'मी 16 वर्षांची असताना सीआयएने माझ्यावर अमानवी प्रयोग केले, आता मी न्यायासाठी त्यांच्याच विरुद्ध उभी'

फोटो स्रोत, Submitted photo
- Author, रॉबिन लेविन्सन आणि किंग आणि एलॉइस एलेना
- Role, बीबीसी प्रतिनिधी
लाना पाँटिंग लहान होती, तेव्हा तिचा कॅनडातील माँट्रियल येथील अॅलन मेमोरियल इन्स्टिट्यूटशी (जुनं मनोरुग्णालय) संबंध आला होता. ते रुग्णालय आजही तिला स्पष्टपणे आठवतं.
या रुग्णालयातील तो उग्र, औषधांसारखा वास ती आजही विसरलेली नाही.
लाना सांगते, "मला ते ठिकाण आवडलं नाही. ते रुग्णालयासारखं दिसत नव्हतं."
हे रुग्णालय एकेकाळी एका स्कॉटिश जहाज व्यापार्याचं घर होतं. एप्रिल 1958 मध्ये एक महिन्यांसाठी ते तिचं घर बनलं.
त्यावेळी एका न्यायाधीशाने 16 वर्षीय लानाला 'आज्ञा न पाळणाऱ्या वर्तनासाठी' इथे पाठवण्याचा आदेश दिला होता.
सीआयएकडून (अमेरिकेची बाह्य गुप्तचर संस्था) सुरू असलेल्या एका गोपनीय प्रयोगाची लाना एक भाग होती. तिच्यासारखे हजारो लोक या प्रयोगात सामील झाले होते.
त्यावेळी सीआयएकडून मेंदूवर नियंत्रण मिळवण्याशी (माइंड कंट्रोल) संबंधित एक गुप्त प्रयोग करण्यात आला.
कॅनडा येथे झालेल्या या प्रयोगातील पीडितांच्या वतीने दाखल केलेल्या खटल्यातील दोन प्रमुख याचिकाकर्त्यांपैकी लाना पाँटिंग ही एक आहे.
गुरुवारी (20 नोव्हेंबर) एका न्यायाधीशांनी रॉयल व्हिक्टोरिया रुग्णालयाचं अपील फेटाळलं. त्यामुळे आता हा खटला पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नुकताच मिळालेल्या वैद्यकीय नोंदीनुसार, लाना बऱ्याचदा घराबाहेर जात असत आणि ती तिच्या आई-वडिलांना आवडत नसलेल्या मित्रांबरोबर राहायची.
पाँटिंग कुटुंब ओटावाहून माँट्रियल येथे आले, त्यावेळी हा सगळा प्रकार घडला. त्यावेळी पाँटिंग कुटुंबीयांची परिस्थितीही बेताची होती.
ती म्हणाली, "मी फक्त एक सामान्य टीनएजर म्हणजे किशोरवयीन मुलगी होते." पण न्यायाधीशांनी तिला अॅलन (मनोरुग्णालय) येथे पाठवलं.
'सायकिक ड्रायव्हिंग'
तेथे पोहोचल्यावर ती नकळतपणे सीआयएच्या एमके-अल्ट्रा या गुप्त प्रयोगाचा भाग बनली.
हा प्रयोग शीतयुद्धाच्या काळातील होता. त्यात लोकांवर त्यांच्या परवानगीशिवाय एलएसडीसारखी सायकिडेलिक औषधं, इलेक्ट्रोशॉक उपचार आणि ब्रेनवॉश तंत्रांचा परिणाम पाहिला जात असत.
अमेरिका आणि कॅनडातील 100 पेक्षा जास्त संस्था, रुग्णालयं, तुरुंग आणि शाळा या प्रकल्पाचा भाग होत्या.
अॅलनमध्ये मॅकगिल युनिव्हर्सिटीचे संशोधक डॉ. इवेन कॅमरन रुग्णांना नशेची औषधं देत आणि त्यांना एकच रेकॉर्डिंग वारंवार, कधीकधी हजारो वेळा ऐकवत असत. या प्रक्रियेला ते 'एक्सप्लोरिंग' (अन्वेषण) म्हणत असत.
डॉ. कॅमरन लाना पाँटिंगला एकच टेप रेकॉर्डिंग शेकडो वेळा ऐकवत असत.
लाना आठवून सांगते की, "ते रेकॉर्डिंग सतत चालू असायचं. त्यात आवाज यायचा, तू चांगली मुलगी आहेस, तू वाईट मुलगी आहेस."

संशोधक जॉर्डन टॉरबे यांनी डॉ. कॅमरन यांच्या प्रयोगांवर आणि त्यांच्या नैतिक परिणामांवर अभ्यास केला आहे. त्या या पद्धतीला 'सायकिक ड्रायव्हिंग' म्हणतात असं सांगितलं.
"रुग्णांच्या मेंदूवर सतत तेच शब्द आणि सूचना पुन्हा पुन्हा ऐकवून नियंत्रण ठेवलं जात होतं," असं त्यांनी सांगितलं.
डॉ. कॅमरन यांनी झोपेच्या गोळ्या, संवेदना कमी करणारे (सेन्सरी डेप्रिवेशन) प्रयोग आणि कृत्रिम कोमाच्या परिणामांवरही काम केलं होतं, असं त्या म्हणाल्या.
वैद्यकीय नोंदींनुसार, लानाला एलएसडीसोबत सोडियम एमायटल (बार्बिट्युरेट), डेसॉक्सिन (एक उत्तेजक औषध) आणि नायट्रस गॅस म्हणजेच 'लाफिंग गॅस' देण्यात आला होता.
डॉ. कॅमरन यांनी त्यांच्या एका वैद्यकीय फाइलमध्ये लिहिलं होतं की,"30 एप्रिलपर्यंत रुग्णावर एक्सप्लोरेशनची प्रक्रिया केली गेली. नायट्रस ऑक्साइड दिल्यावर ती खूप घाबरली आणि आक्रमक झाली. ती अंथरुणात उभी राहून ओरडू लागली."
ही वैद्यकीय फाइल लाना पाँटिंगने माहिती अधिकाराअंतर्गत (फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन) मिळवली आहे.
70 च्या दशकात पहिल्यांदा माहिती आली समोर
एमके-अल्ट्रा प्रयोगाबद्दलची माहिती पहिल्यांदा 1970 च्या दशकात समोर आली. त्यानंतर अनेक पीडितांनी अमेरिका आणि कॅनडा सरकारांविरोधात खटले दाखल केले.
अमेरिकेत बहुतेक खटले अयशस्वी ठरले. परंतु, 1988 मध्ये एका कॅनेडियन न्यायाधिशांनी अमेरिकेच्या सरकारला त्यांनी नऊ पीडितांना प्रत्येकी 67,000 डॉलर्स भरपाई देण्याचे आदेश दिले.
1992 मध्ये कॅनडा सरकारनेही 77 पीडितांना प्रत्येकी 1 लाख कॅनेडियन डॉलर (त्यावेळी सुमारे 80,000 अमेरिकन डॉलर) दिले. पण सरकारने मात्र आपली चूक मान्य केली नाही.

त्या वेळी लानाला ती स्वतः पीडित असल्याचं माहिती नव्हतं. त्यामुळे तिचा त्या भरपाई मिळवणाऱ्यांमध्ये समावेश नव्हता.
तिच्यासोबत काहीतरी चुकीचं घडलं आहे, असं अनेक वर्षे तिला वाटत होतं. परंतु, तिच्यावर नेमके कोणते प्रयोग झाले होते, याची पूर्ण माहिती तिला नुकतीच समजली.
ती सांगते की, अॅलनमध्ये घालवलेला वेळ आणि त्यानंतरची अनेक वर्षे तिला फारसं आठवत नाहीत.
नंतर लानाचं लग्न झालं आणि ती मॅनिटोबा येथे गेली. तिथे तिला दोन मुलं झाली, ज्यांच्याशी आजही तिचं खूप जवळचं नातं आहे. आता ती चार नातवंडांची आजी आहे.
पण ती म्हणते की, अॅलनमध्ये घालवलेला प्रत्येक काळ तिच्या आयुष्यावर कायम परिणाम करत राहिला.
ती म्हणते, "मला याचा परिणाम आयुष्यभर जाणवला. मी असा विचार का करते, असं मला नेहमी वाटायचं. माझ्यासोबत नक्की काय घडलं होतं?"
'कधी कधी मी रात्री ओरडत जागी होते'
मानसिक आरोग्याच्या समस्यांना तोंड देण्यासाठी आपल्याला आयुष्यभर विविध औषधांची मदत घ्यावी लागल्याचं लाना पाँटिंग सांगते.
हा सर्व अॅलनमध्ये घालवलेल्या क्षणांचा परिणाम आहे. आजही मला वारंवार भीतीदायक स्वप्नं पडतात, असं ती म्हणते.
ती म्हणते, "कधी कधी मी रात्री ओरडत जागी होते, कारण तिथे घडलेल्या सर्व गोष्टी मला आठवतात."
रॉयल व्हिक्टोरिया हॉस्पिटल आणि मॅकगिल युनिव्हर्सिटी यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला, कारण हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.

सरकारने 1992 मधील आधीच्या समझोत्याकडे लक्ष वेधलं आणि हे पाऊल 'मानवतावादी कारणांमुळे' घेतल्याचे सांगितले. हे म्हणजे कोणतीही कायदेशीर जबाबदारी मान्य केल्यासारखं नाही, असं सांगितलं.
लाना पाँटिंगसाठी हा खटला एक अशी संधी आहे, ज्यातून कदाचित तिला शेवटी काही दिलासा मिळू शकेल.
ती म्हणते, "कधी कधी मी माझ्या लिव्हिंग रूममध्ये बसलेली असते आणि माझं मन मागे जाऊन ज्या गोष्टी माझ्यासोबत घडल्या होत्या त्या गोष्टी आठवू लागतात. जेव्हा मी डॉ. कॅमरनचा फोटो पाहते, तेव्हा मला खूप राग येतो."
'प्रयोगाच्या नैतिकतेबद्दल कॅमरन यांना माहितीच नाही'
आता डॉ. कॅमरनचं नाव एमके-अल्ट्रा प्रयोगांसोबत जोडलेलं आहे. पण या प्रयोगाला सीआयए निधी पुरवत असलेलं डॉ. कॅमरन यांना माहितीच नव्हतं, हे संशोधक जॉडर्न टॉरबेंच्या अभ्यासातून समोर आलं.
त्यांचं अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेसोबतचं काम 1964 मध्ये संपलं, आणि तीन वर्षांनंतर 1967 मध्ये हृदयविकारामुळे त्यांचं निधन झालं.
टॉरबे म्हणतात की, पैसे कुठून येत होते किंवा नव्हते हे महत्त्वाचं नाही; पण कॅमरनला ते जे प्रयोग करत आहेत, ते नैतिक आहेत की नाही हे माहीत असणं गरजेचं होतं.
"मला आशा आहे की हा खटला पुढे जाईल आणि पीडितांना थोडा न्याय मिळेल. याचा अर्थ त्यांना हरवलेलं आयुष्य परत मिळेल असं नाही, पण त्यांच्या वेदना वाया जाऊ नये आणि त्यातून आपण काहीतरी शिकू," असं त्या म्हणतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











