निर्दोष भावाला फाशीच्या शिक्षेतून मुक्त करण्यासाठी थोरल्या बहिणीनं दिला 56 वर्षे कायदेशीर लढा

91 वर्षांच्या हिडेको हाकामाटा आपल्या भावाला मुक्त करण्यासाठी आपलं अर्ध आयुष्य लढल्या.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 91 वर्षांच्या हिडेको हाकामाटा आपल्या भावाला मुक्त करण्यासाठी आपलं अर्ध आयुष्य लढल्या.
    • Author, शायमा खलिल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
    • Reporting from, टोकयो

न्याय ही बहुधा मानवी समाजातील सर्वात विलक्षण गोष्ट आहे. कारण इतर सजीवांमध्ये न्याय आणि अन्यायाचा बोध नसतो. दुर्दैवानं एकीकडे माणसात न्यायासाठीची सदसद्विवेकबुद्धी विकसित झालेली असताना देखील फार थोड्या लोकांच्या वाट्याला न्याय येत असतो.

किचकट कायदेशीर प्रक्रिया, न्यायव्यवस्था, तपास यंत्रणा या सर्वांना एकत्रितरित्या तोंड देताना जगभरातील बहुसंख्य सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो. दुर्दैवानं तो अनेकदा अपयशी ठरतो.

हे फक्त अविकसित देशांमध्येच होतं असं नाही तर जपानसारखा प्रगत देश देखील त्याला अपवाद नाही. एक भाऊ जो निर्दोष असताना ज्याला फाशी शिक्षा सुनावली गेली आणि त्या शिक्षेच्या टांगत्या तलवारीखाली ज्यानं मानसिक यातना सहन करत आयुष्याची बहुतांश वर्षे तुरुंगातच घालवली.

आपल्या भावाला न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्याची बहुतांश वर्षे खर्ची घालणाऱ्या आणि आता आयुष्याच्या संध्याकाळी देखील भावाची काळजी घेणाऱ्या एका धीरोदात्त थोरल्या बहिणीची सुन्न करून टाकणारी आणि ह्रदय पिळवटून टाकणारी ही कहाणी.

इवाओ हाकामाटा निर्दोष असल्याचा निकाल जपानमधील न्यायालयानं सप्टेंबरमध्ये दिला. तेव्हा जगातील सर्वाधिक काळ मृत्यूदंडाच्या शिक्षेच्या अधीन असलेल्या कैद्याला नेमकं कसं व्यक्त व्हावं तेच कळलं नाही. त्या क्षणाला त्याला फारसा आनंदही झाला नाही.

"मी त्याला सांगितलं की त्याची सुटका झाली आहे, मात्र तो गप्प होता," असं 91 वर्षांच्या हिडेको हाकामाटा म्हणाल्या. जपानमधील हामामात्सू येथील आपल्या घरी त्या बीबीसीशी बोलत होत्या. त्या इवाओ हाकमाटाच्या मोठ्या बहीण आहेत.

त्या पुढे म्हणाल्या, "त्याला कळलं की नाही, हे मला सांगता येणार नाही."

इवाओ हाकामाटा यांना 1968 मध्ये चार हत्यांसाठी दोषी ठरवण्यात आलं होतं. तेव्हापासून हिडेको हाकामाटा आपल्या भावाला सोडवण्यासाठी लढत होत्या.

सप्टेंबर 2024 मध्ये वयाच्या 88 व्या वर्षी, अखेर इवाओ हाकामाटा यांची निर्दोष सुटका झाली. जपानमधील हा सर्वाधिक काळ चाललेला कायदेशीर लढा होता.

इवाओ हाकामाटा यांचं प्रकरण असाधारण आणि आश्चर्यकारकच आहे. पण त्याचवेळी जपानच्या न्याय व्यवस्थेच्या खाली दडलेल्या शिस्तबद्ध क्रौर्यावर देखील या प्रकरणामुळे प्रकाश पडतो.

जपानमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या कैद्यांना फक्त काही तास अगोदरच त्यांच्या फाशीबद्दल कळवलं जातं. आजचा दिवस आपल्या आयुष्यातील शेवटचा दिवस असेल का या अनिश्चिततेत कैदी कित्येक वर्षे तुरुंगात घालवतात.

2014 मध्ये खटल्याच्या पुन्हा सुनावणीची दुर्मिळ मंजूरी मिळाल्यापासून इवाओ हाकामाटा हे त्यांची बहीण हिडेको यांच्याबरोबर राहत आहेत.
फोटो कॅप्शन, 2014 मध्ये खटल्याच्या पुन्हा सुनावणीची दुर्मिळ मंजूरी मिळाल्यापासून इवाओ हाकामाटा हे त्यांची बहीण हिडेको यांच्याबरोबर राहत आहेत.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मानवाधिकार तज्ज्ञ या प्रकारे कैद्यांना क्रूर आणि अमानुष वागणूक देण्याचा अनेक वर्षांपासून निषेध करत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की यामुळे कैद्यांमध्ये मानसिक आजार निर्माण होण्याचा धोका वाढतो.

इवाओ हाकामाटा हे देखील याला अपवाद नाहीत. जो गुन्हा केलाच नाही त्याच्यासाठी दिलेल्या फाशीच्या शिक्षेची वाट पाहत त्यांनी अर्ध्याहून अधिक आयुष्य तुरुंगात घालवले. तेही अगदी एकाकी अवस्थेत. या गोष्टीचा त्यांच्या मनावर, मानसिक स्थितीवर अत्यंत विपरित परिणाम झाला.

मात्र, 2014 मध्ये इवाओ हाकामाटा यांच्या खटल्याची पुन्हा सुनावणी करण्यास मंजुरी मिळाली आणि त्यांची तुरुंगातून सुटका झाली. तेव्हापासून इवाओ आपल्या बहिणीच्या म्हणजे हिडेकोच्या देखरेखीखाली राहतात. हिडेको आपल्या भावाची अतिशय बारकाईनं काळजी घेतात.

आम्ही जेव्हा त्यांच्या घरी पोहोचलो, तेव्हा इवाओ एका स्वयंसेवकांच्या गटाबरोबर बाहेर फिरायला गेलेले होते. हा गट या दोन्ही वृद्ध भावंडांना आधार देतो. इवाओंना अनोळखी लोकांविषयी काळजी वाटते, अनोळखी लोकांमुळे ते चिंताग्रस्त होतात, असं हिडेको सांगतात.

कारण अनेक वर्षे इवाओ त्यांच्या "स्वत:च्या एका वेगळ्याच विश्वात" जगत होते.

इवाओ यांच्या स्थितीबद्दल हिडेको म्हणतात, "कदाचित यावर काहीच उपाय नसावा. कारण जेव्हा तुम्ही 40 वर्षांहून अधिक काळ तुरुंगातील एका छोट्या कोठडीत बंदिस्त असता तेव्हा असंच होतं."

त्या पुढे म्हणाल्या, "त्यांनी इवाओला एखाद्या प्राण्यासारखीच वागणूक दिली."

लाल रेष
लाल रेष

मृत्यूच्या प्रतीक्षेतील जगणं

इवाओ हाकामाटा यांच्याबद्दल सांगायचं तर ते माजी व्यावसायिक बॉक्सर होते. तसंच ते मिसो प्रोसेसिंग फॅक्टरीत काम करत होते. ते फॅक्टरीत काम करत असतानाच त्यांचा बॉस, बॉसची पत्नी आणि त्यांचे दोन किशोरवयीन मुलं यांचे मृतदेह सापडले होते. या चारी जणांची चाकूनं वार करून हत्या करण्यात आली होती.

अधिकाऱ्यांनी या चारही हत्यांचा, शिझुओका येथील या कुटुंबाचं घर पेटवून दिल्याचा आणि घरातून रोख 2,00,000 येन (199 पौंड ; 556 डॉलर) चोरल्याचा आरोप इवाओ हाकामाटा यांच्यावर ठेवला होता.

त्यानंतर 1966 मध्ये एका दिवशी पोलीस इवाओ यांना अटक करण्यासाठी आले.

त्या दिवसाबद्दल हिडेको सांगतात, "हे सर्व काय चाललं आहे याची आम्हाला काहीही कल्पना नव्हती."

पोलिसांनी इवाओ हाकामाटा कुटुंबाच्या घराची झडती घेतली, तसंच त्यांच्या दोन मोठ्या बहिणींच्या घरांची देखील झडती घेतली आणि त्यानंतर ते इवाओ यांना अटक करून घेऊन गेले.

सुरुवातीला इवाओ यांनी हे आरोप नाकारले. मात्र नंतर दिवसाचे 12 तास चाललेल्या चौकशीनंतर आणि मारहाणीनंतर त्यांनी हे मान्य केलं. अर्थात हा कबुलीजबाब जबरदस्तीनं घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

इवाओ यांच्या अटकेच्या दोन वर्षांनी, त्यांना हत्या आणि जाळपोळ केल्याच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलं आणि फाशीची शिक्षा देण्यात आली.

त्यानंतर जेव्हा इवाओ यांना मृत्यूदंडाच्या कोठडीत हलवण्यात आलं, तेव्हा हिडेको यांना आपल्या भावाच्या वागण्यात अचानक मोठा बदल झाल्याचं लक्षात आलं.

खासकरून त्यांना भावाबरोबरची तुरुंगातील एक भेट आठवते.

1968 मध्ये चार हत्या आणि जाळपोळ केल्याच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात येण्यापूर्वी इवाओ हाकामाटा (डावीकडे) एक व्यावसायिक बॉक्सर होते
फोटो कॅप्शन, 1968 मध्ये चार हत्या आणि जाळपोळ केल्याच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात येण्यापूर्वी इवाओ हाकामाटा (डावीकडे) एक व्यावसायिक बॉक्सर होते

हिडेको म्हणाल्या, "त्यानं मला सांगितलं की काल एका व्यक्तीला फाशीची शिक्षा देण्यात आली. तो माझ्या शेजारच्या कोठडीतील कैदी होता."

त्या पुढे म्हणाल्या, "त्यानं मला काळजी घेण्यास सांगितलं. तेव्हापासून मानसिकदृष्ट्या तो पूर्णपणे बदलला. तो खूपच गप्प झाला."

जपानमध्ये फाशीच्या शिक्षेमुळे आयुष्य उदध्वस्त झालेले इवाओ हाकामाटा हे काही एकटेच नाहीत. तिथे कैदी दररोज सकाळी जेव्हा उठतात तेव्हा त्यांना हे माहित नसतं की तो दिवस त्यांच्या आयुष्यातील शेवटचा दिवस असेल की नाही. ते सतत मृत्यूच्या छायेत वावरत असतात.

मेंडा साके यांनी देखील निर्दोष सुटका होण्यापूर्वी फाशीच्या शिक्षेच्या प्रतिक्षेत आयुष्याची 34 वर्षे तुरुंगात घालवली. आपल्या अनुभवावर त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे.

या पुस्तकात ते म्हणतात, "सकाळी 8 ते 8:30 वाजे दरम्यानची वेळ सर्वात महत्त्वाची असायची. कारण सर्वसाधारणपणे याच वेळेस कैद्यांना त्यांच्या फाशीची सूचना दिली जात असे."

त्यांनी पुढे लिहिलं आहे, "तुम्हाला सर्वात भयंकर चिंता, भय वाटू लागतं. कारण तुम्हाला हे माहित नसतं की फाशीच्या शिक्षेची सूचना देणारे कर्मचारी तुमच्या कोठडीसमोर थांबणार आहेत की इतर कोणाचा नंबर लागणार आहे. त्याक्षणी मनात निर्माण होणारी भावना किती भीतीदायक, भयानक होती, हे व्यक्त करणं अशक्य आहे."

91 वर्षांच्या हिडेको म्हणतात की आपल्या लहान भावाचं रक्षण करण्याची आवश्यकता त्यांना नेहमीच वाटत होती
फोटो कॅप्शन, 91 वर्षांच्या हिडेको म्हणतात की आपल्या लहान भावाचं रक्षण करण्याची आवश्यकता त्यांना नेहमीच वाटत होती

2009 च्या अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या अहवालाचे जेम्स वेल्श हे प्रमुख लेखक आहेत. फाशीच्या शिक्षे संदर्भातील परिस्थितीवर हा अहवाल आहे. त्यात त्यांनी नमूद केलं आहे की,

"रोजच्या रोज लवकरच येणाऱ्या मृत्यूचा धोका वाटणं ही एक क्रूर, अमानवी आणि कैद्याला अत्यंत हीन दर्शविणारी बाब आहे."

या अहवालात असा निष्कर्ष काढण्यात आला होता की या प्रकारामुळे कैद्यांना "मोठ्या स्वरुपात गंभीर मानसिक आजार होण्याचा धोका आहे."

जसजशी वर्षे पुढे सरकत होती तसतसं आपल्या भावाचं मानसिक आरोग्य बिघडत चालल्याचं हिडेको यांना दिसत होतं.

हिडेको यांनी सांगितलं, "एकदा त्यानं मला विचारलं, 'मी कोण आहे हे तुला माहित आहे का?' त्यावर मी उत्तरले, 'हो मला माहित आहे. तू इवाओ हाकामाटा आहेस.' त्यावर तो म्हणाला 'नाही', 'तुम्ही इथे वेगळ्या व्यक्तीला भेटायला आले असाल.' त्यानंतर तो त्याच्या कोठडीत परत गेला."

हिडेको आपल्या भावाच्या प्राथमिक प्रवक्त्या आणि वकील झाल्या. मात्र 2014 सालापर्यंत त्यांच्या भावाच्या प्रकरणात यश मिळालं नव्हतं.

इवाओ हाकामाटा ज्या ठिकाणी काम करत होते तिथे मिसो टाकीत लाल डाग लागलेले कपडे सापडले होते. इवाओ हाकामाटा यांच्याविरोधात असणारा तो सर्वात महत्त्वाचा पुरावा होता.

हे कपडे हत्या झाल्यानंतर एक वर्ष आणि दोन महिन्यांनी हे कपडे सापडले होते. सरकारी वकिलांनी सांगितलं की ते कपडे इवाओ हाकामाटा यांचेच आहेत.

मात्र अनेक वर्षे हाकामाटा यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की त्या कपड्यांवर सापडलेले डीएनए हाकामाटा यांच्या डीएनएशी जुळत नाही. हाकामाटा यांच्या वकिलांनी आरोप केला होता की हा पुरावा नंतर पेरण्यात आला आहे.

अखेर बहिणीमुळे भावाला न्याय मिळाला

2014 मध्ये हिडेको यांच्या प्रयत्नांना यश आलं. इवाओ हाकामाटा यांची तुरुंगातून सुटका करण्यास आणि त्यांच्यावर खटला पुन्हा चालवण्यास न्यायाधीशांची मंजूरी मिळवण्यात त्या आणि त्यांचे वकील यशस्वी झाले.

म्हणजेच आता इवाओ यांच्यावरील खटल्याची नव्यानं सुनावणी होणार होती.

प्रदीर्घ कायदेशीर कारवाईमुळे या खटल्याची सुनावणी पुन्हा सुरू होण्यासाठी ऑक्टोबर उजाडला. अखेर जेव्हा खटल्याची सुनावणी सुरू झाली तेव्हा आपल्या भावाची बाजू मांडण्यासाठी आणि त्याला जीवनदान मिळवून देण्यासाठी हिडेको न्यायालयात हजर झाल्या.

हाकामाटा यांचं भवितव्य कपड्यांवरील त्या डागांवर अवलंबून होते. खासकरून आता ते कपडे आणि त्यावरील डाग जुनाट झाले होते.

फिर्यादी पक्षानं दावा केला की कपडे जेव्हा सापडले तेव्हा त्यावरील डाग लाल रंगाचे होते. मात्र बचाव पक्षानं युक्तिवादकेला की मिसोमध्ये इतके दिवस बुडवल्यामुळे ते रक्ताचे डाग काळ्या रंगाचे झाले असते.

हा मुद्दा या खटल्याची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीश कोशी कुनी यांना वस्तुस्थिती पटवून देण्यासाठी पुरेसा होता. त्यानंतर न्यायाधीश म्हणाले की "तपास अधिकाऱ्यांनी कपड्यांवर रक्ताचे डाग नंतर लावले होते आणि घटना घडल्यानंतर ते कपडे मिसो टाकीत लपवले होते."

न्यायाधीश कुनी यांना पुढे आढळलं की तपास अहवालासह इतर पुरावे देखील बनावट किंवा खोटे आहेत. त्यामुळे त्यांनी हाकामाटा निर्दोष असल्याचा निकाल दिला.

या निकालानंतर हिडेको यांची पहिली प्रतिक्रिया म्हणजे त्यांना रडू कोसळलं होतं.

जेव्हा न्यायाधीशांनी म्हटलं की आरोपी दोषी नाही, "तेव्हा मला अतिशय आनंद झाला. मला अश्रू अनावर झाले होते. मी काही सहसा रडणारी व्यक्ती नाही. मात्र त्याक्षणी माझ्या डोळ्यांतून जवळपास एक तास सतत अश्रू वाहत होते."

ओलीस ठेवण्यात आलेला न्याय

हाकामाटा यांच्या विरोधातील पुरावे खोटे होते आणि नंतर पेरण्यात आले होते, या न्यायालयाच्या निष्कर्षमामुळे काही त्रासदायक प्रश्न निर्माण होतात.

जपानचा दोषी ठरवण्याचा दर 99 टक्के आहे. जपानमधील ह्युमन राईट्स वॉच चे संचालक काने डोई यांच्यानुसार, "न्याय ओलीस ठेवणारी ही जी तथाकथित न्यायव्यवस्था आहे ती अटक केलेल्या लोकांना त्यांच्यावरील आरोप सिद्ध होईपर्यंत त्यांना निर्दोष मानण्याचं तत्व, तसंच जामिनाची तात्काळ आणि न्याय्य सुनावणी आणि तपासाच्या वेळेस वकिलांची मदत नाकारते."

डोई यांनी 2023 मध्ये निरीक्षण नोंदवलं की, "न्यायालयीन प्रक्रियेतील अपमानास्पद प्रक्रियांमुळे अनेकाचं आयुष्य आणि त्यांची कुटुंबं उदध्वस्त झाली आहेत. तसंच अनेकांना दोषी नसताना शिक्षा झाल्या आहेत."

डेव्हिड टी जॉन्सन, मनोआ मधील हवाई विद्यापीठात समाजशास्त्राचे प्राध्यापक आहेत. ते जपानमधील न्यायव्यवस्था, तपास यंत्रणा यांच्यावर संशोधन करतात. ते गेल्या 30 वर्षांपासून हाकामाटा प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.

ते म्हणाले की ते यात ओढले गेले याचं एक कारण म्हणजे, "या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे 2010 पर्यंत त्यांना उघड करण्यात आले नव्हते."

जॉन्सन बीबीसीला म्हणाले, "या प्रकरणात न्याय देण्याबाबतचं अपयश हे "अतिशय वाईट आणि अक्षम्य स्वरुपाचं" होतं. न्यायाधीश या खटल्याला मागे सारत होते. एरवी व्यस्त असल्यामुळे अनेकदा ते पुनर्विचार याचिकांच्या बाबतीत तसंच करतात. कायदा देखील त्यांना तसं करण्याची परवानगी देतो."

आपल्या भावाच्या खटल्याची सुनावणी पुन्हा व्हावी यासाठी हिडेको यांनी कित्येक वर्षे प्रयत्नं केले

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आपल्या भावाच्या खटल्याची सुनावणी पुन्हा व्हावी यासाठी हिडेको यांनी कित्येक वर्षे प्रयत्नं केले

हिडेको म्हणतात, या प्रकरणात त्यांच्या भावाकडून जबरदस्तीनं घेण्यात आलेला खोटा कबुली जबाब आणि त्यांच्यावर करण्यात आलेली जबरदस्ती, टाकण्यात आलेला दबाव ही बाब अन्यायाचा केंद्रबिंदू होती.

मात्र जॉन्सन म्हणतात की फक्त एका चुकीमुळे खोटे आरोप होत नाहीत. त्याऐवजी ते पोलिस यंत्रणेपासून ते फिर्यादी वकील, न्यायालय आणि संसदेपर्यंतच्या सर्व पातळ्यावरील संयुक्त अपयशामुळे होत आहेत.

जॉन्सन पुढे म्हणाले, "न्यायाधीशांचा शब्द शेवटचा असतो. जेव्हा शेवटी चुकीचा निकाल दिला जातो, तेव्हा तो तसाच स्वीकारावा लागतो. कारण त्यांनी तसा तो दिलेला असतो. अनेकदा चुकीचा निकाल देण्यासाठी किंवा शिक्षा देण्यासाठी न्यायाधीशांची जबाबदारी दुर्लक्षिली जाते, वगळली जाते आणि त्याकडे दुर्लक्ष केलं जातं."

त्या पार्श्वभूमीवर, हाकामाटा यांची निर्दोष मुक्तता हा पूर्वलक्षी न्यायाच्या बाबतीतील एक दुर्मिळ आणि अत्यंत महत्त्वाचा क्षण होता.

हाकामाटा निर्दोष असल्याचा निकाल दिल्यानंतर, न्याय देण्यासाठी झालेल्या प्रदीर्घ दिरंगाईबद्दल, या खटल्याची पुनर्सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांनी हिडेको यांची माफी मागितली.

त्यानंतर थोड्याच वेळानं शिझुओका पोलिस दलाचे प्रमुख ताकायोशी त्सुदा, हिडेको यांच्या घरी गेले आणि हिडेको आणि त्यांच्या भावासमोर नतमस्तक झाले.

"गेली 58 वर्षे...आमच्यामुळे तुम्हाला कल्पनेपलीकडील चिंता आणि ओझ्याला तोंड द्यावं लागलं. आम्ही खरोखरंच माफी मागतो," असं त्सुदा त्यावेळी म्हणाले.

त्यावेळेस हिडेको यांनी पोलीस प्रमुखांना एक अनपेक्षित उत्तर दिलं.

त्या म्हणाल्या, "आम्हाला वाटतं की जे काही घडलं ते आमच्या नशीबाचा भाग होतं. आमची कशाबद्दलही तक्रार नाही."

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

गुलाबी दरवाजा आणि बहीण-भावाचं ह्रदयस्पर्शी नातं

जवळपास 60 वर्षे चिंता आणि प्रचंड मानसिक यातना, दु:खातून गेल्यानंतर हिडेको यांनी त्यांचं घर विशिष्ट पद्धतीनं सजवलं आहे. जणूकाही त्यांच्या आयुष्यात प्रकाश आल्याप्रमाणेच त्यांनी घराला देखील तसंच रुप दिलं आहे.

काही खोल्या उजळ, स्वागत करणाऱ्या आणि आकर्षून घेणाऱ्या आहेत. त्या हिडेको आणि त्यांचा भाऊ इवाओ यांचे त्यांच्या कुटुंबाबरोबरचे, मित्रांबरोबरचे आणि पाठिराख्यांबरोबरच्या चित्रांनी भरलेल्या आहेत.

आपल्या कुटुंबाचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो पाहत असताना, आपल्या लहान "गोंडस" भावाच्या लहानपणीच्या आठवणी सांगताना हिडेको हसतात.

सहा भावंडांमध्ये सर्वात लहान असलेले इवाओ सतत हिडेकोबरोबर उभे असलेले दिसतात.

"लहानपणी आम्ही नेहमीच सोबत असायचो. आपल्या लहान भावाची आपल्याला काळजी घ्यायची आहे, हे मला नेहमीच माहित होतं. तशी मी घेते आहे."

त्या इवाओ यांच्या खोलीत जातात आणि त्यांच्या जिंजर कॅट (विशिष्ट जातीची मांजर)ची ओळख करून देतात. साधारणपणे इवाओ ज्या खुर्चीवर बसलेले असतात त्या खुर्चीवर ही मांजर बसलेली होती. इवाओ तरुण व्यावसायिक बॉक्सर असतानाच्या त्यांच्या फोटोकडे हिडेको लक्ष वेधतात.

"त्याला बॉक्सिंग चॅम्पियन व्हायचं होतं. मात्र तशातच ही घटना घडली," त्या म्हणतात.

2014 मध्ये हाकामाटा यांची सुटका झाल्यानंतर हिडेको यांना त्यांचा फ्लॅट शक्य तितका उजळ, चमकदार बनवायचा होता. त्यामुळेच त्यांनी घराच्या पुढच्या दरवाजाला गुलाबी रंग दिली.

त्या पुढे सांगतात, "मला वाटत होतं की तो जर उजळ, चमकदार खोलीत राहील आणि त्याचं आयुष्य आनंदी असेल तर तो नैसर्गिकरित्या बरा होईल."

88 वर्षांचे इवाओ हाकामाटा यांची सप्टेंबर 2024 मध्ये निर्दोष मुक्तता करण्यात आली होती

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 88 वर्षांचे इवाओ हाकामाटा यांची सप्टेंबर 2024 मध्ये निर्दोष मुक्तता करण्यात आली होती

हिडेको यांच्या फ्लॅटला भेट देणाऱ्याच्या लक्षात येणारी पहिली गोष्ट म्हणजे, आशा आणि कणखरपणाचा हा उजळ, चमकदार संदेश.

हिडेको यांच्या योजनेचा, घरातील वातावरण तयार करण्याच्या गोष्टीचा परिणाम इवाओ यांच्यावर झाला की नाही हे स्पष्ट नाही. इवाओ हाकामाटा अजूनही तासनतास मागे-पुढे येरझारा घालतात. तीन सिंगल टाटामी चटईच्या आकाराच्या तुरुंगातील कोठडीत त्यांनी वर्षानुवर्षे अशाच येरझारा घातल्या होत्या.

जर या प्रकारे इवाओ यांच्याबाबतीत भयंकर अन्याय झाला नसता तर त्यांचं आयुष्य कसं राहिलं असतं या प्रश्नावर रेंगाळण्यास हिडेको नकार देतात.

त्यांच्या भावाच्या वाट्याला जे दु:ख आलं, यातना आल्या, त्यासाठी कोण दोषी आहे, असं विचारलं असता, हिडेको म्हणतात, "कोणीच नाही."

त्या पुढे सांगतात, "जे घडलं त्याबद्दल तक्रार करत राहिल्यास आम्ही कुठेच पोहोचू शकणार नाही, पुढील वाटचाल करता येणार नाही."

आपल्या भावाला आरामात ठेवणं, त्याची काळजी घेणं, यालाच हिडेको यांचं प्राधान्य आहे. त्या आपल्या भावाची दाढी करू देतात, त्यांच्या डोक्याला मालिश करतात, दररोज सकाळी भावाच्या नाश्त्यासाठी सफरचंद चिरतात आणि जर्दाळूचे तुकडे करतात.

हिडेको यांच्या 91 वर्षांच्या आयुष्यातील बहुतांश काळ त्यांच्या भावाला स्वातंत्र्य आणि न्याय मिळवून देण्यासाठी लढा देण्यात गेला आहे.

त्या म्हणतात, जे काही घडलं ते त्यांचं नशीब होतं.

"मला आता भूतकाळाचा विचार करायचा नाही. मी आणखी किती दिवस जगणार आहे, हे मला माहित नाही. इवाओनं पुढील आयुष्य शांततेत जगावं एवढीच माझी इच्छा आहे," असं हिडेको म्हणतात.

चिका नाकायामा यांच्या अतिरिक्त रिपोर्टिंगसह

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)