'मुलाला दोष दिला जातोय, हे ओझं घेऊन जगू नका', सुमीत सभरवालांच्या वडिलांना सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं?

अहमदाबाद विमान अपघात

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, थियो लेगेट
    • Role, आंतरराष्ट्रीय बिझनेस प्रतिनिधी

अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या पाच महिन्यांनी या अपघाताची चौकशी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. भारताच्या सुप्रीम कोर्टानंही यावर आपलं मत व्यक्त केलंय. या विमान अपघातात 260 जणांचा मृत्यू झाला होता.

12 जून 2025 रोजी फ्लाईट-171 अहमदाबादहून लंडनकडे निघाली होती. उड्डाण घेतल्यानंतर पुढच्या 32 सेकंदातच विमान एका इमारतीला जाऊन धडकलं.

यानंतर जुलै महिन्यात अंतरिम अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. मात्र, टीकाकारांचे म्हणणं आहे की, या अहवालात पायलटला अन्यायकारकपणे लक्ष्य करण्यात आलंय आणि विमानातील संभाव्य तांत्रिक बिघाडावरचं लक्ष हटवलं गेलंय.

शुक्रवारी (7 नोव्हेंबर) सुप्रीम कोर्टातील एका न्यायमूर्तींनी म्हटलं की, अपघातासाठी विमानाच्या कॅप्टनला दोषी धरता येत नाही.

एकीकडे एअरलाइनच्या प्रमुखांनी दावा केलाय की, विमानात कोणताही बिघाड नव्हता. अशावेळी न्यायमूर्तींनी पायलटबाबत केलेलं वक्तव्य महत्त्वाचं मानलं जातंय.

गेल्याच महिन्यात म्हणजे, ऑक्टोबरच्या शेवटी नवी दिल्लीतील 'एव्हिएशन इंडिया 2025 समिट' दरम्यान झालेल्या पॅनेल चर्चेत एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन यांनी मान्य केलं होतं की, हा अपघात 'या घटनेत सहभागी लोकांसाठी, त्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी पूर्णपणे विनाशकारी' होता.

मात्र, त्यांनी हे ठामपणे सांगितलं की, भारतीय अधिकाऱ्यांच्या प्राथमिक चौकशी अहवालात असं सूचित करण्यात आलं होतं की 'विमान, इंजिन किंवा एअरलाइनच्या ऑपरेशनमध्ये कोणतीही बिघाड नव्हती.'

दरम्यान, त्यांनी असंही म्हटलं की, एअर इंडिया तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करत होती, मात्र थेट चौकशीत सहभागी नव्हती.

अंतरिम अहवालावर वाद का झाला?

ही दुर्घटना भारतात घडली असल्याने चौकशी एअर अ‍ॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) या भारतीय संस्थेकडून केली जात आहे. मात्र, विमान आणि त्याचं इंजिन अमेरिकेत डिझाइन आणि तयार करण्यात आलं असल्यामुळे अमेरिकन अधिकारीही या तपासात सहभागी आहेत.

अपघातानंतर फक्त एका महिन्याने AAIB ने प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला. मोठ्या अपघातांच्या चौकशीत ही एक सामान्य प्रक्रिया असते, ज्यात त्या वेळेपर्यंत मिळालेल्या माहितीचा सारांश दिला जातो.

हा अहवाल सामान्यतः अपघातस्थळावरील तपासातून मिळालेल्या माहितीवर आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधील प्राथमिक आकडेवारीवर आधारित असतो. या टप्प्यावर अपघाताच्या कारणांबाबत ठोस निष्कर्ष दिले जात नाहीत.

मात्र, एअर इंडिया-171 संदर्भातील 15 पानी अहवाल दोन छोट्या परिच्छेदांमुळे वादात सापडला.

अहमदाबाद विमान अपघात

फोटो स्रोत, Reuters

पहिल्या परिच्छेदात लिहिले होते की, टेकऑफ झाल्यानंतर काही सेकंदांतच फ्यूएल स्विच 'रन' स्थितीऐवजी कटऑफ स्थितीत गेले होते. हे स्विच सामान्यतः उड्डाणापूर्वी इंजिन सुरू करण्यासाठी आणि उड्डाणानंतर बंद करण्यासाठी वापरले जातात.

त्यामुळे इंजिनाला होणारा इंधन पुरवठा थांबला आणि विमानाने थ्रस्ट, म्हणजे उंचीवर जाण्याची क्षमता, गमावली.

मात्र, पायलट्सनी पुन्हा इंजिन सुरू करण्यासाठी स्विच परत 'रन' स्थितीत नेले, पण तेव्हापर्यंत खूप उशीर झाला होता.

यानंतर अहवालात म्हटलं आहे की, "कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये एक पायलट दुसऱ्याला विचारताना ऐकू आला की, त्याने हे कटऑफ का केले? त्यावर दुसरा पायलट म्हणताना ऐकू आला की, त्याने तसं केलंच नाही."

पायलटना दोष देणं कितपत योग्य?

या अप्रत्यक्ष संभाषणामुळे दोन्ही पायलट्स, कॅप्टन सुमीत सभरवाल आणि सह-पायलट क्लाईव्ह कुंदर, यांच्या भूमिकेबद्दल तर्क-वितर्क सुरू झाले.

नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डचे माजी अध्यक्ष रॉबर्ट समवाल्ट यांनी म्हटलं की, अहवालातून स्पष्ट होतं की "ही विमान किंवा इंजिनशी संबंधित समस्या नव्हती."

त्यांनी अमेरिकन नेटवर्क CBS ला सांगितलं, "कोणीतरी जाणूनबुजून इंधन बंद केले होते का, की चुकून तसे झाले?"

भारतीय एव्हिएशन सेफ्टी कन्सल्टंट कॅप्टन मोहन रंगनाथन यांनी NDTV ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, या अपघातामागे पायलटच्या आत्महत्येचा संशय असू शकतो.

त्यांनी म्हटलं, "मी तो शब्द वापरू इच्छित नाही, पण ऐकण्यात आलं आहे की, पायलटची काही वैद्यकीय पार्श्वभूमी होती, त्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही."

अहमदाबाद विमान अपघात

पीडित कुटुंबांचे वकील माईक अँड्र्यूज यांनी म्हटलं की, माहिती ज्या पद्धतीने सार्वजनिक केली गेली, त्यामुळे "लोकांनी अपूर्ण माहितीनुसार अन्यायकारकपणे पायलट्सना दोषी ठरवायला सुरुवात केली."

त्यांनी पुढे सांगितलं, "अशा गुंतागुतींच्या विमानांमध्ये अनेक गोष्टी चुकीच्या जाऊ शकतात. दोन छोट्या माहितीचे संदर्भाशिवाय विश्लेषण करून पायलट्सवर आत्महत्या किंवा सामूहिक हत्या करण्याचा आरोप लावणे पूर्णपणे चुकीचे आहे."

सुप्रीम कोर्टानं म्हटलं, 'पायलट दोषी नाहीत'

विमानसुरक्षेसंदर्भात काम करणारे सेफ्टी मॅटर्स फाउंडेशनचे संस्थापक कॅप्टन अमित सिंह यांनीही याच गोष्टीला दुजोरा दिला. त्यांनी एक अहवाल सादर केला, ज्यात नमूद केलंय की, उपलब्ध पुरावे 'इंजिन बंद पडण्यामागे इलेक्ट्रिकल बिघाड' या थिअरी ला दुजोरा देतात.

त्यांच्या म्हणण्यानुसार, एखाद्या इलेक्ट्रिकल फॉल्टमुळे इंजिन नियंत्रित करणारी संगणकीय प्रणाली Full Authority Digital Engine Control (FADEC) ने इंधन पुरवठा थांबवून इंजिन बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली असावी.

त्यांनी हेही नमूद केलं की, फ्लाईट डेटा रेकॉर्डरने कदाचित फक्त फ्यूल सप्लाय बंद करण्याचा आदेश नोंदवला, परंतु कॉकपिटमधील स्विच प्रत्यक्षात हलवला गेला होता का, हे नोंदलेलं नाही.

म्हणजेच, स्विचला कदाचित स्पर्शही झाला नव्हता, जोपर्यंत पायलट्सनी इंजिन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला नाही.

सुप्रीम कोर्ट

फोटो स्रोत, Getty Images

कॅप्टन सिंह यांनी चौकशी प्रक्रियेबद्दलही भारताच्या सुप्रीम कोर्टात प्रश्न उपस्थित केले आहेत.

त्यांनी BBC ला सांगितलं की, प्राथमिक अहवालाचा आराखडा पक्षपाती होता, कारण "तो पायलटच्या चुकांकडे बोट दाखवतो, पण उड्डाणादरम्यान झालेल्या सर्व तांत्रिक अडचणींचा उल्लेख करत नाही."

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणावर टिप्पणी केली आहे.

कॅप्टन सुमीत सभरवाल यांचे वडील पुष्करराज सभरवाल (वय 91) यांनी या प्रकरणाच्या स्वतंत्र चौकशीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी त्यांना म्हटलं की, "हा अपघात अतिशय दुर्दैवी आहे, पण तुम्ही हे ओझं मनावर घेऊन जगू नका की, तुमच्या मुलाला दोष दिला जात आहे. कोणीही, कोणत्याही कारणासाठी, त्याला दोषी ठरवू शकत नाही."

या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 नोव्हेंबरला होणार आहे.

'पूर्णपणे चुकीचे'

विमान अपघातात इलेक्ट्रिकल फॉल्ट असल्याच्या शक्यतेला अमेरिकेच्या फाउंडेशन फॉर एव्हिएशन सेफ्टी (FAS) या संस्थेनेही समर्थन दिले आहे.

या संस्थेचे संस्थापक एड पिअर्सन हे बोइंग कंपनीचे माजी वरिष्ठ व्यवस्थापक आहेत आणि कंपनीच्या सुरक्षाविषयक मानकांचे ते पहिल्या आणि सर्वात ठाम टीकाकारांपैकी एक आहेत.

ते प्राथमिक अहवालाला "अत्यंत अपूर्ण... आणि लाजिरवाण्या पातळीपर्यंत अपुरे" असे संबोधतात.

त्यांच्या संस्थेने 787 विमानांमधील इलेक्ट्रिकल अडचणींवर आधारित अनेक अहवालांचा अभ्यास केला आहे. या अहवालांमध्ये वायरिंग असलेल्या भागात पाण्याची गळती यासारख्या बाबींचा समावेश आहे, ज्यावर अमेरिकन नियामक संस्था फेडरल एव्हिएशन ऑथॉरिटी (FAA) ने आधीच लक्ष वेधले होते. काही इतर तज्ज्ञांनीही अशाच चिंता व्यक्त केल्या आहेत.

अहमदाबाद विमान अपघात

फोटो स्रोत, Getty Images

एड पिअर्सन म्हणतात, "त्या विमानात अशा अनेक गोष्टी होत्या ज्यांना आम्ही इलेक्ट्रिकल बिघाड मानतो. या सर्व बाबींची आणि प्रणालीतील संभाव्य त्रुटींची सखोल चौकशी न करता पायलट्सवर दोष टाकणे आम्हाला पूर्णपणे चुकीचे वाटते."

त्यांच्या मते, जाणूनबुजून लक्ष विमानातील दोषांकडून वळवून पायलट्सकडे नेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सेफ्टी मॅटर्स फाउंडेशन (FAS) ने विद्यमान आंतरराष्ट्रीय विमान अपघात तपास प्रक्रियांमध्ये व्यापक सुधारणा करण्याची मागणी केली आहे.

त्यांनी म्हटलं, "जुने प्रोटोकॉल, हितसंबंधातील संघर्ष आणि प्रणालीतील त्रुटी या सर्व गोष्टी सार्वजनिक विश्वास कमी करतात आणि सुरक्षाविषयक सुधारणा उशिरा होतात."

'खुल्या विचारांची गरज'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ ट्रान्सपोर्टेशनच्या माजी इन्स्पेक्टर जनरल आणि वकील मेरी स्चियावो या याच्याशी सहमत नाहीत की, पायलट्सना जाणूनबुजून चौकशीच्या केंद्रस्थानी आणण्यात आलं.

त्यांच्या मते, प्राथमिक अहवालात काही त्रुटी नक्कीच होत्या, पण त्यामागचे कारण म्हणजे चौकशी अधिकारी प्रचंड दबावाखाली होते आणि संपूर्ण जगाचे लक्ष त्यांच्याकडे होते.

त्या म्हणतात, "मला वाटतं ते फक्त घाईत होते. हा भीषण अपघात होता आणि संपूर्ण जग पाहत होते. त्यामुळे ते शक्य तितक्या लवकर काहीतरी प्रकाशित करू इच्छित होते."

त्यांच्या म्हणण्यानुसार, "यानंतर जगभरातील लोकांनी निष्कर्षांवर उडी घेतली आणि लगेच म्हणू लागले की, 'ही पायलटची आत्महत्या होती', 'हे जाणूनबुजून केले गेले होते.'"

मेरी स्चियावो पुढे म्हणाल्या, "जर त्यांना ही चौकशी पुन्हा करावी लागली वअसती, तर कदाचित त्यांनी कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंगमधील त्या छोट्या भागांचा समावेश केला नसता."

त्यांच्या मते, "या अपघातामागे संगणक किंवा यांत्रिक बिघाड हीच सर्वात संभाव्य कारणे आहेत."

आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक नियमांनुसार, कोणत्याही अपघाताचा अंतिम अहवाल 12 महिन्यांच्या आत प्रसिद्ध होणे आवश्यक असते, पण प्रत्यक्षात तसे नेहमी घडत नाही. जोपर्यंत तो अहवाल प्रकाशित होत नाही, तोपर्यंत अपघाताची खरी कारणे अज्ञातच राहतात.

एका माजी विमान अपघात तपास अधिकार्‍याने BBC शी बोलताना म्हटलं की, "जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत 'खुल्या विचार' ठेवणं आवश्यक आहे." म्हणजेच, कुठल्याही एकाच निकषापर्यंत लगेच पोहचू नये, असं त्यांना वाटतं.

बोइंग कंपनीने कायम हेच म्हटलंय की, 787 हे सुरक्षित विमान आहे आणि त्याचा सुरक्षेचा रेकॉर्ड चांगला आहे.

कंपनीने BBC ला सांगितले की, "कंपनी या चौकशीशी संबंधित सर्व माहिती देण्यासाठी भारताच्या एअरक्राफ्ट अ‍ॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) वर अवलंबून राहील."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)