टाळता येण्याजोगे खर्च ओळखण्यासाठी, आवेगी खरेदी कमी करण्यासाठी आणि व्यावहारिक मर्यादेत अधिक चांगली आर्थिक जागरूकता निर्माण करण्यासाठी करू शकतात."

आर्थिक तणाव कमी करण्यात 'खर्चावर नियंत्रण' हे 'जास्त कमाई'च्या तुलनेत किती महत्त्वाचं आहे? आणि या प्रक्रियेत No‑Spend Day कसा मदत करू शकतो किंवा करू शकत नाही? असा प्रश्न विचारताच किरांग म्हणाले, " जास्त कमाई करणे महत्त्वाचे आहे, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणे तितकेच गरजेचं आहे कारण शिस्तीशिवाय वाढलेले उत्पन्न अनेकदा जीवनशैलीतील महागाई आणि कर्जाच्या तणावाकडे नेते. आर्थिक शांतता या दोन्हीच्या संतुलनातून येते."

ते पुढं म्हणाले, "केवळ 'नो-स्पेंड डे' आर्थिक समस्या सोडवू शकत नाही, परंतु तो अनावश्यक खर्चाच्या सवयींबद्दलची जागरूकता सुधारू शकतो. कालांतराने, ही जागरूकता व्यक्तींना हुशार निर्णय घेण्यास, व्यर्थ खर्च कमी करण्यास आणि आर्थिक स्थैर्य सुधारण्यास मदत करते."

आपण काय शिकलो?

दिवसभरात आपण किती प्रकारचे खर्च टाळू शकतो किंवा खरंच एखाद्या गोष्टीची आवश्यकता आहे का याचा विचार आपल्या मनामध्ये यायला लागेल. दिवसभरात आपण केलेल्या सर्व खर्चाचा हिशेब केला तर किती गोष्टी आवश्यक आहेत आणि किती अनावश्यक आहेत हे समजेल.

यामध्ये केवळ तुमचा खर्चाचा एकदिवसीय उपवास होणार आहे असं नाही तर आपल्या रोजच्या सवयींकडेही लक्ष देण्याची संधी मिळेल. आपण बाहेरचं फास्टफूड तसंच पाकिटबंद पदार्थ किती खातो हे समजेल.

आपण काय शिकलो?

फोटो स्रोत, Getty Images

सतत फोनवर राहून खर्च करण्याची सवय लागलेल्या लोकांना आपल्या सोशल मीडियावर खाण्या-पिण्याच्या, वस्तू खरेदीच्या किती जाहिराती येतात हे समजेल. त्यानुसार आपलं सर्च करण्याच्या सवयी बदलता येतील. तसेच आपण किती वेळ फोन वापरतो याचंही भान येईल.

थोडक्यात 24 तासांमध्ये कोणीही श्रीमंत होत नसतं. तसं होताही येत नाही. पण हा एक खर्चाचा उपवास करुन पाहाता येईल. आपली खरेदी खरंच आपणच करतोय की ती नकळत आपल्या हातून घडून जातेय हे समजेल. नंतर आपला निग्रह कितपत घट्ट आहे याचा अंदाज आला की स्वतःलाच काही आव्हानं देता येतील.

आपण काय शिकलो?

फोटो स्रोत, Getty Images

जसं की सुरुवातीच्या काळात एका महिन्यात फक्त एकदाच हा प्रयोग करणं. मग दर पंधरा दिवसांनी करुन पाहाणं त्यानंतर आठवड्यातून एकदा हे जमतंय का हे पाहाता येईल.

याप्रमाणेच मग गरज नसताना मॉलमध्ये खरेदीसाठी जाणं टाळणं, डिलिव्हरी अपवरुन गरज नसताना खाणं मागवणं थांबवणं अशा गोष्टी करता येतील. जसं की एक आठवडा कोणतंही डिलिव्हरी ॲप वापरायचं नाही. एखादा पूर्ण महिना मॉलमध्ये न जाता राहणं असे प्रयोग करता येतील. नवं पुस्तक लगेच मागवण्याऐवजी आधी कपाटातलं न वाचलेलं पुस्तक मागवणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खरेदी आधी थोडं थांबण्याची, विचार करण्याची सवय लागेल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)