केटामाईन: भारतात तयार होणाऱ्या औषधाचा ड्रग्ज म्हणून वापर, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे रॅकेट चालते कसे?

युरोपात औषध उद्योगात केटामाईनला मोठी मागणी आहे.
फोटो कॅप्शन, युरोपात औषध उद्योगात केटामाईनला मोठी मागणी आहे.
    • Author, पॉल केनिऑन आणि पॉल ग्रांट
    • Role, बीबीसी फाईल ऑन 4 इनव्हेस्टिगेस्ट्स

ब्रसेल्सच्या (बेल्जियमची राजधानी) विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांना तो माल तपासताना मोठा धक्काच बसला. एका ट्रकच्या मागच्या बाजूला ठेवलेलं क्रेट उघडलेलं होतं. त्यात टनभर केटामाईन हे औषध सापडेल अशी त्यांची अपेक्षा होती.

मात्र तसं झालं नव्हतं. या अधिकाऱ्यांना तिथे चक्क मीठ मिळालं होतं.

केटामाईन हे पांढऱ्या पावडरच्या रूपात असलेलं एक औषध असतं. त्याचा वापर वेदनाशामक म्हणून केला जातो. नैराश्य आणि अ‍ॅनेस्थेशियासाठी त्याचा वापर वैद्यकीय स्तरावर केला जातो.

त्यामध्ये अ‍ॅनल्जेसिक आणि हॅल्युसिनोजेनिक (भ्रम निर्माण करणारे, धुंदीत नेणारे) गुणधर्म असतात. युरोपमधील औषध उद्योगात केटामाईनला मोठी मागणी आहे.

युरोपातील अनेक देशांमधून शेकडो मैलांचा वेडावाकडा प्रवास करून आलेल्या केटामाईनच्या या खेपेची तपासणी पाच दिवसांपूर्वीच कस्टम अधिकाऱ्यांनी नेदरलँड्समधल्या शिपोल विमानतळावर केली होती. तिथून पुढे ते केटामाइन रस्ते मार्गानं बेल्जियममध्ये जाणार होतं.

मात्र, एखाद्या सिनेमात घडावं त्याप्रमाणे पुढचा घटनाक्रम घडला.

अ‍ॅमस्टरडॅम आणि ब्रसेल्स या दोन शहरांदरम्यानच्या प्रवासात हे केटामाईन गायब झालं आणि त्याऐवजी तिथं चक्क मीठ आलं. त्यासाठी नव्यानं बनावट कागदपत्रंही बनवली गेली होती.

हे केटामाईन काळ्या बाजारात गेलं असावं, असा अधिकाऱ्यांचा संशय आहे. हे केटामाईन शेवटी कुठे गेलं याबद्दल यंत्रणांना काहीही माहिती नाही. तसंच यासाठी जबाबदार असणाऱ्या कोणालाही अटक झालेली नाही.

युरोपात औषध म्हणून येतं, वापर होतो अंमली पदार्थ म्हणून

या एका प्रकरणातून युरोप आणि युकेमध्ये होत असलेली केटामाईनची तस्करी, गुन्हेगारी टोळ्या वापरत असलेल्या गुंतागुंतीच्या पद्धतींमध्ये होत असलेली वाढ दिसून येते.

केटामाईनला कायदेशीर औषध म्हणून दाखवत गुन्हेगारी टोळ्यांकडून असंख्य देशांच्या सीमांमधून त्याची वाहतूक केली जाते आणि अधिकाऱ्यांना गोंधळात टाकलं जातं. त्यानंतर औषधाची खेप गायब होते.

त्यानंतर बेकायदेशीररीत्या हॅल्युसिनोजनिक पदार्थ म्हणजे धुंदीत नेणारा अंमली पदार्थ म्हणून त्याची विक्री केली जाते.

केटामाईन या औषधी पदार्थाचा अंमली पदार्थ म्हणून होत असलेला वापर हीच या सर्व प्रकारातील मेख आहे.

 बेल्जियमच्या केंद्रीय औषध संचालनालयाचे प्रमुख मार्क व्हॅनकॉईली
फोटो कॅप्शन, बेल्जियमच्या केंद्रीय औषध संचालनालयाचे प्रमुख मार्क व्हॅनकॉईली

"गुन्हेगारी टोळ्या केटामाईनची तस्करी करण्याची या सर्व लांबच्या मार्गांचा वापर करत असल्याचं स्पष्ट आहे," असं मार्क व्हॅनकॉईली म्हणतात. ते बेल्जियमच्या केंद्रीय औषध संचालनालयाचे प्रमुख आहेत.

2023 मधील या प्रकरणापासून या प्रकारे केटामाईनची मिठासोबत अदलाबदल केल्याच्या किमान 28 खेपा बेल्जियममधील तपास अधिकाऱ्यांनी पकडल्या आहेत. या खेपांद्वारे किमान 28 टन केटामाईनची तस्करी करण्यात आल्याचा अंदाज आहे.

अनेक गुन्हेगारी टोळ्या अंमली पदार्थांची तस्करी करून प्रचंड कमाई करत असतात. आता त्यांना कमाईचं एक नवं भन्नाट साधन सापडलं आहे, ते म्हणजे केटामाईन. कोकेनसारख्या इतर अंमली पदार्थांऐवजी केटामाईनची विक्री करून या टोळ्या अधिक पैसे कमवत आहेत, असं व्हॅन्कॉईली यांनी सांगितलं.

त्यांना केटामाईनची तस्करी आणि त्याचे परिणाम म्हणजे एखाद्या महासाथीसारखे असतात.

केटामाईनचा अंमली पदार्थ म्हणून वाढता वापर

2023 ते 2024 या कालावधीत केवळ युरोपमध्येच केटामाईनचा वापर 85 टक्क्यांनी वाढला असल्याचं दिसून आलं आहे. हा खप देखील एका अनोख्या पद्धतीनं शोधण्यात आला आहे. सांडपाण्याचं विश्लेषण करून ही माहिती घेण्यात आली आहे.

सांडपाण्याचं व्यवस्थापन करणाऱ्या प्रकल्पामधून मानवी मलमूत्राचे नमुने घेऊन या बेकायदेशीर औषधाच्या वापराचं प्रमाण मोजण्यात आलं आहे.

ताज्या आकडेवारीतून असं दिसतं की, 2023 मध्ये केटामाईनच्या वापरामुळे 53 मृत्यू झाले आहेत.

यात हाय प्रोफाईल, सेलिब्रिटींचाही समावेश आहे. फ्रेंड्स शोमधील अभिनेता मॅथ्यू पेरी आणि ड्रॅग स्टार 'द व्हिव्हियन' यांच्या मृत्यूचा संबंधदेखील केटामाईनशी जोडला गेला आहे.

धुंदी आणण्यासाठी किंवा नशा करण्यासाठी म्हणून केटामाईनचा वापर केल्यास आकलन शक्तीशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. मूत्राशयाचंदेखील कायमस्वरुपी नुकसान होऊ शकतं.

प्रतिकात्मक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, युरोपात केटामाईनची सर्वाधिक आयात जर्मनीमध्ये होते. (प्रतिकात्मक फोटो)

"युकेमधील संघटित गुन्हेगारी टोळ्या केटामाईनच्या या नव्या बाजारात स्पष्टपणे उतरल्या आहेत," असं नॅशनल क्राईन एजन्सीचे (एनसीए) अ‍ॅडम थॉम्पसन म्हणतात.

जर केटामाईनचा अंमली पदार्थ म्हणून इतका गैरवापर होत आहे, मोठ्या प्रमाणात तस्करी होते आहे तर संबंधित यंत्रणा ते का थांबवत नाही, हा प्रश्न आहे.

केटामाईनचा वापर हॉस्पिटल आणि पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये भूल देण्यासाठी एक महत्त्वाचं प्रमाणित (अ‍ॅनेस्थेटिक) औषध म्हणून केला जातो. त्यामुळे युरोपातील कायदेशीर यंत्रणा किंवा अंमलबजावणी संचालनालयांसमोरचं आव्हान अधिक मोठं आणि गुंतागुंतीचं झालं आहे.

केटामाईन एकाच वेळी औषध आणि अंमली पदार्थ म्हणून वापरात असल्याचा गैरफायदा संघटित गुन्हेगारी टोळ्या कशाप्रकारे घेत आहेत याचा अभ्यास, बीबीसीच्या फाईल ऑन 4 इन्व्हेस्टिगेस्ट्सनं केला आहे.

तस्करांकडून वेगवेगळ्या युक्त्यांचा अवलंब

युके आणि बेल्जियमसारख्या देशांमध्ये केटामाईनचं वर्गीकरण नार्कोटिक म्हणजे अंमली पदार्थ म्हणून करण्यात आलं आहे.

मात्र युरोपातीलच ऑस्ट्रिया, जर्मनी आणि नेदरलँडसारख्या इतर देशांमध्ये केटामाईनला औषध म्हणून कायदेशीर मान्यता आहे. त्यामुळे साहजिकच त्याची आयात करताना आणि वाहतूक करताना तुलनेनं कमी तपासणी होते.

"सुरुवातीच्या टप्प्यात, केटामाईनची निर्यात भारतासारख्या देशांमधून ऑस्ट्रिया, जर्मनी आणि नेदरलँड्ससारख्या देशांमधील बाजारपेठेत केली जाते. मात्र संघटित गुन्हेगारी टोळ्या नंतर हे केटामाईन बेकायदेशीर बाजारपेठेत किंवा काळ्या बाजारात वळवतात," असं थॉम्पसन म्हणतात.

केटामाईनची तस्करी करणाऱ्या टोळ्यांना केटामाईनच्या या सर्व प्रवासाची, प्रवासातील सर्व टप्प्यांची चांगली माहिती आहे. त्याच्या आधारे त्यांनी त्यांना सोयीचा असलेला एक मार्ग विकसित केला आहे.

यात केटामाईनची भारतात एक औषध म्हणून कायदेशीररीत्या उत्पादन केलं जातं. भारतातून मग ते जर्मनीत निर्यात केलं जातं. तिथून ते नेदरलॅंड्स आणि बेल्जियमला जातं. नंतर ते युकेमध्ये पाठवलं जातं.

ग्राफिक्स

ब्रसेल्स विमानतळावर केटामाईन गायब होऊन त्या जागी मीठ सापडल्याच्या प्रकरणाबद्दल आपण सुरुवातीलाच पाहिलं आहे. या प्रकरणात सुरुवातीला केटामाईन भारतातून ऑस्ट्रियात आलं.

त्यानंतर ते जर्मनीत नेण्यात आलं. तिथून ते नेदरलँड्सला पाठवण्यात आलं. शेवटी ते रस्ते मार्गानं बेल्जियमला पाठवलं जाणार होतं. या सर्व प्रवासात केटामाईनची वाहतूक कायदेशीररीत्या करण्यात आली होती.

मात्र शेवटच्या टप्प्यात कुठेतरी त्या केटामाईनची मीठाशी अदलाबदल करण्यात आली. तिथून ते केटामाईन बेकायदेशीर विक्रीसाठी काळ्या बाजारात पाठवण्यात आल्याचा अंदाज आहे.

दुसऱ्या एका प्रकरणात, केटामाईनचा असाच एक कंटेनर बेल्जियममधील अँटवर्प बंदरात येणार होता. प्रत्यक्षात बंदरात आल्यावर कंटेनरमध्ये केटामाईनऐवजी साखर असल्याचं आढळून आलं.

तपास यंत्रणांसमोर मोठं आव्हान

केटामाईनची तस्करी करताना संघटित गुन्हेगारी टोळ्या, पळवाटांचा पुरेपूर फायदा उचलत आहेत. केटामाईनला कायदेशीर औषध म्हणून मान्यता असल्यामुळे या कायदेशीर पुरवठा साखळ्यांचा वापर करण्यासाठी ते बनावट कंपन्या स्थापन करत आहेत.

या कंपन्यांद्वारे ते केटामाईनची आयात करतात. युरोपात आल्यानंतर मात्र वेगवेगळ्या देशांमध्ये हा माल हलवून नंतर ते काळ्या बाजारात पाठवलं जातंय.

बेल्जियम आणि डच पोलिसांनी बीबीसीला सांगितलं की, कायदेशीर यंत्रणा किंवा तपास अधिकाऱ्यांना याचा सुगावा लागू नये किंवा नक्की याचं मूळ कुठे आहे, हे लक्षात येऊ नये म्हणून या टोळ्या अनेक देशांमधून हा माल फिरवतात.

त्यामुळे एकदंरीतच त्याला ट्रॅक करणं गुंतागुंतीचं होऊ बसतं. त्यामुळे त्याचा तपास करणं अधिक कठीण होतं. या इतक्या गुंतागुंतीचा प्रकाराला आळा घालण्यासाठी वेगवेगळ्या देशांच्या अंमलबजावणी संचालनालयं किंवा कायदेशीर यंत्रणांमध्ये संपर्क आणि समन्वय आवश्यक आहे.

केटामाईन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतिकात्मक फोटो
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या गुंतागुंतीच्या मार्गामुळे ज्या कंपनीच्या नावावर केटामाईनची युरोपात आयात केली जाते आणि ज्या कंपनीकडे केटामाईनच्या आयातीचा कायदेशीर परवाना आहे, त्या कंपनीला लपवणं देखील या टोळ्यांना शक्य होतं.

"या टोळ्या या सर्व हाताळणीत वेगवेगळ्या देशांमधील कंपन्यांद्वारे वेगवेगळ्या प्रकारची पावलं उचलतात. त्यामुळे नेमका हा माल कोणी मागवला आहे, तो मुळात कोणत्या कंपनीनं आयात केला आहे, याचा छडा लावणं आमच्यासाठी कठीण ठरतं," असं डच पोलिसांचे अंमली पदार्थ तज्ज्ञ इन्स्पेक्टर पीटर जॅन्सन म्हणाले.

युरोपात केटामाईनची सर्वाधिक आयात जर्मनीमध्ये होते.

जर्मनीत औषधनिर्मिती उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. साहजिकच तिथे केटामाईनची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. त्यामुळे तिथे केटामाईन मोठ्या प्रमाणात आयात केल्यास त्याबद्दल संशय येण्याची शक्यता कमी असते.

व्हॅन्कॉईली म्हणतात की, 2023 मध्येच भारतातून 100 टन केटामाईन आयात करण्यात आलं होतं. कायदेशीर मान्यता असलेली औषधं आणि पशुवैद्यकीय वापरासाठी आवश्यक असल्यापेक्षा हे प्रमाण खूपच अधिक होतं.

त्यांनी आम्हाला सांगितलं, "यातील 20 ते 25 टक्के केटामाईन कायदेशीररीत्या तयार होणाऱ्या औषधांसाठी आवश्यक असेल,पण त्यापेक्षा अधिक नाही. मात्र प्रत्यक्षात टनावारी केटामाईन बेकायदेशीर मार्गानं काळ्या बाजारात गायब झालं."

युरोपियन पोलीस दलांचं म्हणणं आहे की, केटामाईनच्या या तस्करीला आळा घालण्यासाठी ते भारतीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याची योजना आखत आहेत.

जर्मनीच्या फेडरल क्रिमिनल पोलिसांनी आम्हाला सांगितलं की, ते केटामाईनसारख्या नवीन सायकोॲक्टिव्ह पदार्थांवर अतिशय बारकाईनं लक्ष ठेवून आहेत.

त्यांनी पुढे सांगितलं की, "पुढील घडामोडी आणि यासंदर्भातील नवीन ट्रेंडचं आकलन करण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अधिकारी, यंत्रणा आणि संस्था एकमेकांशी संपर्क ठेवून आहेत."

'गवताच्या गंजीमध्ये सुई शोधण्यासारखं आहे'

इंग्लंड आणि वेल्समध्ये केटामाईनची तस्करी करणाऱ्या टोळ्या मोठी कमाई करत आहेत. कारण तिथे केटामाईनचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आहे.

तिथे मार्च 2024 अखेरीपर्यंत 16 ते 59 वर्षे वयोगटामधील अंदाजे 2,69,000 लोकांनी केटामाईनचा वापर केला असल्याचं सरकारच्या आकडेवारीतून दिसून येतं.

2013 पासून 16-24 वर्षे वयोगटातील तरुणांमध्ये केटामाईनचा वापर तब्बल 231 टक्क्यांनी वाढला आहे. यावरून केटामाईनच्या खपाचा अंदाज येतो.

अर्थात, केटामाईन इतक्या मोठ्या प्रमाणात का वापरलं जातं हा प्रश्न या पार्श्वभूमीवर पडतो. यामागचं कारण आर्थिक आहे.

प्रतिकात्मक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतिकात्मक फोटो

एनसीएचे ॲडम थॉम्पसन यांनी हे आर्थिक गणित समजावून सांगितलं, "इतर बेकायदेशीर अंमली पदार्थांच्या किमतीचा विचार करता केटामाईन हा अतिशय स्वस्त पदार्थ आहे. रस्त्यावर प्रति ग्रॅम 20 पौंडांना केटामाईनची विक्री होते. तर त्याउलट एक ग्रॅम कोकेनसाठी 60 ते 100 पौंड मोजावे लागतात."

युकेमध्ये केटामाईनची तस्करी दोन मुख्य मार्गांनी होते. यातील पहिला म्हणजे, ते छोट्या पाकिटांमध्ये पॅक करून पोस्टानं पाठवलं जातं. दुसरा मार्ग म्हणजे ट्रक किंवा व्हॅनमध्ये लपवून ते जहाजांद्वारे खाडीच्या बोगद्यातून (चॅनेल टनेल) आणलं जातं, असं एनसीएला वाटतं.

युकेमध्ये अशाप्रकारे केटामाईनची हजारो, लाखो पार्सल येतात. मात्र त्यातील फार थोडं पकडलं जातं. यामागचं कारण म्हणजे, "गवताच्या ढिगाऱ्यात किंवा गंजीमध्ये सुई लपवण्यासारखं आहे," असं थॉम्पसन म्हणतात.

बेल्जियममध्ये काही गुन्हेगारी टोळ्या केटामाईन साठवण्यासाठी एअरबीएनबीचा वापर करत आहेत. नंतर ते कार किंवा ट्रकनं फ्रान्समध्ये हे केटामाईन पाठवतात, असं व्हॅन्कॉईली यांना वाटतं.

एका प्रकरणात पुरुषांच्या एका गटाची हालचाल संशयास्पद वाटत असल्याची तक्रार करण्यात आली होती. ते वाहन भाड्यानं घेण्यात आलं होतं.

त्यामुळे अधिकाऱ्यांना त्या गाडीचा छडा लावता आला. याआधी ती गाडी स्वीडन, बेल्जियममध्ये एअरबीएनबीमध्ये वापरण्यात आली होती.

प्रतिकात्मक फोटो
फोटो कॅप्शन, यात केटामाईनची भारतात एक औषध म्हणून कायदेशीररीत्या उत्पादन केलं जातं.

अधिकाऱ्यांनी जेव्हा एअरबीएनबीच्या बाबतीत पुढील तपास केला, तेव्हा त्यांना एका गॅरेजमध्ये 480 किलो (1,058 पौंड) केटामाईन, 117 किलो कोकेन आणि 63 किलो हेरॉईन साठवलेलं सापडलं.

त्या प्रकरणात शेवटी आठ ब्रिटिश नागरिकांचा सहभाग आढळून आला आणि त्यांच्यावर खटला चालवण्यात आला.

केटामाईनचा वापर वाढतो आहे आणि त्याची तस्करी करण्यासाठी गुन्हेगारांच्या टोळ्या अधिक कल्पक, नवनवीन मार्ग शोधत आहेत. त्यामुळे त्याला आळा घालण्यासाठी युरोपातील अधिकारी, यंत्रणा आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी सहकार्याची मागणी करत आहेत.

केटामाईनच्या तस्करीचं संकट युरोपात जरी वाढत असलं तरी त्याचा परिणाम जगभरात होऊ शकतो. त्यामुळेच याची दखल सगळ्या जगानंच घेण्याची आवश्यकता आहे, असं तिथल्या यंत्रणांना वाटतं.

"केटामाईनच्या तस्करीबद्दल विचार करणं, ही जगभरातील देशांमधील तपास यंत्रणा, कायदेशीर संस्थांची जबाबदारी आहे," असा इशारा थॉम्पसन देतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)