'मी उभी जरी राहिले तरी माझं संपूर्ण अंग थरथरतं’ महिलांना ग्रासणारा हा अदृश्य रोग कोणता?

यास्मिन सिद्दीकी
फोटो कॅप्शन, यास्मिन सिद्दीकी
    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी

भारतातल्या लाखो बायकांपैकीच एक माझी आई आहे, जिने कधीच घरच्यांचं जेवण होण्याआधी जेवण केलं नाही, आणि अनेकदा तिने स्वतःहून उरलंसुरलं, शिळं अन्न खाल्लं आहे.

साहजिक आहे, ती गेली कित्येक वर्षं अॅनेमिक आहे. म्हणजेच तिच्यात रक्ताची कमतरता आहे. तीच नाही, माझ्या बहिणी, मैत्रिणी, शेजारणी, काकू, मावशी, आत्या, आजी पिढ्यांन् पिढ्या अॅनेमिक आहेत.

जगातली सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या भारतातल्या जवळपास निम्म्या बायका, गरीब, मध्यमवर्गीय, वेगवेगळ्या जातीधर्माच्या या आजाराने ग्रस्त आहेत आणि त्यांना माहितीही नाही. असं का? हेच जाणून घ्यायला मी प्रवास केला गाव, शहर आणि जंगलातून.

मुंबईच्या गोवंडी या झोपडपट्टीत आम्हाला भेटल्या यास्मिन सिद्दीकी आणि त्यांच्या तीन मुली.

यास्मिन यांच्या तिन्ही मुलीही अॅनेमिक आहेत. त्यांच्या एका मुलीचा तर रक्ताच्या कमतरतेमुळे आधी गर्भपात झाला आणि आता दुसरं बाळ जन्माला आलं तिचंही वजन अतिशय कमी होतं. त्यांची सर्वात धाकटी मुलगी फारच अशक्त आहे. याचं मूळ भूक आणि कुपोषणात आहे, त्यापाठोपाठ येतो अॅनेमिया. वाढत्या महागाईमुळे या कुटुंबाला रोजचं अन्न मिळत नाही. चहा पिऊन एक वेळेचं जेवण केलं जातं. मुंबईसारख्या मोठ्या शहरात असलेल्या भयंकर गरिबीचं हे रूप.

यास्मिन म्हणतात, “मी उभी जरी राहिले तर माझं संपूर्ण अंग थरथरतं. डोळ्यासमोर अंधारी येते.”

यास्मिन यांची मुलगी मेहरून्निसाचा गेल्या वर्षी गर्भपात झाला. ती म्हणते, “माझ्या पोटात जुळी बाळं होती, पण अशक्तपणा आणि रक्ताच्या कमतरतेमुळे चौथ्या महिन्यात माझा गर्भपात झाला. दुसऱ्या बाळाच्या वेळी गरोदर होते तेव्हाही आठव्या महिन्यात हिमोग्लोबिन एकदम कमी झालं. मला रक्ताच्या बाटल्या चढवाव्या लागल्या. तेव्हा मुलगी झाली तिचंही वजन खूपच कमी होतं. तीही मरता मरता वाचली.”

आता मेहरुन्निसाचा नवरा तिच्या खाण्यापिण्याकडे लक्षं देतोय, आणि बाळाकडेही लक्ष देतोय म्हणून दोघींची तब्येत जरा सुधारली.

पण यास्मिन यांना मात्र अजूनही दोन वेळेचं जेवण नीट मिळत नाही.

“मी औषधं घेत नाही. त्याला पैसे कुठून आणणार? जेवायचं म्हणाल तर घरातले सगळे जेवले की जे उरलेलं असेल ते मी खाते,” त्या म्हणतात.

यास्मिन यांची दुसरी मुलगी, अश्रा, हिलाही अनेक शारिरीक व्याधी आहेत. तिला डोळ्यांना कमी दिसतं. अशक्तपणामुळे ती फारवेळ उभी राहू शकत नाही, ना तिला फार श्रम करता येतात.

सरकार, डॉक्टर सांगतात की हिमोग्लोबिनच्या कमतरेवर उपाय म्हणजे सकस अन्न खाणं, पण इथे एका वेळेचं जेवण मिळण्याची मारामार. सरकारकडून औषधं मिळाली तरी ती पोटात राहाण्यासाठी मुळात पोटात अन्न नको का?

अश्रा म्हणते, “गोळ्या मिळतात सरकारी आरोग्य केंद्रातून, पण जेवायला नसतं काही. उपाशी पोटी त्या गोळ्या घेतल्या तर चक्कर येते, उलटी होते. मग कोणी गोळ्या घेत नाही.”

सरकारच्या एनेमियाविषयक कार्यक्रमाचे मुख्य सल्लागारांनी बीबीसीशी बोलताना मान्य केलं की अॅनेमियावर उपाय म्हणून या आर्यनच्या गोळ्या दिल्या जातात त्या प्रत्येक महिलेसाठी उपायकारक ठरत नाहीत.

अश्राला अनेक शारिरीक व्याधी आहेत
फोटो कॅप्शन, अश्राला अनेक शारिरीक व्याधी आहेत

वेगवेगळ्या आर्थिक स्तरातल्या, ग्रामीण-शहरी भागातल्या महिलांना अॅनिमियाचा त्रास असला तरी एक उपाय सगळ्यांना लागू करून चालणार नाही. त्या त्या वर्गाचे, ठिकाणाचेही वेगळे प्रश्न आहेत. त्यावर उपाय शोधायला हवा.

उदाहरणार्थ मुंबईच्या झोपडपट्टी भागात पसरलेली अस्वच्छता आणि दूषित अन्न यामुळे इथल्या महिलांना वर्म इन्फेस्टेशन म्हणजेच जंत होतात. अॅनेमियाचं हे एक प्रमुख कारण आहे, पण हे कदाचित तुम्हाला दुर्गम आदिवासी भागात आढळणार नाही.

डॉ राजेश प्रजापति गोवंडी भागात सेवा देतात आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते म्हणतात, “अस्वच्छ वातावरण, आणि दुषित अन्नामुळे इथल्या महिलांना जंत होतात. तसं झालं की तुम्ही जे काही खाल ते जंत शोषून घेतात आणि त्यामुळे या महिलांना पोषण मिळत नाही. त्यामुळे इथे उपचार करताना दर सहा महिन्यांना जंत काढून टाकण्यासाठी औषधं द्यावी लागतात त्यानंतरच रक्तवाढीची औषधं देता येतात.”

'मी दिवसभरातून पाच-सहा वेळेस पदार्थ बनवते, पण...'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मुंबईहून साधारण दोनशे किलोमीटरचा प्रवास करत आम्ही गाठलं नाशिक. इथे आम्हाला भेटली स्पर्धा परिक्षांची तयारी करणारी एक मध्यमवर्गीय गृहिणी. तिच्या घरात अन्नाचा तुटवडा नाहीये, पण घर, नवरा, दोन मुलं, स्वतःचा अभ्यास या सगळ्यात तिला जेवायला वेळ नाहीये.

“मी दिवसभरातून वेगवेगळे प्रकार पाच-सहा वेळेस बनवते, मुलांसाठी आणि मिस्टरांसाठी पण मला खायला वेळ मिळत नाही. नाश्ता वगैरै काही नसतो, धावपळच एवढी असते की काढून जरी ठेवला नाश्ता तरी खायला वेळ मिळत नाही,” ती म्हणते.

ती पुढे सांगते, “माझं हिमोग्लोबिन, नॉर्मल जे असतं, मिनीमन जे बायकांना 11-12 लागतं त्यापेक्षा नेहमीच कमी असायचं. 9-10 असायचं. पण यावेळेस खूपच चक्कर येत होत्या तेव्हा मी ब्लड चेक केलं तेव्हा मला समजलं की 6 पेक्षा कमी माझं हिमोग्लोबिन होतं.”

दीक्षाने वेळेवर ट्रीटमेंट घेतली त्यामुळे काही महिन्यात तिला बरं वाटलं, पण अजूनही तिचं धावपळीचं शेड्युल न बदलल्यामुळे त्यांना पुन्हा चक्कर येणं, अशक्तपणा असा त्रास सुरू झालाय. तिला वाटतंय की तिचं हिमोग्लोबिन परत कमी झालंय. आणि जेवण वेळेवर होत नाहीच, घरच्या बाईला ते विचारून नये.

दीक्षा कांबळे-निकम एका मध्यमवर्गीय कुटुंबातल्या आहेत
फोटो कॅप्शन, दीक्षा कांबळे-निकम एका मध्यमवर्गीय कुटुंबातल्या आहेत

स्वतःच्या जेवणाकडे लक्ष का देत नाही असं विचारल्यावर दीक्षा म्हणजे, “रोडवरती मला फ्रुट्स पण दिसतात. बाकीच्या गोष्टी पण दिसतात. तरी पण असं होत नाही की अरे, आपल्याला हिमोग्लोबिन कमी आहे, आपल्याला बाकीचे त्रास आहेत थांबून ते फ्रुट्स घ्यावेत किंवा घेतले तरी घरी आणून स्वतःसाठी खावेत.”

“पहिल्यापासून आपल्याकडे हे बिंबवलेलं असतं की थांब, तू मुलगी आहेस... तू थांब. तुझ्यासाठी आपण नंतर करू. अगोदर आपल्या भावांना दिलं जातं. नाही, त्याला बाहेर जायचं असतं, त्याला खेळायचं असतं. त्याला शिक्षण आहे असं म्हणत त्याला प्राधान्य दिलं जातं. पहिल्यापासून आपल्याकडे मुलीला डावललं जातं. तिला डावा हातच दिलेला असतो, जन्मापासून. तिचाही माईंडसेट असा बनत जातो की जी गोष्ट आहे ती आधी आपल्या घरातल्या मोठ्यांना, पुरुषवर्गाला किंवा आपल्या मुलांना दिली पाहिजे.”

स्वतःच्या जेवणाबदद्ल अपराधीपणाची भावना भारतीय महिलांमध्ये नेहमीच आढळली आहे. भले त्या गृहिणी असोत, कष्टकरी किंवा नोकरदार.

मध्यमवर्गाय घरात पुरेसं अन्न आहे, पण त्या घरातल्या महिलेवर पितृसत्ताक विचारांचा एवढा पगडा आहे की जेवण करताना तिला अपराधी वाटतं आणि आजार ओढावून घेतला जातो.

आदिवासी भागात ही एक मोठी समस्या

शहरी मध्यमवर्गापासून लांब ग्रामीण आदिवासी भागात जाताना मात्र हा आजार भयंकर मोठी समस्या बनून समोर येतो.

तिथे ना पुरेसं अन्न, ना आरोग्य सुविधा, आणि बायकांना दुय्यम समजण्याची वृत्ती ठासून भरलेली.

इथेच आम्हाला भेटली रूनाली पावरा.

रुनाली फारशी बोलत नाही, पण तिच्या डोळ्यात तिचं दुःख दिसत राहातं. ती जेमतेम तिशीची आहे पण वयाने खूप मोठी दिसते कारण तिच्या शरीराने तेवढे धक्के पोचवले आहेत. तिची पाच बाळंतपणं झाली आणि त्यातली चार मुलं बाळ असतानाच गेली.

रुनालीने आपली चार बाळं जन्मानंतर गमावली आहेत
फोटो कॅप्शन, रुनालीने आपली चार बाळं जन्मानंतर गमावली आहेत

रूनालीची मुलं जगत नाहीत म्हणून तिच्या नवऱ्याने आता दुसरी बायको करून आणली आहे. तिच्या कृश अंगकाठीवरूनच जाणवतं की तिला गंभीर स्वरुपाचा अॅनेमिया आहे. तिला आताच एक महिन्यापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन रक्त दिल्याचं तिच्या नवऱ्याने सांगितलं.

या आदिवासी भागात अन्न मिळत असलं तरी एकाच प्रकारचं आहे, त्यात विविधता नाही, त्यामुळे शरीराला आवश्यक ती पोषणमुल्यं मिळत नाहीत. दुसरं म्हणजे आत्यंतिक शारिरीक कष्टाची कामं, त्यातुलनेत कमी कॅलरीजचं सेवन, त्यामुळे इथल्या बायकाच नाही, तर पुरुष, मुलं सगळेच अॅनेमिक असण्याचा धोका वाढतो. इथे जनजागृतीचा अभाव दिसतो.

त्याबदद्ल बोलताना इथे काम करणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणतात, “अवेअरनेस नसल्यामुळे एक नकारात्मकता असते या महिलांच्या मनामध्ये. त्या गोळ्या रेग्युलरली घेत नाही. त्यामुळे बऱ्याचदा जेव्हा आपण आदिवासी पाड्यांमध्ये किंवा खेडेगावांमध्ये फिरतो तेव्हा या गोळ्या आपल्याला उकिरड्यावर पडलेल्या दिसतात.”

अॅनिमिया या आजाराचे अनेक स्तर

भारतात महिलांमध्ये आढळणाऱ्या अॅनिमिया या आजाराचे अनेक स्तर आहेत. त्यात वरकरणी जी कारणं दिसतात ती महत्त्वाची आहेतच, पण खोलात गेलं तर इतर कारणही महिलांच्या आरोग्यावर परिणाम करताना दिसतात.

ती कोणती तर बालविवाह, सततची बाळंतपणं, स्थलांतर.

स्थलांतर, बालविवाह अशी अनेक कारण महिलांच्या आरोग्यावर परिणाम करतात
फोटो कॅप्शन, स्थलांतर, बालविवाह अशी अनेक कारण महिलांच्या आरोग्यावर परिणाम करतात

ते विशद करताना संदीप म्हणतात, “स्थलांतर हा प्रचंड महत्त्वाचा मुद्दा आहे. जोपर्यंत आदिवासी, ग्रामीण भागातल्या कष्टकरी महिलांचं मजुरीसाठी स्थलांतर थांबत नाही तोपर्यंत या महिलांचं आरोग्य चांगलं राहू शकत नाही. कारण मुलाबाळांना घेऊन स्थलांतर करावं लागतं. दुसरं म्हणजे स्थलांतरच्या प्रक्रियेत सरकारी यंत्रणा कितपत या लोकांना सहकार्य करते हे जर का पाहिलं तर त्याच्या फारसं हे लोक मदत करताना दिसत नाहीत.”

“संततीनियमन व्यवस्थित नसलं आणि खूप जास्तीचे मुलं जन्माला आले, तर त्याचा परिणाम कुपोषणाच्या माध्यमातून मुलांवर होतोच. त्यामुळे कुटुंब नियोजन हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बालविवाह थांबवणं.”

आकडेवारी काय सांगते?

नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे 4 च्या आकडेवारी नुसार भारतात 57 ट्कके महिला अॅनिमिक आहेत तर 60 टक्के लहान मुलं अॅनिमिक आहेत. पाळी येण्याच्या वयातल्या किंवा त्यापेक्षा लहान मुली अॅनिमिक आहेत, लग्न झालेल्या मुलं होण्याच्या वयातल्या, गरोदर महिला अॅनिमिक आहेत, पण त्याचबरोबरीने मेनोपॉजमधून जाणाऱ्या, वयाची चाळीशी पन्नाशी उलटलेल्या महिलाही अॅनिमिक आहेत.

पण सध्या सरकारच्या सगळ्या धोरणांचा रोख सध्या गरोदर महिला, तसंच स्तनदा मातांवर दिसतो. माता तसंच बालमृत्यू टाळण्यासाठी हे महत्त्वाचं आहे, पण त्यामुळे इतर वयोगटातल्या महिलांकडे दुर्लक्ष होतंय का हा प्रश्न उभा राहातो.

पोषणमुल्यांच्या कमरतेमुळे होणारा अॅनिमिया रोखण्यासाठी भारत सरकाने पहिला आरोग्य कार्यक्रम सत्तरच्या दशकात सुरू केला होता. म्हणजे पन्नास वर्षांपूर्वी. 2018 साली मोदी सरकारनेही अॅनिमिया रोखण्यासाठी एक महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट सुरू केला ज्याचं नाव आहे अॅनिमिया मुक्त भारत.

त्या कार्यक्रमाअंतर्गत आर्यन आणि फॉलिक एसिडची कमतरता पूर्ण करण्यासाठी गोळ्या देणं, सकस अन्न खाण्यासाठी प्रोत्साहित करणं अशा अनेक गोष्टी येतात. दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये सेंटर फॉर कम्युनिटी मेडिसीनचे एडिशन प्रोफसर असाणारे कपिल यादव यांनी याबद्दल सांगितलं.

ते म्हणतात, “आपला आहारविहार बदलतोय, खाण्याच्या सवयी बदलत आहेत ते पाहाता अॅनिमियाचं प्रमाण वाढायला हवं होतं. पण सरकारच्या प्रयत्नांनी आपण अॅनिमियाचं प्रमाण कमी करू शकलो नाही तरी वाढू दिलेलं नाही. पण तरीही हेही खरं की अॅनिमिया रोखण्यासाठी आपल्याकडे विज्ञान, उपचार, तज्ज्ञ डॉक्टर्स, सरकारी धोरणं आणि निधी सगळं असलं तरी जनसामान्यांमध्ये याबद्दल जागरूकता नाही, त्यामुळे याचा म्हणावा तसा फायदा होताना दिसत नाही.”

ते पुढे म्हणतात, “याचं एक मुख्य कारण म्हणजे अॅनिमिया एक अदृश्य आजार आहे. ज्याला आहे त्याला कळत नाही. त्यांच्या कामाच्या क्षमतेवर परिणाम होतो, त्यांना थकवा जाणवतो, ते अभ्यासात मागे पडू शकतात तरीही त्यांना कळत नाही की हे का होतंय.”

अॅनिमियाची लक्षणं काय आहेत?

  • सततचा थकवा
  • चक्कर येणं
  • डोळ्यासमोर अंधारी येणं
  • चिडचिड होणं
  • अशक्तपणा

अॅनिमियाची कारणं

  • आहारात आर्यन, व्हिटॅमिन्स अशा पोषण मुल्यांची कमतरता
  • पाळीच्या काळात अति रक्तस्राव होणं
  • मलेरिया, टीबी सारख्या संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव
  • अस्वच्छ खाण्यामुळे पोटात जंत होणं
  • आनुवांशिकता
महिलांना सर्वांगिण आरोग्य पुरवण्यासाठी भारताला अजून बरेच प्रयत्न करावे लागतील
फोटो कॅप्शन, महिलांना सर्वांगिण आरोग्य पुरवण्यासाठी भारताला अजून बरेच प्रयत्न करावे लागतील

सरकारी पातळीवर काय प्रयत्न होत आहेत?

  • गरोदर महिलांना आर्यनच्या गोळ्या देणं
  • स्तनदा माता आणि लहान मुलांसाठी पोषण आहार देणं
  • रेशन दुकानांवर फोर्टिफाईड राईस म्हणजेच आर्यनचं प्रमाण जास्त असणारा तांदूळ वितरित करणं
  • डबल फोर्टिफाईड सॉल्ट, म्हणजे आयोडिन आणि आर्यन दोन्ही असणारं मीठ पुरवणं

भारत सरकार संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकासाच्या आराखड्यावर काम करतंय. याअंतर्गत 2030 पर्यंत 16 उदिष्टं पूर्ण करायची आहेत. यातलंच एक उदिष्ट आहे सगळ्यांसाठी आरोग्य आणि कल्याण.

पण तज्ज्ञांना वाटतं की हे उदिष्ट गाठण्यासाठी, विशेषतः भारतीय महिलांच्या बाबतीत, बराच काळ लागेल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.