'किम-जू-आए' उत्तर कोरियाची उत्तराधिकारी, किम-जाँग-उन यांनी लेकीच्या नावावर केलं शिक्कामोर्तब

फोटो स्रोत, KCNA VIA KNS / AFP via Getty Images
- Author, फ्लोरा ड्ररी
- Role, बीबीसी न्यूज
- वाचन वेळ: 4 मिनिटे
सप्टेंबर 2025 मध्ये उत्तर कोरियाचे नेते किम जाँग-उन एक बैठकीसाठी चीनमध्ये आले होते. त्यावेळी ते बुलेटप्रुफ ट्रेनमधून बाहेर पडले तेव्हा त्यांच्या बरोबर मागे उभ्या असलेल्या एका मुलीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
ही मुलगी होती उत्तर कोरियाचे नेते किम जाँग-उन यांची कन्या किम जू आए.
किम जाँग-उन यांनी त्यांच्या याच मुलीला उत्तराधिकारी म्हणून घोषित केल्याची माहिती आहे. दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेने गुरुवारी (12 फेब्रुवारी) याबाबत माहिती दिली.
यानंतर किम जू आएबाबत अनेक चर्चा सुरू असल्या तरी तिच्याबद्दल अतिशय कमी माहिती उपलब्ध आहे. किम जू आएचं वय जवळपास 13 वर्षांच्या आसपास असल्याची माहिती आहे.
काही रिपोर्ट्सनुसार, किम जाँग-उन आणि त्यांची पत्नी री सोल जू यांना तीन अपत्य असून किम जू आए ही दुसऱ्या क्रमांकाची मुलगी आहे.
असं असलं तरी या दाम्पत्याला एकूण किती मुलं आहेत याबाबत बऱ्याच गोष्टींची माहिती समोर आलेली नाही.
कोण आहे किम जू आए?
किम जाँग-उन त्यांच्या कुटुंबाबाबत कमालीची गुप्तता पाळतात. त्यामुळं त्यांच्या कुटुंबाविषयी अतिशय कमी माहिती उपलब्ध आहे. लग्नानंतर त्यांनी पत्नी री सोल जू यांच्याबाबतही गुप्तता पाळली होती.
त्यांच्या मुलांविषयीदेखील अतिशय कमी माहिती उपलब्ध आहे. त्यांच्या मुलांपैकी फक्त 'किम जू आए'बाबतची अधिकृत माहिती उत्तर कोरियाकडून जारी करण्यात आली आहे. तिच्या व्यतिरिक्त किम जाँग-उन यांच्या इतर कोणत्याही अपत्याची माहिती सार्वजनिकरित्या समोर आलेली नाही.
किम जू आएबाबतची बातमी पहिल्यांदा 2013 साली सार्वजनिकरित्या समोर आली होती. त्यावेळी निवृत्त अमेरिकन बास्केट बॉलपटू डेनिस रॉडमन यांनी उत्तर कोरियाला भेट दिली होती.
"किम यांच्या कुटुंबासोबत मी छान वेळ घालवला आणि समुद्रकिनारी आराम केला आणि त्यांच्या मुलांसोबतही खेळलो," असं तो म्हणाला होता. हे सांगताना त्यांनं मुलीचं नाव जू आए असल्याचं नमूद केलं होतं.'

फोटो स्रोत, KCNA VIA KNS / AFP via Getty Images
यानंतर 2022 मध्ये एका क्षेपणास्त्र चाचणी दरम्यान किम जू आए सार्वजनिकरित्या पहिल्यांदा वडिलांसोबत दिसली होती. त्यानंतर काही लष्करी आणि निमलष्करी कार्यक्रमांमध्येही ती आपल्या वडिलांसोबत दिसली होती.
त्यानंतर पुढच्याच वर्षी फेब्रुवारीमध्ये तिचे फोटो टपाल तिकिटांवर दिसू लागले आणि त्यांनंतर उच्च अधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या मेजावानीमध्येही तिची उपस्थिती दिसू लागली.
याठिकाणी तिचा उल्लेख किम जाँग-उन यांची 'आदरणीय मुलगी' म्हणून करण्यात आला. 'आदरणीय' हे विशेषण उत्तर कोरियाच्या सर्वांत आदरणीय लोकांसाठी राखीव आहे.
किम जाँग-उन हे उत्तर कोरियाचे पुढचे नेते असतील हे निश्चित झाल्यावर त्यांना 'आदरणीय कॉम्रेड' म्हणून संबोधण्यात येऊ लागलं होतं.

फोटो स्रोत, KCNA
वृत्तसंस्था एपीनुसार, त्यावेळेस दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय गुप्तचर सेवेने दक्षिण कोरियाच्या नेत्यांना किम जू आएबाबतची अतिरिक्त माहिती दिली होती.
'एनआयएस'ने माहितीत सांगितंल होतं की, तिचं वय (त्यावेळेस) वय 10 वर्षांच्या आसपास आहे. राजधानी प्योंगयांगमध्ये ती घरीच अभ्यास करते. तिला घोडेस्वारी, पोहणं आणि स्किईंगची आवड आहे.
जानेवारी 2024 मध्ये एनआयएनने किम जू आए हिच्याकडे उत्तर कोरियाचे नेते किम जाँग-उन यांची उत्तराधिकारी म्हणून पाहिलं जातं असल्याची शक्यता व्यक्त केली होती.
मात्र, किम जाँग-उन हे अजूनही तुलनेने तरुण असून सर्व सांभाळत असताना एवढ्या लहान वयात मुलीला वारसदार घोषित करण्याची शक्यता कमी असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
ही शक्यता फार कमी असू शकते, असंही त्यांनी म्हटलं होतं.
2025 मध्ये प्रथमच देशाबाहेर सार्वजनिक उपस्थिती
किम जू आए अनेक कार्यक्रमात आपल्या वडिलांबरोबर दिसत आली आहे.
आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या प्रक्षेपणावेळी आणि लष्करी परेडमध्ये ती ती आपल्या वडिलांसोबत दिसली होती.
दरम्यान ती अनेक वेळा केंद्रस्थानी राहिली असून वरिष्ठ लष्करी कमांडर्सकडून तिला लष्करी सलामीही देण्यात आली आहे.
सप्टेंबर 2025 मध्ये ती पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या उत्तर कोरियाबाहेर तिची उपस्थिती पाहायला मिळाली.

फोटो स्रोत, KCNA
दरम्यान, उत्तर कोरियाच्या लोकांना असं सांगितलं जातं की, किम हे अतिशय पवित्र वंशातून येतात, त्यामुळे तेच देशाचं नेतृत्व करू शकतात.
1948 पासून उत्तर कोरियावर राज्य करणारे किम कुटुंब उत्तर कोरियाच्या लोकांना आपण 'पवित्र वंशा'तून येत असल्याचं सांगत आलंय. म्हणजेच देशाचं नेतृत्व करण्याचा अधिकार फक्त त्यांच्याकडेच आहे.
मात्र, काही तज्ज्ञांचा असा अंदाज आहे की किम जोंग उन यांनी आपल्या मुलीला पुढे आणून पितृसत्ताक राज्यात असलेले पूर्वग्रह कमी करण्याचा प्रयत्न केला असावा.
त्याचं कारण म्हणजे, यापूर्वी कधीही कोणत्याही महिलेने उत्तर कोरियाचं नेतृत्व केलेलं नाही.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











