समोरची व्यक्ती खोटं बोलते आहे हे कसं ओळखायचं? चेहऱ्यावरून विश्वासार्हता ओळखण्याचं विज्ञान काय आहे?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, पल्लब घोष
- Role, विज्ञान प्रतिनिधी
"खोटं बोलणारी व्यक्ती कोणीही ओळखू शकत नाही. तुम्ही ते ओळखलं तरी ते लोक अनेकदा ज्याला जास्त महत्त्व देतात त्या 'आंतरिक प्रेरणे'द्वारे होत नाही. तुम्ही ते ओळखतात ते तुम्ही पाहिलेल्या एखाद्या छोट्या चुकीतून."
हे उद्गार आहेत सर स्टीफन फ्राय यांचे. ते मेन्सा कार्ड कॅरियर होते. म्हणजे मेन्सा या अतिशय उच्च बुद्ध्यांक (आयक्यू) असलेल्या लोकांच्या सोसायटीचे सदस्य.
त्यांचा बुद्ध्यांक 170 होता. 'द सेलेब्रिटी ट्रेटर्स' या ब्रिटिश रिॲलिटी शोमधून बाहेर पडण्याआधी स्टीफन यांनी हे वक्तव्यं केलं होतं.
हा कार्यक्रम पाहत असताना त्यांचा सिद्धांत निश्चितच खरा असल्याचं सिद्ध झालं. या शोमध्ये 16 तथाकथित 'विश्वासू' स्पर्धक होते. त्यांच्यातील तीन ट्रेटर म्हणजे खोटं बोलणाऱ्यांपैकी पहिला खोटारडा स्पर्धक ओळखण्यासाठी शोचे 7 भाग लागले.
अर्थात, सर स्टीफन यांचा सिद्धांत पारंपारिक ज्ञानाच्या विसंगत आहे. शतकानुशतके लोकांना खरोखरंच असं वाटत होतं की, ते चेहरे वाचू शकतात, त्यावरून माणसाची पारख करू शकतात. चेहऱ्यावरील हावभाव लक्षात घेण्याची ही एक प्राचीन पद्धत आहे. तिला शरीरशास्त्र (फिजिओग्नोमी) म्हणतात.
19 व्या शतकात गुन्हेगारांना ओळखण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जात होता. या लोकांच्या चेहऱ्याची वैशिष्ट्ये किंवा तोंडवळा 'कमी सुसंस्कृत' मानली जात असे.
मोठाले जबडे आणि गालाची हाडं, असमान वैशिष्ट्ये, भुवयांवरील हाडाचा उंचावलेला भाग किंवा मोठं किंवा सपाट नाक ही चेहऱ्याची वैशिष्ट्यं असणाऱ्या व्यक्तीला विश्वासार्ह मानले जात नसे. त्याच्याकडे संशयानं पाहिलं जात असे.
अर्थातच, तो पूर्णपणे मूर्खपणा होता. त्याचा संबंध सामाजिक आणि वांशिक पूर्वग्रहाशी होता. त्याचा विज्ञानाशी काहीही संबंध नव्हता. अशा वैशिष्ट्यांना बऱ्याच काळापासून बदनाम करण्यात आलं आहे.
तरीदेखील काही आधुनिक अभ्यासातून असं दिसून येतं की, लोकांचा तोंडवळा, त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव या वरवरच्या गोष्टींमुळे आपण पूर्वग्रहदूषित असतो. लोकांच्या आकर्षकपणावर, त्यांच्या चेहऱ्याच्या सममितीवर (सिमिट्री) आणि त्यांच्या चेहऱ्याच्या हावभावांवर आपलं त्यांच्याविषयीचं मत अवलंबून असतं.
वैज्ञानिक युक्तिवाद करतात की, यामुळे एखादा चेहरा इतरांसाठी अधिक विश्वासू ठरू शकतो. मग प्रत्यक्षात ती व्यक्ती जोनाथन रॉस, ॲलन कार आणि कॅट बर्न्स यांच्याइतकीच अप्रामाणिक असली तरीदेखील चेहऱ्याकडे पाहूनच त्याच्याविषयी अंदाज बांधला जातो.
द हॅलो इफेक्ट
आपण वरवरच्या वैशिष्ट्यांवर किंवा तोंडवळ्यासारख्या गोष्टींवर किती प्रचंड विश्वास ठेवतो याचा एक पुरावा म्हणजे 2000 मध्ये प्रकाशित झालेला एक अभ्यास. यात असं मांडण्यात आलं आहे की, आकर्षक लोकांकडे अधिक सकारात्मकपणे पाहिलं जातं.
दुसऱ्या शब्दात सांगायचं तर, आकर्षक लोकांकडे अधिक बुद्धिमान, सक्षम आणि विश्वासार्ह म्हणून पाहिलं जातं.
रॅचेल मॉलिटर, कोव्हेंट्री विद्यापीठात चार्टर्ड सायकॉलिस्ट म्हणजे उच्च मानकं प्राप्त केलेल्या मानसशास्त्रज्ञ आणि प्राध्यापक आहेत.
रॅचेल मॉलिटर म्हणतात, "जे सुंदर असतं, ते चांगलं असतं, असं ते गृहितक आहे. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला पाहिलं आणि ती व्यक्ती जर आकर्षक वाटत असेल, तर त्या व्यक्तीमध्ये वर उल्लेख केलेले सर्व सकारात्मक गुण पाहिले जातात किंवा गृहित धरले जातात."
अर्थात आकर्षक किंवा सुंदर असण्याच्या जगभरात वेगवेगळ्या कल्पना आहेत आणि त्या प्रत्येक दशकात बदलतात.
मात्र 2015 मध्ये आणखी एक अभ्यास प्रकाशित झाला होता. या अभ्यासात आकर्षकपणा आणि विश्वासार्हता याबाबतच्या धारणांचा अभ्यास करण्यात आला होता. या अभ्यासातून आढळलं की जसजसा चेहरा अधिक सामान्य आणि सरासरी स्वरूपाचा होतो, तसतसा तो अधिक आकर्षक आणि अधिक विश्वासार्ह होत जातो.
अभ्यासातून असं आढळलं आहे की, आकर्षक असल्यामुळे त्या व्यक्तीमध्ये इतरही गुण असतील किंवा ती अतिशय विश्वासार्ह असेल अशी धारणा मोठ्या प्रमाणात निर्माण होते. जर हा आकर्षकपणा एका मर्यादेच्या पलीकडे गेला, तर लोक कमी विश्वासार्ह मानले जाऊ लागतात.

फोटो स्रोत, Getty Images
चेहरे आनंदी आणि मैत्रीपूर्ण दिसल्यामुळे देखील आपले 'ट्रस्ट रिफ्लेक्सेस' निर्माण होऊ शकतात. ट्रस्ट रिफ्लेक्सेस म्हणजे इतरांबद्दलचे स्वयंचलित, अबोध किंवा जाणीव नसलेले प्रतिसाद.
2008 मध्ये प्रिन्सटन विद्यापीठातील एका तज्ज्ञाच्या नेतृत्वाखाली झालेल्या प्रयोगांच्या मालिकेत हे सिद्ध करण्यात आलं होतं.
या अभ्यासात भाग घेतलेल्या लोकांनी सातत्यानं रागीट, दु:खी किंवा तटस्थ (चिडचिडा) हावभाव असणाऱ्या चेहऱ्यांपेक्षा आनंदी चेहरे किंवा हसरे हावभाव असलेल्या चेहऱ्यांना अधिक विश्वासार्ह मानलं होतं.
या अभ्यासात सहभागी झालेले लोक स्थानिक विद्यापीठातून घेण्यात आलेले होते. त्यावेळेस आकलनाशी संबंधित विज्ञानाच्या अभ्यासांमध्ये ही सामान्य बाब होती.
2015 मध्ये फ्रेंच सहभागींवर करण्यात आलेल्या अभ्यासातून असंही आढळलं होतं की, जर एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील स्मित किंवा हास्य खरं किंवा प्रामाणिक वाटलं, तर त्यांना विश्वासार्ह मानलं जाण्याची अधिक शक्यता असते.
त्याचा फायदा होत त्या व्यक्तीला अधिक कमाई करण्याच्या संधी किंवा करियरच्या चांगल्या संधी मिळू शकतात.
त्याच्या दुसऱ्या बाजूला, सनग्लासेस, मास्क घातल्यानं किंवा अगदी एखाद्या सजावटीच्या कापडाचा एखादा भाग कपाळावर येत असेल तर चेहऱ्याचे हावभाव अस्पष्ट झाल्यामुळे विश्वासार्हता कमी होऊ शकते, असं डॉ. मॉलिटर म्हणतात.
माझा चेहरा किती विश्वासार्ह आहे?
त्यामुळे माझ्या करियरसाठी धोकादायक ठरू शकणारं पाऊल उचलत, मी संशोधकांना माझ्या स्वत:च्या चेहऱ्याच्या विश्वासार्हतेबद्दल विचारलं.
त्यावर त्यांनी आधी माझ्या चेहऱ्यांच्या वैशिष्ट्यांची सममिती (सिमेट्री) तपासली.
सममिती म्हणजे सौंदर्य, ज्याचा थेट संबंध विश्वासार्हतेशी असतो. म्हणजेच ते समप्रमाणात असतं, असं मिर्सिया झ्लोटेनू म्हणतात. ते लंडनच्या किंग्स कॉलेजमध्ये मानसशास्त्र आणि गुन्हेगारीशास्त्राचे प्राध्यापक आहेत.
मात्र तिथे पुन्हा एकदा हॅलो इफेक्ट येतो.
"सर्व मानवांमध्ये थोड्या प्रमाणात चेहऱ्याची द्विपक्षीय असमानता (असिमिट्री) अपेक्षित आहे. त्यामुळे काही चेहऱ्यांची सममिती सौंदर्याशी संबंधित असू शकते. मात्र खूप जास्त प्रमाणातील सममिती नाही, अन्यथा ती अनैसर्गिक वाटू लागते," असं डॉ. झ्लोटेनू म्हणतात.
याच कारणामुळे, डिजिटल अवतार, रोबोटिक किंवा कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेले चेहरे यासारखे अचूकपणे किंवा परिपूर्णपणे सममिती असलेले चेहरे जवळपास भीतीदायक वाटू शकतात.
(त्यातून निर्माण होणाऱ्या भावनेसाठी एक संज्ञादेखील आहे - 'अनकॅनी व्हॅली'. म्हणजे एखाद्या जवळपास मानवी असलेल्या गोष्टीला भेटताना वाटणारी अस्वस्थता किंवा घृणेची भावना.)

फोटो स्रोत, Getty Images
माझा चेहरा अधिक विश्वासार्ह कसा होऊ शकतो, हे दाखवण्यासाठी त्यात हुशारीनं विविध प्रकारचे बदल करण्यात आले. मिला मिलेवा प्लायमाउथ विद्यापीठात मानसशास्त्राच्या प्राध्यापक आहेत. त्यांनी या कामात मदत केली.
त्यांनी माझ्या चेहऱ्याच्या फोटोमध्ये बदल, फेरफार केले. माझ्या चेहऱ्याची सममिती (सिमिट्री) जुळवण्यात आली. माझ्या ओठांमध्ये बदल करून त्यातून स्मित निर्माण होईल अशी रचना करण्यात आली.
नंतर त्यांनी आणखी एक पाऊल उचललं. काही अभ्यासातून दिसून आलं की, पुरुषांच्या तुलनेत महिलांचे आवाज, चेहरे आणि नाव अधिक विश्वासार्ह मानले जातात.
तर इतर अभ्यासातून असंही आढळून आलं आहे की चेहऱ्यातील स्त्रीत्व वाढल्यास विश्वासार्हतेची धारणादेखील वाढते. त्यामुळे डॉ. मिलेवा यांनी माझ्या चेहऱ्यात बदल करत त्यात अधिक स्त्रीत्व आणण्यासाठी आवश्यक ते बदल केले.
त्यानंतर त्यांनी बदल करून तयार करण्यात आलेले माझे विविध चेहरे अभ्यासात सहभागी झालेल्या 26 जणांना दिले. त्यातून त्यांनी एक छोटसं ऑनलाइन सर्वेक्षण केलं. माझ्या या वेगवेगळ्या प्रतिमा इतर 35 प्रतिमांसोबत एकत्र ठेवण्यात आल्या.
त्यानंतर त्यांना 1 (अजिबात विश्वासार्ह नाही) ते 9 (अत्यंत विश्वासार्ह) असे चढत्या क्रमानं विश्वासार्हतेसाठीचे गुण देण्यात आले.
हे जरी अधिकृतपणे केलेलं वैज्ञानिक किंवा शैक्षणिक पुनरावलोकन नसलं, तरी त्यातून समोर आलेले निष्कर्ष अपेक्षेनुसारच होते. तरुण, आनंदी, स्त्रीत्व असणाऱ्या प्रतिमेवर या अभ्यासात सहभागी झालेल्या बहुतांश जणांनी अधिक विश्वास दाखवला होता.
या अभ्यासाचा अंतिम निष्कर्ष काय होता? मग मी ठरवलं की भविष्यात जर माझ्या वैज्ञानिक अहवालांवर लोकांनी अधिक विश्वास ठेवावा असं मला वाटत असेल, तर मी थोडे अधिक हसले पाहिजे.
कळपाची मानसिकता आणि गटांमध्ये असताना विचार करण्याची पद्धत
मात्र जेव्हा अप्रामाणिक किंवा देशद्रोही लोकांचा विचार केला जातो, तेव्हा गटांमध्ये असताना विचार करण्याच्या संदर्भात नेमका कोणावर विश्वास ठेवावा याबद्दलचे प्रश्न अधिक गुंतागुंतीचे आणि वेगवेगळ्या स्तरांवरील होतात.
डॉ. मॉलिटर फसवणूक ओळखण्यातील तज्ज्ञ आहेत. त्या ट्रेटर्सच्या (शोमधील) प्रचंड चाहत्यादेखील आहेत. यावर्षीच्या स्पर्धकांमधील खोटारडे स्पर्धक ओळखण्यात इतका वेळ का लागला याबद्दल त्यांचं स्वत:चं मत आहे.
त्यांचा युक्तिवाद आहे की, लोक गटांमध्ये असताना ज्याप्रकारे विचार करतात, त्याचा परिणाम होतो आणि त्यांची निर्णय घेण्याची क्षमता प्रभावित होते. याला कन्फर्मिटी बायस म्हणजे एखाद्या गोष्टीची बाजू घेतानाचा पूर्वग्रह असंही म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. मॉलिटर म्हणतात, "कळपाच्या मानसिकतेमुळे लोक सामूहिक चूक करतात. अगदी विश्वासघातासाठीचे पुरावे अतिशय अस्पष्ट किंवा अपुरे असले तरीदेखील."
त्या असंही म्हणतात की, मानवी मन अशा पुराव्यांकडे लक्ष देत नाही, जे मूळ, बऱ्याचवेळा खोट्या, गटात विचार करताना मानल्या जाणाऱ्या गृहितकाच्या बाजूचे नसतात.
एखादी व्यक्ती किती विश्वासार्ह आहे, याबद्दल ज्या वेगानं लोकांच्या मनावर प्रभाव पडतो, तो देखील समस्येचा एक भाग असू शकतो. यातून एखाद्या व्यक्तीची विश्वासार्हता समजण्यात चूक होऊ शकते.
डॉ. मिलेवा म्हणतात की, विश्वासार्हता मोजण्याची मानवामध्ये असणारी क्षमता उत्कांतीच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच विकसित झाली होती. आपल्या पूर्वजांना फक्त एका सेंकदात कोण मित्र आहे आणि कोण शस्त्रू आहे हे सांगावं लागत असे.
"ही एक अतिशय वेगवान प्रक्रिया आहे. एखाद्याच्या विश्वासार्हतेची अतिशय स्थिर प्रतिमा तयार करण्यासाठी आपल्याला सेंकदाच्या जवळपास 10 व्या भागाइतका वेळ लागतो," असं त्या म्हणतात.
यातील वाईट बातमी म्हणजे त्यांच्या संशोधनातून असं आढळून आलं आहे की विश्वासार्हता ठरवण्यासंदर्भातील आपली प्रतिक्रिया जरी वेगवान असली तरी, ते भयानकदेखील आहे.
आपण खोटारड्या लोकांना ओळखण्यात इतके कच्चे का आहोत?
मिर्सिया झ्लोटेनू याच्याशी सहमत आहेत. ते खोटारडेपणा ओळखणं आणि फसवणुकीची सामाजिक भूमिका ओळखण्यासंदर्भातील वैज्ञानिक प्रक्रियेतील तज्ज्ञ आहेत.
त्यांनी दोन गोष्टी शोधल्या आहेत. पहिली म्हणजे, आपल्याला वाटतं की आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवू शकतो आणि जे खोटं बोलतात, त्यांना ओळखण्यात आपण खरोखरंच कुशल आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे आपण तसे कुशल नसतो.
ते म्हणतात, "आपल्या सर्वांना वाटतं की, आपण खोटारडेपणा ओळखू शकतो. कारण आपण घाम येणं, इतरत्र पाहणं, लाजणं, अस्वस्थता किंवा इतर शारीरिक चिन्हं पाहतो."
"मात्र सत्य असं आहे की, ही सर्व चिन्हं पूर्णपणे संदर्भावर आधारित असतात. फसवणूक किंवा खोटारडेपणा ओळखण्यासाठी त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवता येत नाही किंवा विसंबून राहता येत नाही."
ते पुढे म्हणतात, "एखाद्या व्यक्तीला घाम येत असेल किंवा ती इतरत्र पाहत असेल, कारण ती घाबरलेली असेल, लाजाळू असेल किंवा चिंताग्रस्त असेल. ती खोटं बोलते आहे म्हणूनच असं करत असेल असं नाही. अनेकदा, आपण या चिन्हांचा चुकीचा अर्थ लावतो."

फोटो स्रोत, Getty Images
"कारण आपण या चिन्हांचा संबंध अप्रामाणिकपणाशी लावतो. मात्र प्रत्यक्षात ही फक्त विशिष्ट परिस्थितीतील अस्वस्थता किंवा भावनिक उत्तेजनेची चिन्हं असतात."
यासंदर्भात करण्यात आलेल्या अनेक प्रयोगांमध्ये त्यात सहभागी होणाऱ्यांनी व्हीडिओ पाहिले. खरं बोलणाऱ्या किंवा खोटं बोलणाऱ्या सहभागींची संभाषणं ऐकली. खोटेपणा ओळखण्यासाठी त्यांनी घाम येणं, आजूबाजूला पाहणं किंवा लाजणं यासारख्या चिन्हांचा वापर केला.
डॉ. झ्लोटेनू आणि त्यांच्या टीमला आढळलं की संशोधनात सहभागी झालेल्यांना खऱ्या किंवा खोट्यामधील फरक ओळखता आला नाही. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा खोटारडेपणा ओळखता येत नव्हता. यात खोट्या भावना किंवा बनावट कथांचा समावेश होता.
जेव्हा यात आणखी लोकांचा समावेश करण्यात आला, तेव्हा खोटेपणा ओळखण्यातील अचूकता आणखी कमी झाली. कारण यात गटांमध्ये विचार करण्याच्या प्रक्रियेचा अंतर्भाव होता. पुन्हा एकदा गटांमध्ये असताना लोक वेगळ्या पद्धतीनं विचार करून चुकीचं उत्तर देत असल्याची पुष्टी झाली.
या प्रयोगात दोन किंवा अधिकजणांनी एकट्यापेक्षा निश्चितच अधिक चांगली उत्तरं दिली नाहीत.
आत्मविश्वासाचाही त्यांना फायदा झाला नाही. ज्या लोकांना खात्री होती की ते बरोबर आहेत, ते प्रत्यक्षात बरोबर नव्हते.
"तुम्ही जेव्हा वैज्ञानिक साहित्य पाहता आणि तुमच्या अभ्यासातून समोर आलेले निष्कर्ष पाहता, जे समानच आहेत, तेव्हा तुम्हाला आढळतं की लोक खोटारडेपणा ओळखू शकत नाहीत. ते निव्वळ योगायोगानं तो ओळखू शकतात," असं डॉ. झ्लोटेनू यांनी मला टीकात्मकरित्या सांगितलं.
ते म्हणाले, "तर, ते नाणं उडवून टॉस करण्यासारखंच आहे."
ट्रेटर्सचं गूढ
किंबहुना 'द सेलेब्रिटी ट्रेटर्स' या शोमध्ये ट्रेटर्स इतके दिवस का सुटले किंवा ते लक्षात का आले नाहीत, यामागचं कारण हेच आहे.
स्पर्धकांच्या वैयक्तिक वैशिष्ट्यांनीदेखील यात कशी भूमिका बजावली, यासंदर्भात तज्ज्ञाचं स्वतंत्र मत आहे.
मग, 'द सेलिब्रिटी ट्रेटर्स' या शोमधून घ्यायचा धडा फक्त असाच आहे का की आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्यांच्याकडूनच आपली फसवणूक होत राहील?
डॉ. झ्लोटेनू यासंदर्भात युक्तिवाद करतात की जर तसं असेल, तर ती काही वाईटच गोष्ट नाही.
ते म्हणतात की, वैज्ञानिकदृष्ट्या बोलायचं तर, खोटं बोलण्याला फार प्राचीन काळापासून वाईट मानलं जातं. किंबहुना फसवलं जाण्याची आणि इतरांना फसवण्याची क्षमता सामाजिकदृष्ट्या हानिकारकपेक्षा अधिक फायदेशीर आहे.
"तुम्ही रोजच्या आयुष्यातील गोष्टींबद्दल तुमच्या मित्रांशी खोटं बोलता. तुम्ही त्यांना सांगता की ते चांगले दिसतात. सर्वकाही ठीक होईल. केकचा आणखी एखादा तुकडा खाल्ल्यास हरकत नाही."

फोटो स्रोत, Getty Images
ते पुढे म्हणतात, "या सर्व गोष्टी नैतिकदृष्ट्या निंदनीय नाहीत. त्यांचा संबंध नातं तयार करण्याशी, एकजुटीनं राहण्याशी आणि इतरांना बरं वाटेल अशी मदत करण्याशी आहे."
या सर्व गोष्टींच्या बाबतीत तरी तो एकप्रकारचा 'सामाजिक डिंक' असतो. ज्यामुळे सर्वजण जोडले जातात.
वैज्ञानिक म्हणतात की एखादी व्यक्ती खरं बोलते आहे की नाही, हे ट्रेटर्स शोमधील स्पर्धकांबाबत आणि आपल्यासंदर्भात विचार करता, यातून एक महत्त्वाचा अन्वयार्थ निघतो.
तो असा की याप्रकारच्या पूर्वग्रहाबद्दल सजग असणं, पहिल्या प्रभावाबद्दल प्रश्न उपस्थित करणं आणि जिथं शक्य असेल, तिथे आपल्या आंतरिक प्रेरणेवर कमी लक्ष देणं महत्त्वाचं आहे.
म्हणून किमान त्यासंदर्भात, प्रसिद्ध आणि आदरणीय असलेले सर स्टीफन फ्राय बरोबर होते.
(बीबीसी इनडेप्थवर वेबसाईट आणि ॲपवरील सर्वोत्तम विश्लेषण उपलब्ध आहे. ज्यात गृहितकांना आव्हान देणारे नवीन दृष्टीकोन आणि दिवसाच्या सर्वात मोठ्या मुद्द्याबाबत सखोल वृत्तांकन करण्याचा समावेश आहे. नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तुम्ही साइन अप करू शकता, ज्यामुळे इनडेप्थवर जेव्हाही लेख प्रकाशित होईल तेव्हा तुम्हाला त्याची माहिती मिळेल. ते कसं करायचं हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











