4100 रुपयांसाठी उकळतं पाणी टाकल्याचा रिकव्हरी एजंट्सवर आरोप; वसुलीबाबत RBI च्या गाईडलाईन्स काय?

या प्रकरणात दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या आहेत.

फोटो स्रोत, Vishnukant Tiwari/BBC

फोटो कॅप्शन, या प्रकरणात दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या आहेत.
    • Author, विष्णुकांत तिवारी
    • Role, बीबीसी हिंदी

कर्ज वसुली एजंट्सनी 4100 रुपयांच्या थकबाकीचा हप्ता न भरल्यामुळे आपल्यावर उकळतं पाणी फेकल्याचा आरोप एका व्यक्तीनं आणि त्याच्या मुलानं केला आहे.

मध्य प्रदेशमधील सतनामधील ही घटना आहे. समोशाचं दुकान चालवणारे 63 वर्षीय राजेंद्र प्रसाद सोनी आणि त्यांच्या मुलाने हा आरोप केला आहे.

या घटनेनंतर लोन रिकव्हरी एजंट्सच्या काम करण्याच्या पद्धतीवर आणि त्यांच्या देखरेखीबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत.

बीबीसी हिंदीशी बोलताना सतनाचे पोलीस अधीक्षक हंसराज सिंह यांनी म्हटलं की, "या घटनेनंतर लगेचच पीडित राजेंद्र सोनी आणि त्यांचा मुलगा निशांत यांच्या तक्रारीवरून, सानिया सिंग परिहार आणि हर्ष पांडे या खाजगी वित्त कंपनीतील दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध हल्ला करणं, धमकी देणं आणि गंभीर दुखापत करणं यासारख्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे."

सानिया सिंग यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणातील वडील आणि मुलाविरुद्धही मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

अशाप्रकारे, सध्या परस्परविरोधी गुन्हे दाखल झालेले आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील नागौद पोलीस ठाण्याच्या कक्षेत येणाऱ्या गढी टोला वॉर्ड नंबर-6 मधील हे प्रकरण आहे.

राजेंद्र प्रसाद सोनी यांचे सुपुत्र निशांत सोनी यांनी नऊ महिन्यांपूर्वी जना स्मॉल फायनान्स बँकेतून 75 हजार रुपये कर्ज घेऊन नवा उद्योग सुरु करण्याचा प्रयत्न केला होता.

"माझ्या मुलानं दुकान चालवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते चाललं नाही. ते बंद झाल्यानंतर तो काम करू लागला. या काळात आम्ही आमच्या कर्जाचे हप्ते भरण्यास कधीही उशीर केला नाही.

पण सप्टेंबरच्या सुरुवातीला माझ्या मुलाची नोकरी गेली आणि घरावरचं आर्थिक संकट वाढलं. तेव्हा आम्ही 4100 रुपयांचा एक हप्ता भरु शकलो नाही," असं राजेंद्र प्रसाद सोनी यांचं म्हणणं आहे.

या थकबाकीच्या हप्त्यामुळे, बँक कर्मचारी सानिया सिंग परिहार आणि हर्ष पांडे गुरुवारी (18 सप्टेंबर) सकाळी वसुलीसाठी त्यांच्या घरी पोहोचले.

राजेंद्र यांचं म्हणणं आहे की, "मी समोसा विकतो. घरी समोशांसाठी लागणारे बटाटे उकडण्यासाठी गॅसवर ठेवले होते. याच दरम्यान बँकेचे कर्मचारी आले. मी त्यांना माझ्या मुलाची परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी काही एक ऐकलं नाही."

"संभाषण अगदी शिव्या देण्यापर्यंत गेलं आणि त्यांनी धमक्याही दिल्या. त्यानंतर, या एजंट्सनी घरातलं हे उकळतं पाणी घेतलं आणि माझ्या अंगावर टाकलं. या सगळ्यात मध्ये आलेला माझा मुलगाही जखमी झाला आहे," असं ते सांगतात.

सतना पोलिस अधीक्षक हंसराज सिंह यांनी सांगितलं की, आरोपीविरुद्ध अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फोटो स्रोत, Amit Singh/BBC

फोटो कॅप्शन, सतना पोलिस अधीक्षक हंसराज सिंह यांनी सांगितलं की, आरोपीविरुद्ध अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

बीबीसी हिंदीने जना स्मॉल फायनान्स बँकेचे कर्मचारी आणि या प्रकरणातील आरोपी असलेले हर्ष पांडे आणि सानिया सिंह यांच्याशीही बातचित केली.

हर्ष पांडे यांचं म्हणणं आहे की, "आम्ही कर्जाचा हप्ता न भरल्यास नोटीस बजावत नाही, तर त्याऐवजी आम्ही ग्राहकांशी थेट बोलतो. जर त्यांच्या अडचणी तितक्या खऱ्या असल्या तर आम्ही त्यांना त्यांचे हप्ते भरण्यासाठी अधिक वेळ देऊ करतो.

काल, आमच्या महिला कर्मचारी आधी गेल्या, पण त्यांनी मला फोन करून सांगितलं की त्यांच्यासोबत गैरवर्तन करण्यता आलं. तेव्हाच मी तिथे गेलो."

हर्ष पांडे यांनी राजेंद्र सोनी आणि निशांत सोनी यांच्यावर आरोप करताना म्हटलंय की, "आम्ही शांततेत बोलत होतो पण ग्राहकानं पैसे देण्यास नकार दिला आणि आमच्यावर हल्ला केला."

जना स्मॉल फायनान्स बँकेच्या महिला कर्मचारी सानिया सिंग यांनीही त्यांच्यावर आरोप केले.

त्या म्हणाल्या की, "ग्राहक आणि त्यांच्या मुलाने पैसे देण्यास नकार दिला. त्यांनी मला शिवीगाळ केली आणि मारहाणही केली. त्यानंतर त्यांनी स्वतः पाणी गरम केलं आणि ते स्वतःवर ओतून घेतलंय."

जना स्मॉल फायनान्स बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या "ड्यूज कलेक्शन अँड सिक्युरिटीज रिपोजेसन पॉलिसी" नुसार, वसुली प्रक्रिया 'निष्पक्षता, सन्मान आणि समजूतदारपणानं' पार पाडली पाहिजे.

बँकेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की ते कोणतंही 'अत्यंत जबरदस्ती करण्याचं' धोरण अवलंबणार नाही.

मात्र, सतनामध्ये झालेल्या घटनेनंतर या बँकेवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

बँकेकडून काय सांगण्यात आलं?

जना स्मॉल फायनान्स बँकेच्या अधिकाऱ्यांशीही आम्ही या प्रकरणाबाबत बातचित केली.

बँकेने इमेलवर दिलेल्या उत्तरात म्हटलंय की, "जना स्मॉल फायनान्स बँकेमध्ये, आमच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि प्रतिष्ठा तसेच आमच्या ग्राहकांचा विश्वास आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आम्हाला या घटनेची कल्पना आहे आणि आम्ही ती खूप गांभीर्याने घेत आहोत.

सध्या संबंधित अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी व्हावी यासाठी बँक पूर्ण सहकार्य करत आहे."

जना स्मॉल फायनान्स बँकेच्या एजंट्सवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

फोटो स्रोत, Amit Singh/BBC

फोटो कॅप्शन, जना स्मॉल फायनान्स बँकेच्या एजंट्सवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

दुसऱ्या बाजूला, राजेंद्र यांना नोटीशीबाबत विचारलं असता ते म्हणाले की, "आम्हाला कोणतीही नोटीस मिळालेली नाही. उलट, ते आमच्या घरात घुसले आणि त्यांनी आम्हाला शिवीगाळ करत मारहाण केली.

आम्ही हप्ता भरला नाही, हे आम्ही कबूल करतो. परंतु, याचा अर्थ असा होत नाही की एका हप्त्यासाठी बँक अधिकारी आमच्या घरात घुसतील, आम्हाला मारहाण करतील आणि आमची सामाजिक प्रतिष्ठा धुळीला मिळवतील. हे पूर्णपणे चुकीचं आहे."

राजेंद्र यांचा हात आणि चेहरा भाजला आहे, तर निशांत यांच्या छातीला दुखापत झाली आहे. दोघांनाही नागौड सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

आरबीआयच्या गाईडलाईन्स काय सांगतात?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बँका आणि त्यांच्या वतीने काम करणाऱ्या वसुली एजंट्ससाठी मार्गदर्शक तत्त्वं निश्चित केली आहेत.

रिझर्व्ह बँकेने वसुली एजंट आणि बँकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, रिझर्व्ह बँकेने वसुली एजंट आणि बँकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत.

या गाईडलाईन्समध्ये असं म्हटलं आहे की,

  • कर्ज वसुलीच्या वेळी, एजंटला बँकेनं दिलेलं अधिकृत पत्र आणि ओळखपत्र दाखवणं नेहमीच बंधनकारक असेल.
  • कर्ज वसुली एजंट कोणत्याही परिस्थितीत धमक्या, गैरवापर किंवा हिंसाचाराचा वापर करू शकत नाहीत, असेही निर्देश आरबीआयने दिले आहेत.
  • एजंट फक्त नियुक्त केलेल्या वेळीच ग्राहकांशी संपर्क साधू शकतात. ग्राहकांना एजंटच्या वर्तनाबद्दल तक्रार करण्याचा आणि त्यांचं निरसन करण्याचा अधिकार आहे.
  • कर्ज वसुली एजंटच्या वर्तनासाठी बँक थेट जबाबदार आहे. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही एजंटमुळे बँकेविरुद्ध कारवाई होऊ शकते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)